लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३)

Story Of Girl Who Wants To Achieve A Different Dream.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                          धडधडीत खोटं

विराजने तिला; "आधी खा मग बोलू" असं सांगितलं असलं तरीही तिच्या घश्याखाली एकही घास उतरत नव्हता. एरवी तिला "अगं जरा शांत बसून सावकाश खा." असं सांगायला लागत असे, पण आज "सारा खाऊन घे ना काहीतरी" असं सांगायला लागत होतं.

"बाबा! मी खाईन पण फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या." सारा म्हणाली.

"हम्म बोल." विराज म्हणाला.

"बाबा, मला एक सांगा जर तुम्हाला कधी मान्यच नव्हतं मी फोटोग्राफी करावी तर का मला आधी कॅमेरा आणून दिला? का मला यातच शिक्षण दिलं? कदाचित मला आज त्रास कमी झाला असता." सारा खूप पोटतिडकीने बोलत होती.

"म्हणजे यातही आमचीच चूक?" साराच्या आईने रागाने विचारलं.

"अगं विशाखा थांब एक मिनिटं." विराज म्हणाला.

आणि त्याने साराला एक घास भरवत बोलायला सुरुवात केली; "किती भराभर वर्ष सरली ना? मला अजूनही तू पाच वर्षाची होतीस ते आठवतंय. तू पाच वर्षाची होतीस आणि समीर नऊ. तेव्हा मी पहिल्यांदा कॅमेरा असलेला फोन घेतला होता आणि तुम्हा दोघांना त्याचं खूप कौतुक असायचं. मी कधी ऑफिसमधून येतोय? आणि तुम्ही मोबाईल घेऊन बसताय, असं तुम्हाला झालेलं असायचं. कित्येकवेळा समीरच्या वाट्याला मोबाईल यायचाच नाही. तू लहान म्हणून नेहमी तुला पाठीशी घातलं." विराज बोलता बोलता जुन्या आठवणीत रमून गेला.

सगळ्यांच्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.

"तुला माहितेय, तेव्हा आपलं हे घर नव्हतं. एका लहान अपार्टमेंटमध्ये आपण राहायचो. रविवारी मी घरी असलो, की दिवसभर तूच मोबाईल घेऊन बसायचीस आणि घरात फिरणाऱ्या मुंग्यांचे फोटो काढायचीस. कधी कधी फुलं, पानं किंवा खिडकीत एखादी चिमणी आली तर तिचा फोटो. त्या फोनमध्ये आपल्या सगळ्यांच्या फोटोपेक्षा हेच फोटो भरलेले असायचे. तेव्हापासूनच तुझ्यात हे टॅलेंट भरेलेलं होतं. मीही सगळ्यांना अगदी कौतुकाने ते फोटो दाखवायचो." विराज पुढे म्हणाला.

साराला सुद्धा काहीकाही गोष्टी आठवत होत्या.

"हो, हे मला आठवतंय. तेव्हा पासूनच फोटोचं एक वेड होतं माझ्यात. दादाला फक्त गेम खेळायला फोन हवा असायचा आणि मी मोबाईल घेऊन बसले की तो आईच्या मागे जायचा; तू तुला मोबाईल घे आणि फक्त मला दे म्हणून." सारा हसत हसत म्हणाली.

खूप वेळा नंतर तिच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं.

"मग वाटणारच ना तेव्हा तसं. मीही लहानच होतो. मग आई माझी कशीबशी समजूत काढायची आणि थोड्यावेळाने तुझ्याकडून मला मोबाईल मिळवून द्यायची. जास्त वेळ माझा आईसोबत स्वयंपाकघरातच जायचा आणि त्यातूनच मला या सगळ्याची गोडी लागली." समीर मध्येच म्हणाला.

सारा मात्र काहीही बोलली नाही. तिला आज दादाकडून एक माफक अपेक्षा होती तीही आज भंग झाल्याने खरंतर ती नाराज होती. समीरला हे जाणवत होतं पण त्याचंही मन तिच्या काळजीपोटी या गोष्टीला विरोध करत होतं.

"हम्म. त्यावेळी तुम्ही दोघं लहान होतात म्हणून आई घरातून जी कामं करता येतील ती करायची. ट्युशन, विणकामाचे क्लास असं काहीबाही आणि मला हातभार लावायची. म्हणूनच आपल्याला कधी काही कमी पडलं नाही. नंतर माझं प्रमोशन होत गेलं आणि आपलं हे मोठं घर तयार झालं. मग ठरवलं आपल्या लाडक्या लेकीसाठी पहिला पंचवीस हजाराचा कॅमेरा घ्यायचा आणि लगेच घेतला. समीरला स्वयंपाकाची आवड म्हणून त्यालाही हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं." विराज म्हणाला.

