
#ए_पलट!
आशु ए आशु बोल ना गं माझ्याशी. कधीपासून हाका मारतेय मी तुला. तू बघुनसुद्धा दुर्लक्ष करतेयस. काय केलं मी तुझं? कालसुद्धा एकटीच क्लासला गेलीस. मुद्दामहून माझ्या अगोदर जातेस नि मागच्या बेंचवर बसतेस. मला ठाऊक आहे तुला मागे बसायला आवडत नाही तरी केवळ माझ्यासोबत बसावं लागतं म्हणून मागे बसायला जातेस. एवढं काय घोडं मारलय मी तुझं? माझी जीवलग मैत्रीण आहेस तू. का असं करतेस यार सांग ना माझं काय चुकलं ते तू मला सांगितलं नाहीस तर मला कळणार कसं?
नको जाऊदे. अस्मि,मला तुझा राग नाही आलाय. किशोरचा राग आलाय.
कोणाचा..किशोरचा..माझ्या दादाचा? त्याने असं काय केलं.
अगं मला किती आदर होता किशोरबद्दल! मैत्रिणीचा भाऊ म्हणजे माझाही भाऊ मानते मी. पण..
पण काय? काय केलं एवढं दादाने?
जाऊदे,तुझा भाऊ ना तो तू त्याचीच बाजू घेणार.
आता सांगतेस कि नाही?
काल माझी लहान बहीण, माधुरी नि मी तुझ्या वाढदिवसाचे फोटो बघत बसलो होतो तेव्हा तुझ्या भावाचा फोटो पाहून ती म्हणाली,"दिदी हा मुलगा त्या रोडरोमियोंत असतो. आमच्या ट्युशनच्या बाहेरच्या बोळात कॉर्नरला ही मुलं उभी रहातात नि खूप घाणेरडे कॉमेन्ट्स करतात. अगदी मापं वगैरे.
आशु,काय बोलतैस तू! माझा दादा असं काही करणं शक्यच नाही. तो त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला जातो तिकडच्या मैदानावर.
माधुरी खोटं कशाला बोलेल! त्यांच्या ग्रुपमधली एक तर या मुलांच्या कॉमेंट्समुळे ट्युशनला यायचीच बंद झाली. एकटी मुलगी दिसली तर अजुनच चेव चढतो त्यांना. ए धावधाव करून पाठ घेतात कुत्र्यांसारखी. एकदा माधुरीच्याही पाठी लागलेले। ती बिचारी कशीबशी धावत सुटली होती तेव्हापासून त्या साईडने एकटी जायला घाबरते ती.
अगं पण हे आधी का नाही सांगितलस मला तू?
तुझा विश्वास बसेल का?
का नाही बसणार. माझा भाऊ असला म्हणून काय झालं,त्याने अशी मुलींची छेड काढणं हे गैरच आहे. माधुरीला सांग,तू बिनधास्त रहा. मी बघते काय करायचं ते.
-----------
अरे दादा,हल्ली कपडे जास्त मळत नाहीत तुझे. मैदानावर खेळतोस ना का दुसरं काही..
दुसरं काही म्हणजे..ही बेट कशासाठी घेऊन जातो मग आणि अस्मि,तुला कशाला हव्यात गं चांभारचौकशा! गप आपलं कम कर. उगा डोक्यात जाऊ नको समजलं ना.
अरे पण तुला एवढा राग कशाला आला? मी आपलं सहजच विचारलं.
त्यापेक्षा पाणी आण जा. तहान लागलेय मला.
----------------
दुसऱ्या दिवशी अस्मि आशुच्या घरी गेली. आशुचा तिच्याबद्दलचा राग आता निवळला होता. आशुने तिला थंडगार आवळासरबत दिलं. थोड्याच वेळात माधुरीही त्यांना जॉइन झाली.
