लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३९)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३९)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                              एवढी मजल?

इथे घरी साराला आलेला संशय खरा ठरला होता. तिच्या आजीने बिअरबद्दल ऐकलं होतं. सरांनी तिला इंग्लिशमधून सांगितलं होतं त्यामुळे तिला त्याचा नीट अर्थ समजला नव्हता पण बिअर शब्द ऐकूनच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.

"बघितलं? साराची मजल कुठवर गेली ते? ती तिथे दारू घेत होती." तिची आजी चिडून म्हणाली.

"अगं आजी पहिली गोष्ट ती दारू नव्हती गं. दुसरी म्हणजे साराला अजिबात आवडत नाही ते त्यामुळे ती बिअर घेणार नाही." समीर तिला समजावत म्हणाला.

"मी तिचा हात बघितला होता. अरे यांनी, विराजनी आणि आपल्या पूर्ण घराण्यात आजवर कुणीही या असल्या पदार्थांना हात लावला नाही आणि ही तिथे जाऊन हे असं करणार का? मला माहित होतं असंच काहीतरी घडणार म्हणूनच मी तिला विरोध करत होते तर सगळे मलाच बोलत होते. बघितलं? बघितलं का? आज सारा काय घेत होती ते?" तिची आजी तावातावाने बोलत होती.

"अगं कांता ते लोक दुसऱ्या भाषेत बोलत होते. आपल्या साराला काहीही समजलं नसणार पण जेव्हा तिच्या सरांनी ती बिअर आहे असं सांगितलं तेव्हा तिने पटकन हात मागे घेतला की नाही?" तिच्या आजोबांनी आजीला समजावलं.

"हो ना! आणि आजी तुला माहितेय का ते सर काय म्हणाले? ते म्हणत होते की, आफ्रिकेच्या लोकांची ती परंपरा आहे. ते लोक इथे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत अशी बिअर देऊन करतात." समीर म्हणाला.

"शिव शिव शिव. हेच ऐकायचं बाकी होतं." तिची आजी देवासमोर कान धरून हात जोडत म्हणाली.

"आजी अगं एवढं काय त्यात? तू तर अशी वागतेस जसं काय कोणी साराला ड्रग्स देत होतं आणि तीही घेत होती." समीर म्हणाला.

"ही असली व्यसनं लागली की तेही लागायला वेळ नाही लागणार." तिची आजी म्हणाली.

तिच्या या बोलण्याने समीरने तर डोक्यावर हातच मारून घेतला. विशाखाला माहीत होतं साराने असं काहीही केलं नाहीये तरीही ती काही बोलत नव्हती कारण साराची आजी एवढ्यात काहीही ऐकून घेणार नाही हे तिला माहीत होतं. विशाखा जाणून होती आपण काही बोललो तर आईंना वाईट वाटेल आणि त्या दुखावल्या जातील म्हणूनच ती गप्प होती.

"मी एक काम करतो साराला फोन लावतो. तुला तिच्या आवाजावरून नक्की कळेल. मला खात्री आहे माझी बहिण बिअर घेणारच नाही." समीर म्हणाला.

त्याने बोलता बोलताच साराला फोन लावला. तिचा फोन बिझी येत होता.

"काय झालं? नाही ना उचलत?" तिच्या आजीने विचारलं.

"अगं बिझी आहे फोन. थांब दोन मिनिटं." समीर म्हणाला.

त्याने पुन्हा तिला फोन ट्राय केला. अजूनही तिचा फोन व्यस्त येत होता. थोड्यावेळात तिचाच फोन आला.

"हॅलो दादा बोल ना. काय झालं?" तिने विचारलं.

"अगं काही नाही आजीला तुझ्याशी बोलायचं आहे." समीर म्हणाला.

त्याचं हे बोलणं ऐकून साराने एक आवंढा गिळला. समीरने फोन स्पीकरवर टाकला.

"काय गं सारा? तू तिथे कशाला गेली आहेस?" तिच्या आजीने जरा ओरडूनच विचारलं.

"म्हणजे? अगं तुला माहितेय की मी कशासाठी आले आहे ते. असं का विचारतेस?" साराने मुद्दाम गोंधळून विचारलं. तिला अंदाज आलाच होता आजीला काय म्हणायचं आहे त्याचा पण तिने तसं काहीच दाखवलं नाही.

