लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४८)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४८)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                              कौतुक

सगळ्यांनाच साराने केलेलं काम फार आवडलं होतं. साराने पाठवलेले सगळे फोटो आणि व्हिडिओ बघूनच घरातले सगळे झोपायला गेले होते. साराच्या आजीला तर कधी एकदा सकाळ होते आणि सगळ्यांना साराचं कौतुक सांगतेय असं झालं होतं. तिची आजी तर रात्री मनात हेच सगळे इमले बांधत झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सगळं सुरू होतं फक्त आजीची बाहेर जाण्यासाठी चलबिचल होत होती.

"कांता अगं किती ती घाई तुला? एकाजागी शांत बस तरी." साराचे आजोबा म्हणाले.

"काय ओ तुम्ही? एरवी माझ्या मागे लागलेले असता लवकर आवर, देवळात जायचं आहे आणि आज तुम्हीच सगळं हळूहळू करताय." आजी म्हणाली.

"मी काहीही हळूहळू करत नाहीये. सगळं रोजच्याप्रमाणे सुरू आहे. तुला आज बाहेर जायची घाई लागली आहे म्हणून असं वाटतंय." आजोबा म्हणाले.

"हो आई! बाबा बरोबर बोलतायत. घड्याळ बघा सगळं नेहमीप्रमाणेच सुरू आहे." विशाखा दोघांना चहा, नाश्ता देत म्हणाली.

आजी आणि आजोबा चहा घेत होते. तोवर विशाखाची बाकी तयारी सुरू होती. आज कधी नव्हे ते आजीने कसलीच जास्त कुरबुर न करता कमी साखरेचा चहासुद्धा बिना तक्रार संपवला होता.

"नातीचं फारच कौतुक होणार आहे आज. कोणीतरी आज कमी साखरेचा चहासुद्धा जास्त कीचकिच न करता घेतला आहे." आजोबा तिरकस नजरेने आजीकडे पाहत म्हणाले.

एवढ्यात विराज आणि समीर तिथे आले. त्या दोघांनी सुद्धा आजोबा जे बोलले ते ऐकलं होतं.

"बाबा तुम्हाला नाही वाटत का आधी कोणीतरी साराला या क्षेत्रात किती धोका आहे हे सांगत होतं आणि आज त्याच व्यक्तीला तिचं कौतुक करण्याची खूप घाई झाली आहे?" विराज आजोबांना म्हणाला.

"हो आहे मला घाई. माझी नात जर काहीतरी जगावेगळं काम करतेय तर मी मिरवणारच ना? आता बघाच तुम्ही सगळे कसा भाव खाते मी ते." आजी म्हणाली.

आजीच्या अश्या बालिश बोलण्यावर सगळेच हसले.

'सारा तू तुझा शब्द खरा केलास. आज घरात कोणीही तू हे क्षेत्र निवडलं आहेस म्हणून नाराज नाहीये तर उलट तुझंच कौतुक सुरू आहे. आम्हाला तुझ्याबद्दल जी काळजी वाटत होती ती आता हळूहळू मिटायला लागली आहे.' विशाखा चहा, नाश्ता टेबलावर मांडत मनातच विचार करत होती.

साराचे प्रत्येकवेळी येणारे फोन, तिने पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ हे सगळं बघूनच घरच्या सगळ्यांचा अर्धा जीव भांड्यात पडला होता. आपली लेक एवढ्या लांब दूर देशात एकटी कशी राहणार? आणि तेही आदिवासी वस्त्यांमध्ये, जंगलांमध्ये या सगळ्याची जी काळजी साराच्या घरच्यांना होती ती आता हळूहळू मिटायला लागली होती. सारा आफ्रिकेत जाऊन आता साधारण पंधरा दिवस होऊन गेले होते. याकाळात तिने पूर्णपणे घरच्यांचा विश्वास जिंकला होता. साराने तिचे पूर्ण प्रयत्न करून संधी मिळाली तर काय काय करता येतं? हे सगळ्यांनाच दाखवून दिलं होतं.

"चला मी ऑफिसला निघतो. आज लवकरच घरी येईन." विराज म्हणाला.

