लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -७)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                         स्वच्छंदी उडू द्या.

शेवटचा एक सेकंद राहिलेला असताना तिने एक क्लिक केलाच आणि सगळे बाहेर येण्यासाठी वळले. तिने तिच्या परीने तरी तिचं पूर्ण बेस्ट दिलं होतं आणि त्याचीच चमक तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिला आपण यासाठी सिलेक्ट होणार आहोत की नाही? याची काहीही कल्पना नसली तरीही तिला मनातून खूप शांत आणि समाधानी असल्यासारखे वाटत होते.

"थँक्यू सर. तुम्ही परवानगी दिली आणि जातीने लक्ष घालून आमच्यासोबत आलात." साराने वन अधिकाऱ्यांचे आभार मानले.

"इट्स अवर प्लेजर. आधी मला वाटत होतं ही एक मुलगी काय रेकॉर्ड करणार? पण जेव्हा तुझी जिद्द बघितली आणि फोटो काढण्याची पद्धत बघितली तेव्हा समजलं तू पुढे खूप मोठी होणार." ते अधिकारी म्हणाले आणि साराला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन गेले.

साराला आता खूप छान वाटत होतं. जणू ती स्वच्छंदी उडत होती; जिथे पहिल्यांदा तिच्या कामाचं कोणीतरी कौतुक केलं होतं, पण हा आनंद जास्त वेळ तिच्या चेहऱ्यावर टिकला नाही. राहून राहून तिला आपण घरी काय खोटं बोललो आहोत हे आठवत होतंच.

'हेच कौतुक ऐकायला आज इथे दादा असता तर मला खूप छान वाटलं असतं.' सारा मनातून कितीही आनंदी असली तरीही एका क्षणाला तिच्या मनाला हाच विचार शिवून गेलाच.

"खरंच मॅडम तुम्ही खूप छान काम केलं. आजवर आम्ही अनेक पार्टीसिपेंस्ट सोबत गेलो पण अशी जिद्द नाही बघितली. त्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफर तेही एक मुलगी! अश्या घटना आपल्या भारतात फार कमी बघायला मिळतात." लिमका बुक्स ऑफ रेकॉर्डस् चे एक ऑफीसर म्हणाले आणि त्यांच्या बोलण्याने ती भानावर आली.

"हो आणि आपल्याला काही ठिकाणी जो वेळ लागत होता तो बघता मला वाटत होतं; तुम्ही पुढे जाणार आता इथे थांबणार नाही, पण तुम्ही खूप संयमाने काम केलंत. तुमचं टाईम मॅनेजमेंट एकदम परफेक्ट होतं म्हणूनच तुम्हाला एवढे फोटो काढता आले." दुसरे ऑफीसर म्हणाले.

"थँक्यू सर. हे काम म्हणजे आपण संयमानेच वागलं पाहिजे हेच डोक्यात ठेवलं होतं. शिवाय या सगळ्यात मोठा हात माझ्या आईचा आहे. मी तिला आलेल्या परिस्थितीत स्वतःला कसं मोल्ड करून घ्यायचं? हे करताना बघितलं आहे. रोज ती घरात कसं सगळं नियोजन करत असते यातूनच हे टाईम मॅनेजमेंट शिकले मी." ती स्मित करत म्हणाली.

"ग्रेट. तुम्हाला पुढच्या चोवीस तासात मेल येईलच तुमचा रेकॉर्ड सिलेक्ट झाला की रिजेक्ट. या सगळ्या फोटोंच्या ई - कॉपी तुम्ही आम्हाला मेल करा." त्या ऑफीसरने सांगितलं.

"हो सर. लगेचच करते." सारा म्हणाली.

तिथे उभं राहिल्या राहिल्याच साराने लगेचच मेल करून टाकला. बाकीच्या ज्या काही फॉर्मालिटी बाकी होत्या त्यासुद्धा पूर्ण झाल्या आणि ते ऑफिसर्स तिथून गेले. सारासुद्धा तिथून निघाली. निघाल्या बरोबर आधी तिने राघवला फोन लावला.

"हॅलो राघव." ती मुद्दामच हळू आवाजात उदास असल्यासारखं बोलत होती.

"सारा सगळ्यात आधी तू उदास होऊन बोलतेय ते नाटक थांबव." राघव तिचा आवाज ऐकून लगेच म्हणाला.

"अरे पण." तिला त्याची थोडी मस्करी करायची होती म्हणून ती म्हणाली.

"सारा मी तुला चांगलं ओळखतो. बास नाटक. सांग कसं झालं तुझं शूट?" त्याने सरळ मुद्द्याला हात घातला.

