Login

लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -५०) अंतिम

Story Of A Girl Who Wants To Achive Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -५०)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                            सार्थक

जंगलात सारा कधी एकदा हत्तींचे भरपूर फोटो, व्हिडिओ काढायला मिळतायत याची वाट बघत होती. त्यांच्या समोर हत्तींचा जो कळप होता त्यात दोन पिल्लं होती आणि साधारण पाच ते सहा हत्तीणी होत्या. आशियाई हत्तींपेक्षा हे आफ्रिकन हत्ती आकाराने मोठे होते. मोठे मोठे सुळे, भव्य आकार आणि त्यांचा आवाज यामुळे सारा अगदी भारावून गेली होती.

'हत्तींच्या बाबतीत पण पिल्लांचा सांभाळ हा आईच करते. फक्त एवढंच की या कळपात जे असतात ते शक्यतो नातलग असतात असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात वयस्कर हत्तीण म्हणजे या पिल्लांची पणजी असू शकते, एक आजी असते, एक आई असते आणि इतर मावश्या. पिल्लं एकदम सुखरूप आणि योग्य देखरेखीखाली वाढतात. निसर्गाचं पण कसं आहे ना? माया काय ती एकट्या आईलाच दिलेली आहे. कोणतीही आई मग ती माणसाची असो की प्राण्याची पिल्लांना कधीच वाऱ्यावर सोडत नाही.' सारा मनातच म्हणाली.

एवढ्यात तो कळप पाणवठ्यावर जाऊ लागला. आता हत्तींचा मस्त खेळ बघायला मिळणार म्हणून सारा खुश होती. झालंही तसंच ते हत्ती सोंडेने पाणी घेऊन उडवत होते ते अगदी कारंज्याप्रमाणे दिसत होतं. सगळ्या हत्तीणी मिळून पिल्लांवर लक्ष ठेवून होत्या. साराने त्या सगळ्या क्षणांचे छान फोटो काढून घेतले. एक फोटो तर इतका सुंदर आला होता की, त्यात असं वाटत होतं जणू हत्तीच्या डोक्यावर पाण्याची छ्त्री धरली आहे. त्या हत्तीने उडवलेल्या पाण्यातून डोक्यावर छत्री सारखा आकार तयार झाला होता.

"सारा डू यू नो? ये वयस्क हाथी अपने ग्रुप को लीड करती है | मायग्रेशन के वक्त इनका सालो साल जो रास्ता चला आ रहाॅं है वही ये युज करते हैं |" कॅरलॉन सर म्हणाले.

"येस सर." सारा म्हणाली.

त्यानंतर त्यांचं काम तसंच सुरू राहिलं. आज साराने अगदी दिवसभर काम केलेलं असलं तरीही ती अजिबात दमली नव्हती. संपूर्ण रात्र जागून तिने त्या हत्तींच्या कळपाचे विविध फोटो, व्हिडिओ काढले होते. असेच दिवस सरत होते. कधी हत्ती, कधी सिंह, कधी वाघ, कधी समुद्रात माश्यांचे फोटो काढणे तर कधी पक्ष्यांचे फोटो हे सुरूच होतं. सारा आफ्रिकेत आल्यापासून एकही दिवस गॅप न घेता तिचं काम सुरू होतं आणि कॅरलॉन सरांच्यात आणि तिच्यात गुरु शिष्याचं एक जबरदस्त नातं तयार झालं होतं. कॅरलॉन सर देखील आता साराला समजून घ्यायला लागले होते आणि साराच्या प्रयत्नांमुळे त्यांचं भारतीयांविषयी असणारं मत हळूहळू चांगलं होत होतं. अश्यातच अजून पंचवीस दिवस होऊन गेले. वाईल्ड फील्ड शोचं शूट जवळ जवळ संपतच आलं होतं. आजचं त्यांचं काम झालं असल्याने सगळे निवांत बसले होते. साराने नेहमीप्रमाणे घरी फोन केला. त्यांचं बोलणं झालं आणि ती शांत बसून होती. वेळ मिळेल तसा साराचा घरी फोन होत असला तरीही आता तिला देखील घरची ओढ लागली होती. अजून साधारण दहा दिवसांनी ती घरी जाऊ शकणार होती. हे तिने घरी देखील सांगितले होते त्यामुळे घरचे देखील खूप खुश होते. साराला घरी गेल्यावर खऱ्या अर्थाने सरप्राइज मिळणार होतं. तिला अजूनही तिची आजी तिचं किती कौतुक करतेय हे माहीतच नव्हतं.

