# चौकट _ सासरी असलेल्या बंधनांची

सासरी असलेली बंधनाची चौकट एका सुखद घटनेने मीरा कशी ओलांडते हे मी या कथेतून सांगितले आहे.

" मीरा अग उठ ना आज तरी लवकर!! रोज तर 7.30 - 8 ला उठतेस ! पण आज घरी पाहुणे येणार आहेत, लवकर आवरा आवर करायला हवी की नको.. मी एकटीनेच सर्व बघायचे का?  एवढे तरी तुला कळायला पाहिजे ना?"

      मीरा नुकतच लग्न झालेली ,पदरी  थोरल्या सुनेचं नवीन जबाबदारीच ओझं पेलवत असणारी ,पण सोबतच उच्च  शिक्षण घेणारी आधुनिक तरुणी ..खर तर लग्नाआधी पियूषला मीराने  आपली उच्च शिक्षणाची इच्छा सांगितली. पियुषनेही तीची ही इच्छा मान्य केली.तिने प्रवेश परीक्षा दिली आणि त्यानुसार तिला चांगले कॉलेज देखील सासरच्या गावी मेरिट वर मिळाले होते. मग रात्री कधी कधी उशिरापर्यंत ती अभ्यास करत असे आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर होत असे.पण  सासूबाई  तिचे  हे प्रॉब्लेम्स समजून घ्यायला तयारच नव्हत्या.म्हणून तिची खूप घुसमट  व्हायची. कारण सासूबाईंच्या तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या.त्यांना तिच्या शिक्षणाबद्दल काहीच घेणं देणं नव्हतं.म्हणून ती चांगला स्वयंपाक करत नाही, चहा करत नाही,लवकर उठत नाही,पाहुणे आले की त्यांच्यासोबत माझ्या पाया पडत नाही अशा अनेक अवाजवी ,प्रसंगी खोट्या आरोप- प्रत्यारोपांचे ओझे तिच्यावर लादू पाहत होत्या,सतत उणे दुणे बोलणे करत होत्या.

          खर तर नव्या घरातील सदस्यांच्या आवडी निवडी जपत, त्याप्रमाणे वागणे,सर्वांचे मन जिंकणे यासाठी मीराही धडपडत होती हे पियूषही बघत होता. पण सासूबाई मात्र तिच्या काही छोट्या छोट्या गोष्टींचा उगाच बाऊ करत होत्या. मीराला त्यामुळे आपण सासरी असलेल्या या बंधनांच्या चौकटीत खूपच बांधले जातोय असे वाटत असे.पण हे सारे ती सहन करत होती.अशा अत्यंत कठीण परिस्थितीत,जशा जमतील तशा जबाबदाऱ्या पार पाडत तिने आपले शिक्षण  जिद्द आणि चिकाटीने पूर्ण केले. 

        पुढे तिला दिवस गेले आणि अंकितचा जन्म तिला खूप सुखावून गेला.पण अंकित जरा नाजूक असल्याने सव्वा महिन्यातच तिला सासरी यावे लागले. तिला अंकितला सांभाळून घरात काम करण्याचे खूप टेन्शन आले होते.पण सासूबाई मात्र तिला कुठल्याही गोष्टीत आता टोकत नव्हत्या.त्या खूप प्रेमाने तिला नवीन आईपण समजावून सांगायच्या.सासूबाई तिच्यातील नव्या आईची बाळासाठीची धडपड पाहून,रात्रीची जागरणे पाहून कळवळल्या होत्या.एवढ्या दिवसांतून पहिल्यांदाच त्यांनी तिला," तू उशिरा उठत जा ,मी नाश्त्याचे बघत जाईल", असे बजावले होते."तू आता तान्ह्या बाळाची आई आहेस, तेव्हा त्याची आणि तुझी खूप काळजी घेत जा!" असे सांगत होत्या.त्यामुळे मीरा पहिल्यांदा सासरी जराशी सुखावली होती.अंकित हळूहळू मोठा होऊ लागला होता. दिवसागणिक सासूबाई आणि मीराचे नाते बदलत गेले,आणि सासरी असलेल्या बंधनांची चौकट तिच्या आणि सासूबाईंच्या नव्याने बहरलेल्या प्रेमळ नात्याने केव्हाच ओलांडली आणि घराचे गोकुळवन झाले.

 

गोष्ट छोटी डोंगराएवढी

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे