लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४५)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                                  सवय

थोडावेळ काम करून झाल्यावर सरांनी जीप पुन्हा माघारी वळवली. साराच्या मनात मात्र सतत तिने जे काही बघितलं होतं त्याचेच विचार घोळत होते. तिच्या डोळ्यासमोरून त्या पिल्लाचा चेहरा काही केल्या जातच नव्हता.

'निसर्ग इतका कसा कठोर होऊ शकतो? त्या पिल्लाने अजून नीट आयुष्य बघितलं सुद्धा नव्हतं तरीही ते गेलं. का? त्यात मी आणि सर तिथे होतो, सगळं बघितलं होतं तरीही त्या पिल्लाची काहीच मदत करता आली नाही म्हणून मला जास्त त्रास होतोय. हे ओझं आता माझ्या मनावर आयुष्यभरासाठी राहणार.' सारा मनातच बोलत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

"सारा स्टॉप थिंकिग अबाऊट दॅट. ये तो जस्ट बीगिनींग है | नेचर का रुल ही है ये |" सर म्हणाले.

"येस सर आय नो बट मुझे हम उस बच्चे की कुछ मदद नहीं कर पाये इसका बूरा लग रहाॅं है |" सारा म्हणाली.

"हम्म. हो जाएगी आदत |" सर म्हणाले.

यावर सारा काहीच बोलली नाही. तिला आता फक्त आणि फक्त थोडावेळ शांतता आणि तिचा वेळ हवा होता. थोड्याचवेळात ते गावात पोहोचले तशी सारा आधी ते लोक राहत असलेल्या घरात गेली. थंड पाण्याने तोंड धुवून तिने घरी आईला व्हिडिओ कॉल लावला. तोवर भारतात रात्र झाली होती.

"हॅलोऽ कशी आहेस सारा? काय गं काल पासून फोन बिन काहीच नाही ते? हे बघ आज जेवायला पाव भाजी केलीये." तिच्या आईने फोन उचलल्या उचलल्या बोलायला सुरुवात केली.

"आईऽ" सारा म्हणाली आणि अचानक रडायला लागली.

"अगं सारा काय झालं? तुला काही त्रास होतोय का तिथे? कोणी काही बोललं का? बरं नाहीये का तुला?" तिच्या आईने काळजीने विचारायला सुरुवात केली.

तिच्या या बोलण्याने घरातले सगळेच तिच्या भोवती जमले. साराला आता अचानक काय झालं? म्हणून त्यांना काळजी वाटत होती.

"सारा तुला पाव भाजी मिळणार नाहीये म्हणून रडतेस ना?" समीर म्हणाला.

"एक मिनिट थांब समीर. नक्कीच काहीतरी वेगळं घडलं आहे. सारा बोल तू." तिची आई म्हणाली.

"आई आज आम्ही जंगलात गेलो होतो तेव्हा एका चित्त्याच्या पिल्लाचं निरीक्षण करत होतो ते आज गेलं." सारा म्हणाली.

"अगं बाळा असं रडून कसं चालेल मग? हाच निसर्गाचा नियम आहे ना? ज्याचा जन्म होतो त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा होतोच." तिचे आजोबा तिला समजावत म्हणाले.

त्यानंतर साराने त्यांना अगदी डिटेलमध्ये ते पिल्लू कसं गेलं हे सांगितलं. ते सगळं ऐकून तिच्या आईचे आणि आजीचे सुद्धा डोळे पाणावले होते.

"झालं ते झालं. बघ सारा आता याचा जास्त विचार नको करुस. तुला आता या सगळ्याची सवय करून घ्यावी लागेल. अगं मान्य जे झालं ते खूप वाईट होतं तरीही जे होणार असतं ते आपण टाळू शकत नाही बाळा." तिच्या आजीने तिला समजावलं.

त्यांनतर साराला बरं वाटावं म्हणून त्यांनी विषय बदलला आणि बऱ्याच गप्पा मारल्या. साराला आता घरच्यांशी बोलून खूप बरं वाटत होतं. तिच्या मनावरून एक ओझं उतरल्यासारखं तिला वाटत होतं. गप्पा झाल्यावर तिने फोन ठेवला आणि हळूहळू या सगळ्यासाठी ती मनाची तयारी करू लागली.

'आता आज जे झालं ते शेवटचं. पुन्हा मी अशी नाही रडणार. मला दरवेळी सुखद क्षणच अनुभवता येतील असं नाही. या वाईट घटनांसाठी देखील मला माझ्या मनाची तयारी ठेवली पाहिजे.' सारा मनातच म्हणाली.

