चिरडलेले बालपण

Story About Mother And Daughter Who Suffers From Child Sexual Abuse.
"रिया, अगं तुला काय झालं? आज शाळेत काहीच का उत्तरे दिली नाहीस?" राघव त्याच्या आठ वर्षांच्या मुलीवर आज चिडला होता. पण रिया फक्त खाली मान घालून उभी होती. काहीच बोलत नव्हती.

"नेहा, अगं बघ ना, आज शाळेत रियाची तोंडी परीक्षा होती. पण शिक्षिका म्हणाल्या की हिने काहीच उत्तरे दिली नाहीत. वर्गात पण हिचे लक्ष नसते, कुठेतरी शून्यात बघत असते. काय झालं आहे या मुलीला?" राघव वैतागून नेहाला म्हणजेच रियाच्या आईला सांगत होता.

          नेहाला सुद्धा गेल्या काही दिवसात रियामध्ये बदल जाणवला होता. तिला वाटलं होतं अभ्यासाचा ताण घेतल्याने रिया शांत असते, पण वर्गातील हुशार मुलगी आज काहीच उत्तरे न देता घरी परतली म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे, हे नेहा समजून गेली. 

        राघवचा राग शांत करत आणि रियाला समजावत नेहा म्हणाली,"रिया बाळा, जास्त टेन्शन घेऊ नकोस. कधीतरी आपण अभ्यासाचा अति ताण घेतो आणि त्यामुळे ऐनवेळी आपल्याला काही आठवत नाही, असं होतं. काळजी करू नकोस, आपण लेखी परिक्षेत चांगले मार्क पाडू. जा बरं फ्रेश होऊन ये, तुझ्यासाठी आज तुझे आवडते सँडविच केले आहेत." असं म्हणून नेहाने रियाला तिच्या खोलीत पाठवलं.

"अगं तू इतकी शांत कशी राहू शकतेस? रिया नक्कीच अभ्यास सोडून दुसरं काहीतरी करत असणार. ते इंस्टाग्रामवर रील्स वगैरे नाही ना बनवत ही? आपल्याला काहीच माहित नाही. आजपासून रियाचं टीव्ही बघणं आणि मोबाईलवर गेम खेळणं बंद करतो." राघव अजूनही रागातच होता.

"राघव, अरे आपला आपल्या मुलांवर विश्वास पाहिजे. मला नाही वाटत रिया टीव्ही, मोबाईलच्या आहारी गेली आहे. असं वाटतंय तिला काहीतरी सांगायचं आहे, पण ती बोलू शकत नाहीये. तिच्या मनात काहीतरी दडलंय. मला आजचा दिवस दे, माझ्याकडे मन मोकळं करतीये का बघते मी." नेहा राघवला समजावत असतानाच रियाचा जोरजोरात रडण्याचा आवाज आला. दोघेही धावातच तिच्या खोलीमध्ये गेले.

"आई... आई... रक्त... खूप दुखतंय गं.. आई गं...." रिया बाथरूममध्ये रडत होती. नेहाने जाऊन कमोडमध्ये पाहिलं तर लघवी करताना थोडा रक्तस्त्राव झाला होता आणि तिला तिथे दुखतही होतं. घडला प्रकार बघून नेहाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तिने रियाला जवळ घेतलं, तिला शांत करत बेडवर झोपवलं आणि मनोमन विचार करू लागली की,'रियाला पाळी आली? पण इतक्या लवकर? आजकालच्या मुलींना लवकर पाळी येते, पण मग तिच्या पोटात नाही तर लघवीच्या वाटे का दुखतंय? कदाचित युरीन इन्फेकशन झालं असेल.. पाणी कमी पीत असेल…उन्हाळा आहे ना.. पण... पण कारण हेच आहे की दुसरं की काही? रियासोबत तसलं काही घडलं की काय? अरे देवा.. नको नको..मी लागलीच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते. उगाच मनात नको ते विचार येतात.' मनोमन विचार करत नेहाने लगबगीने डॉक्टर शलाकाला फोन केला. रियाला सकाळची अपॉइंटमेंट मिळाली होती. राघव आणि नेहाने रियाला थोडं खाऊ घालून झोपवलं होतं. दोघेही सुन्न झाले होते. हतबलपणे सोफ्यावर बसले होते. चांगली हसणारी, खेळणारी मुलगी आज असं का वागत आहे? याचं उत्तर त्यांना सापडत नव्हतं.

"राघव, रियासोबत तेच तर घडलं नसेल ना?" नेहाने दबक्या आवाजात राघवला विचारलं.

"काय? कशाबद्दल बोलत आहेस तू?"राघव म्हणाला.

"काही वर्षांपूर्वी ज्याचा सामना मी केला होता, ज्या त्रासातून मी गेले होते, ज्या प्रसंगाने माझे जीवन बदलून टाकले, त्याच त्रासाबद्दल मी बोलत आहे. तिला कोणी नको तिथे स्पर्श तर करत नसेल ना?" नेहाने तिच्या मनातील भीती बोलून दाखवली.

"अगं नेहा, जरुरी नाहीये तुझ्यासोबत जे घडलंय ते रियासोबतसुद्धा घडलं पाहिजे. तू मनातून भलते विचार काढून टाक. आपण तिला 'गुड टच बॅड टच' शिकवला आहे. हे असलं काही घडू नये म्हणून तिला स्कूल वॅन किंवा बस सुद्धा लावली नाहीये. शाळेत सोडायला, आणायला मीच जातो. मग हे असलं घडणार तरी कधी? तू उगाच मनात भलत्या शंका आणू नकोस गं." राघव म्हणाला.

"राघव, मला वाटतंय की माझा भूतकाळ पुन्हा माझ्या पुढ्यात उभा राहिलाय. माझ्यासोबत हे असचं सगळं झालं होतं. शाळेतून घरी येताना त्या रिक्षावाल्या काकांचे हात मला नको तिथं स्पर्श करायचे. तेव्हा मला काही समजत नव्हतं. माझ्या शांतपणाचा फायदा घेऊन त्यांची हिंमत एवढी वाढली की तो हात माझ्या छातीवर आणि माझ्या निकरच्या आतही जाऊ लागला. अवघ्या अकरा वर्षाची मी, मला कोणाला सांगू कळत नव्हतं. आईला सांगितलं तर तिने मायेने, काळजीपोटी तुला जवळ घेत असतील असं सांगितलं आणि वडिलांशी हे सगळं बोलायची हिंमत नव्हती. पुढचे अनेक वर्ष तो घाणेरडा स्पर्श माझ्या मनातून गेला नव्हता. मला सगळ्यांसोबत राहायची भीती वाटायची, मी गर्दीत जायला घाबरायचे, बोलायला घाबरायचे. जणू काही माझ्यातील आत्मविश्वास नाहीसा झाला होता. तेव्हा कोणीच मला समजून घेतलं नाही. अशीच वर्ष निघून गेली, फक्त लग्नाच्या वेळी आईने सांगितलं की चुकूनही लहानपणीची रिक्षावालले काकांची गोष्ट सासरी कोणाला सांगू नको. मला तेव्हा फार राग आला होता. चूक माझी नाही तरीही इतके वर्ष मनाचे आघात मी सहन केले आणि आता ही गोष्ट मी होणाऱ्या जोडीदाराला सुद्धा नाही सांगायची? मला ते पटलं नाही, म्हणून तुला सगळं काही सांगितलं. मला या सगळ्यातून बाहेर पडायला तुझी साथ मिळाली राघव, नाहीतर माझं काय झालं असतं? पण आज माझ्या मुलीवर ही वेळ नको यायला, तिच्या सोबत अघटित घडायला नको. "असं म्हणत नेहाला रडू कोसळलं.

"नेहा अगं, तू आधी शांत हो. आपण आपल्या मुलीला सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे असं काही असतं तर तिने नक्कीच आपल्याला कळवलं असतं. तू काळजी करू नकोस. हे युरीन इन्फेकशनच असेल. चल आता झोपूया, उद्या सकाळी लवकर डॉक्टर कडे जायचं आहे." सांत्वन देत राघव म्हणाला आणि थोड्या वेळाने दोघेही झोपायला गेले.

रात्रभर नेहाला डोळा लागला नाही. सतत भूतकाळातील त्या गोष्टी तिला आठवत होत्या. तो घाणेरडा स्पर्श तिला शरीरावर झाला होता पण मनात जखम करून गेला होता. तिने उठून कपाट उघडले. त्यातून तिने एक जुनी फाईल काढली. त्यात तिचे सर्टिफिकेट होते आणि सगळ्यात शेवटी एक पत्र होते. एक असे पत्र ज्यात तिने तिच्या भावना मांडल्या होत्या, ज्या ती कधीच तिच्या आईकडे व्यक्त करू शकली नव्हती. नेहा ते पत्र पुन्हा वाचायला लागली.

