लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -८)

Story Of A Girl Who Wants To Achive Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -८)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                         पंख फुटले.

साराच्या अश्या खोटं बोलून जाण्याने सगळेच दुखावले होते. आजवर ती वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होण्यासाठी घरात न जेवता राहायची, अबोला धरायची पण आज तिने एवढं मोठं पाऊल उचललं याचंच सगळ्यांना वाईट वाटत होतं.

"सारा आधी तू तोंड सांभाळून बोल. आम्हाला काही तुझं वाईट झालेलं नकोय. आम्ही सगळे पण तुझ्याच भल्याचा विचार करतोय ना?" तिची आई म्हणाली.

"हो आई मला कळतंय, पण तो भल्याचा विचार माझे पंख छाटतोय. आपण किती बातम्या बघत असतो ज्यात मुली आपलं वर्चस्व गाजवत असतात? अगं बॉक्सिंग, भालाफेक, रायफल शूटिंग आणि किती अशी क्षेत्र आहेत जिथे आधी फक्त मुलं होती, पण आता मुलीही त्यात प्रशिक्षण घेतात आणि देशाचं नाव उंचावतात ना? त्यांच्या बातम्या बघून आपण वाह! वाह! करतो. मग मीच वेगळं काही निवडलं तर का असं बोलताय सगळे?" सारा म्हणाली.

"तुला आता खरंच पंख फुटलेत पण एक लक्षात घे सारा, तू जे म्हणतेय ना त्यासाठी पंखात प्रचंड बळ लागणार आहे. नाहीतर वाटेत शिकारी शिकार करायला टपून बसलेले आहेतच." तिची आई म्हणाली.

"एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे. माझ्या पंखांना बळ तर आता तुम्ही सगळेच देऊ शकता ना? आई, खरंतर मी आज असं खोटं बोलून जायला नको होतं मला मान्य आहे. फक्त एका प्रश्नांचं उत्तर दे, जर मी खरं सांगितलं असतं तर तुम्ही सगळ्यांनी मला जाऊ दिलं असतं का?" सारा म्हणाली.

कोणीही काहीही बोललं नाही. यातच साराला तिचं उत्तर मिळालं होतं.

"मिळालं मला उत्तर. नसतं जाऊ दिलं. मग आता बाबा तुम्हीच सांगा; मी काय करणं अपेक्षित होतं?" साराने विचारलं.

"सारा तू जे केलं ते चूक होतं हे तुला मान्य आहे ना? आता तोच तोच विषय चघळायला नको. जा आधी तू फ्रेश होऊन ये मला महत्त्वाचं बोलायचं आहे." ते म्हणाले.

"मी येते फ्रेश होऊन पण एक आत्ताच सांगते; आज मी जे खोटं बोलले ते पहिलं आणि शेवटचं. यापुढे नाही बोलणार मी खोटं. जे काही करेन ते सांगून." सारा म्हणाली आणि तिच्या रूममध्ये गेली.

तिची आजची चाल एकदम आत्मविश्वासाने भरलेली होती. तिच्या बोलण्यात एक करारीपणा जाणवत होता आणि त्याला त्याच स्वप्नांच्या दिशेने जाण्याच्या जिद्दीची धार होती. सगळ्यांना सारा एक टॉम बॉय आहे, ती सहसा अन्याय सहन करत नाही आणि तिचं मत स्पष्टपणे मांडते हे माहीत होतं, पण आज त्याच्याही पुढे जाऊन तिने फक्त आणि फक्त तिच्या करिअरसाठी एवढं मोठं सत्य आपल्यापासून लपवलं हे सगळ्यांनी बघितलं. ती तिच्या या मार्गासाठी काहीही करू शकते हे आज सगळ्यांनाच दिसलं.

"तरीही मी आधी पासून सांगत होते पोरीला नीट आवरा. आज ती आता डोक्यावर मिऱ्या वाटतेय ना?" तिची आजी म्हणाली.

"अगं आई असं काय बोलतेस? सारा तिच्या बाजूने बरोबर आहे." विराज म्हणाला.

