लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -६)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -६)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                               परीक्षा

दुसऱ्या दिवशी सारा लवकर उठली आणि सगळं आवरून बसली होती. तिला कॉलेजमध्ये असताना फोटो जर्नलिझममध्ये जे काही शिकवलं होतं ते ती आठवत होती. काहीही असलं तरीही आज तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस होता. थोडा अभ्यास झाल्यावर ती हॉटेलच्या गार्डन एरियामध्ये कॉफी आणि नाश्ता करण्यासाठी गेली. सकाळची प्रसन्न वेळ आणि निसर्ग सानिध्य लाभलेल्या त्या हॉटेल एरियामध्ये साराला खूप बरं वाटलं.

'निसर्गातूनच किती गोष्टी शिकण्यासारख्या असतात ना? हे इवले इवले पक्षी रोज जगण्यासाठी धडपड करतात, इवल्या चोचींनी छान घरटं बांधतात. कधीही त्यांना पुढच्या क्षणाची काळजी नसते. प्रत्येक क्षण भरभरून जगत असतात. माणूस मात्र कायम उद्याच्या काळजीत असतो. निसर्ग आपल्याला एवढं शिकवत असेल तर का काळजी करायची? जे होणार ते छानच होणार.' सारा मनातच म्हणाली आणि आपसूकच तिच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित आलं होतं.

त्या नयनरम्य प्रसन्न वातावरणात तिची काळजी आता कुठल्या कुठे पळून गेली होती. कॉफी आणि हलका नाश्ता झाल्यावर ती पुन्हा रूममध्ये आली. एव्हाना आठ वाजून गेले होते.

'चला आता राघवला फोन लावून मग घरी कॉन्फरन्स कॉल लावला पाहिजे म्हणजे घरच्यांना कसली काळजी राहणार नाही.' तिने विचार केला आणि राघवला फोन लावला.

"हॅलो गूड मॉर्निंग राघव." ती म्हणाली.

"गूड मॉर्निंग. बाय द वे आज तुझी खऱ्या अर्थाने एक्झाम आहे ना? ऑल द बेस्ट." राघव म्हणाला.

"थँक्यू यार पण माझं अजून एक काम आहे. मी आत्ता घरी आईला फोन लावते तुला वैशाली, मायरा आणि अनुष्का होऊन बोलायचं आहे आणि हो वैशालीने मक्याचा चिवडा खाल्ला आहे आणि मायराने लाडू! तर ते पण आवडले म्हणून सांग." सारा म्हणाली.

"असं कसं सांगणार? मी कुठे खाल्लेत हे पदार्थ?" तो मुद्दाम तिची मस्करी करत म्हणाला.

"अरे आहेत माझ्याकडे भरपूर. तुला आज संध्याकाळी भेटून देते पण आत्ता प्लीज सावरून घे ना." ती म्हणाली.

"हो गं! तू कर कॉन्फरन्स कॉल." तो म्हणाला.

लगेचच तिने घरी फोन करून मनसोक्त गप्पा मारल्या. राघवमुळे खरंतर आज ती खोटं बोलली आहे हे बाहेर पडलेलं नव्हतं. बऱ्याच गप्पा झाल्या आणि आता तिला मनातून खूप वाटत होतं आपण सांगावं; 'माझी आज खऱ्या अर्थाने परीक्षा आहे आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद मला हवेत.' पण ती हे करू शकत नव्हती. शेवटी बोलणं संपवून तिने फोन ठेवला आणि नंतर पुन्हा राघवला फोन लावला.

"बोल गं काय झालं?" त्याने विचारलं.

"काही नाही. आज तू सोडून बाकी कोणालाही मी इथे का आली आहे हे माहीत नाहीये. खरंतर आज तू जो माझ्यावर विश्वास दाखवला आहेस तो दादाने दाखवायला हवा होता." सारा म्हणाली.

"अगं असं काही नाही. तुझा मोठा भाऊ आहे तो, त्याला तुझी काळजी वाटणं साहजिक आहे. जर तुझ्या जागी माझी लहान बहीण असती तर कदाचित मीही समीर दादासारखा वागलो असतो." राघव म्हणाला.

