लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४)

Story Of Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                              जाणीव

साराला मनातून कितीही वाईट वाटत असलं तरीही तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. अपराधीपणाची भावना तिच्या मनात येत होती पण तिला तिच्या पुढच्या भविष्यासाठी ठोस पावलं उचलणं भाग होतं.

"अशीच कायम हसत रहा आणि सॉरी बाळा उगाच मी एवढं ताणत बसले." विशाखा म्हणाली.

"आई तू नको ना सॉरी म्हणू. उलट मीच सॉरी. तुला आज दिवसभर माझ्यामुळे खूप त्रास झाला." सारा म्हणाली.

"जाऊदे आता; झालं गेलं गंगेला मिळालं. तू तुझं सगळं पॅकिंग करून घे." विराज म्हणाला.

"हो बाबा आणि तुम्हा दोघांना पुन्हा थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच. आय लव्ह यू." सारा म्हणाली.

आणि लगेचच तिने एक नंबर डायल करून फोन लावला; "हॅलो, मीही येतेय. उद्या आपण..." ती फोनवर बोलण्यात गुंग झाली आणि दोघं बाहेर आले.

साराला ताडोबाला जायची परवानगी मिळाली आणि त्या क्षणापासून मॅडम एकदम खुश होत्या. साराने जसं मनात ठरवलं होतं अगदी त्याप्रमाणे तिने बॅग भरायला घेतली. तिला उद्यासाठी लागणारा कॅमेरा, लेन्सेस, स्टँड आणि तिचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित बघून बॅगेत भरले.

"हॅलो राघव काम झालं. थँक्यू तू खूप मोठं काम केलंस माझ्यासाठी." तिने फोनवर आभार मानले.

राघव! तिच्या कॉलज मधला सगळ्यात टॉप मिमिक्री आर्टिस्ट. कॉलेजच्या एका इव्हेंटमध्ये दोघांची ओळख झाली होती आणि नंतर मैत्री झाली. आज तिला विचार करताना हाच आपली मदत करू शकतो हे जाणवलं होतं, म्हणून तिने आधीच त्याला फोन करून सगळी कल्पना देऊन ठेवली होती. जेव्हा तिचे बाबा फोनवर बोलत होते तेव्हा तो कॉन्फरन्स कॉल नव्हताच. राघव एकटाच सगळ्यांचे आवाज काढून बोलत होता.

"अरे बस का? दोस्ती में नो सॉरी, नो थँक्यू." राघव म्हणाला.

त्यानंतर थोडावेळ फोनवर बोलून तिने फोन ठेवला. रात्र झालीच होती. सगळे जेवायला बसले होते. संध्याकाळपेक्षा आत्ता तिचा मूड चांगला होता. मात्र अजूनही ती तिच्या लाडक्या दादावर नाराजच होती. वरवर जरी ती नॉर्मल आहे असं दाखवत असली तरीही समीरला याची जाणीव होत होती. छान जेवण करून ती पुन्हा रूममध्ये आली.

'येसऽ फायनली परवा मी ज्या क्षणाची वाट बघत होते तो आला. आता फक्त मला माझं बेस्ट द्यायचं आहे आणि नवीन रेकॉर्ड सारा देशमुखच्या नावावर. हा रेकॉर्ड मी करून दाखवला ना, तर घरातल्यांना मस्का मारायला पण सोपं जाईल. आता कधी एकदा तो दिवस उजाडतो आणि मी तिथे माझ्या रेकॉर्डसाठी जाते असं झालं आहे. दादाने जे करायला हवं होतं ते राघवने केलं आहे. तो मैत्रीच्या नात्याला जागला. त्याने माझ्यावर एवढा विश्वास ठेवून हे केलं आहे तर आता माझीही जबाबदारी आहे माझं बेस्ट देणं.' सारा बेडवर बसून तिने लहानपणी काढलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाच्या फोटोला उराशी घेऊन विचार करत होती.

तिला आता फक्त आणि फक्त तिचं भवितव्य दिसत होतं. फोटोग्राफी सोबतच तिला आता जगभर फिरायला मिळणार हेही माहीत होतं. नवीन रेकॉर्ड तेही लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये करायचा म्हणजे करीअरसाठी चांगली सुरुवात आहे हेही तिला माहित होतं आणि म्हणूनच यात कोणत्याही परिस्थितीत तिला यश मिळवणं गरजेचं होतं. आत्ता तिच्या घरचे तिला या करिअरसाठी नाही म्हणत असले; तरीही एकदा त्यांच्यासमोर रेकॉर्ड ठेवला, की निदान दादाला तरी थोडं इमोशनल करून आपल्या पार्टीत वळवता येईल आणि मग आई, बाबा आजी आणि आजोबांना तोच समजावेल असं तिला वाटत होतं. सारा तिच्या या अनोख्या स्वप्नात हरवून बेडवर पडली होती. मनातून प्रचंड आनंदी असल्याने तिला काही केल्या झोप येत नव्हती.

