विठू माझा लेकुरवाळा

All Sant And Devotee Are Children Of Lord Vithathal

             विठू माझा लेकुरवाळा



 विठु माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा

 निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी


 पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर

 गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवाबरोबरी


बंका कडेवरी नामा कारंगुळी धरी

जनी म्हणे गोपाळा करि भक्तांचा सोहळा


. हा अभंग संत जनाबाई यांनी लिहिलेला आहे. जनाबाईंचे अभंग त्यांच्या स्त्री पणाची आपणास एकसारखी जाणीव करून देत असतात. पंढरपूरच्या वारीत आपल्या मुला-बाळांना घेऊन निघालेला विठ्ठलाचे किती समर्पक आणि सुंदर वर्णन जनाबाईंनी या अभंगात केल आहे.


 हा अभंग  भक्तिमार्गावर आपल्या मुलाबाळांना घेऊन निघालेल्या बाप रूपी विठ्ठलाचे शब्दचित्र भक्ताच्या डोळ्यासमोर उभे करतो. भक्तीमार्गाची ती खडतर आणि अवघड वाट बापरुपी विठ्ठलाचे बोट धरूनच पूर्ण करता येईल आणि वैकुंठ प्राप्ती होईल असेच जणू या अभंगातून जनाबाई आपल्याला सुचविण्याचा प्रयत्न करीत आहेत असे मला वाटते.

.           विठू म्हणजे एक लेकुरवाळा बाप आणि संपूर्ण संतमंडळी तिची लेकरं अशी कल्पना करून जनाबाईंनी हा अभंग रचला आहे. खरं तर विठ्ठल हा संपूर्ण विश्वाची माऊली म्हणजेच आई. पण इथे मात्र विठ्ठलाला त्यांनी वडिलांची भूमिका दिली आहे. वडील यात्रेला निघाले आहेत. एका खांद्यावर त्यांनी निवृत्तीला घेतल आहे तर,दुसर्‍या खांद्यावर च्या सोपाना ने निवृतीचा हात धरला आहे. ज्ञानेश्वर महाराज वडिलांच्या पुढे चालतात आहे तर मुक्ताई त्यांच्या मागोमाग निघाली आहे. विठ्ठलाने बंका ला कडेवर घेतल आहे तर, संत नामदेवांनी विठ्ठलाची करंगळी धरली आहे. गोरा कुंभाराने विठ्ठलाच्या मांडीवर आपलं स्थान निर्माण केला आहे तर, संत चोखा मेळा जणू विठ्ठलाचा जीव च आहे. जनाबाई पुढे म्हणतात की , ज्याप्रमाणे कृष्णाने गोकुळामध्ये त्याच्या सवंगड्यांना एकत्र घेऊन अनेक लीला केल्या,  अनेक सण उत्सव साजरे केले. त्याचप्रमाणे आता या कलीयुगात विठ्ठल त्याच्या भक्तांना सोबत घेऊन जणू आनंदाचा सोहळाच साजरा करीत आहे.



********************************************


. आता थोडंसं संत जनाबाई बद्दल….. संत जनाबाईंची वडील निस्सीम विठ्ठल भक्त होते, त्यामुळे त्यांना विठ्ठल भक्तीचा वारसा वडिलांकडून मिळाला. आई-वडिलांचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्याने त्यांना नामदेवा कडे राहावे लागले. जेव्हा त्यांची आई वारली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना , दामा शेठजी कडे पोहोचले. दामाशेटजी नामदेवांचे वडील. आई-वडील नाही, स्वतःचे घरदार ही नाही, संसार नाही. मग जनाबाईंनी चक्रपाणी हाच आपला माय- बाप, बंधू- बहिण - सर्वस्व म्हणून मान्य केले. नामदेवाच्या कुटुंबातील सर्व कामे जनाबाईंना करावी लागत. शेण- गोठा, झाडलोट, पाणी भरणे, कपडे धुणे, साळी कांडणे, इतर दळण कांडणं करताना , त्यांचा विठोबाशी आंतर संवाद सुरु असे. संत सहवास,नाम भक्तीतील आर्तता, यामुळे त्यांना विठ्ठलाचा साक्षात्कार घडला. विठ्ठलाशी एक्य भाव निर्माण झाला, देहाचा पालट झाला, त्यांच्या शारीरिक कष्टात विठ्ठल त्यांना मदत करू लागला. म्हणूनच त्या म्हणतात -" झाडलोट करी जनी केर भरी चक्रपाणि. "


. तूर्तास एवढेच आज आषाढी एकादशी त्यानिमित्त सर्व वाचकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा "पुंडलिक वरदा हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ".



****************************************



 संदर्भ - नामदेव गाथा, शासकीय फोटोझिंको मुद्रणालय मुंबई.

 नीला कोंडोलीकर -  स्त्रियांच्या आत्म चरित्रातील सामाजिक संदर्भ.

 फोटो  - साभार गुगल