साहित्य... समाजजीवनाचे प्रतिबिंब

Literature And Human Life

साहित्य म्हणजे काय? असा प्रश्न विचारला तर काय उत्तर असावे? मगं पटकन उत्तर दिले जाते,\"साहित्य म्हणजे जे आपण वाचत असतो ते\" म्हणजेचं विविध प्रकारची पुस्तके, मासिके,वर्तमानपत्र, ग्रंथ,इ. हे साहित्य कोणीतरी लिहीलेले असते आणि ते इतरांना वाचण्यास मिळत असते.जे साहित्य लिहीतात ते साहित्यिक.
आजुबाजुच्या परिस्थिती चा अभ्यास करून ,निसर्ग, संस्कृती, रुढी,रितीरिवाज, सहवासातील व्यक्ती ,आयुष्यातील सुखदुःख,घटना या सर्वांचा समावेश करून ,नव्या रुपात मांडणे,कधी वास्तविकता तर कधी कल्पकता चा उपयोग करून आपले विचार, आपल्या भावभावना लिखाण स्वरूपात वाचकांना देणे म्हणजे साहित्य.
मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण,विवरण,अर्थ निर्णयन,भाष्य अशा सर्व गोष्टी भाषेत मांडणे म्हणजे साहित्य होय.जीवनातील भावनिक, आध्यात्मिक, बौद्धिक अशा अंगांचा विचार करून वैचारिक, कल्पात्मक ,वास्तव अशा वेगवेगळ्या स्तरांवरचे दर्शन साहित्यातून घडत असते.
प्रत्येक लोक किंवा राष्ट्र, देश किंवा भूभाग ,तेथील इतिहास, भौगोलिक रचना, संस्कृती, परंपरा, वैशिष्ट्ये हे सर्व त्या भागातील साहित्यातून दिसून येते.
प्रत्येक देशाचे आपले साहित्य असते.
भारतातील साहित्यात भारतातीय संस्कृती, रूढी,परंपरा, सण,उत्सव, आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक इ.परिस्थिती अशा अनेक गोष्टी येतात.
भारतात वेगवेगळ्या राज्यात तेथील भाषेनुसार साहित्य लिहिले गेले.
जसे- महाराष्ट्रात मराठी साहित्य, बंगाल मध्ये बंगाली साहित्य .
भारतात प्रादेशिक भाषेप्रमाणे हिंदी आणि इंग्रजी साहित्य लिहिले जाते,वाचले जाते.
भारतीय साहित्य हे खुप पूर्वीपासून लिहीत आलेले आहे.ग्रंथ, पुराणे,वेद,उपनिषदे वगैरे यातून त्यावेळेची माहिती मिळते आणि येणाऱ्या पिढीने कसे आचरण ठेवावे अशी अनेक जीवनमूल्ये यात सांगितलेली असतात. वेगवेगळ्या धर्माचे आपले साहित्य असते.धर्मग्रंथाना प्रमाण मानून त्याप्रमाणे आचरण केले जाते.
मराठी भाषेतील \"साहित्य\" ही संकल्पना इंग्रजीतील Literature या शब्दाला पर्यायी म्हणून उपयोजिली गेली.इंग्रजीतील literature या शब्दाचा शब्दकोशात अर्थ \"कलामूल्य असलेले लेखन,विशिष्ट विषयावरचे माहिती देणारे छापील वाड्ःमय \" असा आहे.तसे साहित्य हा शब्द \"संहित\" या धातूपासून निर्माण झालेला असून संहित चा अर्थ एकत्र ठेवलेले असा आहे.साहित्याचा व्यावहारिक अर्थ सामानसुमान असाही आहे.परंतु साहित्याचे अभ्यासक साहित्याचा अर्थ घेतात तो म्हणजे मौखिक, लिखित सर्जनशील साहित्य.
मराठीत अशा सर्जनशील साहित्यांसाठी \"वाड्ःमय\", \"सारस्वत\",\"विदग्ध वाड्ःमय\",\" ललित वाड्ःमय\" अशा पर्यायी संकल्पना उपयोजिल्या जातात.
संस्कृत परंपरेमध्ये साहित्य असा शब्द प्रयोग इ.स.९०० च्या सुमारास केला गेला.इ.स.९०० च्या दरम्यान काव्यमीमांसेचे शास्त्र या अर्थाने साहित्य ही संकल्पना उपयोजिली गेली.आणि शब्द व अर्थ यांचे परस्परांना अनुरुप असे सौदर्य शाहीत्व म्हणजे साहित्य असे स्थूलमानाने ठरले.
टी.एस.इलियट या थोर कवीने गुड लिटरेचर आणि ग्रेट लिटरेचर असे दोन प्रकार सांगितले आहे. \"एखादी साहित्यकृती ही चांगली साहित्यकृती आहे की नाही हे वाड्ःमयीन निकषावरून समजेल.पण ती थोर / महान साहित्यकृती आहे किंवा नाही हे साहित्यकृती तून व्यक्त केलेल्या जीवनमुल्यांवरून कळेल.
जगात चांगल्या साहित्यकृती खुपच आहेत पण थोर साहित्यकृती किती आणि कोणत्या?

बोलणे ही व्यक्तीची अभिव्यक्ती असते तर साहित्य ही समाजाची अभिव्यक्ती ठरते.
लेखक हा भावभावनांना,आशा- आकाक्षांना आणि सुख- दुःखांना आपल्या शब्दांत लिहीत असतो.समाज जीवनाचा आरसा,समाजजीवनाचे प्रतिबिंब चं साहित्यातून प्रकट होत असते.
साहित्य कृती कल्पनाप्रधान असली तरी तिची पाळेमुळे वास्तवाच्या जमिनीत खोलवर रूजलेली असतात. वास्तवातील घटना- प्रसंगांची निवड करून त्यांची योग्य रचना करुन आणि आपल्या ज्ञानाने ,कल्पनेने नव्या रुपाने लेखकाने निर्मिलेली नवनिर्मिती असते.समाजाच्या कल्याणासाठी ,समाजहितासाठी असते.अनादिकाळापासून साहित्याचा प्रवास अखंड सुरू आहे.त्यात रोज नव्याने नवसाहित्याची भर पडत असते.

जुन्या- नव्या विचारांतून प्रेरणा घेऊन अनेक नवीन साहित्यिक आपल्या लेखणीतून साहित्य लिहीत असतात,साहित्याचा हा वारसा असाचं सुरू राहत असतो.लेखक, कवी,साहित्यिक हे जग सोडून गेला तरी तो आपल्या साहित्याच्या रुपात अजरामर असतो.इतरांना प्रेरणा देत राहतो.
जॉ पॉल सार्त्र हा थोर विचारवंत लिहितो,\" वाचक आहे म्हणून लेखक आहे आणि लेखक आहे म्हणून वाचक आहे. ते एकमेकांसाठी आहेत.लेखक साहित्यकृतीची निर्मिती एकांतात करत असला तरी त्याच्यासमोर वाचक असतोच.किंबहुना तो वाचका साठीचं लिहीत असतो .वाचक नसेल तर साहित्यकृतीला अर्थ च उरणार नाही\"
साहित्य म्हणजे सह् हित म्हणजे सर्वांचे हित ज्यात आहे असे...