'आपण इथे आलो आणि कसे पटापट दिवस सरत गेले समजलंच नाही. आता फक्त दहा दिवस मी इथे असणार मग मी घरी जाणार. त्यांनतर मग दुसरा देश, दुसरी संस्कृती अनुभवायला पुढची वारी.' सारा शांतपणे बसून विचार करत होती.

आत्तापर्यंत तिने जे काही अनुभवलं होतं ते सगळं आठवत होतं. आफ्रिकेतल्या सगळ्या कडू, गोड आठवणींची शिदोरी घेऊन ती घरी परतणार होती. त्या सगळ्या विचारात ती हरवलेली असतानाच जेरेमी सर तिथे आले.

"सारा आय हीअर्ड आफ्टर टेन डेज यू आर गोइंग इन इंडिया?" ते म्हणाले.

त्यांच्या आवाजाने सारा भानावर आली आणि त्यांना "येस सर." म्हणाली.

"गूड. आय लाईक युअर वर्क. वी आर स्टार्ट अवर नेक्स्ट प्रोजेक्ट इन अॅमेझॉन फ्रॉम नेक्स्ट मंथ. तुम और कॅरलॉन सर भी इस प्रोजेक्ट का इंपॉर्टन्ट पार्ट हो | टूमारो वी शूट लास्ट शॉर्ट फॉर शो देन वी विल मीट इन अॅमेझॉन." जेरेमी सर म्हणाले.

साराला तर हे ऐकून खूप आनंद झाला. आत्ता आफ्रिकेतील काम पूर्ण होत नाही तोवर पुढच्या कामाची ऑफर तेही अॅमेझॉनच्या जंगलात हे ऐकून ती खूप खुश झाली. याही पेक्षा जास्त आनंद तिला जेरेमी सरांना हळूहळू हिंदी देखील येऊ लागले याचा झाला.

"थँक्यू सर. आय विल डू माय बेस्ट." सारा स्मित करत म्हणाली.

'अश्याच संधी मिळत राहिल्या तर मला आपल्या देशासाठी खूप काही करता येईल. आत्ताचा माझा आफ्रिकेचा अनुभव नंतर मिळणारा अॅमेझॉनचा अनुभव आणि असे अनेक अनुभव मिळाले की मग अजून पाच वर्षांच्या अनुभवाने मी आपल्या देशाच्या रिसर्च इन्स्टिट्यूटसाठी फोटो, व्हिडिओ देण्याचं काम करणार.' साराने मनातच संपूर्ण आराखडा आखला.

यातच ती रात्र सरली आणि आज वाईल्ड फील्डच्या शेवटच्या शूटसाठी सगळे सवाना डेझर्टमध्ये आले.

'आफ्रिकेत असलेलं रणरणतं वाळवंट. इथे या तापमानात कोणते प्राणी असतील? बघूया आज काय शिकायला मिळतंय.' सारा मनातच विचार करत होती.

प्रचंड ऊन, भरपूर उकाडा आणि दूर दूरपर्यंत पसरलेली फक्त आणि फक्त वाळू. त्या वाळू आणि एवढ्या प्रचंड तापमानात जे कुठले प्राणी तिथे राहत असतील ते कसे राहत असतील? याचाच विचार सारा करत होती. सगळे चालतच चालले होते. सगळं काही नीट आहे असं वाटत असतानाच जेरेमी सर अचानक धावत पुढे गेले. सगळे त्यांच्या मागून आले. त्यांना त्या वाळूमध्ये एक छोटासा साप लपलेला दिसला होता. त्यांनी त्याला थोडे प्रयत्न करून काठीने धरून ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी पटकन पण अगदी व्यवस्थित त्या सापाबद्दल साराला माहिती दिली.