"घ्या अजून पोरीची बाजू. अरे उद्या लग्न ठरलं तिचं तर काय सांगणार पाहुण्यांना? आमची लेक जंगलात फिरत असते, कोणत्याही वस्त्यांमध्ये जाऊन राहते आणि तिला जास्तीत जास्त बाहेर राहावं लागतं? कोण करेल हिच्या सोबत सोयरिक?" तिची आजी म्हणाली.

साराने रूममधून येताना हे ऐकलं. आपण जिथे स्त्री - पुरुष समानता बोलतो तिथे विचार मात्र तसा करत नाही याची तिला कीव येत होती.

"कोणी नाही करणार ना माझ्याशी लग्न? हेच मला आवडेल. पुरुषांनी कुठेही जा, कुठेही रहा ते चालतं पण मी कामासाठी जाणार हे चालत नाही?" सारा म्हणाली.

तिला आजीचं बोलणं खूप खटकलं होतं आणि म्हणूनच जरा रागात ती म्हणाली.

"साराऽ हेच शिकवलं का आम्ही तुला? आधी आजीला सॉरी म्हण." तिची आई ओरडली.

"काय चुकीचं बोलले मी आई म्हणून सॉरी म्हणू? पोरगी तेवढी फक्त धुतल्या तांदळासारखी हवी आणि मुलं? त्यांनी काहीही केलं असेल तरी चालेल? का असं?" सारा म्हणाली.

आता हा वाद चिघळत जाणार आणि त्रास आपल्याच माणसांना होणार हे विराजने ओळखलं.

"सारा थांब! आता काहीही बोलू नकोस." तो म्हणाला.

साराची आजी काहीतरी बोलायला जाणार तर तिच्या आजोबांनी तिलाही थांबवलं.

"हे असं वागून चालणार आहे का? विषय काय आहे? आपण बोलतोय काय?" तिचे आजोबा म्हणाले.

थोडावेळ कोणीही काहीच बोललं नाही. साराच्या मनात खरंतर खूप कालवा कालव होत होती. जिथे आपण प्रत्येकाच्या मताचा आदर केला पाहिजे, मुलींनाही समान हक्काने जे हवं ते करू दिलं पाहिजे असे विचार करताना मात्र हे माझ्या घरात नाही दुसऱ्या घरात होऊदे असं म्हणत असतो म्हणून, तिला जास्त वाईट वाटत होतं.

"सारा आधी तू बोल, एवढं मोठं खोटं बोलून जावं असं का वाटलं तुला?" तिच्या बाबांनी विचारलं.

"बाबा मी बरेच दिवस आधी लिमका बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी फॉर्म भरला होता आणि आज मला त्यासाठी शूट करायचं होतं. मला हे तुम्हा सगळ्यांना सांगायचं होतं, पण नेमकं त्याच दिवशी आईने माझ्या या करिअरसाठी कडाडून विरोध केला होता. त्यात ही गोष्ट मी घरी सांगितली असती तर मला जायलाच मिळालं नसतं म्हणून मी खोटं बोलले." साराने शांतपणे स्वतःची बाजू मांडली.

"बघ सारा तू तुझ्या या रेकॉर्डसाठी खोटं बोललीस पण आज ना उद्या हे बाहेर येणार होतंच ना? शिवाय इथे आम्ही सगळे तू मैत्रिणींसोबत गेली आहेस म्हणून निर्धास्त होतो पण जेव्हा अनुष्का दादाला इथेच दिसली तेव्हा आमच्या मनात काय काय विचार येऊन गेले असतील कळतंय का तुला? त्यात तुझा फोन बंद येत होता, मग आम्ही इथे एक एक क्षण कसा काढला असेल? तुझा तिथून निघाल्याचा फोन आला तेव्हाही तू एकटी एवढ्या लांबून कशी येणार येणार आहेस? हेही टेंशन होतंच. तू घरात पाऊल टाकत नाहीस तोवर काय वाटलं असेल आम्हाला कळतंय का तुला?" तिची आई म्हणाली.

"हो आई मला कळतंय सगळं. मी जे वागले त्याचा मला पश्चाताप आहेच. मी हे तुम्हा सगळ्यांना आजच सांगणार होते पण आधीच तुम्हाला समजलं होतं." सारा म्हणाली.

"कधी सांगणार होतीस? तुला आम्ही दोन वेळा संधी दिली होती; एक तू तिथून निघाल्यावर फोन केलेला तेव्हा आणि दुसरी तू आल्या आल्या. तरीही तू खरं बोलली नाहीस." तिची आजी म्हणाली.