त्याच्या आवाजाने विशाखा भानावर आली आणि तिनेही तिचा नाश्ता संपवून बाकी कामं करायला घेतली. आजी, आजोबा देवळात जायला निघाले तर समीर त्याच्या कामासाठी बाहेर पडला.
*********************************
इथे आफ्रिकेत पहाट होत होती. साराला रात्री छान झोप लागली होती आणि म्हणूनच तिला आज लवकर जाग आली आणि खूप प्रसन्न वाटत होतं.

'कालचा दिवस खूप छान गेला. आता आज तर अजून नवीन नवीन प्राणी बघायला मिळतील आणि त्यांची माहितीसुद्धा कळेल. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता ते काम मला काल करायला मिळालं. हे थोडं मिमिक्री टाईपमध्येच झालं फक्त माझा आवाज टेक्नॉलॉजीच्या मदतीने बदलतील एवढंच. अरे हो! मिमिक्रीवरून आठवलं राघव सोबत बऱ्याच दिवसात बोलणं नाही झालं. आत्ता भारतात साडे आठ, नऊ वाजले असतील त्याला फोन करते.' ती मनातच सगळा विचार करून म्हणाली.

पटकन उठून फ्रेश होऊन लगेचच तिने मोबाईल हातात घेतला आणि राघवला फोन केला.

"हॅलो सारा मॅडम. काय बाबा आता तुम्ही मोठ्या झालात आम्हा पामारांची आठवण कशाला येईल ना?" राघव फोन उचलल्या उचलल्या गंमत करत म्हणाला.

"हो का? फोटो आणि व्हिडिओ पाठवले ते उगाच का मग?" सारासुद्धा मुद्दाम म्हणाली.

"हो गं! जस्ट गंमत केली. बोल ना कशी आहेस? कसं सुरू आहे काम?" त्याने विचारलं.

"एकदम भारी. तुला विक्टोरिया वॉटर फॉल्सचे फोटो, व्हिडिओ पाठवले आहेत बघ तिथेच सध्या काम सुरू आहे. आज दुसऱ्या स्पॉटवर जाऊ. अरे हो अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे. तो फेमस शो आहे बघ वाईल्ड फील्ड त्या शोमध्ये मी माझी वाक्य दिली आहेत. आय मीन माझा आवाज दिला आहे तो नंतर जेरेमी सरांच्या व्हॉईसमध्ये कन्व्हर्ट होईल." सारा उत्साहात म्हणाली.

"अरे वा! म्हणजे आता तू मिमिक्रीसुद्धा करायला लागलीस." राघव म्हणाला.

"नाही रे. त्यांना तो शो भारतात दाखवायचा आहे तर नंतर भाषा कन्व्हर्ट करण्यापेक्षा त्यांनी मला विचारलं करशील का? तर केलं मी हे काम. अरे कसलं भारी वाटलं माहितेय. मला तर इथे खूप काही शिकायला मिळतंय आणि आता इथल्या वातावरणाची सवय देखील झाली आहे." सारा म्हणाली.

"गूड. गूड. असंच मस्त मस्त काम करत रहा. तू भारतात आलीस की सगळं डिटेलमध्ये सांगून फोटो आणि व्हिडिओ दाखवायचे आहेत." राघव म्हणाला.

"हो. हे काय सांगणं झालं?" सारा म्हणाली.

त्यांनतर दोघांनी छान गप्पा मारल्या आणि साराने फोन ठेवला. तिला तिची तयारी करायची होती आणि राघवला सुद्धा कामाला जायचं होतं. साराने तिची तयारी केली तोवर बाकी सगळे पण उठले होते. आज सगळे झांबेझी नदीच्या परिसरातच पण थोडं अंतर पुढे जंगलात जाणार होते.

'आजचा नवीन दिवस नवीन उमेद आणि नवीन संधी घेऊन आला आहे. आज आफ्रिकेत येऊन मला पंधरा दिवस होऊन गेलेत. साधारण अजून महिन्याभरात मी पुन्हा घरी जाईन आणि नंतर कुठलातरी नवीन देश, नवीन संस्कृती बघायला मला मिळेल.' सारा मनातच बोलत होती.