'आजचं हे शेवटचं शूट. कम ऑन सारा हेही छान कर.' तिने स्वतःलाच प्रोत्साहन दिलं.

सगळं सेट झालं. आता शूटला सुरुवात होणार होती. आज का कोण जाणे पण साराच्या मनात धाकधूक होत होती. इतके दिवस तिने शूट आणि तिचं काम एकत्रच केलं होतं तरीही तिला असं कधी वाटलं नव्हतं. आज तिच्या मनाची अवस्था काहीतरी वेगळीच झाली होती. काहीतरी वेगळं नक्की घडणार आहे असं सारखं तिला वाटत होतं पण हे सगळं बोलायला आणि स्वतःला सावरायला तिच्या हातात वेळ कुठे होता? तिने लगेचच दीर्घ श्वास घेऊन कामाला सुरुवात केली. आता सारा पुन्हा एकदा जेरेमी सरांच्या वतीने बोलणार होती.

"यह एक बीटीस पेरिंगवे (Bitis Peringueyi) सांप है | भलेही यह सांप दिखने में बहुत छोटा है, लेकीन बहुत चालाक है | अभिभी यह इतने साफ-सुथरे तरीके से मिट्टी में छिपा हुआ था कि अगर मैंने इसके रेंगने के निशान नहीं देखे होते, तो मैं इसे नहीं देख पाता | यह सांप मिट्टी में छुपकर छिपकली, चिटी और छोटे छोटे किडे़ खाता है | अभी मैने इसे मिट्टी से बाहर निकाला तो, वह अपना मुॅंह खोलकर मुझे चेतावनी दे रहाॅं है ताकी मै उससे दूर रहूॅं |" एवढं बोलून साराने तिचं बोलणं संपवलं.

तोवर सरांनी त्या सापाला हातात घेतलं होतं. आता जेरेमी सर त्याचे दात दाखवत होते.

"आप देख सकते हैं कि इस सांप के दाॅंत कितने छोटे हैं | इस सांप की खासियत यह है कि यह अपने दांत जहाँ चाहे पलट सकता है | संक्षेप में, इस सांप के दाॅंत मोबाइल हैं | इस सांप के काटने से जख्म वाला भाग सुन्न हो जाता है | इसका ये वेपन है |" साराने अगदी व्यवस्थित समीक्षण केलं.

आता सरांनी त्या सापाला खाली सोडलं होतं. तो साप इतर सापांसारखा सरळ सरपटत नसून कसा उजव्या आणि डाव्या बाजूला आधी डोके आणि मग शेपूट असा सरपटतो हे दाखवण्यासाठी त्यांनी असं केलं होतं. साराने देखील अगदी व्यवस्थित सगळं सांगितलं. त्यांनतर कॅरलॉन सर आणि सारा त्या सापाचे फोटो घेत होते.

"आई गंऽ" सारा अचानक ओरडली आणि खालीच बसली.

साराला अचानक काहीतरी झालंय हे सगळ्यांनी ओळखलं. जेरेमी सर आणि कॅरलॉन सर पटकन तिच्या जवळ गेले.

"हे सारा? व्हॉट हॅपंड?" कॅरलॉन सर तिच्या जवळ येत म्हणाले.

"डोन्ट नो. सर पैर में कुछ तो हुवाॅं | बहुत दर्द हो रहाॅं है |" सारा हातानेच पाय दाबत म्हणाली.

जेरेमी सरांनी पटकन तिचा पाय बघितला आणि त्यांचं लक्ष तिचा पाय होता तिथे गेलं. तिथे एक लहान झुडूप होतं आणि त्यांना काहीतरी संशय आलाच.

"फास्ट.. गिव्ह मी अ प्लॅस्टर." ते पटकन म्हणाले.

त्यांच्या टीमने पटकन काळया रंगाच्या बँडएड सारखं एक प्लॅस्टर दिलं. सरांनी साराला जिथे जखम झाली होती तिथे ते लावलं.

"सारा रिलॅक्स." जेरेमी सरांनी तिला थोडं शांत केलं.

