पूर्णपुरुष कृष्ण

Everyone's Favourite Lord Krishna

पूर्णपुरुष कृष्ण



         रामायण आणि महाभारत भारतीय तत्वज्ञानाचा पायाच जणू,किंबहुना समग्र भारतीय तत्वज्ञानाच ह्या दोन ग्रंथांनी सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचले. त्यातही रामायणाचे उदाहरण म्हणजे एका आदर्श कुटुंबाची, परिवाराची, त्यागाची कथा. तर महाभारत म्हणजे व्यक्तीचा मी त्याच्या कर्तृत्व पेक्षा अधिक मोठा झाल्याने निर्माण झालेल्या लोभाची, आकसाची, स्वार्थाची, अहंकाराची पारिवारिक हेव्या-दाव्यानची, भाऊबंदकीची एक महागाथा.


               महाभारत रामायणाच्या कथा आपल्या पैकी प्रत्येकाने कधी ना कधी ऐकलेल्या असतात. आताच्या आधुनिक जगात अनेक डिजिटल माध्यमांवर दृकश्राव्य स्वरुपात त्यांचा अनुभव घेतलेला असतो, पण तरीही कितीदा तरी बघून ह्या कथा परत परत वाचाव्याशा,ऐकाव्याशा,बघाव्यशा वाटतात त्यातच त्या महाकाव्य रचनाकाराची खरी प्रतिभा दडलेली आहे.


          महाभारताची मोहिनी अशी की, वाचणाऱ्याला प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी, नवी वाट दाखवणारी, नवा आदर्श, नवी दिशा आणि नवीन तत्वज्ञान सांगणारी. महाभारताचा खरा नायक कोण? पितामह भीष्म? अर्जुन? कर्ण? नाही महाभारताचा कर्ता आणि खरा नायक कृष्णच!



          कृष्ण नावाची काय ती मोहिनी! काय ती जादू! प्रत्येकाच्या आयुष्यात तो कधी ना कधी असतोच!


         

          कृष्णाचे बालपण असं की, आज हजारो वर्षानंतरही प्रत्येक आई आपल्या मुलात त्याच सावळ्या कान्हाला शोधते. त्याचे मैत्रीचे,मित्रत्वाचे तत्वज्ञान असे की, प्रत्येकाला कृष्णाचा सवंगडी व्हावे वाटते, सुदामा व्हावे वाटते. त्याचे प्रेम असं की, प्रत्येक तरुण त्यांच्या तारुण्यात कधी ना कधी निदान स्वतःपुरता तरी राधेचा कृष्ण होतो, प्रेमाच्या निळ्या रंगात रंगून जातो.जगाच्या कोरड्या व्यवहारात जीवनाचं तत्वज्ञान, खरा गर्भित अर्थ शोधायला त्या सावळ्या वनमाळीन सांगितलेली गीता सदासर्वदा मार्गदर्शक ठरते. मानवाच्या जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत जर काही त्याला साथ-सोबत करत असेल तर ते कृष्णाचं तत्वज्ञान-गीता आणि कृष्णनीती.



                  महाभारतात अनेक व्यक्तिरेखा व्यासांनी चितारल्या भीष्म,द्रोण,कुंती,ध्रुतराष्ट्र, भीम अर्जुन,दुर्योधन,कर्ण अनेक जण, पण तरीही प्रत्येक व्यक्तिरेखेचं एक खास वैशिष्ट्य. त्या वैशिष्ट्याच्या पुढे ती व्यक्तिरेखा जातच नाही.



            भीष्म म्हटलं की आठवते ते आसक्ती विरहित त्यागी जीवन. वडिलांच्या इच्छेसाठी स्वतःचं तारुण्य आणि अस्तित्वच नाकारलेला आणि कुरु वंशाचा विशाल वटवृक्ष एका हाती सांभाळणारा त्यागवंत वृद्ध कुरू. अगतिकता आणि अति संयमाचा महासागर ज्याने केवळ एका हाती सांभाळला असा कुरुंचा अखेरचा वंशज.


