लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -९)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -९)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                              हो की नाही?

सारा आशेने सगळ्यांकडे बघत होती. तिला आता तरी सगळ्यांनी यासाठी सपोर्ट करावा असं वाटत होतं. उगाचच फक्त छंद म्हणून तिला हे काम करायचं नव्हतं, तर तिला हे काम जगायचं होतं. सगळे शांत बसले होते आणि म्हणून तिच्या काळजीत अजूनच भर पडली होती.

"आईऽ बोल ना काहीतरी." सारा म्हणाली.

"काय बोलू सारा? आम्ही काहीही बोललो तरीही तू तुझ्या मनाला जे वाटतं तेच करणार आहेस ना?" तिची आई म्हणाली.

"अगं आई असं का बोलतेस? सॉरी ना. जर मला कायम असंच करायचं असतं, तर मी आजही अजून काहीतरी खोटं बोलले असते ना? मला तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहेच. तुम्हा सगळ्यांच्या मनाविरुद्ध मी आजवर काहीही केलं का? पुढेही मला करायचं नाहीये. फक्त यावेळी तुम्ही मला समजून घ्या." सारा पुन्हा तिची बाजू मांडत होती.

समीरला आता हळूहळू साराची बाजू कळत होती. आपण तिच्या बाबतीत जरा जास्तच पझेसिव झालो होतो हेही त्याच्या लक्षात आलं.

'उगाच साराच्या मनाविरुद्ध वागलो मी. तिला तेव्हाच सपोर्ट केला असता, तर कदाचित तिला आज तिची बाजू सारखी मांडवी लागली नसती. खरंतर मीच माझ्या बहिणीवर विश्वास ठेवायला कुठेतरी कमी पडलो. जर आपणच असं वागलो तर समाज काय मोकळाच आहे नको नको ते बोलायला. आता मात्र मी माझी चूक सुधारली पाहिजे.' समीर स्वतःशीच म्हणाला.

त्याला त्याची चूक आता लक्षात आली होती. तो साराकडे बघत होता, पण आज मात्र तिच्या डोळ्यात दादा आपल्याला मदत करेल ही आशा दिसत नव्हती. ती तिच्याच परीने सगळ्यांना समजावत होती.

"मला काहीतरी बोलायचं आहे." समीर मध्येच म्हणाला.

आता पुन्हा दादा काहीतरी घोळ घालणार म्हणून साराच्या डोळ्यात काळजी दिसत होती. सगळे समीरकडे बघत होते.

"मला वाटतंय आपण साराला एक संधी देऊ." समीर म्हणाला.

तो हे म्हणाला पण साराच्या पटकन ते लक्षात आलं नाही. तिच्या मनात दादा विरोधच करणार हे बसलं असल्याने ते समजायला तिला जरा वेळ लागला, पण जेव्हा समजलं तेव्हा तिने चमकून दादाकडे बघितलं. तिच्या डोळ्यात दिसणारे आश्चर्याचे भाव त्याने बरोबर टिपले होते.

"हो सारा! मला माझी चूक लक्षात आली आहे." त्याने साराला सांगितलं.

"अरे समीर पण..." त्याची आजी बोलत होती पण तिला मध्येच तोडत समीर बोलू लागला; "आजी अगं आत्ताच आपण सारा काय करू शकते हे बघितलं. अगं सलग सहा तास न थांबता एवढे छान फोटो काढणं ही काही खायची गोष्ट नाहीये. मला वाटतंय आपण तिच्यातल्या या कलेला वाव दिला पाहिजे."

समीरचा प्रत्येक शब्द साराला आनंद देत होता. एवढा वेळ सगळ्यांना समजावून, समजावून थकलेला तिचा जीव त्याच्या शब्दांनी पुन्हा उभारी घेत होता.

"आई, बाबा, आजी, आजोबा आता तरी ऐका ना. दादाला पण आता मी यात करिअर करावं असं वाटतंय." सारा म्हणाली.