प्रिय आई,
'आई' 
आभाळाएवढी माया करते ती 'आई',
सगळ्या इच्छा पूर्ण करते ती'आई ',
सगळ्या संकटापासून वाचवते ती 'आई ',
संस्काराचे बीज पेरते ती 'आई ',
बरोबर ना? 
असं म्हणतात माणूस म्हातारा झाला की त्याला विस्मृतीचा त्रास होतो. पण आई, मी म्हातारी नाही झाले ना तू म्हातारी झालीस, की की तू माझ्यासोबत घडलेल्या त्या गोष्टी विसरायला लावते. आई, अगं मी अवघ्या अकरा वर्षांची होते, वयात येत होते, कळीचे एका सुंदर फुलात रूपांतर होण्याच्या टप्प्यावर मी होते. मग या फुलावर तो वाईट भुंगा का येऊन बसला? का त्याने माझी इच्छा नसताना माझ्या पाकळ्यांना स्पर्श केला? एकदा केला, दोनदा केला... आणि वारंवार करतच राहिला. जेव्हा ते रिक्षावाले काका मला स्पर्श करायचे, तेव्हा माझ्या तोंडातून फक्त आणि फक्त एकच नाव यायचं ते म्हणजे "आई... गं..." माझी ती आर्त हाक तुझ्यापर्यंत कधीच पोहोचली नाही का गं? कदाचित नाही. म्हणूनच मी स्वतःहून तुला सांगायला आले पण माझं बोलणं तुला खोटं वाटलं. का? माझ्यावर तू विश्वास न दाखवता एका परक्या माणसावर पटकन विश्वास ठेवलास? "बाबांना सांगू नकोस ते ओरडतील, बाहेर कोणाला बोलू नकोस ते बदनामी करतील, सासरी काही बोलू नकोस ते चारित्र्यहीन समजतील..."हे सारं मला तू शिकवलं ना. तुझ्या या वागणुकीमुळे आई मी खूप मागे पडले गं. आत्मविश्वास हरवून बसले. प्रत्येक पुरुषाला त्याच दृष्टीकोनातून बघू लागले गं. माझ्यातीला हा बदल कधीच तुझ्या लक्षात आला नाही का?

       कदाचित तू त्यावेळी माझी बाजू घेतली असती तर आज परिस्थिती वेगळी असती. का नाही तू मला लढायला शिकवलं? का नाही तू या गोष्टीबद्दल माझ्याशी मोकळेपणाने बोललीस? का माझी चूक नसताना मी यातना भोगावं असं तुला वाटलं? मी काहीच केलं नव्हतं तरी मी चारित्र्यहीन का व्हावी? लोकांनी माझ्याबद्दल चर्चा केली असती तर काय एवढं झालं असतं? मी निर्दोष होते ना. आई, तुझ्या या वागणुकीमुळे मला माझ्या हक्कासाठी लढता आलं नाही. अन्यायाविरुद्ध आवाज काढायला मी शिकले नाही. म्हणूनच कदाचित मी समजापासून दूर एका दरीत पडले आहे, जिथून मला बाहेर पडायचा रस्ता सापडत नाहीये.

       हे बघ ना सासरी जायच्या आधी तुझ्यासाठी एवढं पत्र लिहितीये, पण ते पत्र तुझ्या हातात द्यायची हिंमत सुद्धा माझ्यात नाही. कदाचित हे कायमचे माझ्याकडेच राहील. चल येते गं.
                                                            एकटी पडलेली,
                                                                       नेहा

           नेहा ते पत्र वाचून ढसाढसा रडू लागली. तिला पुन्हा तिच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव झाली. मी सहन केलं ते पुरे, पण जर माझ्या मुलीसोबत हे घडलं असेल तर तिच्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहणार, असा तिने मनोमन निश्चय केला.

     दुसऱ्या दिवशी तिघेही नाश्ता करून डॉक्टर शलाकाकडे जायला निघाले. शलाका रियाला लहानपणापासून ओळखत होती. तसेच ती समुपदेशक सुद्धा होती. तिघेही तिच्या क्लिनिकवर पोहोचले. रिया शांतच बसली होती. काहीही बोलत नव्हती. नेहाने घडला प्रकार शलाकाला सांगितला. तिने आत नेऊन रियाची तपासणी केली आणि तिच्या सोबत एकांतात बोलण्यासाठी नेहा आणि राघवला बाहेर थांबण्यास सांगितले.