     

             अर्जुन म्हणजे दुविधा, कर्ण म्हणजे त्याग, कुंती म्हणजे दुःख आणि खंत, द्रौपदी म्हणजे हट्ट आणि जिद्द, तर दुर्योधन म्हणजे अहंकार, युधिष्ठिर म्हणजे जीवनाचे तत्वज्ञान. पण कृष्ण म्हणजे लिहायला गेलं तर, समजायला गेलं तर, काही लिहिता येत नाही. मानवाच्या कुठल्याच गुणांचा रंग किंवा रेखा त्याच्यासाठी चपखल बसत नाही. विराट रूपाने तो इतका मोठा झाला आहे की, मानवाच्या कल्पनेच्या, दृष्टीच्या, भासाच्या-अभ्यासाच्या साऱ्याच कल्पना तिथे थिट्या पडल्या आहेत. कुठल्याच मापदंडात तो मावतच नाही. 



               कृष्ण म्हणजे नक्की कोण? काय? कसं? काहीच सांगता येत नाही त्याच्या विषयी. जन्मताच त्याच्या आई वडिलांनी त्याला दुसऱ्याकडे संगोपनासाठी सोपवलं. पौगंडावस्थेत त्याने सवंगडी, नंद-यशोदा, राधेला सोडलं. महाभारताच्या युद्धानंतर त्याला गांधारीचा शाप स्वीकारावा लागला. स्वतःची द्वारका सोडावी लागली. पण त्याच्या ओठी ना कधी खंत ना खेद. सगळं सोडूनही हा सदा आनंदी.


                कृष्णाचे बालपण असं की यशोदा-नंद बाबा, सारे ब्रजवासी सारेच फिरून बालपणात शिरले. राधेचं आणि कृष्णाचं प्रेम इतकं सुंदर आणि पवित्र की हजारो वर्षानंतरही प्रत्येकच तरुण-तरुणीला स्वतःत राधा-कृष्णाची प्रतीकं आणि प्रतिमा कधी ना कधी दिसतातच.



                 जीवनाचं तत्वज्ञान तर त्यांनं असं सांगितलं की, हतबल, गतधैर्य, अगतिक अर्जुन पुन्हा युद्धास तयार झाला. आठ पट्टराण्या असूनही, सोळा हजार शंभर राजकन्यांना त्याने दुष्ट समाजाच्या हिन दुषणान पासून वाचवण्यासाठी स्वतःचं नाव दिलं.


           द्रोपदी आणि कृष्णाचं नातं जगाच्या कुठल्याच नात्यात न बसणारं. मुळात द्रौपदी याज्ञसेनी, रूपगर्विता. त्रागा आणि द्रौपदी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू पण तरीही प्रत्येकच वेळी कृष्ण कल्याणीला मदत करतो. द्युतसभेत वस्त्रहरणाच्या वेळी त्याने द्रौपदीच्या शीलाचं रक्षण केलं. वनात दुर्वासांच्या कोपापासून वाचण्यासाठी द्रोपदीच्या अक्षय पात्रातलं मेथीचं पान ग्रहण केलं. द्विधा मनस्थितीतल्या अर्जुनाला युध्दा करीता प्रेरित केलं. जणू एखाद्या सांसारिक स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना आणि युद्ध प्रसंगांना तोंड द्यायला हा कृष्ण तिचा पाठीराखा म्हणून सदैव तिच्या पाठीशी उभा आहे. कृष्ण आणि द्रौपदीचे नाते इतके वेगळे, अतिशय विलक्षण, अशरीरी स्त्री-पुरुष मैत्रीचे, अर्थगर्भ, अस्फुट स्नेहमय बंध आहे.



               पण तरीही कृष्ण नक्की कोण? हा विचार केला तर, हाती काहीच येत नाही. दुर्गाबाई भागवतांच्या शब्दात सांगायचं झालं तर एखादी साधना, पूजा, यज्ञ, होम-हवन झाल्यानंतर आरतीच्या समापनात प्रज्वलित होणारा कापराचा दरवळणारा जळका वास म्हणजेच कृष्ण असं काहीसं वाटून जातं.



********************************************


 वाचकहो लेख कसा वाटला ते नक्की कळवा.



तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत



जय हिंद.



🎭 Series Post

View all