दोघांनाही त्यांच्या आई - बाबांनी त्यांना एवढं मोठं करण्यासाठी काय खस्ता खाल्ल्या आहेत याची जाणीव होती. कधीही "आपल्याला हे परवडणार नाही" असं म्हणून त्यांच्या पालकांनी या मुलांचं मन मोडलं नव्हतं आणि मुलांनीही कधी अवाजवी हट्ट केले नव्हते.

'आपण काय बोलून बसलो?' याची आता साराला खंत वाटत होती.

"सॉरी बाबा. मी असं बोलायला नको होतं." सारा म्हणाली.

"ते ठीक आहे. आपल्या मनासारखं जर काही होत नसेल तर रागाच्याभरात बोलून जातो आपण. त्याचं तू वाईट वाटून नको घेऊ. फक्त एवढं लक्षात ठेव सगळी आपली माणसं आहेत. आपल्या भल्याचा विचार करून ते बोलत असतात." तिच्या बाबांनी तिला समजावलं.

"सॉरी." सारा म्हणाली.

"सारा, तुझं सॉरी नकोय आम्हाला. बघ विराज आणि विशाखाने तुम्हा दोघांना घडवायला खूप खस्ता खाल्ल्या आहेत. अगदी सगळ्यांचे आई - बाप खातात तश्याच. तुला फोटो काढायला आवडतात म्हणून दोघांनी तेव्हाच ठरवलं होतं तू सण समारंभात फोटो काढशील पण तुझं आता काहीतरी भलतंच चाललं आहे." तिचे आजोबा म्हणाले.

"आजोबा अहो त्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणतात. आत्ता तो मुद्दा नाहीये. मला माझं मन कुठेतरी रमवायचं आहे म्हणून उद्या मी ताडोबाला जाऊ का? असं विचारत होते." सारा म्हणाली.

"सारा तुला एकदा नाही म्हणून सांगितलं आहे मी." विशाखा तिला ओरडली.

"थांब तिला ओरडू नकोस. मी बघतो. सारा! मला सांग कोण कोण चाललं आहे?" तिच्या बाबांनी विचारलं.

"बाबा आमचा कॉलेज ग्रुप. हवंतर तुमचं खाऊन झालं की सगळ्यांना कॉन्फरन्स कॉल लावते तुम्ही स्वतः बोला." सारा म्हणाली.

"ठीक आहे." विराज म्हणाला.

साराने काहीही न बोलता गप्पपणे चार घास खाऊन घेतले आणि ती रूममध्ये मोबाईल आणायला गेली. सगळे हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते. साराने मोबाईल आणला आणि एक नंबर डायल केला.

"हॅलो, अगं वैशाली आपल्या उद्याच्या प्लॅनबद्दल जरा बाबांना तुझ्याशी बोलायचं आहे. एक काम कर ना अनुष्का, निधी आणि मायराला पण कॉन्फरन्स मध्ये घे." सारा म्हणाली.

"हॅलोऽ मला आवाज येत नाहीये. सगळ्यांना कॉन्फरन्समध्ये घेतलं की मग पुन्हा लाव फोन. हॅलोऽ" सारा म्हणाली आणि तिने फोन कट केला.

थोड्यावेळाने फोन आला तेव्हा साराने मोबाईल बाबांकडे दिला.

"हॅलो! पोरींनो तुम्ही अचानक असा काय प्लॅन केला ताडोबाला जायचा?" विराजने विचारलं.

"काका खूप आधीपासून ठरवत होतो पण सगळ्यांचा एक टाईम काही जुळून येत नव्हता. उद्या सगळे फ्री आहेत म्हणून चाललो आहोत. अनुष्काचे तिथे रॉ हाऊस आहे तिथे एक रात्र राहू." वैशाली म्हणाली.

"तुमच्या सोबत कोणी मोठं असणार आहे का?" तिच्या बाबांनी विचारलं.

"इथून जाताना नाही पण तिथे माझी मावशी राहते तर तिथे ती असेल." अनुष्का म्हणाली.

"बरं ठीक आहे." विराज म्हणाला आणि त्याने फोन साराला दिला.

"बरं बाय मी तुम्हा सगळ्यांना कळवते मी येणार आहे की नाही ते." सारा म्हणाली आणि तिने फोन ठेवला.

"बाबा आता तरी विश्वास बसला ना?" साराने विचारलं.

"इथे प्रश्न विश्वास असण्या नसण्याचा नव्हता सारा. तू एकदा फोटो काढण्याच्या नादात लागलीस की तुझं कुठेही लक्ष नसतं. त्यात ताडोबाला जाणार म्हणजे आमच्या जीवाला घोर म्हणून नाही म्हणलं होतं तुला." विशाखा म्हणाली.

