लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -५)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                             काळजी

सारा तिचं आवरून पुन्हा बाहेर आली. एव्हाना नऊ वाजून गेले होते.

"सारा! तुम्ही कोणाच्या गाडीने जाताय की कसं?" तिच्या आजोबांनी विचारलं.

"नाही आजोबा. आम्ही ट्रेनने चाललो आहोत. दादरवरून जाणार आहोत." सारा म्हणाली.

"ठीक आहे. वेळोवेळी फोन करून कळवा. सावकाश जा आणि सावकाश या." आजोबा म्हणाले.

"हो आजोबा. नमस्कार करते." सारा म्हणाली आणि तिने नमस्कार केला.

"आयुष्यमान भव." आजोबांनी तिला आशीर्वाद दिला.

अजून तिला निघायला थोडा वेळ होता. तिने रूममधून तिची बॅग बाहेर आणली आणि हॉलमध्येच बसून एक नंबर डायल केला.

"हॅलो! झाली का तुमची सगळ्यांची तयारी?" तिने विचारलं.

समीर तिथेच बसला होता, पण अजूनही सारा त्याच्याशी आधी एवढं नॉर्मल वागत नव्हती. तिला अजून वेळ लागणार होता हे त्यालाही समजत होतं.

'सारा आत्ता तुला माझा राग येतोय, पण जेव्हा तुझं तुला समजेल की, मी का तुला विरोध केला? तेव्हा तू आधी सारखी बोलशील माझ्याशी याची मला खात्री आहे. आत्ता तुला थोडा वेळ देणं गरजेचं आहे हे मलाही कळतंय. तू घे हवा तेवढा वेळ.' तो मनातच म्हणाला.

'दादा! मला तुझा हेतू कळला आहे, पण एकदा विचार कर तुम्ही सगळे असताना, माझी एवढी प्रेमाची माणसं माझ्या सोबत असताना मला काही होईल का? मी तुझा विरोध झुगारून हे काम केलं म्हणून तुला एक दिवस नक्कीच अभिमान वाटेल.' सारासुद्धा मनातच विचार करत होती. तिला दादासोबत बोलायचं नव्हतं म्हणून तिने फोन लावल्याचं नाटक केलं होतं.

दोघंही आपापल्या मताप्रमाणे विरूद्ध विचार करत होते. साराही तिच्या जागी बरोबर होती आणि समीरही. साराला तिचं भविष्य डोळ्यासमोर दिसत होतं. तिलाही माहीत होतं आपल्याला या वाटेत खूप अडथळे येणार आहेत पण त्याची तीव्रता तिच्या लक्षात आलेली नव्हती. वय आणि अनुभवाची कमतरता तिला सगळं जग सुंदरच आहे असं दाखवत होतं. तिला अजून किती समस्यांना सामोरं जावं लागणार आहे हे समीर आणि बाकी घरचे जाणून होते.

"आईऽ चल मी निघते आता." साराने आईला हाक मारली.

"हो पण सावकाश जायचं." विराज म्हणाला.

"हो बाबा नका काळजी करू." सारा म्हणाली.

"अगं सारा एक मिनिट थांब. हे पैसे ठेव सोबत. जर काही खरेदी करावी वाटली किंवा कशाला लागले जास्त पैसे तर असावे सोबत." तिची आई तिच्या हातात दोन हजारांची नोट देत म्हणाली.

"नको आई. प्रवासासाठी जो खर्च होणार आहे तो बाबांनी दिला आहे त्यातूनच उलट थोडे शिल्लक राहतील." सारा म्हणाली.

"तरीही असुदे." असं म्हणत तिच्या आईने तिच्या हातात पैसे ठेवले आणि ती जायला निघाली.

"सारा थांब! मी येतो तुला सोडायला. तुझ्या मैत्रिणी आल्या की मी येईन घरी." समीर म्हणाला.

साराचा आता पेच होणार होता. ती चेहऱ्यावर काहीही गोंधळ न दाखवता बोलू लागली; "दादा नको. आम्ही सगळे पुढच्या गल्लीतून एकत्र जातोय."

"समीर! जाऊदे तिला एकटीला. आता काय लहान आहे का ती?" त्याचे बाबा म्हणाले.

साराला हे पथ्यावरच पडलं होतं. लगेचच ती घरातून निघाली.

'सॉरी आई, बाबा. आज मी पहिल्यांदा तुमच्याशी खोटं बोलून जातेय, पण दुसरा पर्याय नाही.' सारा मनात म्हणाली आणि मेन गेटमधून बाहेर पडली.

तिने जसं ठरवलं होतं त्याप्रमाणे प्रवास सुरू केला. आधीच तिने तिथे एका हॉटेलची रूम बुक करून ठेवली होती. प्रवासानंतर सरळ ती तिथेच उतरली. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या हॉटेलमध्येच तिने रूम बुक केली होती. पोहोचल्या पोहोचल्या तिने घरी कळवलं आणि ती जेवायला म्हणून हॉटेलच्या गार्डन एरियामध्ये गेली. उद्या धावपळ होणार आहे म्हणून हलकं जेवण तिने मागवलं. ऑर्डर येईपर्यंत ती शांत चित्ताने निसर्गाचं निरीक्षण करत होती. तिची ऑर्डर आल्यावर छान जेवण केल्यावर ती पुन्हा रूममध्ये गेली.

