तुमच्या माझ्या मनातला कृष्ण

Lord Krishna the first social worker of Indian society

                 तुमच्या माझ्या मनातला कृष्ण



               कृष्ण भेटणं इतकं सोपं आहे का? तो देवकीचा होता पण त्याचं बालपण अनुभवलं, खरं मातृत्व मात्र उपभोगलं यशोदेने. तो बंधु होता सुभद्रेचा पण प्रत्येक संकटसमयी तो धावला द्रोपदीसाठी. आपली अवाढव्य सेना त्यानं दिली दुर्योधनाला आणि महाभारताच्या महायुद्धात "न धरी शस्त्र करी" अशी प्रतिज्ञा करुन सुद्धा विजय मात्र अर्जुनाला मिळवून दिला. त्याचं प्रेम होतं राधे वर पण पाणिग्रहण मात्र त्यानं केलं रुक्मिणीचं.


              खरच कृष्ण भेटणं सोपं नाही पण दुसऱ्याच क्षणी मला वाटतं, कृष्णा भेटणं वाटतं तितकं अवघडही नाही, कठीण तर अजिबातच नाही. जो त्याला मनोभावे पूजतो,आळवतो, त्याच्या चरणी लीन होतो, त्याच्यासाठी तर कृष्ण सदोदित मदतीला तत्पर असतो.


           कृष्णाचे प्रेम असं की, केवळ वृंदावनातील राधाच नाही तर गोप-गोपी, झाडे-वेली, पशु-पक्षी त्याच्या सुरेल वेणूच्या सुरात भान हरपले, मोठा बंधू त्याचा दास झाला, गायी जास्त दूध प्रसवू लागल्या.समस्त चराचर सृष्टी त्या वनमाळीच्या निळ्या रंगात रंगून गेली.


                 त्याचा न्याय असा कि, मथुरेचं राज्य कंस वधानंतर त्यांनं त्याच्या आजोबांना देऊन टाकलं. गतधैर्य अर्जुनाला समरांगणात गीतोपदेश केला. पांचालीच्या लज्जा रक्षणार्थ तो कौरवांच्या द्युतगृही गेला. महाभारताच्या युद्धाच्या हानीची समस्त जबाबदारी त्यानं स्वतःवर घेतली. गांधारीचा शाप शिरोधार्य मानला. आठ पट्टराण्या असूनही सोळा हजार शंभर कन्यांना त्याने स्वतःचं नाव दिलं. निर्धन मित्र सुदामा, द्विधा मनस्थितीतील अर्जुन, दु:खी कुंती, अष्टवक्रा,कुब्जा, महात्मा विदूर सगळ्यांना तो भेटला.


                खरंच कृष्ण भेटण अगदी सहज शक्य आहे. फक्त तुमच्या मनात दीनदुबळ्यांविषयी कणव, तळमळ आणि न्यायाविषयी विश्‍वास हवा. तुम्ही न्यायाच्या, सत्याच्या, धर्माच्या बाजूने उभे राहा, तो माधव तुमच्या बाजूने नक्कीच उभा राहील.




         यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः|

         तत्र श्रीर्विजयो भुतीध्रुवा नितिर्मतिर्मम||




********************************************


संदर्भ

 व्यासपर्व, दुर्गा भागवत.

 श्रीमद्भगवद्गीता.



जय हिंद.