प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-२

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल.
भाग-२ 
 
दुसऱ्या दिवशी सकाळी,
डोकं ठणठणत होतं, फार काहीतरी अवजड भार डोक्यावर ठेवला असावा इतकं डोकं जड झालेलं. वेदनेची एक तीव्र कळ मेंदूत सणसणत गेली आणि त्याने पाय मागे पुढे करत हालचाल सुरू केली. हाताच्या दोन्ही मुठी घट्ट आवळत, दातांवर दात घासत त्याने अस्पष्ट आरोळी ठोकली. श्वास वर खाली होत होते. हात ओढले गेल्याने सलाईन च्या स्टॅन्ड ला लागून असलेला टेबल हलला. तसा त्या आवाजाने बाहेर बसून असलेल्या करणने काचेतून आत पाहिले. त्याची होणारी हालचाल पाहून त्याने लगेच तिथल्या मेडिकल स्टाफला कळवले.  डॉक्टरांनी आत जाऊन त्याला चेक केले.
" पेशंटला शुद्ध आली आहे. डोक्याला मार लागला असला तरी मेंदूला तेवढी फार काही गंभीर इजा झालेली नाही. त्यामुळे काळजीच कारण नाही. " करणच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून ‌‌डाॅक्टरांनी त्याला स्पष्टीकरण दिले.
" पण मग तो रात्रभर बेशुद्ध कसा काय म्हणजे याचा अर्थ..."
" डोक्याला मार लागल्याने ते बेशुद्ध होते तसेच  सलाईन इंजेक्शन च्या प्रभावामुळे ते झोपून गेले. आणि त्यांच्या मेंदूला आराम अत्यावश्यक आहे. पण तरी सुदैवाने पेशंटच्या डोक्याला अंतर्गत कोणतीही इजा झालेली नाही." 
" ओके. मग मी...मी आता त्याला भेटू शकतो का? "
"हो नक्कीच" 
" Thank you Doctor, thank you so much" डाॅक्टरांचे हात हातात घेत तो त्यांचे आभार मानू लागला.यावर डाॅक्टरांनीही हसून त्याला प्रतिसाद दिला.
सार्थक उशीला डोकं टेकवून डोळे मिटून शांत बसला होता. तोच
" सार्थक...." एक अस्पष्ट हाक कानावर पडली. आणि चेहऱ्यावर एक हास्य आलं.मुसमुसण्याचा आवाज येत होता.
" गळ्यात पडून रडायला आत आला असशील तर बाहेर हो आधी..." तो डोळे बंद करूनच पण जरा चढ्या आवाजात बोलला.
" नाही नाही मी रडत नाहीये." डोळे पूसत करण म्हणाला.तसं सार्थकने डोळे उघडून एक मोठी स्माईल दिली त्याला.
"HAPPY FRIENDSHIP DAY BUDDY " सार्थक म्हणाला तसा करणने त्याची गळाभेट घेऊन परत त्याला विश केलं.
" तूही इक यार मेरा, तेरे बिना है ये जहा अधूरा.." करण 
" हो पोचल्या भावना आधीच. तुला कोणतं गाणं डेडिकेट करावं बरं..... हा आठवलं
यार मेरा सुपरस्टार, रडका कलाकार.." 
तसे ते दोघेही मनमोकळं हसले.
 
