लाइट कॅमेरा अँक्शन ..

टीव्ही चे वेड असलेल्या मुलीची गोष्ट


\"\" आज उठायला एवढा उशीर कसा काय झाला?\" तिने समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिले. चक्क सात वाजून गेले होते.

\" अरे देवा! अशी कशी मला जाग आली नाही? आता ह्यांचा डबा, मुलांची आंघोळ, शाळेची तयारी, नाष्टा, झाडलोट, दुपारचे जेवण सगळयालाचं उशीर होणार.\"

मनातल्या मनात विचार करत ती अंथरूनातून ताडकन उठायला गेली तेवढ्यात, दोन्ही हातात ट्रे मध्ये चहाचा कप घेऊन, समोर आलेला त्याचा आवाज तिच्या कानावर पडला.

" गुड मॉर्निंग डार्लिंग, तुला आवडतो तसा कडक आलं घालून केलेला स्पेशल चहा तुझ्यासाठी हजर आहे आणि हे आजचं वर्तमान पत्र. "

ती नुसतीच त्याच्या तोंडाकडे आ वासून बघत राहिली.

" राणी सरकार, चहा घ्या. मला माहीत आहे, तुम्हाला अशा बेड टी ची सवय नाही. पण आज तुमचा स्पेशल दिवस आहे.

आज तूम्ही दिवसभर काहीच काम करणार नाही. तुमची सर्व कामे आज मी करणार.

संध्याकाळी आपण सहा ते नऊ सिनेमाला जाऊ आणि रात्री बाहेरचं एकाद्या चांगल्या रेस्तराँट मध्ये डिनर करून घरी येऊ." असे म्हणत त्याने पुन्हा तिला आश्चर्याचा धक्का दिला.

दोन्ही मुलं शाळेसाठी तयार होऊन तिला टाटा करायला आली तेव्हा तर तिला नवलचं वाटले.

ती उठली. तिने घरभर नजर फिरवली.

केरकचरा निघून लादी चकचकत होती. सासूबाईंनी नुकतेच किचन सगळे आवरलेले होते.

तिला पहाताच,"सूनबाई झोप झाली का नीट? तुझ्या आवडीचं उपिट केलं आहे. आवरून घे आणि खाऊन सांग मला जमलं आहे का?" अगदी प्रेमाने त्या बोलल्या.

टेबलवर नवऱ्याचा डबाही तयार होता ...

तिची देवघरात नजर गेली. ताज्या टवटवीत फुलांसहीत सासऱ्यांची साग्रसंगीत पूजा आटोपत आली होती.

तिला सर्व गोष्टीचं नवल वाटले. तिची सकाळचं मुळी, सासरे उठण्यापूर्वी बागेत जाऊन पूजेसाठी ताजी फुले तोडण्यापासून सुरू होत होती.

आज दिवस नक्की कुठे उगवलाय?

आज काय बरं विशेष आहे?

खरं तर तिच्याशिवाय कोणाचेही कोणत्याच बाबतीत पान हलत नाही. पण आज सर्व कामे तिच्या मदतीशिवाय पार पडली गेली होती.

\" तिच्यावर खरचं नशीब इतके खूष झाले असावे का? की याच्यामागे नक्की कोणते राजकारण शिजत असावे? \" तिच्या मनाला शंका चाटून गेली.

\" अरे बापरे! मी विसरलेच आज माझा वाढदिवस आहे आणि तो ही पन्नासवा. म्हणून मला ही स्पेशल ट्रीटमेंट. आता माझ्या लक्षात आले.

व्वा ! किती मी नशीबवान आहे ! मला इतकी प्रेमळ माणसे भेटली आहेत. \" मनातल्या मनात ती अगदी खूष झाली.

तिला आठवले, तिचे बाबा, तिच्या पन्नासव्या वाढदिवशी त्यांची सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर करणार आहेत.