"काय यार तू? लगेच ओळखलं ना मी नाटक करतेय ते?" ती तक्रारीच्या सुरात म्हणाली.

"मग? सांग चल आता." तो म्हणाला.

"शूट तर एक नंबर झालं. म्हणजे आता माझा नंबर येईल की नाही? हे मला माहीत नाही, पण आतून खूप मस्त फिलिंग येतेय. एक समाधान वाटतंय. मी माझे पूर्ण प्रयत्न केलेत आणि काम हवं तसं केलं आहे." सारा म्हणाली.

"अरे वा! मस्तच. मी म्हणालो होतो ना, तू छान करशील शूट असं? झालं की नाही?" राघव म्हणाला.

"हो रे. शूट सुरू होऊन काही वेळ तरी मनात सतत शंका येत होती कसं होईल शूट? पण झालं सगळं आणि खरंच खूप थँक्यू यार. तुझ्यामुळे मी आज इथे येऊ शकले." सारा म्हणाली.

"चल बाय मी फोन ठेवतो. काय आहे ना आत्ता माझ्याकडे वेळ नाहीये. ही वेळ मी फक्त आणि फक्त माझ्या फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी ठेवतो. तर सारा मॅडम तुम्ही उद्या ऑफिसच्या वेळेत फोन करा." तो म्हणाला.

"अरे नको. नको. सॉरी. पुन्हा नाही म्हणणार थँक्यू. पण एक सांगू?" सारा म्हणाली.

"एक काय दहा सांग." तो म्हणाला.

"तुला आत्ता ही खूप छोटी गोष्ट वाटतेय, पण माझ्यासाठी आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा होता. कदाचित तू जर आज माझी मदत नसती केली तर मी इथवर येऊच शकले नसते. तू आज खास माझ्यासाठी तुझं सगळ्यात महत्त्वाचं तत्व; कधीही खोट्या कामासाठी तुझ्या कलेचा वापर करणार नाहीस हे मोडलंस आणि म्हणूनच हे शक्य झालं." सारा म्हणाली.

"तू काय आता मला उगाच या अश्या दुसऱ्या पद्धतीने थँक्यू म्हणते आहेस का? अगं ती तत्व मी बनवली आहेत. त्या तत्वांनी मला नाही बनवलं. मी जे काही केलं आहे ते तुझ्या उद्याच्या करिअरसाठी, तुझ्या उद्याच्या स्वप्नांसाठी! त्यात काय एवढं? तुला स्वच्छंदी उडता यावं, मनासारखं काम करता यावं यासाठी मी हे केलं आणि मैत्रीच्या हक्काने तू मला हे सागितलं असताना सुद्धा मी केलं नसतं तर आयुष्याच्या मैत्रीच्या परीक्षेत तर मी नापासच झालो असतो." राघव म्हणाला.

"खरंतर हा तुझा मोठेपणा आहे. तू जेवढं मला समजून घेतलं आहेस तेवढं समजून घेणं हे मला घरच्यांकडून अपेक्षित होतं पण झालं उलट." सारा म्हणाली.

"अगं आत्ता एवढं छान शूट करून आलीस ना? नको असे भलते सलते विचार मनात आणू. पटकन आता तिथून निघ मी काकूंच्या हातच्या लाडू, चिवड्याची वाट बघतोय आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर." राघव म्हणाला.

"हो येते मी तिथे. चल बाय." सारा म्हणाली आणि तिने फोन ठेवला.

घरीसुद्धा ती थोड्यावेळात तिथून निघणार आहे असं सांगायला तिचा फोन करून झाला. ती आता परतीच्या प्रवासाला लागली होती. साधारण संध्याकाळचे सात वाजत आले होते. निसर्गाने त्याची किमया दाखवायला सुरुवात केली होती. सगळीकडे छान केशरी प्रकाश पडला होता. सूर्याचा हलका लाल गोळा अस्ताला चालला होता आणि परतीच्या वाटेवर जाणारे पक्षी दिसत होते. आत्ता मात्र सारा तिचा कॅमेरा बाजूला ठेवून निसर्ग डोळ्यात साठवत होती. सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद करायच्या नसतात. मनाच्या अल्बममध्ये हे क्षण साठवायचे म्हणून ती अगदी मनभरून सगळं न्याहाळत होती. आजचा हा सूर्यप्रकाश साराच्या चेहऱ्याला अजूनच खुलवत होता. एक समाधानाची लकेर तिच्या चेहऱ्याला अजूनच खुलवत होती. हा प्रवास कधी संपला हेही तिला समजलं नाही. ठरल्याप्रमाणे ती आधी राघवला भेटायला गेली. राघव तिथे आधीच आलेला होता.