सार्थक हे एक हसतं खेळतं व्यक्तिमत्व होतं. हुशार, प्रेमळ माणूसकी जपणारा असा तो होता. मुंबईत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये हद्यरोगतज्ञ म्हणून एक वर्षापुर्वी च शिफ्ट झालेला. तेव्हा त्याला करण भेटला. दोघेही एका बिल्डिंग मध्ये शेजारीच राहायचे. करणही गावाहून मुंबईत ३ वर्षांपूर्वी येऊन एका कंपनीत बड्या पोस्टवर होता. वर्षभरात करणने त्याला कधी आजारी पडलेलं किंवा आराम करत बसलेलं बघितलं नव्हतं. म्हणून आज त्याला असं बघून त्याला सार्थकसाठी वाईट वाटत होतं. त्याच्या ह्या कंडीशनला तो स्वत: ला जबाबदार समजत होता. पण आता सार्थकच्या फ्रीली बोलण्याने मनातलं साचलेपण कमी झालेले.
तर दुसरीकडे सार्थक मात्र वेगळ्याच विचारात होता. तो अजूनही त्या घटनेतून बाहेर आला नव्हता. जे घडलं ते खरं होतं की नाही यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता.ती मुलगी नक्कीच एखादी पोलिस अधिकारी असावी असं त्याला मनोमन वाटत होतं. एकूणच कालच्या त्या मुलीबद्दल  खूप मोठं  प्रश्नचिन्ह पडलेलं. करणशी बोलून मनातली खदखद व्यक्त करावी असं फार वाटत होतं पण आता इथे त्याला याबद्दल बोलून टेन्स करायचं नव्हतं. म्हणून घरी गेल्यावर सविस्तर बोलू असा विचार करून त्याने तो विषय तात्पूरता बाजूला ठेवला.
 
स्थळ-मुंबई हायकोर्ट
वेळ- साधारण दुपारची
  राज्यासह देशभर चर्चित असलेल्या 'नागपूर तिहेरी हत्याकांड प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी चालू होती. या प्रकरणात तेथील बड्या राजकीय नेत्याचा मुलगा व त्याचे काही साथीदार यांचा मुख्य आरोपी म्हणून समावेश होता. त्या नेत्याचे दिल्लीत वजन असल्याने साहजिकच ही केस माध्यमातून हायप्रोफाइल केस ठरलेली. कोर्टाच्या आवारात कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. अखेर सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस कठोर शिक्षा सुनावली. 
 
निकाल कळताच तिथे उपस्थित समर्थकांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. माध्यमं, वृत्तपत्र प्रतिनिधींनी सदर नेत्याच्या भोवती गराडा घातला होता. हा अन्याय असल्याच्या आणाभाका  घेतल्या जात होत्या.
तेवढ्यात साधारण ३० वर्षीय महिला वकिल तिच्या सहायक वकिलासमवेत कोर्टाबाहेर येत असल्याचं दिसलं. आणि माध्यमांनी तिकडे धाव घेतली.
" राजकीय सूडापोटी तुम्ही खोट्या पुराव्यांच्या आधारे हा कट रचून एका बड्या नेत्याला जाणीवपूर्वक  अडकवले आहे, असा आरोप तुमच्यावर होतोय हे खरं आहे का?" 
" या कटामागे विरोधी शक्तींचे अदृश्य हात तुमच्या पाठीशी आहेत असं बोललं जात आहे यावर काय प्रतिक्रिया आहे आपली ?"
" या सर्व प्रकरणात तुमच्यावर होत असलेल्या आरोपांचं ठोस उत्तर आहे का तुमच्याकडे ?"हे आणि असे अनेक प्रश्न माध्यम प्रतिनिधी विचारत होते.
" मुळात कोणत्या निष्कर्षाच्या आधारावर तुम्ही बोलताय? काय खरं आणि काय खोटं माहित करून न घेता केवळ ऐकीव माहितीवर आधारित तथ्यहिन प्रश्नांवर मला बोलण्याची गरज वाटत नाही." ती शांतपणे म्हणाली. तिच्या आवाजात ना कोणते भाव होते ना कोणत्या मर्यादा. एवढं बोलून ती तडक तिथून निघाली.
तर ती होती अॅड. गौरवी सपकाळ. ही केस आपणच जिंकणार अशा आविर्भावात असणार्या सर्वशक्तिशाली तथाकथित नेत्याला या स्वप्ननगरीतून बाहेर यायला भाग पाडलं ते गौरवीने....अखेरच्या क्षणी तिने केलेला युक्तिवाद , पुराव्यांच्या आधारे केलेली शिस्तबद्ध व पद्धतशीर मांडणी मोलाची ठरली. न्यायाधीशांच्या तीन सदस्यीय समितीने याच पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध निकाल देऊन कठोर शिक्षा सुनावली.
 