"रिया, बाळा मी तुला एक कोरा कागद देते, त्यावर तू तुला हवं ते तुझ्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न कर. आत्ता काय वाटत आहे तुला ते चित्र काढ. ठीक आहे?" शलाका म्हणाली. रियानेही होकारार्थी मान हलवली आणि खडू घेऊन फक्त रेघोट्या मारू लागली. थोड्या वेळाने तिने काहीतरी चित्र रेखाटायला सुरुवात केली. शलाका शांतपणे रियाचे हावभाव बघत होती. तिला रियाच्या डोळ्यात कसलीतरी चीड दिसत होती. असं काहीतरी ती जे कोणाला सांगू शकत नव्हती. काही वेळाने रियाने तो कागद शलाकाकडे दिला. शलाका ते चित्र बारकाईने बघत होती. सुरवातीला रियाने फक्त रेघोट्या मारल्या होत्या आणि त्याच्या पुढ्यात "माय माईंड "असं लिहिलं होतं. पुढे तिने लाल रंगात काही वर्तुळे काढली होती आणि त्याच्यापुढे "ब्लीडींग "असं लिहिलं होतं. त्यानंतर तिने एक आकृती काढली होती, त्यावरून तो कोणीतरी माणूस असावा असा शलाकाने अंदाज बांधला आणि त्याच्या पुढ्यात "आय हेट यू अंकल " असं लिहिलं होतं. शलाकाच्या मनातील शंका खरी ठरली होती. ती रियाच्या शेजारी जाऊन बसली आणि म्हणाली, "रिया बाळा मी तुझी एकदम जवळची फ्रेंड आहे असं समज आणि मला या चित्रात तू काय काढलं आहे ते सांगतेस का जरा? बघ मी कोणालाही सांगणार नाही." रियाने शलाकाकडे पाहिले आणि आता तिचा बांध सुटला. ती शलाकाच्या गळ्यात पडून रडू लागली आणि मन मोकळं करू लागली. रियाने घडला प्रकार शलाकाला सांगितला.

        थोड्या वेळाने रियाला काही खेळणी खेळायला देऊन शलाकाने नेहा आणि राघवला दुसऱ्या केबिनमध्ये बोलवलं. घडला प्रकार ऐकायला नेहा आणि राघव तर अधीर झाले होते. शलाकाने त्यांना रियाने काढलेले चित्र दाखवले. दोघांनाही काही कळेना की रियाने त्या चित्रातून काय सांगायचा प्रयत्न केला आहे.

"डॉक्टर, रिया ठीक आहे ना? तिला फक्त युरीन इन्फेकशन झालं आहे ना? आणि तिने परीक्षेचं टेन्शन घेतलं आहे?" नेहाने काळजीपोटी विचारले.

"नेहा राघव, आता मी काय सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐका. रियाचं लैंगिक शोषण झालं आहे, त्यामुळे तिला हा सगळा त्रास होत आहे." शलाका म्हणाली.

"काय? कसं शक्य आहे? आम्ही तिला सगळं शिकवलं आहे. 'गुड टच बॅड टच' तिला माहित आहे. कोणा अनोळखी माणसाकडे जायचं नाही, त्याने दाखवलेलं आमिष स्वीकारायचं नाही, हे सगळं तिला माहित आहे." नेहा मोठ्याने म्हणाली.

"हो डॉक्टर, तिला शाळेत, क्लासला सोडायला, आणायला तर मीच जातो. त्यामुळे हे कसं शक्य आहे?" राघव आश्चर्यचकित होऊन पण काळजीने म्हणाला.

"आणि मी म्हणाले हे कोणी घरच्या माणसानेच केलं आहे तर? कसं आहे नेहा आपण मुलांना गुड टच बॅड टच शिकवतो आणि अनोळखी माणसापासून सावध करतो. पण ही गोष्ट कोणी घरातला माणूस करू शकतो, ही गोष्ट आपण साफ विसरतो. अनोळखी माणूस चॉकलेट देऊन बॅड टच करेल हे आपण सांगतो, पण घरातील व्यक्ती देखील असं करू शकते हे आपण सांगतच नाही. हे चित्र बघ, या आडव्या तिडव्या रेषा म्हणजे रियाच्या मनाची अवस्था आहे, ही वर्तुळं म्हणजे तिला जिथे हात लावण्यात आलं आहे ती जागा आणि हा माणूस म्हणजे तिचा काका आहे." शलाका म्हणाली.