"हे तू माझी समजूत घालण्यासाठी बोलतोयस. असो! आज आता माझ्या आयुष्यातली खूप मोठी परीक्षा आहे आणि घरच्या कोणाच्याच शुभेच्छा माझ्या पाठीशी नाहीयेत म्हणून मला खूप वाईट वाटतंय." ती म्हणाली.

"ओ मॅडम... तुम्ही कधी पासून एवढा विचार करायला लागलात? अगं सारा तुला असं मुळमुळीत बघायची सवय नाहीये. तू झणझणीत मिरची आहेस ना तशीच रहा. सगळं काही छान होणार बघ." राघव म्हणाला.

"तुझ्याशी बोलून खरंच बरं वाटलं रे. आता थोड्यावेळात मी इथून चेक आऊट करतेय." ती म्हणाली.

"ओके. ऑल द बेस्ट. सगळं काही नीट होणार आहे उगाच मनावर दडपण ठेवू नकोस. कॉलेजचा एखादा प्रोजेक्ट करायचा आहे असं मनात आणून शूट कर." त्याने तिला समजावलं.

"हो. मी शांत राहण्याचा प्रयत्न करतेय. बरं चल आता करते संध्याकाळी फोन." सारा म्हणाली.

"नुसता फोन नाही. घरी जायच्या आधी मला काकूंनी दिलेला डबा हवाय." तो म्हणाला.

"अरे हो रे. आधी तुलाच भेटणार आहे मी." सारा म्हणाली.

"बरं चल आता ऑल द बेस्ट." तो म्हणाला.

"थँक्यू. भेटू संध्याकाळी. बाय." सारा म्हणाली आणि तिने फोन ठेवला.

आता तिला हॉटेलमधून चेक आऊट करून निघायचं होतं. तिची खरी धावपळ अकरा पासून सुरु होणार होती. दहा वाजता स्पॉटवर पोहोचलं पाहिजे म्हणून ती तिथून साडे नऊलाच बाहेर पडली होती. आजचा एक एक सेकंद तिच्यासाठी महत्त्वाचा होता. बघता बघता अकरा वाजत आले. सारासोबत लिमका बुक्स ऑफ रेकॉर्डस् मधले दोन जण होते.

"चला मॅडम तुमची वेळ आता दहा सेकंदात सुरू होतेय." एक ऑफीसर म्हणाले.

साराने एक दीर्घ श्वास घेतला आणि लगेचच तिच्या कामाचा श्री गणेशा झाला. ६२५.४ वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या या अभयारण्यात सारा तिच्या स्वप्नांच्या दिशेने जात होती. ही एक परीक्षाच होती तिच्यासाठी. साधारण उंची, गव्हाळ रंग, मोठे डोळे आणि अगदी जाड नाही आणि अगदी बारीक नाही अशी हेल्दी सारा पाठीवर तिला लागणाऱ्या सामानाची बॅग घेऊन, हातात कॅमेरा घेऊन चालू लागली. आज सारा खरीखुरी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे असं दिसत होतं. आजचा तिचा रेकॉर्ड सेट झाला की पुढे तिला खूप संधी आपोआप मिळणार होत्या.

'आज इथे माझ्या सोबत दादा असता तर? नक्कीच त्याला अभिमान वाटला असता.' सारा विचार करता करता चालत होती.