'ते एक बरं झालं माझा गोल आधीपासून सेट होता म्हणून प्रत्येक वाढदिवसाला, दिवाळीला आणि रक्षाबंधनाला मिळालेले पैसे साठवून ठेवले होते ते आज कामी आले. शिवाय आज घरातून निघताना फिरण्यासाठी किंवा खरेदीसाठी म्हणून आईने पैसे दिले म्हणून सगळं भागलं. बरं आता ते जाऊदे उद्यावर फोकस केला पाहिजे.' ती स्वतःलाच म्हणाली.

तिने पुन्हा एकदा उद्या ती कशी सुरुवात करणार आहे?, आपल्याला कोणत्या वेळी कोणत्या लेन्स वापरायच्या आहेत?, त्यांचे नियम काय आहेत? याची एकदा मनातच उजळणी केली. इंटरनेटवरून काही प्रसिद्ध फोटोग्राफर्सचे फोटो पाहिले आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास केला. या सगळ्यात रात्र होत आली होती. तिचं याकडे अजिबात लक्ष नव्हतं. फोनच्या रिंगमुळे तिची तंद्री तुटली आणि तिला वेळेचं भान आलं. घरून फोन आला होता.

"हॅलो..." सारा खुश होऊन म्हणाली.

"एकदम खुशीत आहे स्वारी. काय मग कसा गेला आजचा दिवस? काय काय केलं?" तिच्या आईने विचारलं.

"आणि जेवण झालं का?" आजी म्हणाली.

फोन स्पीकरवर होता आणि सगळेच तिच्याशी बोलत होते. सारा एकटी अशी पहिल्यांदाच एवढ्या लांब गेल्यामुळे सगळ्यांना तिची काळजी वाटत होती.

"आजचा दिवस मस्त गेला. आम्ही सगळे इथे आलो आणि दुपारी खूप मस्त जेवण केलं आत्ता आता जेवायचं आहे अजून. इथे बाहेर लॉन आहे तर सगळे तिकडेच जायला निघालो आहोत." साराने कशीबशी थाप मारली.

"बरं. वैशालीला मक्याचा चिवडा आवडला का? आणि मायाराने लाडू खाल्ले? जरा दे बघू त्यांना फोन मीच बोलते." साराची आई म्हणाली.

"अगं आई थांब, थांब किती घाई? हो! त्यांनी खाल्ला डबा. खूप आवडले त्यांना पदार्थ. आत्ता आम्ही जेवायला निघत होतो तितक्यात तुझा फोन आला म्हणून मी मागे राहिले आहे. त्या दोघींना सांगते ना तुला फोन करायला. नाहीतर फोन कशाला? घरीच आणते त्यांना." सारा म्हणाली.

"बरं बरं. जा मग आता जेवायला आणि जास्त तिखट, तेलकट खाऊ नकोस तुला त्रास होतो." तिची आई म्हणाली.

"हो आई नको काळजी करू. बरं चल उद्या बोलू. सकाळी फोन करते मी. पुन्हा आम्ही फिरण्यात गुंग झालो की फोन नाही होणार म्हणून." सारा म्हणाली.

"हो चालेल. बाय." सगळे एकदम म्हणाले.

साराने सुद्धा "बाय" म्हणून फोन ठेवला आणि रूममध्येच जेवण मागवलं.

'उद्याचा दिवस आता माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एरवी फोटोग्राफी करणं वेगळं आणि उद्या वेगळं. मला हवे तसे फोटो मिळायला हवेत.' सारा मनातच विचार करत होती एवढ्यात रूमचं दार वाजलं.

तिची ऑर्डर आली होती. तिने जेवण घेतलं आणि जेवण करू लागली. नाही म्हणलं तरीही तिला उद्याची काळजी वाटत होती. उद्याच्या दिवसभरात तिला वाघाचे फोटो काढायचे होते. तिला तिच्या स्टाईलने प्रत्येक फोटो जिवंत करायचा होता. त्याच काळजीत आणि विचारात तिने जेवण संपवलं आणि पुन्हा थोडावेळ अभ्यास करून झोपायला गेली. उद्याच्या उत्साह आणि काळजीने बराचवेळ तिला झोप येत नव्हती. सतत कुस बदलत असताना तिला ती लहान असतानाचे दिवस आठवले. शाळेत कसली स्पर्धा किंवा परीक्षा असली की, ही अशीच बेचैन असायची मग आई तिला थोपटून झोपायची. आज तिला आईच्या त्याच स्पर्शाची उणीव भासत होती. आपण कितीही मोठं झालो तरीही कसल्या काळजीत असल्यावर आईची एक मायेची थाप किती कामी येते याची तिला जाणीव होत होती. न कळत त्या शांत रात्री तिच्या डोळ्यांच्या कडासुद्धा ओलावल्या होत्या.

'नाही सारा! असं इमोशनल होऊन चालणार नाही. आता लवकर झोप. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.' तिने स्वतःलाच बजावलं आणि पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागली.

तिला दुसऱ्या दिवशी लवकर सगळं आवरून निघणं भाग होतं. सकाळी अकरा पासून तिचं शूट सुरू होणार होतं ते संध्याकाळी संपणार होतं. यासगळ्या धावपळीसाठी तिला आत्ता आराम करणं गरजेचं होतंच. तिला हेही समजत होतं की, आपण हा मार्ग निवडला आहे त्यामुळे घरच्यांच्या जीवाला घोर लागणार आहेच. आत्ता आपल्याला कोणाचाही पाठिंबा नाहीये तर स्वतःच स्वतःला पाठिंबा द्यायचा आहे, पण जे ठरवलं आहे तेच करायचं आहे.

क्रमशः....
*****************************
सारा आता उद्या तिचं काम नीट करू शकेल? तिच्या नावावर रेकॉर्ड सेट होईल? तिला हवे तसे फोटो मिळतील? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all