लेंढार

Lendhar Marathi kavita

लेंढार

कायी समज नायी 

कायी उमज नायी

लगीन करण्याचं

माहं वय नायी...१

मायबापानं सांभाळलं

वया आधीच उरकलं

लेंढार म्हणून वाढवलं

खाणारं एक तोंड कमी केलं....२

गावात असली पंगत तर

घर लेंढारासकट खायला जाई 

खाणारी तोंडे व्हती दाहा

माय म्हणी यक दिस निघून जाई ....३

दिसाची रात व्हतांना 

म्या सारं बघत व्हते 

दुसऱ्या दिसाची वाट बघतांना 

मनात कायतरी शिजत व्हते....४

लेंढाराची पैदास काय 

थांबतच नवती 

शिक्षणाच्या अभावाने

लेंढार नुसती मरत‌ व्हती ...५

नायी समज नायी भानं

कसं राहावं कुणी सांगावं 

गरीबांच्या ओंजळीत 

कंदी फुलं सुखाच पडावं...६

ना ईज ना निवारा

सारा संसार पावसात वाहिला

रानातल्या त्या वसतीत

जीव घाबराच राहिला....७

वेळ कधी येईल 

आम्ही सुखी होण्याची 

कुणीबी मदत करत नायी

आम्हा गरीबांच्या लेकरांची‌...८

आलं लेंढार म्हणूनी 

सर्वजण हिनविती 

नकळत्या वयात 

आम्हां बोल लाविती .....९

कळत नव्हती मायबापाला

तवा सुखी संसाराची व्याख्या

पैदा करूनी सोडलं वाऱ्यावरी

लेंढाराला आमच्यासारख्या...१०

ना ओळख जगी कुणाला

ना पत्ता आमुचा एक ठायी

भरकटली जमात आमची

आस जगण्याची लावे कशा पायी..‌.११

सौ. आश्विनी सुहास मिश्रीकोटकर