एका आलिशान हॉटेलच्या खोलीत एक तरूण व्यक्ती हे सगळं लाईव्ह पाहत होता. उत्तराच्या अपेक्षेत असलेल्या पत्रकारांना प्रतिप्रश्न करून खडे बोल सुनावलेले त्याने पाहिले. आणि टीव्ही बंद झाला.त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य पसरलं.
 
" A lady lawyer possesses a certain kind of power that may both force you into hellfire and assist you in obtaining justice. CAPS OF U GAURAVI" स्मितहास्य करत तो स्वत:शीच म्हणाला. 

गौरवी कोर्टाच्या आवाराबाहेर निघालेली असताना अचानक एक ६० वर्षीय गृहस्थ समोर आला.त्याला पाहून तिच्या ओठांवर एक कुत्सित हास्य पसरलं.तो तोच नेता होता ज्याच्या मुलाविरोधात निकाल लागलेला.
" फार माज आहे ना तुला एक दिवस नाही तुझा हा सगळा माज उतरवला ना तर नाव नाही लावणार रामानंद महामुनी"
" Ohh, thanks for that"  ती त्याच्याकडे न बघता उपहासात्मक म्हणाली.
" गौरवी सपकाळ याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील तुला. एक दिवस महागात पडेल हे सगळं एवढी मोठी किंमत मोजावी लागेल तुला हे गाठीशी ठेव. " तो अजूनच जास्त चवताळून म्हणाला.
" I'm eagerly waiting for that day Mr. Mahamuni. all the best" इकडेतिकडे पाहत ती त्याला बोलत होती. 
" चूकीच्या माणसाशी पंगा घेतलाय तू. .....तुला माहित नाही मी कोणय ते आणि काय करु शकतो यावर........
" तो पुढे बोलतच होता की तिने रोखून त्याच्याकडे बघितलं.आणि त्याचे पुढचे शब्द गळ्यातून बाहेर पडलेच नाहीत.तिची रोखलेली स्थिर नजर समोरच्याला अस्थिर करण्यास पुरेशी होती. 
       तिच्या सोबत असणार्या असिस्टंट कडे चलण्याचा कटाक्ष टाकून ती तिथून झरकन वार्याच्या वेगाने निघून गेली.तिच्या पाठमोर्या आकृतीकडे मि. महामुनी रागाने धूसपूसत बघत होता.तोच मागून आवाज आला.
" कसं आहे ना महामुनीजी, पैसा आणि सत्तेच्या जोरावर न्याय विकत घेणं हे लाच घेण्याइतपत सोपं नसतं. कायद्यासमोर सगळे सारखेच असतात"  
" ए, चल तू मला शहाणपणा शिकवू नको" महामुनी दात ओठ खात त्याला म्हणाला.आणि नेमकं हेच जाता जाता गौरवीने ऐकलं.
" कृणाल....." तिने हाक मारताच कृणाल धावत तिच्यामागे गेला. तर कृणाल हा गौरवीचा सहायक वकिल असून तो तिचा सहकारीही होता.
" काय मी पण कोणत्या गाढवासमोर गीता वाचत होतो राव " गाडीत बसून कृणाल स्वत:शी च बडबडत होता. यावर गौरवीने त्याच्याकडे तुला काय गरज होती गाढवाच्या नादी लागण्याची अशा अंदाजात पाहिले.
" नाही तर काय, जाऊद्या सोडा. हा पण त्याचं तोंड बघण्यालायक झालेलं. मला तर एक छानसा फोटो काढावा वाटत होता. " कृणाल हसत म्हणाला.
" इडियट..." त्याच्या त्या वाक्यावर  ती याच काही नाही होऊ शकत अशा अर्थी मान हलवत म्हणाली.
" But mam what's about next? " त्याने गंभीर होत विचारले.
