' लहानपण देगा देवा '

'लहानपण देगा देवा'

        लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...

         ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार...

         जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण...

         तुका म्हणे बरवे जन, व्हावे लहानाहुनी लहान...

                             अभंग वाणी. संत तुकाराम.

लहानपण म्हणजे येथे नेणपण, अज्ञानी वृत्ती. स्वतःकडे कमीपणा घेण्याची वृत्ती,नम्रभाव. आयुष्य जगत असताना आपण " लहान "होऊन जगलो तर इतरांकडून आपल्याला खूप काही शिकता येतं. नम्रता हा एक सद्गुण आहे.


लहानग्या मुंगीला साखरेचा रवा मिळतो. पण ऐरावता सारख्या इंद्राच्या हत्तीला अंकुशाचा मार खावा लागतो. मलाच सर्व काही येतं असं म्हणून स्वतःला खूप मोठे समजत राहिलं तर हा अहंकार आपल्याला अधू बनवतो. 


बालपण अगदी निरागस असते. लहान मुल जेव्हा बोलायला शिकते तेव्हा जिज्ञासू वृत्तीने ते मुल सर्वांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडते. हीच शिकण्याची प्रक्रिया आपल्याला टिकवता आली पाहिजे.हेच ते लहानपण.


आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे....

अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे.

  " तमसो मा ज्योतिर्गमय."

            अहंकाराचा वारा, न लागो राजसा...

            माझिया विष्णुदासा भाविकांची.

संत नामदेवांचे हे वचन.

अहंकाराचे भूत मानगुटीवर बसले की मनुष्य बेताल वागू लागतो. त्याची विवेक बुद्धी हरवते. कमी कष्टात अपेक्षेपेक्षा जास्त गोष्ट मिळाली की अहंकाराची निर्मिती होते. "मीच शहाणा "हा भाव आपल्याला इतरांशी जोडूच देत नाही.


समुद्राची खोली जेवढी जास्त तेवढा लाटांचा वेग कमी असतो. आणि ही खोली जेवढी कमी तेवढा लाटांचा वेग जास्त असतो. नदीच्या उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो. म्हणूनच म्हणतात, "उथळ पाण्याला खळखळाट फार."


म्हणजे जेथे थोडेच असते मग ते पाणी असो वा ज्ञान तिथे गर्जना, गर्व जास्त असतो. "अल्प ज्ञान,ताठा फार "खरी ज्ञानी, बुद्धिमान व्यक्ती शांत, संयमी असते. ती आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करीत बसत नाही.


चांगदेव हे एक विद्वान योगी पुरुष होते. परंतु आपल्या विद्वत्तेचा त्यांना गर्व झाला होता. मात्र मुक्ताईचे अभंग ऐकून त्यांनी मुक्ताईला आपले गुरु मानले. मनाला बुद्धीच्या मुठीत ठेवणारी माणसे अर्जुनासारखी बनतात. नाहीतर मनाची मूठ माणसाला दुर्योधन, रावण, कंसासारखी बनवते.


म्हणूनच आपण आपल्या अंगी नम्रता, अज्ञवृत्ती ठेवली तर आपल्यामध्ये अहंकाराला जागाच मिळणार नाही. नदीला महापूर येतो तेव्हा मोठमोठी झाडे त्या पुरात वाहून जातात, पण लव्हाळी (उंच वाढणारे एक गवत) लवचिक असल्यामुळे वाचते.


देवापुढे आपण झुकून नमस्कार करतो. वडीलधाऱ्यांना आपण शिरसाष्टांग म्हणजे पायावर डोके ठेवून नमस्कार केला पाहिजे.

        मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी...

        माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी.

म्हणून अंगी नम्रता ठेवा. झुकणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. तर ताठपणा, अकड ही मृतपणाची निशाणी आहे. नम्र व्यक्तीचा चाहता वर्ग मोठा असतो. अशी व्यक्ती सर्वांची आवडती असते. म्हणूनच म्हणतात, येताना एकटे असतो तरी सर्वांचे होऊन जाण्यातच मजा असते.

धन्यवाद.