Login

आई-बाबांचं हरवलेलं पत्र आणि ती

A girl finds her parent's letter after their demise which changes her life drastically.

स्मार्टफोनच्या आधुनिक जगात ती पेनने डायरी लिहायची.. जिथे वाढदिवसाला एक मेसेज समोरच्याला केला आणि स्टेटस स्टोरीला त्याचा एक फोटो ठेवला की समोरचा खुश तिथे ती सगळ्यांना शक्यतोवर भेटून किंवा फोन करून शुभेच्छा द्यायची... जिथे आज वेगवेगळ्या ऍप्सवरून फोटो, व्हिडिओस टाकून,स्टोरी टाकून आपला आनंद, दुःख, भावना सगळं मांडलं जातंय, तिथे ती हे सगळं अंगणातल्या तुळशीला...जी तिची सर्वात चांगली मैत्रिण होती तिला सांगायची... जिथे ई-मेलवर सगळं बोलणं होतंय तिथे ही अजूनही पत्र लिहायची...

इतरांना ती आवडत नव्हती..ती चुकीची वाटायची पण तिचा अट्टाहास नव्हता की कुणाला ती आवडावी..ती चुकीची नव्हतीच मुळी फक्त इतरांपेक्षा वेगळी होती..

पण का होती वेगळी कुणीच जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला.. जिथे दोन मिनिटात जे सांगायचं आहे ते मोबाईल वर टाइप करून पाठवलं की समोरच्याला मिळतं तिथे ती पोस्टात जाऊन पत्र का पाठवत असेल?

कारणही तसंच होतं. तिलाही आधी स्मार्टफोनचं आकर्षण होतं. तिने त्यासाठी घरी हट्टदेखील केला होता पण गरीब परिस्थतीमुळे आईवडील तिला फोन देऊ शकले नाही. असं याआधीही बऱ्याच वेळा घडलं होतं,  तिला हवं ते तिला मिळत नव्हतं मग ती अजूनच चिडचिडी होत चालली होती. परिणामी तिचे नाते खूपच कटू झाले आईवडिलांशी....तिने रागारागातच ठरवलं की स्वतः कमवून घेऊनच दाखवेल आता फोन आणि सगळं काही आणि जिद्दीला पेटली. आई बाबा पत्र लिहायचे गावी सगळ्यांना तर तिला खूप राग यायचा की किती हे लोक मागासलेले आहेत अजूनही.. फोनवर हेच बोलणं पाच मिनीटमधे समोरच्यापर्यंत पोहचते.

ते काहीही सांगायला गेले तरी ती दुर्लक्ष करायची. तिने शिक्षण पूर्ण केलं, नोकरीला लागली दुसऱ्याच महिन्यात फोन घेतला आणि आभासी दुनियेत हरवली. नवीन नवीन ते जग तिला खूप सुंदर वाटत होतं, अगदी भारावून गेली ती. हळूहळू परिस्थती सुधारली, पैसे आले. नवीन घर घेतलं. सगळं तिच्या मनासारखं होतं तरीही आईवडिलांना काडीची किंमत देत नव्हती. असेच दिवस जात होते, एक दिवस अचानक काळाने घाव घातला,त्यांचा दोघांचा भयंकर अपघात झाला आणि ते जागीच मृत पावले.

ती तर अजूनही धक्क्यात होती. तिचा विश्वास बसत नव्हता जे घडलंय त्यावर..तिला आता उणीव भासत होती की आपण काय गमावून बसलोय.. पण आता कितीही जाणीव झाली तरी काही फायदा नव्हता. अंत्यविधीला सगळे गावाकडचे लोक उपस्थित होते ज्यांना ती आतापर्यंत मागासलेले समजत होती. तिच्या आभासी मैत्रीच्या जगात कुणालाही वेळ नव्हता तिच्या आयुष्यात काय चाललंय ते बघायला अंत्यसंस्कार पार पडले. आलेले पाहुणे ज्याच्या त्याच्या घरी परतले, आता मात्र ती एकटी पडली.


काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात तिला आठवलं,तिचे बाबा तिला नेहमी म्हणायचे, आम्ही गेल्यावर ही बॅग उघडून सगळं बघ. तुझ्यासाठी काहीतरी ठेवून जाणार आहे मी.. ती म्हणायची समोर तर आहोत, आताच द्या काय द्यायचं ते पण ते तिला सांगायचे,"आम्ही गेल्यावर तू एकटी राहशील ना मग त्यावेळी त्या वस्तूमधे तुला तुझे हरवलेले आईबाबाही सापडतील कदाचित."