"हो का? मग मगाशी दारू पीत होतीस ना? म्हणूनच फोन घेतला नाहीस ना?" तिच्या आजीने विचारलं.

"अगं काहीही काय आजी? मी असं करेन का? मला नव्हतं माहीत ती बिअर आहे ते. मी घेतली नाहीये ती. अगं माझी एवढी मजल आहे का तरी? तुझ्या संस्करांवर लोक बोट ठेवतील असं मी करेन का?" साराने आजीला समजावलं.

"मग फोन का नाही घेतलास?" तिच्या आजीने विचारलं.

"अगं मी ना इथल्या बाजारात आली आहे. या लोकांनी छान छान स्वतःच्या हातांनी बनवलेल्या वस्तू आहेत इथे. मी राघवला त्याच दाखवत होते व्हिडिओ कॉलवर म्हणून फोन बिझी आला." सारा म्हणाली.

आता आपली नात खरेदी करतेय म्हणल्यावर आजीला सुद्धा उत्साह वाटू लागला.

"सारा आम्हाला पण दाखव ना काय काय आहे तिथे?" आजी म्हणाली.

साराचा उपाय कामी आला होता. तिला माहित होतं खरेदी म्हणलं की आजीचा मूड छान होणार आणि ती आधीचं सगळं विसरणार. साराने लगेचच घरी व्हिडिओ कॉल लावला.

"आई, आजी सगळ्यात आधी एक सांगते, आजच मी इथे पोहोचले आहे म्हणून मला काम नाहीये पण उद्या पासून मला काम असेल तर सारखं सारखं आपल्याला असं फोनवर बोलता येणार नाहीये." साराने आधीच सगळ्यांना सांगितलं.

"हो बाळा माहीत आहे." तिची आई म्हणाली.

"हम्म. खरंच ही पिली नाहीये." तिची आजी हळू आवाजात म्हणाली पण साराने हे ऐकलं आणि हसू दाबत त्या बाजारातल्या वस्तू दाखवू लागली.

"आजी हा बघ हत्ती. घेऊन येऊ का? आपल्याला भोंडल्याच्यावेळी उपयोगी पडेल." सारा तिथली हत्तीची मूर्ती आजीला दाखवत म्हणाली.

"हो घे. छान आहे. नक्षीकाम पण एकदम सुबक आहे." तिची आजी म्हणाली.

सगळेच वस्तू बघण्यात आणि खरेदी करण्यात व्यस्त होते. साराने तिथून हत्तीची मूर्ती, ब्रेसलेट, लाकडाच्या गोलावर काढलेल्या आफ्रिकन सफारीची चित्रं असं काहीबाही खरेदी केलं. सगळ्या वस्तू तिने घरी दाखवल्या. सारा सोबत तिची आई आणि आजोबा बोलत होते. तोवर समीरने आजीला हळूच विचारलं; "आजी तुझं आता तरी समाधान झालं ना? आपल्या सारावर विश्वास ठेव."

"हो." आजी म्हणाली आणि ती तिथून उठून तिच्या खोलीत गेली.

"बरं आई, आजोबा तुम्ही पण आता आराम करा. चल दादा फोन ठेवते." सारा म्हणाली.

समीरने तोंडाने हो म्हणलं असलं तरीही त्याने हळूच साराला खूण केली होती म्हणून तिने फोन चालू ठेवला. साराची आई आणि आजोबा आराम करायला आत गेले. समीरने पटकन इअर फोन्स घातले.

"काय झालं दादा?" साराने विचारलं.

"मला सांग तू मगाशी घेतलीस का बिअर?" समीरने हळूच विचारलं.

"अरे काहीही काय? अजिबात नाही. तुला माहितेय ना मी काही तत्व ठरवली आहेत त्यात हे बसत नाही." सारा म्हणाली.

"हम्म." समीर म्हणाला आणि दोघंही हसू लागले.

नंतर समीरने आजीने घरात जो काही गोंधळ घातला होता तो सांगितला. साराला हे अपेक्षितच होतं म्हणून ती हसली आणि नंतर थोडं बोलणं झाल्यावर तिने फोन ठेवला.