कॅरलॉन सरांना तिला काय झालं असावं याचा अंदाज आलाच. तिचा पाय चुकून तश्याच वाळूत दडून बसलेल्या सापाच्या शेपटी जवळ पडला होता आणि म्हणूनच स्वसंरक्षणासाठी त्या सापाने तिला दंश केला होता.

"सर मेरा पैर सुन्न होता जा रहाॅं है |" सारा म्हणाली.

लगेचच सगळे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी तिला तिथून घेऊन निघाले. तिच्यावर प्राथमिक उपचार देखील झाले पण आता तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती. या सगळ्यात रात्र झाली होती. तिचा पाय देखील हळूहळू बरा होऊ लागला होता पण तिला आता काहीही करून आधी घरी जायचं होतं. अचानक हे सगळं झाल्याने ती मनातून थोडी घाबरली तर होतीच.

"सारा टेंशन मत लो | जंगल में ऐसे अॅक्सिडेंट्स होते हैं | टूमारो मॉर्निंग वी विल गोइंग इन इंडिया." कॅरलॉन सर म्हणाले.

त्यांच्या बोलण्याने साराला जरा शांत वाटलं. डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊन तिला झोप लागतच होती की एकदम खाडकन ती उठून बसली. सगळे तिच्या तिथेच बसले होते. अचानक साराला पुन्हा काहीतरी त्रास होऊ लागला की काय? याची काळजी सगळ्यांनाच होती.

'उद्या जर मी घरी गेले आणि घरी मला साप चावला आहे हे समजलं तर पुन्हा मला या क्षेत्रात काम करणं फार अवघड होऊन बसेल. यावेळी आजी तर ऐकणार नाहीच सोबत तिला आई आणि आजोबा पण सपोर्ट करतील. नाही! नाही! काहीही झालं तरीही उद्या मी घरी नाही जाणार.' सारा मनातच विचार करत बसली होती.

ती अशी एकदम सुन्नपणे विचार करताना पाहून जेरेमी सर आणि कॅरलॉन सरांनी तिला हाताला धरून हलवलं आणि नक्की काय झालं? म्हणून विचारलं.

'सरांना जर याबद्दल सांगितलं तर त्यांचं भारतीय मुलींविषयी जे मत मी बदलू लागले आहे ते पुन्हा गढूळ होईल. नाही यांना खरं सांगून चालणार नाही.' तिने पुन्हा मनातच विचार केला.

तोवर जेरेमी सरांचं तिला दोन ते तीन वेळा काय झालं? म्हणून विचारून झालं होतं.

"आय नो सारा तुम्हे अपने घर की याद आ रही है | मैने तुम्हारे घर इन्फॉर्म किया है | डोन्ट वरी. टूमारो वी विल गो. मैं खुद तुम्हे इंडिया तक छोड़ने आ रहाॅं हूॅं |" कॅरलॉन सर म्हणाले.

साराला ज्याची भीती होती तेच घडलं. आता झालं गेलं तर तिला बदलता येणार नव्हतं. आता फक्त घरी गेल्यावर तिला पुन्हा सगळं शून्यातून सुरू करावं लागणार याचीच काळजी होती.

"सर आपने किससे बात की?" साराने आवंढा गिळत विचारलं.

"हिज नेम?.. या! समीर." सरांनी आठवून तिला सांगितलं.

समीर दादाचं नाव ऐकून तिच्या जीवात जीव आला.

'अरे हो आत्ता आठवलं मी सरांकडे जे काही फॉर्म भरून दिले त्यात मी दादाचा नंबर एमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून दिला आहे. बरं झालं हे फक्त दादाला माहीत आहे.' सारा मनोमन निश्चिंत झाली.

दुसऱ्या दिवशी सारा आणि सर भारतात येण्यासाठी निघाले. साराला अजूनही चालताना थोडा त्रास होत होता पण तो फक्त पायाला ठेच लागल्यावर जेवढा असतो तेवढाच होता. सर अगदी काळजीपूर्वक तिला घेऊन आले होते. त्यांचा एवढा मोठा प्रवास देखील झाला आणि भारतात पोहोचल्यावर समीर एअरपोर्टवर आला होता. सारा त्याला बिलगली.