"मलाही हेच म्हणायचं आहे. आपण तिला पाठिंबा दिला तर ती खूप मोठी क्षितिजं गाठू शकेल." समीर म्हणाला.

"समीर ते सगळं फक्त असं बोलायला छान वाटतंय. पण उद्या आपली सारा पूर्ण जगभर फिरेल तेव्हा तिच्या सुरक्षेचं काय?" तिचे बाबा काळजीने म्हणाले.

"बाबा मला कळतेय तुमची काळजी पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल?" सारा तिच्या आई बाबांच्या जवळ बसत म्हणाली.

तिच्या बाबांनी फक्त "हम्म" म्हणून सहमती दर्शवली आणि सारा बोलू लागली; "बाबा, मी लहान असताना तुम्ही मला डान्स क्लास, ड्रॉइंग क्लास यासागळ्या आधी कराटे क्लासला घातलं, स्विमिंग क्लासला घातलं, हरप्रकारे स्वसंरक्षण कसं करायचं? याचे धडे दिले. ते का? फक्त सर्टिफिकेट मिळावं म्हणून?"

साराच्या बोलण्यात तथ्य होतं. तिच्या या प्रश्नांनी आपण काय बोलावं? हेच कोणाला समजत नव्हतं. सारा एक एक करून आपण सक्षम आहोत आणि स्वतःची काळजी घेऊ शकतो हे घरच्यांना पटवून देत होती. तिच्या डोळ्यात आज वेगळीच चमक त्यांना दिसत होती. सारा काहीही झालं तरी यातच उतरणार हे तिच्या डोळ्यातच दिसत होतं. कोणीही काही बोलत नाही पाहून साराच पुढे बोलू लागली;

"आई, बाबा आजवर तुम्ही माझे सगळे हट्ट पुरवले, आजवर मी जे मागितलं ते मला दिलंत आणि यापुढेही तुम्ही माझ्या भल्याचाच विचार करणार हे मला माहीत आहे. फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. आज मी ही जी परीक्षा दिली त्यात पदोपदी मला तुम्हा सगळ्यांची आठवण येत होती. सारखं वाईट वाटत होतं आपण खोटं बोललो आहोत, पण तुम्हा सगळ्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता. मला माहित आहे जर आधीच तुम्हाला हे माहित असतं आणि तुम्हा सगळ्यांनी आधीच होकार दिला असता तर आज आजी दिवसभर देवासमोर बसली असती, आजोबांच्या येरझाऱ्या सुरू असत्या, आईने काहीही खाल्लं नसतं, तुमचं फक्त शरीर ऑफिसमध्ये असतं आणि दादा सतत घड्याळ बघत बसला असता. जर हा रेकॉर्ड झाला तर पुढे काय करायचं आहे हेही माझ्या डोक्यात आहे. मला काहीही होणार नाही." सारा म्हणाली.

साराच्या बोलण्याने तिच्या आईच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. अगदी असेच सगळे वागले असते. समीर आणि साराची कोणतीही महत्त्वाची परीक्षा असली की घरात हे असंच वातावरण असायचं.

"अगं सारा तू ते कराटे काय म्हणतेस ते माणसांसाठी ठीक आहे पण जर हिंस्र प्राण्यांनी तुझ्यावर हल्ला केला तर?" साराची आजी काळजीने म्हणाली.

"अगं आजी प्राणी असे कधीच त्रास देत नाहीत. माणूसच प्राण्यांपेक्षा हिंस्र वागतो. आपण प्राण्यांना काही त्रास दिला तरच ते आपल्याला त्रास देतात. शिवाय आता टेक्नॉलॉजी एवढी बदलली आहे की स्वतःची सुरक्षा करून हे काम करता येतं." सारा म्हणाली.

"हो! सारा बरोबर बोलतेय. प्लीज तिच्या सुखासाठी फक्त एकदा आपण तिचं ऐकूया." समीर सगळ्यांना समजावत म्हणाला.