"सारा कॅन वी गो नाऊ? तुम्हारा शॉपिंग हो गया?" सरांनी तिला विचारलं.

"येस सर." सारा म्हणाली.

एव्हाना आता आफ्रिकेत जेवणाची वेळ झाली होती. दोघं तिथल्या आदिवासींसोबत पुन्हा गावात आले.

"सारा! द फूड वी आर गोईंग टू इट नाऊ इज ट्रेडीशनल हीअर. टुडे वी आर गोईंग टू इट चीकांडा अँड सम फिश डिशेस. देअर आर मेनी टाईप्स ऑफ फिश अवेलेबल इन आफ्रिका, सो इट इज अ बिग पार्ट ऑफ देअर डायट." सर तिला म्हणाले.

साराने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. तिला मासे जेवणात असणार आहेत हे तर समजलं पण हे चिकांडा काय भानगड आहे? हे तिला समजलं नाही.

"सर व्हॉट इज चिकांडा? इज धिस अल्सो नॉनव्हेज डिश?" साराने विचारलं.

"नो! नो! इट्स प्युअर व्हेज डिश. इट्स अल्सो रेफर्ड ऍज आफ्रिकन पोलोनी. इट्स मेड फ्रॉम वाईल्ड ऑर्किड ट्यूबर्स, पिनट्स, बेकिंग सोडा अँड चीली. इट्स कूक अंटील मीटलुफ कन्सिस्टंसी. इट्स सर्व्ह आयदर कोल्ड ऑर हॉट." सरांनी तिला सगळं नीट समजावून सांगितलं.

साराला सुद्धा हा काहीतरी नवीनच प्रकार आहे म्हणून याची चव कशी असेल? याबद्दल उत्सुकता होती. आधीच भरपूर गरम होत असल्याने तिने जास्त मासे खाण्याचं टाळलं. अगदीच नावाला तिने नॉनव्हेज पदार्थ पानात घेतले होते. साराने पहिला घास घेतला आणि तिला ते आवडलं. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. सारा मुद्दामच सगळे व्हेज पदार्थ बघून खात होती. तिला माहित होतं आपण मांसाहार केला तर तो पचायला जड जाणार आणि नंतर त्रास आपल्यालाच होणार म्हणून कटाक्षाने ती ते टाळत होती. फक्त सगळे पदार्थ चवीसाठी एक एक घास तिने घेतले होते.

"सारा व्हाय यू कान्ट टेकिंग नॉनव्हेज? टेस्ट इट. इट्स व्हेरी टेस्टी." सर तिला म्हणाले.

"नो सर. आय नो ये सब टेस्टी होगा बट इट्स हेवी फॉर डायजेस्ट. कलसे हमें काम शुरू करना है | हम इंडियन्स को रोज नॉनव्हेज खानेकी आदत भी नहीं होती | हमारे आयुर्वेद में भी नॉनव्हेज इंसनो के योग्य नहीं होता ऐसाही बताया है | लेकीन अब बदलते कल्चर के साथ लोगोने ये सब खाना चालू किया है, मगर अभिभी हमारे घर में साल में एखाद बार ही नॉनव्हेज बनता है | सो, ये सब को ध्यान में रखते हूवे मैने सोचा की पेट के लिये जो आयुर्वेदने बताया है वही सही है | सो आय प्रेफर्ड ओन्ली व्हेज फूड." सारा म्हणाली.

तिचं बोलणं झालं आणि बहुदा सरांना सुद्धा ते पटलं. कारण त्यांनी नॉनव्हेज घेण्यासाठी पुढे केलेला हात मागे घेत पानात घेतलेलं नॉनव्हेज संपवलं आणि नंतर शाकाहारी जेवण पानात घेतलं.

'ही आहे आमच्या भारताच्या आयुर्वेदाची कमाल. सगळं अगदी शास्त्रीय.' सारा सरांकडे बघत मनातच म्हणाली.

क्रमशः...
****************************
आता आजचा अर्धा दिवस तर संपलाच. उद्या पासून सारा खऱ्या अर्थाने तिथे कामाला लागेल. कसा असेल तिचा तिथला अनुभव? तिला नवीन काय काय शिकायला मिळेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all