लक्ष्मी

लक्ष्मी ही आपल्याला कोणत्याही रुपात दिसू शकते

गोष्ट छोटी डोंगराएव्हढी 

एक दुर्गा अशीही



"लक्ष्मी, अग ए लक्ष्मी..  मी जरा बाहेर जाऊन येतो तोपर्यंत कारखान्यात लक्ष दे."
गजानन त्याच्या मुलीला म्हणजेच लक्ष्मीला बोलावून थोडा वेळ त्यांच्या हळद कारखान्याकडे लक्ष दे म्हणून सांगत होता. कारखान्यात काही बायका अजूनही कामं करत होत्या, तिथं उभं राहिलं पाहिजे म्हणून तो तिला सांगत होता.

"आले आले.. आप्पा अहो जरा तरी दम धरा की, तिकडे आई तापाने फणफणलीये आणि तुम्ही इकडे माझ्या नावाने ओरडताय. कुठं कुठं बघू मी एकटी?"

"अग ही मशीन सुरू होत नाहीये, त्यासाठी दुरुस्तीला घेऊन जायची आहे आम्हांला. गाडी येईलच इतक्यात त्यात घालून मग न्यावी लागेल. आणि हो आम्हांला यायला जास्त वेळ झाला तर दुपारून कारखाना बंद करून घरातच थांब."

"आप्पा, तुम्ही पण ना. मला इतकं चांगलं मेकॅनिकल इंजिनिअर शिकवल तुम्ही आणि बाहेर मशीन घेऊन चाललाय."

"लक्ष्मी, तुला येईल पोरी ही मशीन दुरुस्ती करायला?"

"आणा बघू जरा इकडे, काय झालंय बघू तरी द्या मला मशिनीला. माझ्याकडून नाही झालं तर घेऊन जावा शहरात दुरुस्तीला."

लक्ष्मी, ही एकुलती एक मुलगी गजानन आणि सुनीताची. तिला चांगलं शिकवून खूप मोठं करायचं म्हणून ह्या दोघांनी शेतात राबराब राबून तिला इंजिनियर केलं.
त्यांची स्वतःची हळदीची शेती आहे, त्यावर भागल नाही म्हणून छोटेखानी कारखाना उभारला, हळदीचे पीक घेतले की त्याची पावडर तयार करून बाहेर माल पोहोचता करायचा. हा कारखाना उभारून आता जवळपास आठ वर्षे उलटून गेली होती.

सुरुवातीला भांडवल नाही म्हणून सुनीताने तिचे सगळे दागिने मोडून कारखान्यासाठी दिले होते. पण आज त्याच चीज झालेलं बघतांना तिला त्या दागिन्यांच काहीच वाटत नव्हतं.
खूप मेहनत घेतली होती दोघांनी. हळद लागवडी पासून ती काढून साफ करायची, त्याला वाफवायचं मग वाळवायचं आणि नंतर पॉलिश करून पुन्हा त्यातली छोटी मोठी हळद निवडून वेगळी करायची. नंतर त्याची पावडर तयार करून ती पॅकिंग करायची आणि पुढे विकायला पाठवण्यापर्यंत सगळी काम त्यादोघांनी स्वतः केलेली. अगदी घरोघरी हळदीच्या पावडरीचे सॅम्पल सुद्धा वाटले. कधी नफा तर कधी तोटा सुद्धा सहन करावा लागला, तेव्हा कुठे त्यांचा कारखाना आज इतका मोठा झालेला होता.
कारखान्याने चांगला जम बसला होता आणि मुलगी पण नुकतीच इंजिनिअरिंग पास होऊन घरी आली होती.

पण काल मध्येच हळद पॉलिश करायची मशीन बंद पडली. ती जर बंद झाली तर हळद तयार होणार नाही दळण्यासाठी आणि त्यामुळे पुढच्या सगळ्या कामांचा खोळंबा होईल.
जास्त वेळ गेला तर कामं थांबून चालणार नाही, म्हणून गजानन लगेच मशीन दुरुस्तीला घेऊन चालला होता शहरात.

लक्ष्मीने मशीन बघितली, अगदी साधीच मशीन होती ती. एका मोठ्या ड्रम सारखी आणि त्यात पाते होते म्हणजे हळदीचे वरचे साल त्याने निघून जाते. त्यातच थोडीशी दुरुस्ती करून लक्ष्मीने बघितले आणि सुरू होतेय का ते पाहिलं.

"आप्पा, सुरू करा बरं ते बटण."

बटण सुरू करताच मशीन अगदी पहिल्यासारखी चांगली चालू लागली. ते पाहून गजाननला खूप आनंद झाला.

"आप्पा, तुमची मशीन तर सुरू झाली की."

"होय रे बाळा, तू खरंच खूप हुशार आहे."

मशीन जोरजोरात फिरू लागली, आणि त्यात राहिलेली आधीची थोडी हळद सुद्धा गरगर फिरत होती. त्यातून लक्ष्मीच्या अंगावर हळद पावडरचे धूलिकण उडत होते.
तिच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर उडालेली हळद बघून ती खरोखरच एका मळवट भरलेल्या लक्ष्मी सारखी भासत होती.


सौं तृप्ती कोष्टी