यातच रात्र झाली आणि सारा आता नॉर्मल झाली होती. रात्री देखील या गोष्टीचा विचार न करता ती शांतपणे झोपली. दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे रोजचं काम आणि वेळ मिळाला तर घरी फोन सुरू होतं. साराला आता तिथली चांगलीच सवय झाली होती. यातच एक आठवडा सरला आणि ती वाट बघत असलेला दिवस उजाडला. आज ती विक्टोरिया वॉटर फॉल्सला जाणार होती. आफ्रिकेत जेव्हा पहाट होत होती तेव्हाच तिने घरी फोन करून याबद्दल सांगितलं होतं आणि तिचं सगळं आवरून ती बसली होती.

"सारा आर यू रेडी?" सरांनी तिला विचारलं.

"येस सर." सारा म्हणाली.

आता त्यांचा मुक्काम विक्टोरिया वॉटर फॉल्सजवळ असलेल्या गावात होणार होता म्हणून तिने सगळंच सामान बरोबर घेतलं होतं. जीपमधूनच ते त्या गावात पोहोचले.

"सारा अप्रॉक्स इन टू अवर्स हमारा काम स्टार्ट हो जाएगा |" सर म्हणाले.

"ओके सर." सारा म्हणाली.

तोवर सर तिला गाव आणि तिथली लोकं दाखवत होते. आधीच्या गावापेक्षा अगदी लहान आणि खूप पारंपरिक पद्धतीचं हे गाव होतं. सगळेच तिथे आफ्रिकन भाषेत बोलत होते. साराला आता त्यातले थोडेफार शब्द कळत होते पण बाकी ते लोक काय बोलतायत हे सर तिला समजावून सांगायचे.

'सर जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांचं वागणं आणि आत्ताचं वागणं यात किती फरक आहे ना? तिथे आले होते तेव्हा खूप कडक वागत होते पण आता सगळं किती समजून घेतात आणि छान पद्धतीने समजावतात. अगदी बाबा जशी माझी काळजी घेतात त्याप्रमाणे सर घेतात. सरांचं मतपरिवर्तन व्हायला लागलं असावं का?' सारा मनातच म्हणाली.

ती तिच्याच विचारत गुंग होती. सरांच्या आवाजाने ती भानावर आली. तिथले गावकरी लोक तिला गाईचं दूध काढायला सांगत होते.

"सर बट आय डोन्ट नो." सारा म्हणाली.

"डोन्ट वरी सारा दे विल टीच यू. इन्फॅक्ट आय अल्सो डू दॅट." सर म्हणाले.

तिथे दोन गाई बांधलेल्या होत्या. सर तर लगेचच कामाला लागले आणि सारासुद्धा त्या लोकांकडून शिकून प्रयत्न करत होती. सुरुवातीला तिला ते जड गेलं पण नंतर जमलं.

"सारा ड्रिंक दॅट मिल्क." सर म्हणाले.

त्यांनीही ज्या बादलीत दूध काढायला सुरुवात केली होती ती प्यायला सुरुवात केली. साराने आधी थोडं दूध पिऊन बघितलं तर ते तिला फार आवडलं.

'आजी आणि आजोबा ज्या धारोष्ण दुधाबद्दल बोलायचे ते हेच. किती मस्त लागतंय ना हे. आता मी आजी आजोबांना नक्की सांगणार मीही धारोष्ण दूध प्यायले आहे.' सारा मनातच म्हणाली.

त्यानंतर त्या आदिवासींनी तिला झाडाच्या फांदीपासून भाला बनवून शिकार कशी करायची हे शिकवलं. सुरुवातीला तिचा नेम चुकत होता पण नंतर हळूहळू तिला जमलं. तोवर दोन तास होऊन गेले होते. एवढ्यात एक हेलिकॉप्टर येताना सरांनी आणि साराने बघितलं. ज्या शोसाठी त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती त्याचेच प्रेझेंटर त्यातून उतरले.

"हॅलो मिस्टर जेरेमी." कॅरलॉन सरांनी त्यांना हस्तांदोलन करून त्यांचं स्वागत केलं.

"हॅलो." जेरेमी सर म्हणाले.

"सर शी इज सारा, माय इंटर्न." कॅरलॉन सरांनी साराची ओळख करून दिली.

"हॅलो मिस सारा." जेरेमी सरांनी तिलाही हस्तांदोलन केले.

