लॉक डाऊन आणि माझे केस

लॉक डाऊन मध्ये सगळं बंद असल्याने बऱ्याच जणांना घरच्या घरी केस कापावे लागले होते. त्याचीच ही विनोदी कथा
लॉकडाउनच्या काळात माझे केस  एव्हढे भयानक वाढले असतील याची मला कल्पनाच नव्हती.पण   एक दिवस काय झालं. रात्री उठलो.लाईट लावला. बाथरूमला जाऊन आलो आणि सहज आरशाकडे नजर गेली तर आरशात एक अस्वला सारखा चेहरा दिसला.मला वाटलं घरात कोणीतरी डाकूच शिरला आहे.

तसा मी शूर आहे. पण त्या दिवशी का कोण जाणे मला एकदमच भीती वाटली आणि मी जोरदार किंकाळी फोडली.अशा वेळी बायकोने झटकन धुणं वाळत घालायची काठी हातात घेतली आणि ती त्वेषाने दरवाजाकडे धावली. वेळ कधी सांगून येत नाही म्हणून ती नेहमी धुणं वाळत घालायची काठी हाताशी ठेऊन झोपते. जेंव्हा तिला समजलं की मी आरशात स्वतःलाच पाहून घाबरलो होतो. तेव्हा ती एव्हढया जोरजोरात हसायला लागली की विचारूच नका. थांबून थांबून, आठवून आठवून ती घटकेत माझ्या कडे पाहायची मग आरशात पाहायची आणि खदाखदा हसायची.आता यात हसण्या सारखं काय आहे.घाबरतो एखाद्या वेळी माणूस.  पण एकदम धो धो हसत सुटायचं. तेही सगळं अंग हादरवत. म्हणजे अतीच ना.

कल्पना करा, रात्रीचे बारा वाजले आहेत आणि ही अशी माझ्याकडं बघून खदाखदा हसते आहे. कसं वाटतं असेल मला. बरं तिच्या हसण्याचा आवाज एव्हढा मोठा होता की लॉकडाउन असतांनाही शेजाऱ्यांनी दरवाजे उघडले. संशयाने आमच्या घराकडे बघत आणि फोन करून काही मदतीची गरज आहे का असं विचारलं. आता काय उत्तर देणार या वर.

त्यात एकाने," जोशी बुवा मध्य रात्र आहे आणि आपल्या शेजारी माणसं राहतात याचे भान ठेवावे." असा मेसेज पाठवला.

तर एकाने, "एव्हढया गंभीर संकटातून जग जातं असतांना असं हसणं माणुसकीला धरून आहे का," असा संतप्त प्रश्न केला.

सेक्रेटरीने तर फोन करून, एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचा सल्ला दिला.

अशी सगळी सोसायटी जागी झाली. फोनाफोनी सुरु झाली. बायकोने लगेच तिच्या मैत्रिणीला एव्हढया रात्री आरशात स्वतःलाच पाहून मी कसा घाबरलो हे सांगितलं. मग दोघी एव्हढया रात्री गप्पांमध्ये गुंगल्या. बराच वेळ झाला. तरी त्यांच्या गप्पा थांबेनात. मग मी तिचं घड्याळाकडे लक्ष वेधलं. मग ती कुठं शांत झाली.

मी अंथरुणावर पडलो खरा पण माझ्या डोळ्यासमोरून माझाच केस पिंजारलेला, दाढी मिशा वाढलेला चेहरा जात नव्हता. पूर्वी कधीतरी वाल्या कोळ्याची, अंगुलीमालाची गोष्ट ऐकली होती. तसेच केस पिंजारलेले दिसत होते.

" तूला भीती नाही वाटत का ग", असं मी विचारलं तर ,"आम्ही मुधोळकर आहोत जोशी नाही" असं बाणेदार उत्तर तिने दिलं.

पण या केसांचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा असं मला वाटायला लागलं. कारण दुसऱ्या दिवशी मी खाली किराणा दुकानात गेलो होतो. तोंडाला मास्क आणि हातात पिशवी पाहून त्याने मला न ओळखताच, आगे जावं, असं हातानेच सांगितलं. पुन्हा घरी येतांना कुत्री पण सुसाट बेभान होवून
पिसाळल्या सारखी भुंकत भुंकत अंगावर धावून येत होती.

मग ठरवलं केस कापून टाकायचे. पण कापणार कोण आणि कसे. कारण सलूनची दुकानं बंद होती. शेवटी घरीच प्रयोग करायचा ठरवला.

त्या साठी बायकोची मदत घेणं खूप आवश्यक होतं. बायकोला नीट समजावून सांगितलं. तिच्या स्वभावात  एक जबरदस्त आत्मविश्वास आहे. काहीही सांगायला गेलं की लगेच म्हणते," टेन्शन घेऊ नका, येते मला. "

लगेच तिने माझा ताबा घेतला. अस्सल न्हावी करतो तसा कपडा माझ्या गळ्याभोवती गुंडाळला. हातात कात्री घेतली. तशी तिच्या हातात कात्री पाहिल्यावर मी थोडा मनातून घाबरलोच होतो म्हणा. पण वरवर काहीच दाखवलं नाही. डोळे गच्च मिटून घेतले.

बराच वेळ, कचाकच आवाज येत होता. थोड्यावेळाने कानाच्या पाळी जवळ थोडासा जोरदार चिमटा बसल्या सारखं वाटलं. "अग हळू हळू "असं मी ओरडलो.
" झालं एकदाच, बघा जरा काय मस्त कापले केस मी.," असं म्हणतं तिने आरसा माझ्या समोर धरला. माझ्या डोळ्यसमोर गझनी पिक्चर मधला अमीर खान चमकून गेला. तर मधेच नांगरलेली जमीन दिसायला लागली.

" हे चांगलं दिसत नाही "हे बऱ्याच कष्टाने मी बायकोला पटवून सांगितलं. आणि सांगितलं की डोक्यावरचे सगळे केस दाढीच्या ट्रिमर ने काढून टाक. शेवटी ऐकलं बुवा तिने. आणि सगळ्या डोक्यावर ट्रीमर फिरवला. आता डोकं एकदम सफाचट होऊन गेलो. आता मीच मला ओळखू येत नव्हतो.

आणि कुठून तिला बुद्धी सुचली तिला, तिने माझा फोटो काढून फेसबुक वर अपलोड करून टाकला.

त्या नंतर, कित्येक जणांना गावी काहीतरी वाईट घडल्याचं वाटलं. अनेक जणांनी सांत्वनाचे फोन करणे सुरु केले.अशा वेळी मानसिक संतुलन सांभाळून राहण्याची गरज असल्याच सांगितलं. अनेक जणांनी लॉक डाउन संपल्यावर नक्की भेटायला येवू असे मेसेज दिले.

पण तसं काहीही झालेलं नाही, हे तुम्हालाही समजावं म्हणूनच मी हा लेख  लिहिला आहे. काळजी नसावी. पण लोभ असावा. येण्याची घाई करू नये.

आपला
दत्ता जोशी