" As we decided yesterday . Get sure about  all instructions" ती समोर बघत बोलली. तिच्या चेहऱ्यावर ना केस जिंकल्याचा आनंद होता ना कसला अभिमान. तिला फक्त एकाच गोष्टीचं समाधान होतं. सत्य कधीही पराभूत होत नाही एवढच तिला माहित होतं. 
हाॉस्पिटलमध्ये.
सार्थकला डाॅक्टरांनी घरी जाण्याची परमिशन दिली होती. डिस्चार्जची सगळी प्रोसिडर पूर्ण झाल्यावर ते दोघेही तिथून निघाले. सार्थकची नजर मात्र चहुबाजूला भिरभिरत होती. ते पाहून करणने शेवटी त्याला विचारलेच.
" काय बघतोय एवढ, हाॅस्पिटल कधी बघितलं नाही का " 
" तू माझीच खेच हा " सार्थक ने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि परत सगळं निरखून पाहायला लागला.
" नाई मी काय म्हणतो तुला इथून जायचं नसेल तर तू इथेच मुक्काम ठोक हवं तर.. " करणने परत एकदा निशाणा साधला.  तसं सार्थकने जरा नाराजीनेच पाहिले त्याच्याकडे. . . 
" अरे म्हणजे तू याच हाॅस्पिटलमध्ये शिफ्ट हो असं म्हणत होतो मी" करणने जरा बाजू सावरत म्हणलं. नाहीतर डॉक्टर साहेब सदम्यात गेले असते. बोलत बोलत ते हाॅस्पिटलच्या मेन डोअर जवळ आले.पण सार्थकला अचानक काय सूचलं काय माहित. 
" करण तू हो पुढे आणि गाडी काढ पार्किंगमधून मी आलोच." त्याने असे म्हणताच करणही पडत्या फळाची आज्ञा मानून पुढे निघाला. तोच सार्थकने रिसेप्शनिस्ट जवळ जाऊन तिथे विचारले.
" Excuse me madam, मी सार्थक अभ्यंकर. मला जरा...हा ते काल मी इथे अॅडमिट होतो तेव्हा माझी काही डिटेल्स फिल करायची राहिलीत का ते विचारायचं होतं." शब्दांची जुळवाजुळव करत कसंबसं तो म्हणाला.
" तुमच्यासोबत असणार्याने सगळी डिटेल्स लिहिली आहेत सर"  तिने तसं म्हणताच तो गप्प झाला. पण अचानक काहीतरी आठवून परत म्हणाला.
" ते माझ्या मित्राला ना नंबर्स लक्षात राहत नाहीत.जरा विसरभोळा आहे तो म्हणून म्हणतोय मी बाकी काही नाही. "
" ओके" म्हणत तिने त्याला कालची रेजिस्टर मध्ये नोंद केलेला त्याच्या नावाचा कॉलम ओपन करून ती माहिती त्याला दाखवली. त्याला जे पाहायचं होतं ते त्याने पाहिले. पण तिथे ज्या व्यक्तीचं नाव असायला पाहिजे होतं तिथे तर करणचं नाव होतं शिवाय सही पण त्याचीच होती.हे त्याला अपेक्षित नव्हतं. कारण त्याला काल रात्री त्या मुलीने आणलेलं पण मग तिचं नाव इथे असायला पाहिजे होतं. पण इथे तर...
" Thank you mam" एवढं बोलून तो तिथून निघाला पण तरी त्याने गेटजवळ आल्यावर गार्डला विचारलं त्यानेही तेच उत्तर दिले. तेवढ्यात करणने हाॅर्न वाजवून त्याला भानावर आणलं आणि गाडीत बसून ते दोघे तिथून निघून गेले.
ते जाताच त्या गार्डने कुणाला तरी फोन करून ते दोघे डिस्चार्ज घेऊन घरी गेल्याचे कळवले.आणि फोन कट झाला.
 
क्रमशः
©️®️ अबोली डोंगरे. 
 
 

🎭 Series Post

View all