ती अधाशासारखं बाबांचं जुनं सामान उचकू लागली.. पण त्यात तिला तिच्या बालपणीच्या सगळ्या वस्तू सापडत होत्या, तिची बाहुली,तिची भातुकली.. तोडक्या मोडक्या पण खूप अनमोल आठवणी तिला त्यात सापडल्या.

त्यात तिच्या बाबांची एक डायरी तिला सापडली.त्यात त्यांनी लिहलेली असंख्य पत्र लिहलेली होती.
सगळी तिच्यासाठीच होती, प्रत्येक पत्रात त्यांनी तिची माफी मागितलेली होती. माफी तिला जत्रेत फुगा न घेऊन दिल्याबद्दल,  माफी तिला नवीन कपडे न देऊ शकल्याबद्दल, माफी तिला इंग्रजी माध्यमात न टाकता सरकारी शाळेत  टाकल्याबद्दल, माफी तिने मागितलेली प्रत्येक गोष्ट उशिरा दिल्याबद्दल,  माफी तिला आवडीचा फोन न घेऊन दिल्याबद्दल,  माफी तिच्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याबद्दल,  माफी चांगले पालक न होऊ शकल्याबद्दल, माफी तिच्या मनात आणि आयुष्यात जागा न मिळवू शकल्याबद्दल,  माफी तिला एकटं सोडून जाण्याबद्दल...????त्या पत्रांना अनुक्रमांक ही दिलेले होते त्यांनी.. त्यात पत्र क्रमांक दोन पासून सुरुवात होती जी तिच्या वय वर्ष तीन नंतरची होती. तिने ते पहिलं "हरवलेलं पत्र" शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला ते सापडलंच नाही.

काही दिवसांनी गावावरून तिच्या नावाने आलेलं एक पत्र तिला मिळालं.
ते पत्र तिच्या बाबांच्या बालपणीच्या मित्राचं होतं. तिने ते उघडलं ते तर त्यात बाबांचं हस्ताक्षर होतं.... तिच्या पायाखालची जमीन सरकली..त्यात लिहलेलं होत..

"प्रिय बेटा,

हे पत्र मी तुला या जगात नसेल तेव्हा मिळेल. पण आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.तू नेहमी आनंदी राहावी असं खूप वाटत होतं पण तुला आम्ही काहीच देऊ शकलो नाही याचं वाईट वाटतंय. तू आता सगळं तुझ्या जिद्दीने कमावलंस याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आज मी तुझी माफी मागणार आहे.. कारण आम्ही तुझ्यापासून आयुष्यभर लपवून ठेवलं की आम्ही तुझे जन्मदाते आईवडील नाही.

आम्हाला मुलबाळ नव्हतं आणि तू दोन अडीच वर्षाची असताना आम्हाला मंदिराबाहेर सापडली. कुणीच तुझी जबाबदारी घेत नव्हतं, पोलीस तुझ्या खऱ्या आईबाबांना शोधू शकले नाही. मग आम्हीच तुझे आईबाबा झालो.

खूप खूप त्रास दिला आम्ही तुला पण आम्हाला वाटलं होतं की त्या जीवनापेक्षा आम्ही तुला चांगलं जीवन देऊ शकू पण आम्ही असफल राहिलो त्याबद्दल खूप दुःख आहे आम्हाला..तू आम्हाला नक्की माफ करशील अशी माझी खात्री आहे.

हे तेच हरवलेलं पत्र आहे जे तू माझ्या सामानात शोधतेय.. तू कसलंच वाईट वाटून घेऊ नकोस. तू तुझ्या जागेवर बरोबर होतीस आणि आहेस.सदैव खुश रहा.

तुझेच आई -बाबा..."


ते सगळं वाचून तिचे अश्रू डोळ्यातून खाली ओघळले.तिला खूप पश्चाताप झाला होता पण आता त्याचा काही फायदा नव्हता. ही जाणीव उणीव भासण्याआधी झाली असती तर किती बरं झालं असतं. हरवलेलं पत्र सापडलं होतं पण हरवलेले आईबाबा आता तिला कधीच भेटणार नव्हते..

लेख आवडल्यास लाईक,शेयर आणि कमेंट करा.लेख निनावी शेयर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

©® सुवर्णा राहुल बागुल