"दादा तू घरी काही सांगितलं नाहीये ना? कोणाला काही माहीत नाहीये ना?" तिने आल्या आल्या प्रश्न विचारायला सुरुवात केली.

"अगदी सगळंच नाही पण थोडी कल्पना दिली आहे. आधी घरी चल तुला त्रास होतोय उभं राहायला. सर प्लीज कम." समीर म्हणाला.

"नो नो. आय एम गोइंग टू कर्नाटका |" सर म्हणाले.

"प्लीज सर घर चलो ना, आपने सारा का इतना ख्याल रखा, उसे यहाँ तक छोडने आये प्लीज सर." समीर त्यांना म्हणाला.

त्याने फारच आग्रह केला म्हणून सर देखील त्या दोघांबरोबर गेले. घरी आल्यावर प्रथे प्रमाणे साराच्या आईने तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि सारा समीरचा आधार घेतच घरात गेली.

"सारा एक फोन करून सांगायचं तरी होतं ना तुला काय झालं ते." तिची आजी ती आल्या आल्या म्हणाली.

"आई थांब तिला बसू दे." विराज म्हणाला.

"आई, बाबा हे कॅरलॉन सर." समीर म्हणाला.

त्यांनी सरांचं देखील स्वागत केलं. समीरने साराचं सगळं सामान आत नेऊन ठेवलं. सर आणि सारा फ्रेश होऊन आले तोवर विशाखाने त्यांना खायला केलं होतं. सारा काहीच न बोलता आता आजी आपल्याला खूप काही सूनवेल या विचाराने तोंड पाडून कसंबसं थोडं खात होती. सगळ्यांनीच तिचा असा चेहरा बघितला. साराच्या न कळत त्यांच्यात काहीतरी खुणा झाल्या.

"सारा तुला तिथे सापाने दंश केला हे आम्हाला समजलं आहे." साराची आजी म्हणाली.

तिच्या बोलण्याने साराला एकदम ठसकाच लागला. घरी सगळ्यांना सगळं माहित आहे हे एव्हाना आता तिच्या लक्षात आलं होतं. तिच्या बाबांनी तिला पाणी दिलं. सारा काहीच न बोलता आजीकडे बघत होती.

"अशी काय बघतेस? लहान असताना चालताना पडली होतीस तेव्हा काय आम्ही तुला पुन्हा चालूच दिलं नाही का? जेव्हा कॉलेजला जाताना गाडीवरून पडली होतीस तेव्हा पासून गाडी चालवू दिली नाही का?" तिची आजी म्हणाली.

एक क्षणभर तरी साराला काहीच समजलं नाही. ती पुरती गोंधळून गेली होती.

"अशी काय गोंधळून बघतेस? तू अजून खूप शिकायचं आहेस. अगं प्राण्यांच्या सानिध्यात असे लहानसहान अपघात होत राहणार. यापुढे अजून काळजी घ्यायची आणि तरीही काही लागलं किंवा खुपलं तरीही घाबरून लगेच घरी नाही यायचं." तिची आजी ठामपणे म्हणाली.

साराला हे ऐकून एकदम आश्चर्याचा धक्काच बसला होता. जी आजी आपल्याला एवढा विरोध करत होती तीच आज आपल्याला धीर देतेय आणि अजून यात खूप काम करून दाखव म्हणून सांगतेय? यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिच्या चेहऱ्यावर हे आश्चर्य स्पष्ट दिसत होतं.

"एवढी चकित नको होऊ सारा. आजी तुझं कौतुक करताना थकत नाहीये. अगं तू आफ्रिकेला गेल्यानंतर थोड्याच दिवसात आजीला तुझं सगळं म्हणणं पटलं." तिचे बाबा म्हणाले.

त्यानंतर मग साराला सगळ्यांनी मिळून आजीने कसं तिला समजून घेतलं? आणि परब आजींच्या नातीला देखील तिच्याकडून कशी प्रेरणा मिळाली हे सांगितलं. सारा हे ऐकून भारावून गेली होती.

"आजी खरंतर तुम्हा सगळ्यांमुळे माझ्या या कष्टाचं सार्थक झालं. थँक्यू तू मला खूप समजून घेतलंस." सारा आजीला मिठी मारत म्हणाली.