"अगं आजी हे मी फोनवर सांगितलं असतं तर तुम्हाला काळजी वाटली असती म्हणून नाही सांगितलं आणि आल्या आल्या मला नव्हतं सांगायचं. मी कधी सांगणार होते ते थांब सांगते." सारा म्हणाली आणि तिने स्मार्ट टीव्हीला लॅपटॉप कनेक्ट केला.

"हे काय आता?" तिच्या आजोबांनी विचारलं.

"कळेल." सारा म्हणाली.

तिने आज जे फोटो शूट केलं होतं ते त्यावर झळकत होतं.

"हे फोटो दाखवता दाखवता मी तुम्हाला सांगणार होते आणि मला खात्री आहे हे फोटो बघून तुम्हा सगळ्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसेल." सारा म्हणाली.

शूट झाल्यावर तिला मनातून समाधान वाटत असलं तरीही तिने ते फोटो काही नीट बघितलेले नव्हते. सगळ्यांना फोटो दाखवताना आपण पण फोटो नीट बघायचे हे ती ठरवून आलेली पण आल्या आल्याच तिला मनस्ताप झाला.

"आज मी तिथे सलग सहा तास फोटोशूट केलं आहे त्याचेच फोटो आहेत हे." सारा म्हणाली. आणि फोटो दाखवायला सुरुवात केली.

साराने सुद्धा फोटो नीट बघितले नव्हते त्यामुळे तीही मन लावून आपण सगळं काम नीट केलं आहे ना? हे बघत होती. वाघिणीचे तिच्या पिल्लांसोबत खेळतानाचे फोटो, शिकार करतानाचे फोटो, वाघ डरकाळी फोडतानाचे फोटो, वाघीण पिल्लांना प्रोटेक्ट करतानाचे फोटो असे वेगवेगळ्या परिस्थितीत काढलेले एकूण तीनशे बत्तीस फोटो तिचे दाखवून झाले होते. आता फक्त शेवटचा एक फोटो दाखवायचा राहिला होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर असलेलं कौतुक स्पष्ट दिसत होतं. त्यांच्या मनातला राग कुठच्या कुठे पळून गेला आहे हे सगळ्यांच्या चेहऱ्यावरूनच तिला समजलं. वाघाचे फोटो तेही प्रत्येक फोटोत काहीतरी वेगळं हे बघून सगळ्यांना खूप कुतूहलसुद्धा वाटत होतं.

"तर आत्तापर्यंत आपण हे फोटो बघितले. लेट्स सी नाऊ लास्ट बट नॉट द लिस्ट फोटो." असं म्हणून तिने शेवटचा फोटो ओपन केला.

साराने सुद्धा तो फोटो नीट बघितला नव्हता. आत्ता सगळ्यांसोबतच तीही बघत होती. तिला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता एवढा छान तो फोटो आला होता. वेळ संपत आल्यावर सहज क्लिक केलेल्या फोटोमुळेच तिच्या या पूर्ण अल्बमला शोभा आली होती. त्या फोटोत वाघ आकाशाच्या दिशेने बघत होता आणि बरोबर त्याच्या नाकावर सूर्याचा गोळा तळपत होता. फोटो बघून असं वाटत होतं जणू त्या वाघाने सूर्य स्वतःच्या नाकावर घेतला आहे.

"एकच नंबर फोटो आहे हा." साराचे बाबा नकळत म्हणाले.

"आता गेला ना राग?" साराने हे ऐकून विचारलं.

"सारा अगं तुझ्यावर राग धरून बसायला आम्ही तुझे शत्रू नाहीये. तुझी काळजी वाटते, तुझं पुढे कसं होणार? याचे विचार सतावतात म्हणून आम्ही बोलत असतो." तिची आई म्हणाली.

"हो आई मला कळतंय पण आता तरी तुम्हा सगळ्यांचा विश्वास बसला ना?" सारा म्हणाली.

क्रमशः......
******************************
आता तरी साराला तिच्या करिअरसाठी परवानगी मिळेल? तिच्या नावावर हा रेकॉर्ड होईल का? काय असेल तिची पुढची ऍक्शन? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all