अस्मिने माधुरीला सांगितलं,"माधु,आज माझा भाऊ तुझ्यामागे लागलाय तर त्याला अद्दल शिकवण्यासाठी म्हणून मी एक प्लान बनवलाय पण यापुढे मात्र तुझं तुला या रोडरोमियोंना सामोरं जायला हवं. अजिबात घाबरायचं नाही. आपण घाबरलं की त्यांना चेव चढतो. मोठ्याने ओरडायचं. आजुबाजूचे नक्कीच मदत करतील किंवा स्वसंरक्षणासाठी ज्युडो वगैरे शिकून घे. डोळ्यात अंगार ठेवायचा. कोणाची बिषाद नाय पाहिजे मागे लागायची.
आता मात्र मला तुझा एखादा ड्रेस दे. मग मी बघते काय ते. जरा उसवून घालेन."
माधुरीचा ड्रेस घालून,तिच्यासारखीच हेअर स्टाईल करुन संध्याकाळी साडेसहाला,माधुरीचा क्लास सुटण्यापुर्वी दहा मिनीटं माधुरीच्या क्लासच्याइथून अस्मि निघाली. अगदी मान खाली घालून, पुस्तकांची बेग छातीजवळ घट्ट धरुन.
ए किश्या,ते बघ तुझं पाखरु चाललय. नाही रे क्लास सुटायला वेळ आहे अजुन. तिथेच कठड्याला टेकून सिगारेटचे झुरके घेत असलेला किश्या,अस्मिचा दादा म्हणाला.
अरे यार,ड्रेस ओळखतो मी. पिंक कलरचा वरती निळीपिवळी फुलपाखरं,रम्या म्हणाला.
किश्या सावध झाला. त्याने तोंडात बोटं घालून शिट्टी मारली.
अस्मि मुद्दामहून जरा हळू चालत होती.
इतक्यात घोळक्यातून तिच्या दादाचाच आवाज आला,"फुलवा तू फुलवायचं कि नुसतच झुलवायचं. शिंगरु मेलं हेलपाट्यानं असं नाही वागायचं."
अस्मि मुद्दाम हळू पावलं टाकत होती. इतक्यात हातातली सिगारेट मित्राला देत,केसांतून हात फिरवत किश्या तिच्या मागे येऊ लागला,"फुलपाखरु छान किती दिसते फुलपाखरु. हाय क्या चाल है. काय बांधाय. आपण नजरेने मापं घेतो. अगदी एक्युरेट. ए पलट" असं म्हणायला नि अस्मि मागं वळून बघायला एकच वेळ झाली.
अस्मिला समोर पाहून किश्याचं अवसान पुरतं गळालं. त्याला सापकन कोणीतरी तोंडात मारल्यासारखं झालं.
अस्मि,तू इथं कशी?,उसनं अवसान आणून किश्या बोलला.
का? तुला कोणाची अपेक्षा होती? माधुरीची? हल्ली तिला टारगेट केलयस ना. मुली म्हणजे फुलपाखरु काय! अशी किती फुलपाखरं उडवलैस रे तू! यासाठी येतोस क्रिकेट खेळायला, बेट घेऊन आणि सिगरेट ओढतोस! दादा,तुला एक्युरेट मापं घ्यायची आहेत ना. थांब मी आईच्या शिवणातली मेजरिंग टेप आणलेय. चल कठड्याजवळ. तिथे तुझे मित्र लिहून घेतील मापं. तू नीट लिहून घे.
किश्याची मान पुरती खाली गेली. दोर तुटलेल्या पतंगासारखी त्याची अवस्था झाली. तोंड कुठे लपवावं ते कळेना नि सॉरी म्हणायचीही लाज वाटू लागली. बाकीच्या साथीदारांच्याही माना शरमेने झुकल्या. अस्मि मात्र तिच्या ऐटबाज चालीत तिथून निघून गेली.
ती मेजरिंग टेप किश्याच्या हातात लोंबकळत राहिली.
-----------
दुसऱ्या दिवशी बोळाच्या टोकाला कुणी उभं नव्हतं. माधुरी व तिच्या मैत्रिणींनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
-----सौ.गीता गजानन गरुड.