"कोण? काका? म्हणजे सुमित? नाही शक्यच नाही. रियाचा गैरसमज झाला आहे. माझा भाऊ हे करणं शक्य नाही." राघव रागातच म्हणाला.

"हे बघा, इथेच तर आपण चुकतो. बऱ्याचदा लैंगिक शोषण करणारी ही ओळखीची घरातील व्यक्तीच असते. भारतात दर पाच पैकी दोन मुलांचे लैंगिक शोषण करणारी व्यक्ती परिचयाची असते." शलाका सांगत होती.

    नेहा आणि राघवच्या पायाखालची जमीन सरकली होती. "गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सगळे तिच्या काकाच्या घरी गेला होता ना? तिथेच हा प्रकार घडला आहे. रियाला सुमितने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवले आणि नंतर तिच्या निकरमध्ये हात घातला. ती नको म्हणत असताना तो वारंवार करत होता आणि हे सगळं तुम्ही तिला त्याच्या घरी ठेवून खरेदीला गेला होता तेव्हा घडलं आहे. आई बाबांना सांगितलं तरी ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत याची रियाला जाणीव करून देण्यात आली आणि काल पुन्हा शाळेच्या बाहेर कारमध्ये हा प्रकार घडला. सुमित कार घेऊन रियाला घ्यायला आला होता." डॉक्टर सांगत होती.

"हो हो, काल शाळेबाहेर मला सुमित भेटला. मला शाळेत जायला थोडा उशीरच झाला होता. शेजारच्या बिल्डिंगमध्ये त्याची मीटिंग आहे असं बोलला. वेळ आहे तोपर्यंत रियाला भेटायला आलो, त्याने असं सांगितलं होतं." राघवने सांगितले.

घडला प्रकार ऐकून नेहाला रडू कोसळलं. ती क्लिनिकमध्येच ढसाढसा रडू लागली. तिला सांत्वन देत शलाका म्हणाली,"अगं नेहा, ही वेळ रडण्याची नाहीये. तुम्ही दोघांनी रियाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील पाहिजे. पोक्सो कायद्याअंतर्गत आपण गुन्हेगाराला शिक्षा देऊया. लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे रक्षण करण्यासाठी खास हा कायदा भारतात लागू केला आहे. राघव प्लिज, तुम्ही रियाची साथ द्या. तुमचा भाऊ आहे, बदनामी होईल असा विचार अजिबात करू नका." शलाका म्हणाली.

"नाही डॉक्टर, भाऊ आहे म्हणून काय झालं? चुकीला माफी नाही. आणि बदनामी तर त्याची होणार, माझ्या मुलीची नाही." राघव म्हणाला.

"हो डॉक्टर, माझ्याबाबत जे घडलं होतं त्यावेळी माझ्या आईवडिलांनी माझी साथ दिली नाही, पण आज देवाने मला मुलीची साथ द्यायची संधी दिली, आहे ती मी सोडणार नाही. सुमितला शिक्षा तर होणारच." नेहा डोळे पुसत म्हणाली.

  पोक्सो कायद्याअंतर्गत नेहा आणि राघवने पोलिसात सुमित विरोधात तक्रार नोंदवली आणि सुमितला अटकही झाली. नातीगोती न पाहता नेहा आणि राघवने रियाची साथ दिली होती. नेहाला आज जणू काही स्वतःला न्याय मिळाला आहे असं वाटत होतं. तिने आणि राघवने एक सुजाण पालक असल्याचे कर्तव्य पार पाडले होते. लैंगिक शोषण सारखा नाजूक विषय त्यांनी योग्य पद्धतीने हाताळला होता. त्यावर खुलून चर्चा केली होती. रियाला त्यांनी समजून घेतलं होतं. पुढे रियालाही मानसिक धक्क्यातून सावरायाला काही महिने गेले. त्यात डॉक्टर शलाका यांचं समुपदेशन कामी आलं. पण वेळीच घडला प्रकार लक्षात आल्याने कळी उमलण्याआधी चिरडली गेली नाही. घडल्या घटना रियाच्या मनात घर करून बसल्या नाहीत. ती पुढील आयुष्य स्वछंदपणे जगायला, आकाशी उंच भरारी घ्यायला सज्ज झाली.

समाप्त.

सिद्धी भुरके ©®