लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४९)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४९)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                  भित्या पाठी ब्रम्ह राक्षस.

सारा तर आज अगदी सातवे आसमन पे होती. तिला तिचं काम करताना मिमिक्री करायला मिळत होती त्यामुळे तर ती अजूनच खुश होती.

'मला सगळ्यांनी समजून घेतलं म्हणून आज मी इथे हे क्षण अनुभवते आहे. प्रत्येकाच्या वाट्याला हे असं सुख येतं असं नाही. मी भारतात परत गेल्यावर नक्कीच ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांची मनापासून मदत करणार.' सारा विचार करत होती.

ती तिच्याच विचारात असताना सगळे पुढच्या स्पॉटवर पोहोचले होते. हा स्पॉट थोडा लांब असल्याने साधारण अर्धा, पाऊण तास त्यांचा प्रवास झाला होता. चालता चालता अचानक जेरेमी सरांना एक साप दिसला. कोणालाही काही कळायच्या आत ते पटकन त्या सापाजवळ गेले. झाडाच्या फांदीवर बसलेला तो साप पटकन डोळ्याला दिसतही नव्हता. अगदी झाडाच्या खोडासारखा रंग, त्यावर चॉकलेटी रंगाचे चौकोनी आकाराप्रमाणे डिझाईन असलेला हा साप होता.

'आता हा कोणता साप असावा? सरांनी तर एकदम बिनधास्त जाऊन त्याला हातात धरलं आहे.' सारा मनातच म्हणाली.

"सारा धिस इज रॉक पायथाॅन स्नेक (Rock Paython) ये आफ्रिका का सबसे बडा़ स्नेक है |" कॅरलॉन सर म्हणाले.

'सगळ्यात मोठा? हा तर किती लहान दिसतोय.' सारा सापाला निरखून बघत विचार करत होती.

"आय नो व्हॉट यू थिंक. धिस स्नेक लूक्स स्मॉल अँड सर टोल्ड यू दॅट इट इज द बिगेस्ट स्नेक इन आफ्रिका, राईट?" जेरेमी सर म्हणाले.

"येस सर." सारा म्हणाली.

त्यानंतर त्यांनी साराला व्यवस्थित सगळं सांगितलं. आता सारा पुन्हा हिंदीत सगळी माहिती सांगणार होती. यावेळी तिने तिचा कॅमेरा एक व्यवस्थित जागा बघून तिथे सेट केला. यावेळी तिला त्या सापाच्या संपूर्ण हालचाली आणि त्याचे बारीकसारीक फोटो देखील हवे होते.

"सारा कॅन वी स्टार्ट?" डायरेक्टरनी साराला विचारलं.

"येस सर." सारा म्हणाली.

"ओके. गेट युअर पोझिशन." ते म्हणाले.

लगेचच आता कामाला सुरुवात झाली.

"यह सांप अफ्रीका में सबसे बड़े सांप के रूप में जाना जाता है | रॉक पायथाॅन के रूप में जाने वाला यह सांप जहरीला नहीं है | यह लंबाई में छह मीटर तक बढ़ सकता है और इसका वजन अस्सी किलोग्राम तक हो सकता है | मैं इसके इतने करीब हूॅं और इसे छू रहा हूॅं क्योंकि यह लगबग पंद्रह किलोग्राम का होगा और इसकी लंबाई तीन मीटर तक होगी | यह सांप हालांकि विषैला नहीं है लेकीन खतरनाक जरूर है, क्योंकि यह अपने शिकार को जोर से दबाकर उसकी साॅंस को रोककर मार डा़लता है | इसके कांटने से बहुत खुन बेह जाता है और शिकार बच नहीं पाता |" सारा सरांच्या वतीने बोलली.

आता सरांनी त्याला झाडाच्या फांदीवरून खाली काढलं होतं. तो सरांच्या हाताला विळखा घालून तो विळखा घट्ट करत होता पण सरांनी दुसऱ्या हाताने लगेच लगेच तो विळखा सोडवला होता. जर त्यांनी असं केलं नसतं तर हाताचा रक्त पुरवठा थांबून हात सुन्न पडला असता आणि याचा फायदा घेऊन त्या सापाने त्यांना दंश केला असता. त्यांनी आता जास्त वेळ न दवडता त्याला खाली जमिनीवर ठेवलं. त्यांच्या हातात एक काठी होतीच. आता पुन्हा साराला सरांच्या वतीने बोलायचं होतं.

"इन सांपों की ऑंखें तेज नहीं होती हैं | शिकार करने से पहले ये सांप अपना मुॅंह खोलते हैं और शिकार को चेतावनी देते हैं, और ऐसा करते समय क्या हम इस शिकार को खा सकते है क्या? वे गणना भी करते हैं |" सारा म्हणाली.