साराने देखील स्मित करून त्यांचं स्वागत केलं.

"लेट्स स्टार्ट द वर्क?" जेरेमी सर म्हणाले.

"येस येस." कॅरलॉन सर म्हणाले.

त्यांच्या कामाला लगेचच सुरुवात होणार होती. त्यांना विक्टोरिया वॉटर फॉल्सवरून जायचं असल्याने तिघे हेलिकॉप्टरमध्ये जाऊन बसले.

'वाव! माझा हा हेलिकॉप्टरमधून फिरण्याचा पहिलाच अनुभव आहे. किती छान वाटतंय इथे बसूनच. जेव्हा उंच आकाशातून सगळं दृश्य न्याहाळता येईल तेव्हा तर किती भारी वाटेल.' सारा मनातच म्हणाली.

त्यांच्या हेलिकॉप्टरने टेक ऑफ केलं. थोडं अंतर पार केल्यावर जे काही दृश्य दिसत होतं ते अगदी स्वप्नवत होतं. त्यांचं हेलिकॉप्टर बरोबर विक्टोरिया वॉटर फॉल्सवरून उडत होतं.
*****************************
इथे घरी सकाळ सकाळीच साराचा फोन येऊन गेल्याने सगळेच खुश होते. विशाखा अगदी गाणं गुणगुणत काम करत होती.

"काय आई आज भलतीच खुश दिसतेस." समीर किचनमध्ये येत म्हणाला.

"हो रे. सकाळ सकाळीच साराचा फोन येऊन गेला ना. आज मॅडम विक्टोरिया वॉटर फॉल्सला जाणार आहेत. खूप खुश वाटत होती आवाजावरून म्हणून मग मीही खुश आहे." विशाखा म्हणाली.

"हम्म. आई खरंच आपण साराला उगाच आधी विरोध करत होतो ना? किती खुश आहे आता ती. एकवेळ तुमच्या सगळ्यांचं ठीक होतं पण मी एक भाऊ म्हणून तिला समजून घ्यायला कमी पडलो. जर तेव्हा मला उपरती झाली नसती तर कदाचित काही काळाने मीच माझ्या नजरेतून उतरलो असतो गं." समीर म्हणाला.

"जाऊदे रे. आता झालं गेलं विसरून जा. आपली सारा आता अगदी जीव तोडून मेहनत करतेय, नवीन काहीतरी शिकतेय आणि काहीतरी वेगळं धडाडीचं काम करतेय म्हणून मला तिचा खूप अभिमान वाटतो. काहीतरी वेगळं करिअर करणारी माझी मुलगी आहे म्हणून मी सगळ्यांमध्ये खूप अभिमानाने मिरवते." विशाखा म्हणाली.

"अच्छा? फक्त साराच का? आणि मी?" समीर नाराज होत म्हणाला.

"हो रे तू पण. दोघंही एवढे मोठे घोडे झालात तरीही आईकडून सारखं कौतुक हवं असतं ना? एकाचाच कौतुक केलं तर एक रुसून बसतं. हो ना?" विशाखा म्हणाली.

यावर समीर हसला. पुन्हा विशाखा बोलू लागली; "माझी दोन्ही मुलं खुश आणि समाधानी असली की मलाही छान वाटतं. तुम्ही दोघंही अगदी गुणाची बाळं आहात माझी."

"चल मग इसी बात पे आज तुझे आराम. आज ये शेफ समीर सब खाना बनायेगा |" समीर म्हणाला आणि त्याने विशाखाला जवळ जवळ ओढतच टीव्ही समोर नेऊन बसवलं.

"काहीही काय समीर? चल बाजूला हो मला भरपूर कामं आहेत." ती तिथून उठत म्हणाली.

"असुदे. मी आहे ना? मी करतो सगळं. आज आराम कर ना तू." समीर म्हणाला.

"काय कारण? अरे सवय नाहीये मला नुसतं बसून राहण्याची. चल सरक बाजूला." ती त्याला जबरदस्ती बाजूला सारत किचनमध्ये गेली.

"बरं मग तू फक्त मला मदत कर. बाकी सगळं मी करणार हे आता फायनल आहे." समीर म्हणाला आणि त्याने तिचं काहीही ऐकून न घेता कामाला सुरुवात केली.

क्रमशः.....
********************************
साराचा विक्टोरिया वॉटर फॉल्समधला अनुभव कसा असेल? अजून काय काय तिला पाहायला मिळणार आहे? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all