आता ती तिला हव्या त्या स्पॉटवर पोहोचली होती. समोर काही फूट अंतरावर एक वाघीण तिच्या नवजात पिलांसोबत बसली होती. वन अधिकारीसुद्धा या सगळ्यांसोबत होतेच. व्यवस्थित लाईट आणि बाकी टेक्निकल गोष्टी बघून सारा फोटो काढायला तयार झाली होती. स्वतःची सुरक्षा कशी करायची? हेही तिला माहित होतं. एक आडोसा बघून ती तिथे उभी होती. वाघीण पिलांशी जेव्हा खेळत असेल तेव्हाचे काही फोटो तिला हवे होते. ती त्या क्षणाची वाट बघत होती आणि नशिबाने पुढच्या दहा मिनिटातच तो क्षण आला. वाघिणीच्या अंगावर पिल्लं खेळू लागली आणि साराला हवा तसा फोटो मिळाला. तिने मनातच एक लिस्ट तयार केली होती त्याप्रमाणे पहिला फोटो तर तिला मिळाला. तिला दुसरा फोटो वाघीण किंवा सिंहीण जेव्हा शिकार करते तेव्हाचा हवा होता. तिथल्या अधिकाऱ्यांसोबत सगळे पुढच्या स्पॉटवर गेले. एक वाघीण सावलीत बसून सगळा परिसर बघत होती. नुकतीच तरुण झालेली वाघीण होती ती. आजू - बाजूला शिकारीची काही कमी नव्हती. आता फक्त योग्य वेळेची वाट बघणे एवढंच साराच्या हातात होतं. पहिल्या वेळी तर नशिबाने पटकन साथ दिली होती यावेळी काय होईल हे कोणीही सांगू शकत नव्हतं.

'बापरे! साधारण पाऊण तास होऊन गेलाय अजून मला फोटो नाही मिळाला. दुसऱ्या स्पॉटवर जाऊ का? नाही नको. आपल्याला पेशेंस ठेवावे लागणार.' सारा मनातच विचार करत होती.

या कामात खूप संयम लागतो हे तिला माहीत होतं. त्यातूनही जर मनातून वाटत असेल की, आपल्याला हवा तसा फोटो मिळणार आहे आणि आपण तो कौल डावलून गेलो तर काही मिली सेकांदांसाठी सुद्धा ती संधी हातची गमवावी लागू शकते हे तिने अभ्यासलेल्या बऱ्याच लेखांतून वाचलं होतं. मोठे मोठे अभ्यासक ज्यांनी याबद्दल लिहिलं आहे त्यांचा अनुभव गाठीशी धरून सारा चालत होती. अजून थोडावेळ तसाच गेला आणि ती वाघीण तिथून उठली. एका हरणानाला ती लक्ष्य करणार होती. सारा लगेचच तिचा कॅमेरा घेऊन सज्ज झाली. वाघीण हरणाच्या जवळ दबक्या पावलांनी गेली आणि हरीण सावध होताच धावाधाव सुरू झाली. सारा क्लिक बटणावर बोट ठेवूनच होती. वाघिणीने हरणाला पकडण्याचा प्रयत्न केला आणि साराने पटकन एक क्लिक घेतला. काही मिली सेकंदाच्या या क्षणात साराला तर तिला हवा तसा फोटो मिळाला पण खऱ्या आयुष्यात वाघिणीच्या हातून ते हरिण निसटून गेलं.

'हरिण वाचलं ते चांगलं झालं पण बिचाऱ्या त्या वाघिणीला काहीही मिळालं नाही.' साराच्या मनात आनंद आणि दुःख दोन्ही भावना दाटून आल्या.

साराचे तिथले फोटो काढून झाल्यावर सगळे पुढे निघाले. कधी साराला हवे तसे फोटो मिळत होते तर कधी एवढा वेळ वाट पाहूनही पदरी निराशा पडत होती. आता फोटोशूट सुरू होऊन बराचवेळ झाला होता आणि सारा आपण रेकॉर्डसाठी शूटिंग करतोय हे विसरून स्वतः एन्जॉय करत शूट करत होती. त्यामुळे तिच्या मनावरचं एक ओझं हलकं झालं होतं. दिवसभराच्या या धावपळीत तिची वेळ संपायला फक्त दहा सेकंद राहिले होते आणि एक लास्ट फोटो तिला हवा होता म्हणजे तिचा सहा तासात वाघाचे तीनशे तेहत्तीस फोटो काढण्याचा रेकॉर्ड होणार होता.

क्रमशः....
***************************
साराला तिचा शेवटचा फोटो हवा तसा मिळणार का? तिचा हा तीनशे तेहत्तीस फोटो काढण्याचा रेकॉर्ड सेट होणार का? तिच्या घरच्यांना ती हे कसं सांगणार? काय असेल त्यांची प्रतिक्रिया? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all