लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४४)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                              मातृत्व

सारा त्या जखमी पिल्लाला शोधत होती आणि थोडावेळ शोध घेतल्यावर गवताच्या आड तिला ते पिल्लू दिसलं. त्या पिल्लाची आई आणि बाकी भावंडंसुद्धा तिथेच होती. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पळापळ झाली होतीच त्यामुळे ते थोडे दूर गेले होते.

'आपण माणसं जशी घरात कोणी आजारी असल्यावर काळजीत दिसतो अगदी तशीच काळजी या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतेय. प्राण्यांनासुद्धा भावना असतात.' सारा मनातच म्हणाली.

त्या जखमी पिल्लाच्याजवळ त्याची आई बसून होती आणि इतर भावंडंसुद्धा आज मस्ती करत नव्हती. ज्या पिल्लाला लागलं होतं ते एकदम मलूल होऊन इवळत पडलं होतं. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दुःख दिसत होतं.

"सर इस बच्चे के इलाज के लिये हम कुछ नहीं कर सकते क्या?" साराने न राहून सरांना विचारलं.

"नो. नेचर ही उसका इलाज करेगा | ये बच्चा जिंदा रहेगा या नहीं ये नेचर डीसाईड करेगा; हम नहीं |" सर पटकन बोलून गेले.

त्यांच्या या बोलण्याने साराला खूप वाईट वाटलं. सरांनी तर अगदी सहज जे निसर्ग करेल तेच होईल म्हणून सांगितलं असलं तरीही साराच्या मनाला हे पटत नव्हतं. तरीही तिच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. त्यांचं बोलणं ऐकून साराच्या मनात एकदम चर्रऽ झालं होतं.

'सरांचं म्हणणं सुद्धा बरोबरच आहे म्हणा. आपल्याला आता या सगळ्याची सवय करून घ्यायलाच हवी. आपण कुठे कुठे निसर्गात हस्तक्षेप करणार? आता मन घट्ट केलंच पाहिजे.' साराने दोन मिनिटं डोळे घट्ट मिटून स्वतःलाच समजावलं.

तोवर समोरच्या दृश्यात ती मादा चित्ता पिल्लाची जखम चाटत होती. ते दृश्य बघून तर साराला पटकन तिच्याच घरची आठवण आली.

'मी किंवा दादा आजारी असतो तेव्हाही आई उशाशी बसून राहते, औषध पाणी करते आणि रात्र रात्र जागते सुद्धा! हेच आत्ता ही आई करतेय. औषध म्हणून आपल्या पिल्लाची जखम चाटून साफ करतेय. खरंच आज खूप प्रकर्षाने जाणवतंय मातृत्व हे मातृत्वच असतं. आई माणसाची असो वा प्राण्याची आई ही शेवटी आईच असते.' सारा मनातच म्हणाली.

तिने त्याही दृश्यांचे काही फोटो काढून घेतले. फोटो काढतानाच तिच्या मनात जेव्हा तिचा अॅक्सिडेंट झाला होता तेव्हाच्या आठवणी पुन्हा जाग्या होत होत्या.

'मी कॉलेजमध्ये असताना स्कूटीवरून जाताना माझा अॅक्सिडेंट झाला होता. मला चांगलंच आठवतंय पाय गाडीखाली गेल्यामुळे फॅक्चर होता. रस्त्यावरच्याच एका माणसाने मला घरी आणून सोडलं होतं. तेव्हा आईची काय अवस्था झाली होती? मी आजही विसरू शकत नाही. लागलं मला होतं पण वेदना आईला होत होत्या. मी म्हणत होते काही त्रास होत नाहीये तरीही आईचा जीव खूप कळवत होता. दिवस रात्र आई माझ्याच उशाशी बसून राहायची. चालताना खूप त्रास व्हायचा तेव्हा आई मला आधार द्यायची. जवळ जवळ दीड ते दोन महिने माझा पाय बांधलेला होता. प्लॅस्टर काढलं तेव्हाही पायाला खूप मुंग्या आल्यासारखं वाटत होतं. उभं राहायला आणि चालताना त्रास व्हायचा. तरीही आई कायम आधार द्यायला होतीच. एकदा अशीच हळूहळू उभी राहत असताना माझा तोल गेला होता आणि डोकं बेडच्या कॉर्नरवर आदळणार होतं पण आईला काय माहित कसं समजलं? आणि पळत येऊन तिने हात मध्ये घालून माझं डोकं वाचवलं. त्यात आईच्या हाताला चांगलीच जखम झाली होती.' साराला त्या जखमी पिल्लाला बघून ती जेव्हा जखमी झाली होती तेव्हाच्या गोष्टी आठवत होत्या.

ती पूर्णपणे त्या विचारात हरवून गेली होती. त्या चित्त्याची पिल्लाप्रती असणारी काळजी साराला तिच्या आईची आठवण करून देत होती. ती त्या जुन्या आठवणीतच समोरचं दृश्य बघत होती. पिल्लाची एवढी होणारी तगमग त्याच्या आईलाही पाहवत नव्हती पण त्या व्यतिरिक्त दुसरा पर्यायही नव्हता.

