लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४२)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                     निसर्ग किती सुंदर आहे.

कॅरलॉन सर साराला अप्रत्यक्षपणे का होईना पण भारतीय लोक आपल्या मुलांच्या बाबतीत जरा जास्तच हळवे असतात आणि सतत त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करतात असं सुचवू पाहत होते पण सारा सुद्धा त्यांना पालक कोणत्या बाबतीत बरोबर आहेत हे दाखवून देत होती. सारा त्यांना अगदी तोडीस तोड उत्तर तेही अगदी व्यवस्थित कारणांसह देत असल्याने थोड्याच वेळात त्यांची ही शाब्दिक चकमक थांबली आणि दोघं पुन्हा कामाला लागले.

'सारा आय मे नेव्हर हॅव सेड दॅट बट माय एक्सपरिएन्स सो फार हॅज फोर्स मी टू से इट. आय डीड नॉट बीलिव्ह यू वूड कम हिअर अंटील यू केम बिफोर मी इन आफ्रिका. आय सिंसियरली से दॅट यू इंडियन्स हॅव अ लॉट ऑफ टॅलेंट, जस्ट लेट इट कम आऊट. यू गेट लेफ्ट बिहाइंड बिकॉज यू गेट स्टक इन द थिंग्ज यू डोन्ट वॉन्ट टू डू. लेट इट गो! वाय एम आय थिंकिंग धिस?' सर मनातच म्हणाले.

लगेचच त्यांनी हा विचार झटकून दिला आणि तेही पूर्णपणे कामावर लक्ष देऊ लागले. या सगळ्यात दुपार उलटुन चालली होती. त्यांनी थोडा ब्रेक घ्यायचा ठरवलं. साराने आईने दिलेला फराळ बरोबर आणला होता आणि तोच आज तिने खाण्याचा निर्णय घेतला होता. तिला आफ्रिकेत पोहोचून दोनच दिवस झाले असले तरीही ती तिच्या आईच्या हातची चव मिस करत होती. अजूनही तिला अशी फिरतीवर राहण्यासाठी आणि असेल त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागणार होताच. थोडावेळ असाच गेल्यावर त्यांनी पुन्हा काम केलं आणि संध्याकाळ होऊन गेल्यावर दोघं पुन्हा गावात आले.

"सारा नेक्स्ट वीक वाईल्ड फील्ड शो के प्रेझेंटर आ रहे है | उनका शूटिंग विक्टोरिया वॉटर फॉल्स में होने वाला है | ये विक वी कॅन शूट इन धिस एरिया अँड देन वी विल गो फॉर विक्टोरिया वॉटर फॉल्स." सर म्हणाले.

"ओके सर. आय एम रियली व्हेरी एक्साईटेड फॉर इट." सारा आनंदी होत म्हणाली.

तिला आफ्रिका म्हणलं की विक्टोरिया वॉटर फॉल्स सुद्धा डोळ्यासमोर दिसायचे. आता पुढच्याच आठवड्यात आपल्याला तिथे जायला मिळणार आहे या बातमीनेच ती खूप आनंदी झाली होती.

'आफ्रिकेत येऊन जर मला विक्टोरिया वॉटर फॉल्स बघायला मिळाले नसते तर माझ्यासारखी कम नशिबी मीच ठरले असते. पण आता तसं काहीच होणार नाही. पुढच्या आठवड्यात तिथे जायचं आहे म्हणजे खूप मजा येणार. निसर्ग किती सुंदर आहे याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे विक्टोरिया वॉटर फॉल्स. आता कधी एकदा हा आठवडा संपेल असं झालंय.' सारा मनातच विचार करत होती.

"सारा व्हॉट आर यू थिंककिंग? अभी विक्टोरिया वॉटर फॉल्स को जाने के लिये टाईम है | अभी काम पे फोकस करो |" सर तिला विचारात गढलेलं पाहून म्हणाले.

"येस सर. वो विक्टोरिया वॉटर फॉल्स के बारे में सूनके बहुत एक्सायटेड फील हो रहा है |" सारा म्हणाली.

यावर सरांनी नुसतं "हम्म" केलं.

रात्री साराने याबद्दल घरी सुद्धा सांगितलं. या उत्साहामुळे ती हे विसरली होती की भारताची वेळ साडे तीन तास पुढे आहे त्यामुळे तिने घरी फोन लावला तेव्हा खूप उशीर झाला होता आणि म्हणून जास्त काही न बोलता तिने फोन ठेवला होता. मात्र तिची ती रात्र सतत विक्टोरिया वॉटर फॉल्सबद्दल विचार करण्यातच संपली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सर आणि सारा त्यांच्या कामासाठी निघाले होते. आज साराला त्या चित्त्याच्या पिल्लांचे निरीक्षण करून संपूर्ण दिवसभर त्यांचे प्रत्येक क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा टास्क सरांनी दिला होता. अर्थात सर सुद्धा तिथे तिची मदत करायला असणार होतेच. पहाटे पहाटेच खरंतर त्यांचं काम सुरू झालं होतं.