सर देखील त्यांचं हे सगळं बोलणं आणि एकमेकांबद्दल असलेला आदर, प्रेम बघत होते. त्यांचं देखील भारतीयांविषयी असलेलं मत पूर्णपणे बदललं होतं. असाच काळ पुढे चालला होता. सारा कधी भारतील विविध राज्यात, कधी विविध देशात पंख पसरून स्वच्छंदी उडत होती. अश्यातच अजून चार वर्ष सरली आणि तिच्या कामाचा अंदाज, तिचं कौशल्य लोकांना दिसू लागलं. तिची प्रेरणा घेऊन अजून मुली या क्षेत्रात पाऊल टाकायला तयार झाल्या. ज्यांना खरंच यात रस होता परंतु पैश्या अभावी त्यांना स्वप्नपूर्ती करता येऊ शकत नव्हती त्यांना सारा मार्ग दाखवत होती. विविध रेकॉर्ड सेट करून, स्पर्धेत भाग घेऊन त्यातून जे पैसे मिळतील ते तुम्ही तुमच्या पुढच्या करिअरसाठी वापरा म्हणून सांगत होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या कष्टाच्या कमाईवर हे करता येत असल्याने अगदी ताठ मानेने त्या मुली यात उतरल्या होत्या. सारा आता भारतीय इन्स्टिट्यूटना फोटो, व्हिडिओ देण्याचं काम करत होती. सोबतच तिची परदेशवारी देखील व्हायची. आता कॅरलॉन सरांप्रमाणे ती देखील प्रसिद्ध झाली होती. युवकांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी तिचे काही इंटरव्ह्यू देखील प्रसिद्ध करण्यात आले होते.

"मी जे काही शिकले आहे त्याचा उपयोग मला आपल्या देशासाठी करता आला आणि ज्या क्षेत्रात जायला मुली कचरत होत्या, सामाजिक दडपण आणि कुटुंबाची काळजी यामुळे त्या त्यांच्या मनाप्रमाणे यात उतरू शकत नव्हत्या त्या आता यात बिनधास्तपणे येत आहेत हेच माझ्या कामाचं सार्थक आहे असं मी मानते. खरंतर स्त्री ही निसर्गाशी घट्टपणे जोडली गेलेली असते आणि अश्यातच निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्याची संधी मिळाली तर ती अजुनच बहरत जाते असं माझं मत आहे." हे तर ती प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलायचीच.

तिला प्रत्येक स्त्रीने अगदी निडरपणे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि समजाच्या चुकीच्या दृष्टिकोनाचा विचार न करता उलट त्यांनाच दृष्टिकोन बदलायला लावावा हे वाटत असे. तिने तसे प्रयत्न करून काहींना या क्षेत्रात स्वतः आणलं होतं. तिची आजी जी सतत साराला यावरून बोलायची तीच आता साराला या सगळ्यासाठी पाठिंबा देत होती. आज साराच्या पंचविसाव्या वाढदिवसानिमित्त तिचं "लाईट, कॅमेरा, ऍक्शन" हे आत्मचरित्र प्रकाशित होणार होतं. तिच्यासारख्या अनेक होतकरू युवांना योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी म्हणून तिने ते लिहिलं होतं. सोहळा सुरू होता.

"आता आपण बर्थ डे गर्ल सारा याबद्दल काय म्हणतेय ते ऐकूया." अँकरने अनाऊंस केलं.

सारा मस्तपैकी लाँग पार्टी वेअर गाऊनमध्ये स्टेजवर गेली.

"सगळ्यात आधी मी आज जी कोणी आहे याचं क्रेडिट माझ्या कुटुंबाला आणि राघवला जातं. माझ्या नशिबात मला सगळे समजून घेणारे भेटले पण प्रत्येकाचं असं नशीब असतं असं नाही. हे आत्मचरित्र लिहिण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे एकाच पुस्तकात तुम्हाला या कामाविषयी पूर्ण माहिती मिळावी आणि अनुभव देखील वाचता यावे. आपलं जे स्वप्न असतं ते सत्यात उतरतंय हे बघताना, अनुभवताना जी मजा असते ती प्रत्येकाला मिळावी हीच माझी इच्छा आहे. मनापासून सांगते निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्याची संधी खूप काही शिकवून जाते. जवळून निसर्ग अनुभवण्याची मजा काही औरच. हे पुस्तक वाचून आपल्या समजाची दृष्टी थोडी जरी बदलली आणि अगदी बिनधास्तपणे मुली या क्षेत्रात उतरल्या तर मी याचं सार्थक झाल्याचं समजेन." साराने तिचं बोलणं संपवलं.

टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. तिथे उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रु होते. अंधार दूर करण्यासाठी जो पहिला दिवा लावावा लागतो त्यासाठी जी पहिली काडी जळते ती आज सारा होती. तिच्यामुळे आज समाजाचा चुकीच्या दृष्टीचा अंधार दूर झाला होता आणि इतर मुलींसाठी त्यांना आवडत्या कोणत्याही क्षेत्रात अगदी बिनधास्त पाऊल टाकायला मार्ग मोकळा होता. सगळ्यांच्याच डोळ्यात साराबद्दल कौतुक स्पष्ट दिसत होतं. तिच्या आई - बाबांच्या चेहऱ्यावर त्यांच्या कष्टाचं, संस्कारांचं सार्थक झाल्याचं समाधान झळकत होतं आणि त्याच समाधानाने मोठ्या थाटात तिचा वाढदिवस देखील साजरा होत होता.

समाप्त.
*****************************
नमस्कार वाचक मित्र, मैत्रिणींनो!

सदर कथा मी नारीवादी स्पर्धेसाठी लिहिली. नारीवादी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त एक कुटुंब, त्यात एखादी त्रास सहन करणारी बाई असंच चित्र उभं राहतं. पण नारीवादीची दुसरी बाजू म्हणजे एखादी मुलगी, एखादी स्त्री स्वतःच्या स्वप्नांसाठी जी मेहनत घेत असते, एखाद्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते तेव्हा तिचं तिथे असणारं स्थान, तिचा संघर्ष अशीही आहेच. आपण समाजात वावरताना बघतो की, मुलांना जे करायचं असेल ते करू दिलं जातं परंतु मुलगी जेव्हा काहीतरी वेगळं करू पाहते तेव्हा तिच्यावर बंधनं लादली जातात. समाज काय म्हणेल? यातून काही वाईट घडणार नाही ना? हा विचार आधी केला जातो. सुरक्षेसाठी सर्व ठीक आहे पण त्या स्वच्छंदी उडू पाहणाऱ्या पाखरांचे पंख आधीच नियम आणि समाज काय म्हणेल? या कात्रीने कापले जातात. ही कथा वाचून ज्यांना जगावेगळं काहीतरी करायचं आहे त्यांना प्रेरणा आणि समाजाचा सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडा जरी बदलला तरीही याचं सार्थक झाल्याचं मी समजेन. साराचा हा प्रवास सोपा तर नक्कीच नव्हता, कारण समाज ती जंगलात राहणार म्हणून आधीच त्यांच्या दृष्टीने विचित्र अर्थ काढत होते. घरच्यांच्या मनाविरुद्ध स्वतःला सिद्ध करताना नक्कीच तिला यातना झाल्या. तरीही फक्त मन घट्ट करून तिने स्वतःला सिद्ध केलं. शिवाय देशाचं नावही उंचावलं. कॅरलॉन सरांचं मत सारामुळे बदललं. अशीच धमक जर प्रत्येकाने दाखवली तर सगळ्यांनाच आवडत्या क्षेत्रात जायला मिळेल यात वाद नाही. बाकी याही कथेला तुम्ही सर्वांनी छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. असाच लोभ असावा. ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आता आपण पुन्हा भेटूया द डी.एन्.ए. पर्व दोनमध्ये. पुढच्या महिन्यापासून पुन्हा आपली सी.आय.डी. टीम येतेय. तयार आहात ना? तुम्हाला जर त्या कथेत येण्याची संधी मिळाली तर सी.आय.डी.ची तुम्ही कशी मदत कराल? हेही कमेंट करून नक्की सांगा.

🎭 Series Post

View all