"म्हणजे मी माझ्या मनासारखं काहीही करायचं नाहीये का? दादाला तुम्ही बिनधास्त काहीही एवढं न विचारता कुठेही पाठवता पण मला जेव्हा जायचं असतं तेव्हाच का? मी मुलगी आहे म्हणून?" सारा रागात बोलून गेली.

"साराऽ तुझं आता अती होतंय हा. आजवर कधी तुमच्या दोघांत भेदभाव केलाय? अगं दादा त्याची काळजी नीट घेतो. तुझ्यासारखा हलगर्जीपणा कधीही करत नाही तो." तिची आई ओरडली.

"मलाच ओरडा सगळे. मला काही बोलायचं नाहीये." सारा म्हणाली आणि रूममध्ये जाऊन बसली.

"विशाखा मला वाटतंय आपण जरा जास्तच ताणतोय. साराला तिच्या मैत्रिणींबरोबर फिरायला तरी जाऊ देऊ. आजच तिच्यावर एवढे आघात नको. अगं ती या वयात नाही फिरणार तर कधी?" विराज म्हणाला.

"हो रे मला पटतंय पण ही काही बोलायची पद्धत आहे? मीच खरंतर कुठेतरी कमी पडले सारावर संस्कार करायला." विशाखा स्वतःला दोष देत म्हणाली.

"स्वतःला दोष नको देऊस. तू बरोबर संस्कार केले आहेस तिच्यावर. बघ बाकीच्या मुली जरा आवाज चढवून बोललं की गप्प बसतात, पण आपली सारा तशी नाही. तिला तिचं मत स्पष्टपणे मांडता येतं. आजच्या काळात हेच महत्वाचं नाही का?" विराजने तिला समजावलं.

"विराज बरोबर बोलतोय विशाखा. तू स्वतःला त्रास नको करून घेऊ." साराची आजी म्हणाली.

"मला वाटतंय आता आपण तिच्या मैत्रिणींशी फोनवर बोललो आहोत तर सारावर थोडा विश्वास ठेवायला हवा. तिला जाऊ देऊया उद्या." विराज म्हणाला.

विशाखाला सुद्धा ते पटलं. कितीही झालं तरीही मुलीच्या आनंदात तिलाही आनंद मिळणार होता. 'आधीच तिचं एवढं मोठं वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होण्याचं स्वप्न आपण तिला सोडायला सांगतोय तर निदान दोन दिवस कुठेतरी मन रमवून आली तर तिलाही कदाचित बरं वाटेल.' असा विचार तिने केला.

"ठीक आहे." विशाखा म्हणाली.

विराज आणि विशाखा तिच्या रूमबाहेर आले. दार नुसतंच ढकललेलं होतं. सारा बेडवर पडली होती. ते दोघं आले आहेत याचीही चाहूल तिला नव्हती. कोपराखाली उशी घेऊन पोटावर झोपून ती मोबाईलमध्ये जुने कॉलेजचे फोटो बघत होती.

"सारा!" विशाखाने हाक मारली तेव्हा ती भानावर आली आणि उठून बसली.

ती काहीही बोलत नाही पाहून विशाखाने विराजकडे बघितलं. त्याने डोळ्यांनीच तिला बोलण्याचा इशारा केला आणि विशाखा बोलू लागली; "सारा, तुला उद्या ताडोबाला जायचं आहे ना?"

"नाही." सारा रागावून म्हणाली.

"अच्छा. खरं नाही जायचं? चला बरं झालं. माझं एक चिवडा आणि लाडू करायचं काम वाचलं." विशाखा म्हणाली.

तिच्या या बोलण्याने साराने चमकून तिच्याकडे बघितलं.

"सारा तू जा उद्या. मस्त एन्जॉय कर." विराज म्हणाला.

तिला तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. फक्त एवढं ऐकूनच तिच्या चेहऱ्यावरची दुःखाची लकेर कुठल्या कुठे गेली होती.

"आई, बाबा खरं?" तिने आनंदात विचारलं.

"हो. जा तू उद्या." विशाखा म्हणाली.

सारा लगेचच दोघांना बिलगली. 'सॉरी आई, बाबा. आज पहिल्यांदा मी तुमच्याशी एवढं धडधडीत खोटं बोलले आहे. काय करू? मला दुसरा कोणता मार्ग दिसतच नव्हता.' साराने मनातच दोघांची माफी मागितली.

क्रमशः.....
*****************************
साराने मनात माफी का मागितली असेल? एवढं कोणतं ती धडधडीत खोटं बोलली असेल? तिच्या मैत्रिणी जाणार असतील का तिच्या सोबत? सारा ताडोबाला चालली आहे हे खरं असलं तरी ती तिथे का जाणार आहे हे घरी समजल्यावर काय होईल? सारा नवीन रेकॉर्ड तयार करू शकेल का? कसं असेल तिचं पुढचं करीयर? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all