'आज खूप भारी वाटतंय मला. खूप प्रसन्न सुद्धा वाटतंय. इथे आल्या आल्या जेवढी गरमी होत होती तेवढी आता जाणवत नाहीये. कदाचित मनापासून इथल्या वातावरणाची सवय व्हायला लागली असावी. निसर्गाने आपसूक मला सामावून घेतलं आहे. आत्ता एवढ्या लवकर निघायचं होतं म्हणून नाहीतर एकदा घरी सुद्धा फोन करून झाला असता पण आत्ता तिथे सगळी सकाळची गडबड सुरू असेल. असो! रात्री वेळ मिळाला तर नक्की फोन करेन. अजून मला दादाला तो आफ्रिकेच्या लोकांचा खेळाचा व्हिडिओ पाठवायचा आहे. बघूया आता कधी आणि किती वेळ मिळेल त्यावर आहे सगळं.' सारा मनातच विचार करत होती.

आत्ता आत्ता तिला तिथल्या वातावरणाची सवय व्हायला लागली होती. हळूहळू ती तिथल्या निसर्गात रुळत होती. आजूबाजूची झाडं, प्राणी, गवताळ जागा हे सगळं बघून तिला खूप छान वाटायचं. दिवसभर केलेल्या कामाचा क्षीण ती हिरवळ बघून दूर व्हायचा. ती हिरवळ बघून डोळ्यांना सुद्धा आराम मिळायचा आणि साराला पुन्हा पुन्हा वाटू लागायचं; निसर्ग किती सुंदर आहे. ती सरांना सुद्धा असं बोलून दाखवायची पण सर फक्त स्मित करायचे. सगळा निसर्ग न्याहाळत ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले होते. सारा त्या चित्त्याच्या पिल्लांना आणि त्यांच्या आईला शोधत होती.

'कुठे गेली असतील पिल्लं?' सारा मनातच म्हणाली.
*******************************
इथे घरी साराचा फोन येऊन जायचा तरीही सगळ्यांना तिची खूप आठवण यायची. विशाखाला तर अजून सारा घरात नाहीये याचा कधीकधी विसर पडायचा. आत्ता सुद्धा विराजला कामावर जायचं असल्याने त्याचा डबा भरता भरता तिच्या डोक्यात साराचेच विचार घुमत होते.

'सारा आफ्रिकेला जाऊन दोनच दिवस झालेत तरीही खूप काळ गेल्यासारखं वाटतंय. कशी असेल माझी पोर? स्वतःची नीट काळजी घेत असेल ना? फोनवर ती कितीही छान बोलली तरीही मला तिची खूप काळजी वाटतेय.' विशाखा मनातच स्वतःशी बोलत होती.

"विशाखा आज साराचा फोन आला होता का गं?" विराजने विचारलं.

त्याच्या आवाजाने तिच्या विचारांची तंद्री तुटली.

"नाही ना रे. बहुतेक तिला आज वेळ मिळाला नसेल नाहीतर ती सकाळी एकदा तरी फोन करते." विशाखा म्हणाली.

"हम्म. थांब मी एकदा करून बघतो. जर ती बिझी असेल तर नाही उचलणार पण ऑफिसला जायच्या आधी एकदा तिच्याशी बोललं की छान वाटतं." विराज म्हणाला आणि बोलता बोलता त्याने साराचा नंबर डायल केला.

विशाखाने सुद्धा त्याला थांबवलं नाही. तिला हे माहीत होतं की, सारा कामात असेल म्हणूनच फोन करू शकली नसेल पण जर ती आज विसरली असेल तर? म्हणून तीही त्याला काही बोलली नाही. तिलाही सारा सोबत बोलण्याचा मोह झालाच होता. थोडावेळ असाच गेला आणि विशाखाने विचारलं; "लागला का रे फोन? उचलत नाहीये का?"

"अगं आऊट ऑफ कव्हरेज एरिया येतोय." विराज म्हणाला.

समीरने त्याचं हे बोलणं ऐकलं.

"काय बाबा तुम्ही पण? अहो सारा तिथे जंगलात काम करते. तिथे तुम्ही तिचा फोन लागेल अशी कशी अपेक्षा करताय?" समीर म्हणाला.

"हो रे मला माहित आहे पण आज तिचा फोन आला नाही ना म्हणून चैन पडत नाहीये." विराज म्हणाला.

"आई, बाबा आता तुम्ही या सगळ्याची सवय करून घ्या. खरंतर साराला आफ्रिकेत जाऊन आज तिसराच दिवस आहे तरीही तुम्ही असे वागत आहात जसं की ती खूप काळ झाला लांब गेली आहे आणि तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये." समीर म्हणाला.

"माहितीये रे तरीही तिची खूप आठवण येतेय. काल रात्री तिचा फोन आलेला तर म्हणत होती पुढच्या आठवड्यात त्या शोच्या संदर्भात विक्टोरिया वॉटर फॉल्सला जाणार आहे." त्याची आई म्हणाली.

"काय? खरंच? आई तुला माहितेय तिथे साराला खूप काही शिकायला मिळेल आणि तिथला व्ह्यू तर किती मस्त असतो." समीर आनंदी होत उत्साहात म्हणाला.