हे सगळं शूटिंग झाल्यावर सरांनी काठीच्या मदतीने त्या सापाचे दात दाखवले. या सापाचे दात थोडे आतल्या बाजूनेच असतात. आतल्या बाजूला असलेले दात अती तीक्ष्ण होते. साराच्या आता लक्षात आलं होतं की, का भक्ष्याचा रक्तस्त्राव होत असेल ते.

'या सापाचे दात हुकासारखे काम करत असणार. त्यामुळेच तर हे आतल्या बाजूला आहेत आणि जेव्हा या सापाची शिकार त्याच्या जबड्यात अडकत असेल तेव्हा हेच दात त्याला निसटून जाऊ देत नाहीत आणि बराच रक्तस्त्राव होतो.' सारा मनातच म्हणाली.

त्यांनतर जेरेमी सरांच्या सांगण्यावरून अशीच डिटेल माहिती शोसाठी तिने हिंदीत शूट केली. जेव्हा सरांनी या सापाला देखील खाण्यासाठी तसेच शूज बनवण्यासाठी मारले जाते हे सांगितलं तेव्हा साराला प्रचंड राग आला होता.

'हे लोक कसे काहीही खाऊ शकतात? मगरी काय?, साप काय? जे दिसेल ते खातात. उद्या माणसांना खायला देखील कमी करणार नाहीत. यापेक्षाही अजून भयंकर म्हणजे स्वतःच्या सो कॉल्ड स्टेटससाठी या बिचाऱ्या प्राण्यांना मारून त्यांच्या पर्स, शूज, बेल्ट बनवतात. अरे कशाला? उद्या तुमच्या कोणाच्या कातडीचे बूट बनवले तर कसं वाटेल तुम्हाला?' सारा मनातच म्हणाली.

त्यांचं तिथलं शूट झालं होतं आणि सगळे तिथून थोड्या अंतरावर हत्ती बघायला जाणार होते. सारा मात्र अजूनही तिच्याच जागी स्तब्ध उभी होती.

"हे सारा. लेट्स गो." जेरेमी सर म्हणाले.

त्यांच्या आवाजाने ती भानावर आली आणि जीपमध्ये जाऊन बसली.

'आपली भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे. कधीच कोणत्याही प्राण्याला त्रास होऊ देत नाही. आपल्या भारतात जवळ जवळ सगळेच प्राणी देवासमान मानले जातात. उंदीर मामा गणपतीचे वाहन, नंदी शंकराचे वाहन, हत्ती इंद्र देवाचे वाहन, वाघ देवीचे वाहन असं सगळं करत करत प्रत्येक प्राण्याला अभय मिळाले आहे. काहींना त्या दंतकथा वाटल्या तरीही आपले ऋषीमुनी आणि पूर्वजांनी पूर्ण विचार करूनच प्राण्यांना देव मानण्याची प्रथा सुरू केली.' सारा तिच्याच विचारात होती.

सगळ्यांनाच सारा स्वतःमध्ये हरवली आहे हे जाणवत होतं. जेरेमी सरांना वाटलं तिला अजून मनासारखी माहिती मिळाली नाही किंवा काहीतरी शंका आहे म्हणून ती अशी बसली आहे. त्यामुळे जेरेमी सरांनी तिला याबद्दल विचारलं. साराने लगेचच ही योग्य संधी आहे हे जाणून आपल्या भारतीय संस्कृतीत कसे प्राण्यांचे रक्षण केले जाते हे सांगितलं. ती एक एक करून कॅरलॉन सरांना भारतीय संस्कृतीविषयी पटवून देत होती. कॅरलॉन सर तर काहीच बोलले नाहीत पण जेरेमी सर आणि त्यांची टीम साराला याबद्दल अजून विचारून आणि खरंच त्यांचं मत याबद्दल काय आहे? हेसुध्दा मनापासून सांगत होते. त्यांची ही चर्चा छान रंगली होती पण तोवर त्यांचा पुढचा स्पॉट आला होता. एव्हाना दुपार कलली होती.

"सारा इन धिस स्पॉट वी कॅन सी अ आफ्रिकन एलीफंट." कॅरलॉन सर म्हणाले.

सारा ज्या क्षणाची वाट बघत होती तो आज फायनली आला होता. तिचं आफ्रिकन हत्ती जवळून बघायचं फार आधी पासूनच स्वप्न होतं.

