हरवलेली माणुसकी

The poem is about human reacting inhumanly to the situations which are not to be celebrated. This poem directs to the miserable situations occuring in every human being and the reactions of other humans to it. Why human has lost humanity?

शिर्षक - हरवलेली माणुसकी
 
कोण होतास तू!
साधा आणि सरळ एक माणूस...
आयुष्याचे अनेक काचखळगे 
तुडवत तू, जगत राहीलास...
इथे कोणी कोणाचा नाही,
जो तो मतलबी आहे,
तूही या झंझावात फसलास,
फसलास ना, भुललास ना?
ह्या झगमगत्या जगाला....
चेहऱ्यावर रंगरंगोटी लावलेले,
मुखवटे घेवून फिरणारे ही माणसे
कधी कोणाला ओळखताच आली नाही...
गोल-गोल चक्राकार आपल्या भोवती
सतत ही फिरत असतात,
तरी आपण त्यांना ओळखत नाही....
इथे अनेक वेगवेगळ्या,
जाती-धर्माचे लोक आहेत,
प्रत्येकजण फक्त आपला स्वार्थ साधत आहे;
माणसा माणसातली इथे,
पदोपदी माणुसकी हरवत आहे....
कोण आहे याला जबाबदार?
तू, मी की हे समाजाचे ठेकेदार?
माणूस हा तोच असतो,
आत्माही तोच असतो,
फक्त त्यांचे विचार बदलतात....
का आणि कशासाठी बदलतात?
लालच, हव्यास आणि स्वार्थ,
यासाठीच माणूस हरवत चालला आहे....
त्यांच्यातली माणुसकी हरवत आहे,
जो तो एकमेकांना खाली खेचून;
पायदळी तुडवत आहे....
जो तो हेवेदावे करत आहे,
उठसूट एकमेकांचा गळा कापतो,
एक कोमल कळी कुस्करली जाते;
विधवेचा भर सभेत अपमान,
आईबापांना वृध्दाश्रम....
अरे थू.. तुमच्या जिंदगीवर!
कसला रे तू माणूस?
तू जन्मालाच का आलास या धरत्रीवर?
अरे माणसा, तुला माणूस सुध्दा,
बोलण्याची आता लाज वाटते...
अरे! शेवटी तू मातीतच जाणार आहेस ना?
मग कशासाठी, हे सर्व चाललं आहे?
अरे! का रे तुम्ही हा बाजार मांडला आहे?
माणुसकी ही विकत नाही मिळत,
ती कमवावी लागते...
पण्, इथे तर बाजारभाव चालला आहे,
माणसाच्या माणुसकीचा बाजारभाव!
हो! राजरोस तो विकला जातो,
तुडवला जातो पायाखाली....
इथे कोणाच्या किंकाळीचा आवाज;
कानावर पडत नाही, 
इथे फक्त छद्मी हास्य गडगडत असते....
इथे शरीराचे किती लक्तरे ओरबडली,
अन् शरीराचे किती तुकडे पडले,
कोणाला काही फरक नाही पडत;
इथे फक्त बघ्याची भूमिका मात्र
नाट्यमयरित्या बरोबर चालू असते....
कोणी फोटो काढतो, 
तर, कोणी व्हिडिओ काढतो;
एका क्षणासाठी का असेना,
पण्, माणूस त्या माणसाला;
सेलिब्रिटी मात्र नक्की बनवतो..…
इथे मदतीचा हात कोणी देत नाही
पण्, सेलिब्रिटी मात्र तो बनवतो,
कारण, इथे तो एक माणूस नाही;
तर तो एक श्रोता असतो....
फुकटात बघायला आलेला,
माणसातील माणुसकी हरवलेला;
तो एक माणूस असतो,
हो, तो एक माणूस असतो, 
जो असंच आपलं आयुष्य;
सडत जगत असतो....
त्याच्यातच आपलं सुख मानत असतो,
आणि कुजकं आयुष्य तो जगत असतो....
फक्त आयुष्य तो जगत असतो...

©®प्रणाली कदम
कल्याण, महाराष्ट्र