लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४३)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                नाण्याला दोन बाजू असतात.

सारा त्या पिल्लांना शोधत होती आणि थोड्याचवेळात तिला ती पिल्लं दिसली. आई सोबत खेळत, मजा करत ती पिल्लं आईच्या मागे मागेच होती. पिल्लांना खाऊ घालायला त्यांच्या आईला शिकार करणं भाग होतं. पिल्लांची आई शिकार करायला गेली तेव्हा पिल्लं सुरक्षित अंतर ठेवून एका आडोश्याला थांबली होती. त्यांनाही माहीत होतं आपण आई सोबत गेलो तर भक्ष्य सावध होईल आणि हातची शिकार जाईल.

'निसर्गाची किमया खरंच खूप अगाध आहे. या मुक्या जनावरांना सुद्धा समजतं कधी कसं वागायचं ते. निसर्ग पदोपदी जाणीव करून देतोय; निसर्ग हा सुंदरच आहे फक्त आपणच त्याला आजवर उध्वस्त करत आलोय.' सारा मनातच म्हणाली.

तोवर त्या चित्त्याने समोर शिकार केली होती. त्यांचं खाऊन झाल्यावर पुन्हा पिल्लं खेळू लागली. सगळं काही सुरळीत सुरू होतं.

"सर कुदरत किताना खुबसुरत है | यहाँ कुदरत के आचल में हर कोई खुश होता है |" सारा म्हणाली.

"सारा यू डोन्ट हॅव एक्सपिरीयन्स. इच कॉईन हॅज टू साईडस्." सर म्हणाले.

सर असं का म्हणाले असतील? यावर सारा विचार करत होती. ती सकाळपासून सरांना निसर्ग किती सुंदर आहे हे दाखवत असताना सुद्धा सर काही बोलत नव्हते आणि आता नाण्याला दोन बाजू असतात असं म्हणत होते म्हणून सारा गोंधळली होती. तरीही तिने चेहऱ्यावर तसं काहीही न दाखवता तिचं काम सुरू ठेवलं होतं. आता जवळ जवळ संध्याकाळ झाली होती. आजची रात्र सुद्धा त्यांना तिथेच काम करायचं होतं. सरांनी तसं तिथल्या अधिकाऱ्यांना कळवल्याने दोन वन अधिकारी सुद्धा तिथे आले होते.

'आजचा दिवस तर आता घरी फोन करायला पण मिळणार नाही. अजून दोनच दिवस झालेत इथे येऊन आणि तेही दोन्ही दिवशी घरच्यांशी बोलता आलं होतं तरीही मला सगळ्यांची खूप आठवण येतेय. बुद्धीला कळतंय आता असंच होणार, याची सवय करून घेतली पाहिजे पण मन मात्र वळत नाहीये. आत्ता घरी आईची रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू असेल किंवा झाली पण असेल, बाबा घरी आले असतील, आजी आजोबा टीव्ही बघत असतील.' सारा विचार करत होती.

ती शरीराने जरी आफ्रिकेच्या जंगलात असली तरीही तिचं मन मात्र तिच्या घरी चक्कर मारत होतं. आपला मायदेश सोडून एवढ्या लांब असं एकटीने पहिल्यांदा गेल्यामुळे हे होणं स्वाभाविकच होतं. ती विचारांच्या तंद्रीत असतानाच सर त्या वन अधिकाऱ्यांशी काहीतरी बोलले आणि त्या आवाजाने सारा भानावर आली.

'आता मला सारखी सारखी घरची आठवण काढून चालणार नाही. कामावर फोकस कर सारा. या सगळ्याची तू जेवढ्या लवकर सवय करून घेशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे. आज वेळ नाही मिळाला म्हणून काय झालं? उद्या मिळेल. नाहीच मिळाला तर सकाळी लवकरच निघायच्या आधी फोन करून घ्यायचा.' साराने स्वतःलाच समजावलं.

त्यांनतर ती पुन्हा मनापासून काम करू लागली. आता चांगलाच अंधार पडायला लागला होता. सरांनी आणि तिने नाईट व्हिजनचा कॅमेरा काढला.

"सारा वी हॅव टू कॅच सम नाईट मुव्हमेंटस् ऑफ चिता. व्हेअर दे स्टे?, हाऊ मदर चिता प्रोटेक्ट हर कब्ज." सर म्हणाले.

"ओके सर." सारा म्हणाली.

बदलत्या काळाप्रमाणे चित्त्याच्या राहणीमानात कोणते बदल झाले आहेत? ते आपलं संरक्षण कसं करतात? आणि आलेल्या परिस्थितीला कसं तोंड देतात? हे अभ्यासकांच्या एका गटाला अभ्यासायचं होतं. वाईल्ड क्षेत्रात जे प्राण्यांच्या फोटोंचं मॅगझिन प्रकाशित होतं त्यावरून त्यांना बरीच माहिती मिळत असते आणि म्हणूनच त्यांचं हे काम सुरू होतं.

"सर अब रात हो गयी है | वो मदर चिता अपने बच्चो के साथ घास में है |" सारा म्हणाली.

"येस. देखते है ये रात शांती से निकलती है या कुछ होता है |" सर म्हणाले.

सारा सगळं बघत होती. तिचं प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष होतं. आज ती अगदी दिवसभर काम करत असली तरीही तिला झोप आली नव्हती.

'दादाने बरोबर सांगितलं होतं, शरीर हायड्रेटेड असलं आणि व्यवस्थित पोटभर काहीतरी खाल्लेलं असलं की जास्तीचं काम करण्यासाठी ऊर्जा आपोआप मिळते.' सारा मनातच म्हणाली.

ती आज दिवसभर एनर्जी ड्रिंक घालून पाणी पीत होती शिवाय आईने दिलेल्या फराळाचा डबा ती सोबत घेऊन आली होती. दर दोन दोन तासाला तिने त्यातून थोडं थोडं खाल्लं होतं त्यामुळे अजूनही ती फ्रेश होती. सगळं काही सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच अचानक काहीतरी झालं. एकदम निरव शांतता आणि संथ असलेल्या जंगलात अचानकच धावपळ सुरू झाली. काही कळायच्या आतच सगळं काही घडत होतं.

'हे काय झालं अचानक? काय होतंय नक्की?' सारा इकडे तिकडे बघत मनातच म्हणाली.

अचानकच चित्त्याची पिल्लं आणि त्यांची आई जिथे होते तिथे हल्ला झाला होता. आपल्या पिल्लांना वाचवायला त्यांची आई जिवाच्या आकांताने प्रयत्न करत होती. एका लांडग्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. कशी बशी सगळी पिल्लं आणि त्यांची आई तिथून निसटले. तरीही एक पिल्लू जखमी झालंच. त्या लांडग्याचे तीक्ष्ण दात त्या पिल्लाच्या पायात रुतले होते आणि म्हणूनच रक्तस्त्राव सुद्धा होत होता. त्याला तोंडात धरून त्याच्या आईने सुरक्षित जागी नेलं. सारा सगळं बघत होती. तिच्या मनात आत्ताही आपण काहीतरी करावं हे आलं होतं पण सरांनी फक्त तिच्याकडे बघितलं आणि ती समोरचं दृश्य बघत राहिली. सरांनी तिला आधीच सांगितलं होतं; निसर्गाच्या कामात ढवळाढवळ करायची नाही. त्यामुळे तिचे हात बांधले गेले होते.

'आत्ता कळतंय सर का म्हणत होते नाण्याला दोन बाजू असतात.' सारा मनातच म्हणाली.

"सारा देखा? नेचर खुबसुरत है लेकीन इसकी दुसरी साईड भी है |" सर म्हणाले.

"येस सर." सारा म्हणाली.

ती त्या चित्त्याची पिल्लं कुठे गेली असतील? हे शोधत होती. त्या एका पिल्लाला जेवढं लागलं होतं त्यावरून तरी त्याला चालता येईल असं वाटत नव्हतं. हे कमी होतं म्हणून की काय अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि मोठ्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली.

'याला म्हणतात दुष्काळात तेरावा महिना.' सारा मनातच म्हणाली.

सकाळपर्यंत तिला निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळालं होतं पण आता ती त्याच निसर्गाचं रौद्र रूप बघत होती.

"साराऽ टेक धिस." सर म्हणाले.

त्यांच्या आवाजाने ती भानावर आली. जीपमध्ये असलेला रेनकोट त्यांनी तिला दिला. पटकन सगळ्यांनी रेनकोट घातला.

"ये सब ह्युमन के कारण ही हो रहा है | आफ्रिका में अचानक बहुत गरमी होना, अचानक से बारिश शुरु होना इन सबकी वजह ग्लोबल वॉर्मिग ही है |" सर म्हणाले.

साराने नुसतं "हम्म" केलं.