'सारा, अगं झोप ना. कितीवेळ जागी राहशील?' ती स्वतःलाच समजावत होती.


पण म्हणतात ना माणसाला टेंशन असलं की काळजीने आणि आनंद असला की त्या उत्साहामुळे झोप येत नाही. तसंच काहीसं साराच्या बाबतीत होत होतं. बऱ्याच उशीरा कशीबशी तिला झोप लागली तेही प्राण्यांच्या विचारातच. तिला आता मोकळं आभाळ मिळणार होतं स्वच्छंदी उडायला. एकदा रेकॉर्ड करून दाखवला की आकाश ठेंगणं होणार होतं तिच्यासाठी, म्हणूनच तिला काहीही झालं तरी हे काम फत्ते करून दाखवायचं होतंच. या सगळ्या स्वप्नात आणि विचारात ती मात्र आता शांत झोपली होती. पहाटेचे पाच वाजून गेले असतील आणि अचानक तिला जाग आली. कधी नव्हे ते सारा आज स्वतःहून उठली होती. तिने घड्याळ बघितलं.

'सारा मॅडम परत झोपलात तर उठायचे वांदे होतील. आवरून घेऊया.' ती स्वतःशीच म्हणाली आणि बेडवर बसूनच तिने आळस टाकला.

दोन मिनिटं ती तशीच बसून राहिली आणि मग उठली. उठून मस्त पैकी फ्रेश होऊन आज स्वतःहून मॅडम अंघोळीलासुद्धा गेल्या. एरवी तिच्या आईला तिच्या मागे सारखं ओरडायला लगायचं; "सारा, अगं जा अंघोळीला. दहा वाजून गेलेत. थोड्यावेळात कपडे धुवायला मावशी येतील." तेव्हा कुठे ती साडेदहा पर्यंत अंघोळीला जायची. पण आज मात्र तिला तिच्या स्वप्नांच्या मागे जायचं होतं आणि याबाबतीत ती एकदम सिरियस होती. म्हणतात ना माणसाला त्याच्या जबाबदारीची जाणीव असली की, कोणीही त्याला उठवायला लागत नाही तसंच सारासोबत झालं होतं. तिला तिची फोटोशूटची जबाबदारी चांगलीच माहीत होती त्याच जाणिवेतून ती आज कोणीही हाका न मारता उठली. तिचं सगळं आवरून होईपर्यंत सहा वाजले होते.

'आता थोड्याच वेळात आई उठेल. तिला आज आपण सरप्राइज देऊया. रोज आपण आयतं खातो आज सकाळची पहिली कॉफी आईला आयती हातात देऊ.' असा विचार करून ती किचनमध्ये गेली.

किचनमध्ये खुडबुड करून तिने कॉफी आणि साखरेचा डबा शोधला आणि एकीकडे दूध गरम करत ठेवलं. तोवर तिची आई रूममधून बाहेर आली.

"काय झालं सारा? भूक लागली का?" तिच्या आईने आश्चर्याने विचारलं.

"नाही. कॉफी करतेय मी आपल्यासाठी. रोज तू आम्हा सगळ्यांना देतेस ना? आज तू माझ्या हातची आयती कॉफी पी." सारा म्हणाली.

आजचं साराचं हे वागणं बघून तिच्या आईला चक्कर यायचीच बाकी होती. ती अवाक होऊन तिच्याकडे बघत होती तोवर साराने स्वतःला आणि आईला कॉफी आणली.

"घे, पिऊन बघ कशी झालीये?" सारा तिच्या हातात कॉफी मग देत म्हणाली.

"आज सूर्य नक्की पूर्वेला उगवला ना?" तिच्या आईला अजूनही विश्वास बसत नव्हता.

"हो. त्याने त्याचं काम नीट केलं आहे. तू घे ना कॉफी." सारा म्हणाली.

तिने कॉफी हातात घेतली आणि दोघी डायनिंग टेबलवर बसल्या. अजूनही विशाखाला हे सत्य आहे यावर विश्वास बसत नव्हता. साराने हे ओळखलं आणि ती म्हणाली; "आई! मला कॉफी येते करता आणि आज आम्ही सगळे मस्त ताडोबाला फिरायला जातोय म्हणून लवकर जाग आली. एवढं मी कधी शहाण्या मुलीसारखं वागत नाही असे भाव आणून नको बघू."

"अच्छा हो का? कधी वागली आहेस सांग शहाण्या मुलीसारखं?" विशाखा म्हणाली.

साराने फक्त "सोड ना आई. तू कॉफी घे, थंड होईल." असं म्हणून विषय बदलला आणि दोघी हसायला लागल्या.

"जमली जमली, छान जमली पोरीला कॉफी." विशाखाने एक घोट घेतला आणि म्हणाली.

दोघी माय लेकी तिथे गप्पा मारत मारत कॉफी पीत होत्या.