"सारा देखा ये बच्चे की मदर अपने बच्चे की जितनी हो सके केअर ले रही है |" सर म्हणाले.

"येस सर. ये सब देख के घर की याद आयी | मेरा अॅक्सिडेंट हो गया था तब मम्मी जितनी परेशान थी उतनी ही ये चिता मम्मी भी है |" सारा भावूक होत म्हणाली.

यावर सर काहीही बोलले नाहीत. सारा सुद्धा समोर जे होतंय ते बघत होती. त्या लांडग्याने अचानक हल्ला केल्याने जीव वाचवून दूर येता येता पिल्लं आणि चित्ता आई खूप दूर आले होते आणि आता त्यांना पुन्हा त्यांच्या सुरक्षित जागी जाणं भाग होतं. कारण त्या लांडग्याला चकवून चित्ते पळाले असले तरीही त्याला त्या पिल्लाचा गंध मिळाला होता आणि ते जखमी होतं याचा फायदा घ्यायला तो लांडगा पुन्हा येणार हे नक्की होतं. एव्हाना आता चांगलंच उजाडलं होतं. त्यांचा प्रवास सुरू झाला होता. सगळी पिल्लं आईच्या मागे बरोबर चालत होती पण बिचारं हेच जखमी पिल्लू शेवटी राहत होतं. थोड्या थोड्या अंतराने त्याची आई थांबून मागे बघत होती पण तिच्याही बिचारीच्या हातात जास्त वेळ नव्हता. त्या लांडग्याला आधीच गंध मिळाला असल्याने तिच्या इतर पिल्लांचासुद्धा जीव धोक्यात होता.

'एकट्या आईने मुलांना सांभाळणं हे खरंच खूप कठीण काम आहे. आपण सुखी कुटुंबात राहतो पण सगळ्यांच्याच नशिबी हे सुख नसतं. काहींचा बाप असून नसून सारखाच असतो. कित्येकवेळा रस्त्यावर आपल्या बायकोला दारुसाठी मारणारे नवरे मी बघितले आहेत. बिचारी लहान लहान पोरं घाबरून कुठेतरी लपून बसतात आणि अश्या या दारुड्या बापाला दिसली तर तीही बिचारी तुडवली जातात. कारण काय तर फक्त आणि फक्त दारुसाठी पैसा! बायकोने कमवायचं, पोरांचं बघायचं आणि एवढं करूनही त्या नकर्त्या नवऱ्याचा जाच सहन करायचा तो वेगळाच. हेही कमी म्हणून मग या सगळ्यावर नजर ठेवून बसलेले संधी साधू लांडगे असतातच. हे तर जंगल आहे आणि इथे प्राणी फक्त आणि फक्त पोट भरण्यासाठी हल्ला करतात पण खऱ्या आयुष्यातले लांडगे अश्या एकट्या आयांचे लचके तोडायला बसलेले असतातच. त्यांना माहीत असतं एक आई कितीही काहीही झालं तरी आगीची झळ आपल्या बाळांवर येऊ देणार नाही आणि याचाच गैरफायदा समाजात असलेले विकृत लांडगे घेतात. खरंतर त्यांना लांडगा म्हणून या खऱ्या प्राण्याचा अपमान केल्यासारखं आहे.' सारा मनातच विचार करत होती आणि त्यामुळे तिच्या मुठी आपसूकच रागाने आवळल्या गेल्या होत्या.

"सारा वाय यू सो अँग्री?" सरांनी तिला असं बघून विचारलं.

साराच्या मनात जे सुरू होतं ते तिने सांगितलं.

"तुम इंडियन्स स्पेशली वुमेन्स ये सब बेअर करती है दॅट्स वाय ये सब होता है | तुम लड़कीयो को अपना पॉइंट सामने रखने का हक मिलता ही नहीं |" सर म्हणाले.

"येस सर ये सब होता है लेकीन अब बहुत सी महिलाॅंये आवाज उठाती है | उनको अब अपने हक की पेहचान है | लेकीन सर बुरा तब लगता है जब ऐसे किसी प्रॉब्लेम में फसी महिला को कोई अपना शिकार समजता है | और सर आपको ये मानना पडे़गा की, ये इंडिया से ज्यादा डेव्हलप कंट्री में ज्यादा देखा गया है |" सारा म्हणाली.

"हम्म." सर म्हणाले.

'सर आमच्या भारतात असतील अश्या बायका ज्या अन्याय सहन करतात पण वेळ आलीच तर त्या आदिशक्ती सुद्धा होतात. त्यांना त्यांच्या शक्तीची आपसूक जाणीव होते आणि त्या त्यांचा लढा देतात. कित्येक शिकल्या सवरल्या देशात ज्याला आपण विकसित देश म्हणतो तिथे तर नाती किती काळ टिकतात? हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. भारतात मात्र असं नाहीये.' सारा मनातच म्हणाली.