एवढ्यात जीपचा हॉर्न वाजला आणि ती भानावर आली. सगळे जंगलाच्या दिशेने जायला सज्ज होते. रस्त्याने जाताना साराने जेरेमी सरांना आणि बाकी टीमला तिच्या आईने करून दिलेल्या फराळातून काही पदार्थ खायला दिले होते. आपल्या भारतीय संस्कृतीत कसे प्रत्येक पदार्थ पोषक असतात आणि त्यामागचं नेमकं शास्त्र काय? हेही ती सांगत होती. आधीच भारतीय पदार्थांसाठी खवय्ये असणाऱ्या सगळ्यांनी ते पदार्थ मिटक्या मारत खाल्ले. तोवर त्यांना जिथे जायचं होतं तो स्पॉट आला. जेरेमी सर सगळ्यात पुढे चालत होते.

"सर व्हॉट वी विल सी हिअर?" साराने कॅरलॉन सरांना विचारलं.

"वेलवेट मंकी." सर म्हणाले.

साराने हे नाव ऐकलं होतं पण तिला त्या माकडाबद्दल जास्त माहिती नव्हती. आता आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत आणि त्याचे फोटो, व्हिडिओ काढणार आहोत म्हणून ती उत्साहात सगळं जंगल न्याहाळत होती. एक व्यवस्थित जागा बघून सगळे तिथे बसले. जेरेमी सर सगळ्यात पुढे होते. त्यांच्यात आणि बाकी सगळ्यांमध्ये साधारण चार फुटांचे तरी अंतर होते. आजही साराला हिंदीत सगळी माहिती द्यायची होती. सगळे कॅमेरे आणि बाकी गोष्टी सेट होईपर्यंत जेरेमी सरांनी त्यांना कुठे बसून शूट करायचं आहे हे बघून ते सगळे जिथे होते तिथे आले. जेरेमी सर आणि कॅरलॉन सरांनी मिळून साराला काय बोलायचं आहे? हे सांगितलं. तिला त्या वेलवेट मंकी विषयी सगळी माहिती त्यांनी सांगितली.

"रेडी?" डायरेक्टरनी विचारलं.

"येस." सगळे म्हणाले.

जेरेमी सरांनी त्यांची पोजिशन घेतली. सुरुवातीला झाडावर कॅमेरे फिरवून झाडांवर बसलेली माकडं दाखवण्यात आली. सारा तिचं देखील शूटिंगच काम करत होती. सगळीकडे कॅमेरे फिरवून दाखवून झाल्यावर आता फोकस जेरेमी सरांवर करण्यात आला. एक माकड त्यांच्या काही अंतरावर येऊन उभं होतं. साराला आता काय बोलायचं आहे हे चांगलंच माहीत होतं.

"इस बंदर को वेलवेट मंकी कहाॅं जाता है | ऐसा इसलिए है क्योंकि दूर से देखने पर यह बहुत चिकना दिखता है | आप इस मखमली बंदर को इसके सफेद रंग, काले चेहरे और नीली सतह से पहचान सकते हैं | यह आमतौर पर इंसानों के करीब नहीं आता है | अभी भी ये पेड़ से नीचे आया हैं क्योंकी मेरे हाथ में ये मूंगफली है | इस बंदर को मूंगफली का बहुत शौक है और उसकी दृष्टि इतनी तेज है कि वह बिस मीटर की दूरी से छोटे कीड़े देख सकता है | इससे आप अनुमान लगा सकते हैं कि इसकी दृष्टि कितनी तेज है | आप अभी भी मेरे चारों ओर देख सकते हैं, बहुत सारे वेलवेट मंकी इकट्ठा हो रहे हैं |" सारा म्हणाली.

"कट.." डायरेक्टर म्हणाले.

जेरेमी सर लगेच सगळ्यांच्या इथे आले.

"वी कान्ट स्टे हिअर लाँगर. देअर आर अ लॉट ऑफ मंकिज हिअर. वी नीड टू गेट आउट ऑफ हिअर ऍज सून ऍज पॉसिबल." जेरेमी सर म्हणाले.

त्या माकडांचे काही फोटो आणि व्हिडिओ काढून सगळे मागे फिरले. या सगळ्या शूटिंगमध्ये दुपार झालीच होती. वेळ कसा जात होता हे कोणालाही कळत नव्हतं.

'आपण आपल्या आवडीच्या कामात असलो की वेळ कसा जातो हे समजतच नाही. खरंच खूप काही शिकायला मिळतंय मला.' सारा मनातच म्हणाली.

क्रमशः.....
*******************************
साराची आजी आत्ता कुठे साराला पाठिंबा द्यायला लागली आहे पण काही भलतंच होणार नाही ना? साराला आता अजून काय काय करायला मिळेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all