'माझा सगळ्यात आवडता प्राणी हत्ती आज मला बघायला मिळेल. असं म्हणतात हत्तीची बुद्धी खूप तीक्ष्ण असते. ते कोणतीही गोष्ट सहजासहजी विसरत नाहीत. हा फक्त आता आजची रात्र देखील हत्ती सोबत घालवायला मिळाली तर खूप मजा येईल.' सारा मनातच विचार करत होती.

विचारा विचारातच तिने तिचा कॅमेरा सेट करून ठेवला होता. आत्ता काही शोसाठी शूटिंग होणार नव्हतं त्यामुळे साराला पूर्णपणे तिच्या मनासारखे फोटो, व्हिडिओ काढायला मिळणार होते. सगळे जिथे थांबले होते तिथून काही अंतरावरच हत्तींचा एक कळप होता.

"टुडे वी विल स्टे हिअर. एलिफंट के साथ स्टे करने का अपना ही मजा है |" कॅरलॉन सर म्हणाले.

साराला जे हवं होतं ते देखील झालं. आता ती पूर्णपणे तिच्या कामात गुंतली होती.
****************************
इथे साराच्या घरी सकाळपासून साराची आजी तिच्या मैत्रिणींना फोटो, व्हिडिओ दाखवल्यावर कोण काय म्हणलं? हे सांगताना थकत नव्हती. संध्याकाळची वेळ होती आणि सगळे आत्ता घरातच होते. सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते.

"अरे विराज तुला माहितेय ती परबीण जिने मला संस्कारांवरून एवढे बोल लावले होते तीही आज साराबद्दल चांगलं बोलत होती." आजी म्हणाली.

"आई हे तू जवळ जवळ पाचव्यांदा सांगितलं आहेस." विराज म्हणाला.

"हो का? बरं मग हे नसेल सांगितलं; ती असं का बोलली माहितेय?" आजी बोलत होती पण तिला मध्येच तोडत समीर बोलू लागला; "हो माहीत आहे. कारण आता त्या परब आजींच्या नातीलासुद्धा साराचं बघून हेच क्षेत्र निवडायचं आहे. यंदा तिने दहावीची परीक्षा दिली आहे."

"हे पण सांगितलं?" आजी तोंड लहान करून म्हणाली.

"आई तुम्ही सकाळ पासून जवळ जवळ एक अन् एक शब्द सांगितला आहे." विशाखा म्हणाली.

"कांता बघ तुला म्हणालो होतो ना मी की, तूच साराचं सगळ्यात जास्त कौतुक करणार." आजोबा म्हणाले.

"हो. खरं सांगू का? मला तेव्हाही तिचं कौतुक वाटत होतं पण तिची काळजी, जगाची भीती आणि त्यात पोरीची जात म्हणून मी तिला विरोध करत गेले." आजी म्हणाली.

आज एवढ्या दिवसांनी आजीच्या मनातलं बाहेर आलं होतं. हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी होतं. थोडावेळ थांबून स्वतःला सावरुन आजी पुन्हा बोलू लागली; "सारा जर ठाम राहिली नसती तर कदाचित माझ्यातल्या भीतीने तिला हे काम करूच दिलं नसतं आणि नंतर मात्र उरलं सूरलं आयुष्य मला साराच्या मनाविरुद्ध तिला दुसरं काम करायला लावलं या ओझ्याखाली काढावं लागलं असतं."

"असुदे आई. आपण तिच्या काळजीपोटी बोलत होतो. तुम्ही तर आमच्या सगळ्यांपेक्षा खूप अनुभवी आहात. कसं आहे ना, जग कितीही बदललं असलं तरीही आजच्या जगात आणि तेही बाहेरच्या देशात कशी परिस्थिती आहे? हे आपण बघतोय. फरक फक्त एवढाच आहे तुमची आणि आमची पिढी नवीन आव्हांना घाबरते, मोठे सांगतील ते शेवटचं मानून गप्प बसते पण ही आजची पिढी अशी नाही. आपल्याला देखील त्यांच्याकडून हे शिकायला हवं. सारा अजिबात घाबरली नाही याचाच अर्थ आपण तिला योग्य पद्धतीने मोठं केलं आहे. आपल्या साराला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात याचाच अर्थ आपण कुठेही चुकलो नाही. ते म्हणतात ना भित्या पाठी ब्रम्ह राक्षस तसं झालं होतं आपलं मात्र साराने त्या राक्षसाचा वध आत्मविश्वासाच्या शस्त्राने केला." विशाखा म्हणाली.

क्रमशः....
*******************************
साराच्या आजीला तर तिने हे काम केलेलं चालणार होतंच फक्त भीतीपोटी ती तिला विरोध करत गेली. आजीच्या मनातली भीती आत्ता कुठे दूर झालेली असताना काही वेगळं तर घडणार नाही ना? सारा आता अजून काय काय शिकेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all