"अरे समीर तू तरी सगळ्या बाजूंनी विचार कर. उद्या जेव्हा हिच्या लग्नासाठी स्थळं येतील तेव्हा त्यांना असं चालणार आहे का? तू स्वतःवरून सांग तुला अशी मुलगी चालली असती का बायको म्हणून जी सतत बाहेर कोणत्याही वस्त्यांत कुठेही राहते, सतत बाहेर जाते?" त्याची आजी म्हणाली.

"हो. का नाही? हे एक काम आहे. मुलं बाहेर जाऊन राहतात, कित्येक मीटिंग दुसरीकडे करतात ते आपल्याला चालतं मग मुलगी करतेय म्हणून काय झालं? आपण कोणत्याही मुलीच्या चारित्र्यावर संशय घेणारे कोण? मुळात आपल्याला तो हक्कच नाही. इथे सारा आहे म्हणून मी बोलत नाहीये, तर कोणतीही मुलगी असो जर ती तिचं काम करायला अशी जात असेल तर उलट आपली जबाबदारी आहे तिला समजून घेणं." समीर म्हणाला.

त्याच्या बोलण्याने तर आजीने डोक्याला हातच लावून घेतला. विशाखाला मात्र आपण मुलावर योग्य संस्कार केले याची जाणीव झाली. प्रत्येक स्त्रीचा आदर आणि तिच्या कामाकडे चांगल्या दृष्टीने बघणे हे त्याच्या बोलण्यातून जाणवलं.

"मी काय बोलतेय, तू काय बोलतोयस? अरे आपल्याला आपल्या सारावर पूर्ण विश्वास आहे पण उद्या लोक उलट सुलट बोलणार लिहून घे." ती जरा नाराजीने म्हणाली.

"एक विचारू? हेच साराच्या ऐवजी मी हे केलं असतं तर युद्ध जिंकून आल्यावर जसा उत्साह असतो तसा दिसला असता मला. हो की नाही? मग साराच्या बाबतीत पण तसंच करुया ना. आता तरी विचार कर आजी, अगं आपण कुठल्या काळात आहोत? साराच्या आनंदात आपला आनंद आहे की नाही? तिला तर काही होणारच नाही शिवाय आपण असू ना तिच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे." समीर आजीला समजावत म्हणाला.

"आजी अगं तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असताना कोणी उलट सुलट बोलायची हिंमत तरी करेल का? अगं तू आहेस की सगळ्यांना चोख उत्तर द्यायला." सारा मुद्दामच तिला चण्याच्या झाडावर चढवत म्हणाली.

समीर आणि बाकी सगळ्यांच्या सुद्धा हे लक्षात आलं होतं आणि सगळेच गालातल्या गालात हसत होते.

"आई, बाबा बघा ना विचार करून. मलाही कळतंय तुमची स्थिती दोलायमान झाली आहे, पण साराचं पुढचं आयुष्य यावर निर्भर आहे. तुमचं मग काय उत्तर आहे? हो की नाही?" समीर म्हणाला.

"हो! मलाही आता पटतंय." विराज म्हणाला.

"येऽऽ थँक्यू, थँक्यू, थँक्यू बाबा... लव्ह यू.." सारा ओरडतच तिच्या बाबांना बिलगली.

तिच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद फाकला होता.

"हो.. हो.. थांब. आधी सांग तुझा निकाल कधी आहे?" त्यांनी विचारलं.

"पुढच्या चोवीस तासात मेल येणार आहे आणि मला खात्री आहे हा रेकॉर्ड माझ्या नावावर होणारच." सारा आत्मविश्वासाने म्हणाली.

क्रमशः.....
******************************
समीर तर स्वतःहून साराच्या बाजूने आला. घरचेही आता हो, नाही करत करत तिला पाठिंबा द्यायला तयार झाले आहेत पण जेव्हा खरंच तिला दूर देशात कामासाठी जावं लागेल तेव्हा काय होईल? तिची आजी म्हणते तसं समाज तिचं जगणं मुश्किल करून ठेवेल का? तिचं काम ती कसं करेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all