"कुठे आहे लाडू आणि चिवडा?" राघवने तिला तिथे आल्या आल्याच विचारलं.

"अरे हो! देतेय ना. किती घाई?" सारा म्हणाली आणि तिने बॅगेतून चिवडा, लाडू त्याला दिला.

"आहाहा! किती मस्त बनवतात काकू लाडू, चिवडा." राघव लगेचच एक एक घास तोंडात टाकत म्हणाला.

सारा मात्र शांतच उभी होती. राघवने हे बघितलं आणि तोंडातला घास कसाबसा पटकन संपवून तो बोलू लागला; "सारा! नक्की काय झालंय? तू टेंशनमधे का आहेस?"

"अरे बघ ना आज मी एवढं मोठं खोटं बोलून बाहेर पडले पण खोटं असं किती काळ लपून राहणार आहे?" ती म्हणाली.

"बस एवढंच? अगं आत्ता घरी जाशील ना तेव्हा सगळं खरं सांगून टाक. बघ तुझ्या नावावर रेकॉर्ड सेट झाला ना, तर तुझ्या घरच्यांना सुद्धा आनंदच होणार आहे. त्यांनाही तुझं चांगलं झालेलं हवं आहे." त्याने तिला समजावलं.

"बघूया आता काय होतंय. चल मी निघते." सारा म्हणाली आणि तिथून निघाली.

सारा घरी तर पोहोचली पण तिला काहीतरी विचित्र वाटत होतं. सगळे हॉल मध्येच बसले होते.

"आईऽ,‌ बाबाऽ आज खूप मजा आली. आम्ही सगळे छान फिरलो." ती उत्साहात बोलत आत गेली.

एरवी "आधी हात पाय धुवून ये." असं सांगणारी आई आणि आजी तिला काहीही बोलले नव्हते. काहीतरी विचित्र आहे हे तिला जाणवत होतं.

"काय झालंय सगळ्यांना? असे का काहीही न बोलता बसला आहात?" तिने हा बदल ओळखून विचारलं.

"कुठे काय? काही नाही. तू सांग ना कशी झाली तुमची पिकनिक?" तिच्या आईने विचारलं.

"हो आई खूप मस्त. आम्ही सगळे छान फिरलो, खूप फोटो काढले आणि खूप धम्माल केली." सारा म्हणाली.

"अच्छा. छान छान. पण तुमची राहायची गैरसोय झाली असेल ना?" समीरने मध्येच विचारलं.

"नाही. असं विचारायला काय झालं?" साराने गोंधळून विचारलं.

"अगं ती अनुष्का भेटली होती मला. ती तर इथेच होती आणि तिच्या रॉ हाऊसच काम सुरू आहे म्हणून विचारलं." समीर म्हणाला.

म्हणजे आपण खोटं बोललो आहोत हे आपण घरी यायच्या आधीच सगळ्यांना समजलं आहे हे साराने ओळखलं.

"सॉरी. मी खोटं बोलले." सारा म्हणाली.

"का?" तिच्या बाबांनी विचारलं.

ती काहीही बोलली नाही. एरवी तिची बाजू घेणारे बाबा आज तिला प्रश्न विचारत होते त्यावरूनच तिला परिस्थितीच गांभीर्य लक्षात आलं होतं.

"बोल ना साराऽ का खोटं बोललीस? बाबांनी काय विचारलं?" तिची आई ओरडली.

"खरंच सॉरी आई, बाबा. मी ताडोबाला गेले होते हे खरं आहे. लिमका बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी मी फॉर्म भरला होता त्याचंच आज शूट होतं म्हणून.." साराने सांगितलं.

"अच्छा? म्हणजे आजकाल आता तू खोटंही बोलायला लागली आहेस या कामासाठी. अगं तुला आमची तळमळ कळत नाही का?" तिची आई म्हणाली.

"अगं आई मला सगळं कळतंय. पण मला सुद्धा माझी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायची आहेत ना? मलाही या निरभ्र आकाशात स्वच्छंदी उडायचं आहे. माझ्या पंखांना बळ द्या ना तुम्ही सगळे." सारा पोटतिडकीने बोलत होती.

क्रमशः....
*****************************
साराला तिच्या स्वापांनाच्या दिशेने स्वच्छंदी उडता येईल का? काय असेल आता घरच्यांची प्रतिक्रिया? ती तिचं काम कसं करेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all