एवढ्यात तिचं लक्ष समोर गेलं. ते पिल्लू त्याच्या आईपासून खूप मागे राहत होतं. थोडं अंतर पुढे गेल्यावर ते एका जागी बसलं.

'काय झालं असेल या पिल्लाला? एवढं लहान आहे अजून आणि किती यातना सहन कराव्या लागत आहेत याला?' सारा मनातच त्याच्याकडे बघत म्हणाली.

सोबत तिचं काम सुद्धा सुरू होतंच. त्या पिल्लाची आई थोड्या थोड्या अंतराने मागे वळून बघत होती. अचानक पिल्लू एका जागी थांबलं आहे पाहून ती पुन्हा मागे आली. आजूबाजूला काही धोका नाहीये ना? हे पाहून, याची खात्री करूनच ती पुन्हा तिच्या इतर पिल्लांसोबत मागे वळली होती. ती त्या जखमी पिल्लाजवळ आली. ते पिल्लू आता गवतात निपचित पडलं होतं आणि उचकी दिल्यासारखे आवाज येत होते.

'नक्कीच ते पिल्लू शेवटचे श्वास घेत असणार. आचके दिल्यासारखा आवाज येतोय.' सारा मनातच म्हणाली.

तिच्या चेहऱ्यावर प्रचंड टेंशन दिसत होतं. ते पिल्लू एवढ्या लवकर जाईल हेच साराच्या ध्यानी मनी नव्हतं. ती ते पिल्लू वाचावं म्हणून सतत देवाकडे प्रार्थना करत होती. ती आई चित्ता पिल्लाजवळ आली. त्याची इतर भावंडंसुद्धा त्याच्या भोवती होती, त्याला मागून ढोसत होती पण आता त्या जखमी पिल्लाची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती.

'शेवटी जे व्हायला नको होतं तेच झालं. ते पिल्लू गेलं.' सारा मनातच म्हणाली.

तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. एवढ्या जवळून एखाद्या प्राण्याचा तेही एवढ्या लहान पिल्लाचा मृत्यू तिने पहिल्यांदाच बघितला होता आणि म्हणूनच तिला खूप गलबलून आलं होतं.

"सारा सब शूट करना है तुम्हे | माना ये सब तुम्हे बहुत हर्ट कर रहा है लेकीन अब इसकी आदत कर लो |" सर म्हणाले.

तिने कसंबसं मन घट्ट करून कॅमेरा सुरू केला. तिचं खरंतर त्यात लक्षच लागत नव्हतं. त्या पिल्लाजवळ त्याची आई गेली. तिच्याही डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते. थोडावेळ तिने त्या पिल्लाला न्याहाळून चाटले आणि इतर पिल्लांसोबत ती पुढे निघून गेली.

'कसं आयुष्य असतं ना प्राण्यांचं? त्या आईला किती यातना होत असतील? तरीही भावना व्यक्त करायला मार्ग नाही, सांत्वन करायला कोणी नाही आणि शिवाय इतर पिल्लांच्या सुरक्षेचा प्रश्न तर सतत आहेच. आई शेवटी सगळ्या गोष्टींचा विचार करतेच. आत्ताही या आईला आपलं पिल्लू गमावल्याचं दुःख आहे पण इतर पिल्लांची जबाबदारी आणि त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे म्हणून तिला हे दुःख विसरून पुढे जावं लागतंय. मातृत्व खरंच खूप श्रेष्ठ असतं.' सारा मनातच म्हणाली.

ती शूट करत असली तरीही तिच्या डोळ्यातून आपसूक पाणी येत होतं. या सगळ्यात संध्याकाळ झाली होती. तिला आता कामात लक्ष लागेल असं वाटत नव्हतं.

"सर प्लीज कॅन वी गो बॅक? मुझे अनइझी फील हो रहा है |" सारा म्हणाली.

तसंही आजचं त्यांचं काम झाल्यात जमा होतंच. त्यात साराची मनःस्थिती ठीक नव्हती. तिच्यासाठी हे सगळं नवीन असल्याने तिला ते जड जात होतं हे सरांनी ओळखलं होतं.

"ओके. बट नेक्स्ट टाईम से ये सब नहीं चलेगा | तुम्हे इन सबकी आदत करनी होगी | तुम इंडियन्स इतने इमोशनल क्यों होते हो आय डोन्ट नो?" सर म्हणाले.

साराची काहीही बोलण्याची मनःस्थिती नव्हती म्हणून ती काहीच बोलली नाही.

क्रमशः....
****************************
साराला वाईट वाटणं तर साहजिक आहेच तिला या सगळ्याची सवय व्हायला वेळ तर लागेलच पण या सगळ्यात ती सरांचं मत बदलू शकेल का? तिला तिथे अजून काय काय अनुभव येणार आहेत? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all