"हम्म. काल तिचा फोन आला तर इथे बराच उशीर झालेला म्हणून जास्त बोलता आलं नाही. आज तिचा सकाळी लवकरच फोन येईल या आशेवर आम्ही झोपलो होतो." विराज म्हणाला.

"बाबा नसेल मिळाला तिला वेळ. दिवसभरात येऊन जाईल एकदातरी फोन एवढी काळजी नका करू." समीर म्हणाला.

विराज त्याचं आवरून आणि डबा घेऊन ऑफिसला निघून गेला. ऑफिसला जायच्या आधी रोज साराची बडबड ऐकून घ्यायची सवय त्याला असल्याने या दोन, तीन दिवसात त्याला खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं.

"बरं आई मी आज जरा मित्रांसोबत बाहेर जातोय. आम्ही तीन जण आहोत. मागे आमचं चालतं फिरतं हॉटेल काढायचं सुरू होतं त्याबद्दलच जरा एक दोन ठिकाणी मीटिंग आहेत." समीर म्हणाला.

"बरं. किती वाजेपर्यंत येशील?" विशाखाने विचारलं.

"दुपार नंतर येईन. बाहेरच काहीतरी खाणं होईल. तुम्ही सगळे जेवून घ्या माझी वाट नका बघू." समीर म्हणाला.

"ओके." विशाखा म्हणाली.

समीर त्याचं आवरायला त्याच्या रूममध्ये गेला आणि विशाखा बाकी आवराआवर करू लागली.

'पोरं किती मोठी झाली? समीर सुद्धा आता हळूहळू सेटल होईल. दोन्ही पोरं गुणाची आहेत. सारा सुद्धा स्वतःच्या बळावर सगळं करतेय आणि समीरला पण स्टार्टअप सुरू करायचा आहे तर तोही स्वतःच हातपाय मारतोय. विराजने खरंतर दोन्ही पोरांच्या नावाने पैसे ठेवले आहेत पण दोघांनाही स्वतःच्याच बळावर मोठं व्हायचं आहे. देवाच्या कृपेने अगदी योग्य संस्कार घडलेत मुलांवर.' विशाखा मनातच विचार करत होती.

विचारा विचारातच तिने काम संपवलं आणि ती हॉलमध्ये येऊन बसली. एवढ्यात साराची आजी तिथे आली.

"विशाखा अगं साराने काय सगळ्यांची तोंडं बंद केली आहेत. आता कोणीच साराच्या विरोधात काही बोलत नाही. अगदी व्यवस्थित सगळ्यांना उत्तरं देऊन गेली ती." तिची आजी म्हणाली.

"म्हणजे? आई मी समजले नाही." विशाखाने गोंधळून विचारलं.

साराची आजी तिच्या आईच्या बाजूला बसत बोलू लागली; "अगं सारा नाही का माझ्या सोबत देवळात यायची तेव्हा तिने सगळ्यांना तिची बाजू सांगितली होती तेव्हापासून सगळ्या विचारत असतात सारा कशी आहे?, काही फोटो पाठवले का तिने? असं सगळं."

"अरे वा! छानच आहे मग. म्हणजे आता तुम्हीही तिला सपोर्ट कराल ना?" विशाखाने विचारलं.

"अगं मी काही मुद्दाम तिच्याशी असं वागत नव्हते आणि लोक काय म्हणतील? यापेक्षा मला तिची काळजी जास्त होती. आजचं जग खूप भयानक आहे तुला माहितेय, शिवाय आपली सारा जंगलात राहणार म्हणून मी असं म्हणायचे." तिची आजी म्हणाली.

"हो आई माहीत आहे. मलाही याच गोष्टीची जास्त काळजी होती आणि अजूनही आहे." विशाखा म्हणाली.

"पण खरं सांगू विशाखा? मला सारा म्हणाली ते आता पटायला लागलं आहे. सारा तिथे जाऊन सुद्धा नीट काळजी घेत आहे हे मलाही दिसतंय. हळूहळू मीही आता मनाची तयारी करतेय. घेऊ दे आपल्या पाखराला उंच झेप. साराचं बोलणं आता मला पटतं, निसर्ग खूप सुंदर आहे आणि आपल्याला सगळं शिकवतो. " तिची आजी म्हणाली.

तिच्या बोलण्याने विशाखाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं.

"अगं असं काय बघतेस? खरंच बोलतेय मी. हा फक्त साराला हे सगळं सांगू नकोस. नाहीतर मॅडम हवेत तरंगत राहतील आणि बेजबाबदारपणे वागतील." तिची आजी विशाखाला असं पाहून म्हणाली.

विशाखाने फक्त स्मित करून "बरं" म्हणलं.

क्रमशः.....
*******************************
साराची आजी हळूहळू साराला पाठिंबा द्यायला लागली आहे. सारा सुद्धा तिचं काम अगदी चोख करत आहे पण पुढे काही संकट तर येणार नाही ना? तिच्या आजीचा आत्ता कुठे सारावर विश्वास बसतोय तो मावळणार नाही ना? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all