"बरं चल आता तुम्हा सगळ्यांना प्रवासात खायला डबा भरते. मायराला माझ्या हातचे लाडू आवडतात ना म्हणून जास्त देतेय आणि वैशालीसाठी तिला आवडतो म्हणून मक्याचा चिवडा पण केला आहे." साराची आई म्हणाली.

"एक.. एक.. मिनिट आई. मला एक कळत नाहीये तू त्या दोघींची आई आहेस की माझी? माझ्या आवडीचं काय?" साराने विचारलं.

"तुझ्या आवडीच्या खोबऱ्याच्या वड्या." विशाखा म्हणाली.

"थँक्यू आई." सारा एकदम खुश होऊन म्हणाली.

"वेडी कुठली. काल तुझा फोटो काढून ठेवायला हवा होता. फुग्यासारखं तोंड फुगलं होतं." विशाखा म्हणाली.

एवढ्यात विराज आणि समीर त्यांचं त्यांचं आवरून आले.

"बघ कशी कळी खुलली आहे माझ्या लाडक्या लेकीची." विराज म्हणाला.

त्याबरोबर साराने छान गोड स्मित केलं. पण समीरला बघून तिला अजूनही वाईट वाटत होतं.

"बरं मी आहे खोलीत. एकदा सगळं सामान चेक करते आणि डबे बॅगेत भरते. दहापर्यंत निघेन मी." सारा म्हणाली.

तिला समीरशी बोलायचं नव्हतं म्हणून खरंतर ती तिथून गेली. समीरच्या हे बरोबर लक्षात आलं होतं. त्याने पटकन कशीबशी कॉफी संपवली आणि तो तिच्या रूममध्ये गेला.

"साराऽ" त्याने दारातूनच तिला हाक मारली.

तिने काहीही प्रतिसाद दिला नाही म्हणता तो आत गेला.

"सॉरी ना सारा. अजून किती वेळ अशी न बोलता राहणार आहेस?" तो तिला समजावत होता.

तरीही सारा तिच्या तिच्या कामातच होती. त्याचं बोलणं ऐकून न ऐकल्या सारखं ती वागत होती.

"सारा, मला कळतोय तुझा राग, पण आपलं नातं एकदम टॉम अँड जेरी सारखं आहे की नाही? मी काल जे वागलो ते तुझ्या काळजीपोटी ना?" समीर म्हणाला.

"दादा याला काळजी नाही ओव्हर प्रोटेक्टिंग म्हणतात. आजवर ठीक होतं रे किंबहुना तुझी लहान बहीण म्हणून तुझा तो हक्कच आहे, पण काल तरी तू माझी बाजू समजून घेऊन माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होतास." सारा जरा नाराजीने म्हणाली.

"काय करणार होतो मी सारा? मला नसतं चाललं उद्या कोणी माझ्या बहिणीबद्दल वाकडं बोललेलं. तू वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होणार म्हणजे देश विदेशात फिरणार. तुला एकटीला अनेक वस्त्या, जंगलं आणि कुठल्या कुठल्या निर्जन ठिकाणी राहावं लागेल याची मला कल्पना आहे. तुला जेवढं हे जग सरळ वाटतंय ना तेवढं नाहीये. तू इथे परत आल्यावर तुझ्यावर ज्या नजरा रोखल्या जातील ना त्या मला सहन होणार नाहीत. अगं तुला अजून कुठे माहीत आहे जगाची मानसिकता. तुझ्यावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे गं, पण लोकांचं काय? त्यांना फक्त विषय चघळायला हवे असतात आणि तो विषय तू होऊ नये म्हणून मी असं वागलो." समीर पोटतिडकीने बोलत होता.

त्याला चांगलीच कल्पना होती उद्या सारावर काय वेळ येऊ शकते याची. बोलताना त्याच्या डोळ्यांच्या कडांमध्ये थोडं पाणी आलेलं साराला जाणवलं.

"सॉरी दादा." सारा म्हणाली.

"तुझं सॉरी मला नकोय. मलाही तुझाच आनंद महत्वाचा आहे, पण कोणीही तुझ्यावर चिखलफेक केलेली मी नाही सहन करू शकत म्हणून मी असं वागलो. थोडं समजून घे." समीर म्हणाला आणि तो तिथून गेला.

'दादा तुला माझी एवढी काळजी आहे हे आज समजलं रे, पण जर रस्ताच नसेल तर कोणालातरी तो तयार करावाच लागतो. दिव्यांची रोषणाई करायला पहिल्या काडीला तरी जळावंच लागतं. माझा शब्द आहे तूच मला या करिअरसाठी पाठिंबा देणार.' सारा मनात म्हणाली.

क्रमशः.....
*****************************
साराला समीरच्या मनात तिच्या विषयी किती काळजी आहे हे आज समजलं पण खरंच ती त्याला स्वतःच्या बाजूने वळवून घेऊ शकेल? तिचा हा रेकॉर्ड होईल का? घरी सत्य समजेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all