'निसर्गाला खरंच मानवाने खूप त्रास दिला आहे. प्रगतीच्या मुखवट्या आडून अधोगती सुरू झाली आहे. जंगल तोड आणि संकरित बियाणे यामुळे स्वतःची तर तब्येत ढासळून घेतली आहेच शिवाय या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांचे घरही हिरावून घेतले. मानव यांची घरं तोडून स्वतःची घरं, रस्ते बांधू लागला, शेतीसाठी जागा रिकामी करू लागला आणि प्राणी शेतात आले की त्यांना त्यांच्याच जागेतून हुसकावून लावू लागला. निसर्ग तरी हे किती सहन करेल? त्याचं रौद्र रूप सगळ्यांना बघावं लागणारच आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. माणसं शहाणी झाली तर ठीक. पृथ्वीवर सगळे गुण्यागोविंदाने राहू नाहीतर पाठीवर ऑक्सीजनचा सिलेंडर आणि पाण्यासाठी गोळी, व्हिटॅमिनसाठी अन्नाच्या ऐवजी कॅपसुल आणि म्युझियममध्ये एखादं प्रदर्शनाला संपूर्ण सुरक्षेत ठेवलेलं झाड हेच चित्र बघायला मिळेल.' सारा मनातच विचार करत होती.

"सारा! तुम्हारा ध्यान किधार है?" सरांनी तिला असं विचारत गढलेलं पाहून विचारलं.

"सर नेचर की हानी हम इनसानो ने की | लेकीन इन जानवरो का इसमें क्या दोष? इन सबकी तकलीफ उन्हे भी होती है | अभी वही देखो ना वो बच्चे को इतनी गेहरी चोट आई है मगर अचानक आई इस बारिश के कारण उसमे मिट्टी जा रही है | वह बिचारा चलने की कोशिश कर रहा है मगर चल नहीं पा रहा |" सारा भावूक होत म्हणाली.

"कंट्रोल युअर इमोशन सारा. जो होना है वही होगा | देखो अभी बारिश बंद हो गयी है |" सर म्हणाले.

या सगळ्यात पहाट होत आली होती. रात्री साधारण दीड ते दोन तास पाऊस पडला होता आणि सगळ्या जंगलात चिखल झाला होता. साराची नजर त्या जखमी पिल्लाला शोधत होती.
*******************************
इथे साराच्या घरी तिची आई कामात असली तरीही तिचं त्यात लक्ष नव्हतं. काल साराशी काहीच कॉन्टॅक्ट न झाल्याने खरंतर ती अस्वस्थ होती.

'साराने जाताना सांगितलं होतं तिला काम असेल तेव्हा घरी फोन करायला वेळ मिळणार नाही. तरीही असं का होतंय? रात्रीपासून खूप अस्वस्थ वाटतंय. सारा तिथे ठीक असेल ना?' ती मनातच विचार करत होती.

"आईऽ अगं चहा उतू जाईल." समीर स्वयंपाक घरात आला आणि त्याने पटकन गॅस बंद केला.

विशाखा साराच्या विचारात एवढी हरवली होती की तिला आपण गॅसवर चहा ठेवला आहे हेच लक्षात राहिलं नाही.

"काय झालं आई? तू एवढी अस्वस्थ का आहेस?" समीरने काळजीने विचारलं.

"अरे काल दिवसभरात एकदाही सारा सोबत बोलणं नाही झालं रे. मला तिची खूप काळजी वाटतेय. खूप अस्वस्थ वाटतंय. असं वाटतंय आपली सारा अस्वस्थ आहे. तिच्या मनात नक्की काहीतरी सुरू आहे." विशाखा म्हणाली.

"आई असं काही नाहीये. ती बिझी असेल तिथे. वेळ मिळाला की फोन करेल. तू खूप जास्त विचार करतेय ना म्हणून तुला असं वाटतंय." समीर तिला समजावत म्हणाला.

"हो रे पण आपली सारा तिथे जाऊन फक्त तीन, चार दिवस झालेत. तिथलं वातावरण, पाण्यातला बदल, अन्नातला बदल यामुळे निदान मला आठडवभर तरी तिची काळजी वाटत राहणार." विशाखा म्हणाली.

क्रमशः.......
*******************************
साराला त्या पिल्लाचा होणारा खडतर प्रवास बघवेल का? की ती पुन्हा सरांचा नियम मोडून काहीतरी करायला जाईल? तिचं मन तिथे अस्वस्थ आहे तर इथे तिच्या आईला सुद्धा तसंच वाटतंय. साराची आजी आत्ता कुठे या सगळ्याला तयार होत होती तर पुन्हा ती याच्या विरोधात जाईल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all