तिला मिळणाऱ्या प्रॉपर्टीवर तिच्या सासरच्या सर्वांचाचं डोळा आहे असे तिला तिच्या नणंदेच्या नवऱ्याकडून समजले होते.

कदाचीत तिचे बरे वाईट करायला सुद्धा ही मंडळी मागे पुढे पहाणार नाहीत म्हणून बजावले होते.

सर्वांवर बारीक लक्ष ठेवायला हवं असे तिने मनात पक्के ठरवले. कदाचीत आज रात्रीच्या पार्टीत जेवणातून विष कालवून मला मारण्याचा प्लॅन करतील.

हा ...हा ... हा ... शेवटी सर्वाचे प्लॅन उधळून मी कंपनीची मालकीण झाले.

बाबांची सर्व प्रॉपर्टी माझी झाली.

दादा आणि वहिनी आता हात चोळत बसले असतील. मला प्रॉपर्टीतून बेदखल करायला निघाले होते.

खऱ्या अर्थाने राजकारण करणाऱ्या बापाचा वारसा मी चालवला.

नुसता चालवला नाही तर मी त्याच्याही पुढे निघून गेले.

सर्व मालमत्तेवर वारसदार म्हणून, माझे नाव मी टाकले हे सख्ख्या बापाला सुद्धा कळून नाही दिले.

आता माझा नवरा माझ्या ताटाखालचे मांजर बनेल.

सासू सासरे माझ्यापुढे नाक घासत येतील.

श्रीमंतीची मिजास करणाऱ्या नणंदेचा तोराही आपसूक उतरेल.

स्विमिंगपूल वर कोण ही छछोरी स्वतःला स्मार्ट समजते?

उंचावर जाऊन डाय मारतेय. तिला काय वाटतेय तीच अशी डेरींग करू शकते?

हूं! दाखवतेच तिला, अगदी उंचावरून मीही सहज डाय मारू शकते ते.

" आई ...आई ...आई .. गं.... मेले ... मेले .... मेले मी ... वाचवा मला .... अरे त्याला बोलवा ... मला उचलून घेईल तो ....

अरे तुम्ही लाईट कॅमेरा बंद करा आधी .... प्लिज हेल्प मी फर्स्ट .... आय एम नॉट इन ॲक्शन ..... बंद करा आधी कॅमेरा ...

आ .... ओ माय गॉड .....मला उठता येत नाही .... माय डार्लिंग .... कुठे आहेस तू ... प्लीज पीक मी अप् … ", ती मदत मागत होती.

" कोण डार्लिंग ? कोणाला बोलवा ? ...

आता कुठलं हिचं शूटिंग चालू होते कोण जाणे? म्हणे लाईट कॅमेरा बंद करा."

कपाळाला हात लावत आईने बेडवरून पडलेल्या तिला विचारलं.

" यू डोन्ट नो माय डार्लिंग ? .... माय डियर हबी ... कॉल हिम इमिजेटली फर्स्ट." ती विव्हळत बोलत होती.

" जळल मेलं ह्या कार्टीच लक्षणं ..... म्हणे कॉल हिम इमिजेटली .....

पंचवीस वर्षाची घोडी झाली तरी लग्नाचा नाही पत्ता ... नी म्हणे हबीला बोलवा ....

दिवसभर टिव्हीवर त्या राजकरणाच्या बातम्या आणि कारस्थान असलेल्या सिरीयल पहात बसते ..... आणि रात्री झोपेत, पाहिलेल्या त्या वेगवेगळ्या भूमिकेत एकाच वेळी शिरते नि सर्वांच्या झोपेचं खोबरं करते.

देवा कसं होणार आहे माझ्या मागे हिचं?

लाईट कॅमेरा अँक्शनचे वेड कधी जाणार आहे कोण जाणे ? " म्हणत आईने नेहमीप्रमाणे कपाळाला हात लावला.

समाप्त
---------------------------------------------

कशी वाटली कथा? आवडली असल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा.