लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३८)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३८)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                        थोडक्यात वाचले.

इथे साराच्या घरी सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं. साराचे बाबा ऑफिसला गेले होते. तिची आई दुपारच्या जेवणाची तयारी करत होती आणि समीर त्याच्या आजी, आजोबांना रूटीन चेकअपसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेला होता.

"साराऽ अगं आवरलं का तुझं?" तिची आई तिच्या खोली जवळ जात म्हणाली.

नंतर तिच्याच लक्षात आलं सारा घरात नाहीये. सकाळीच आपण तिच्याशी फोनवर बोललो आहोत.

'सारा आफ्रिकेला गेली आहे हे काही लक्षातच राहत नाहीये.' ती स्वतःशीच म्हणाली आणि पुन्हा स्वयंपाक घराकडे वळली.

तिची सगळी कामं आटपेपर्यंत समीर आजी, आजोबांना घेऊन घरी आला. आजी, आजोबा सोफ्यावर बसले तोवर समीरने त्यांना पाणी आणून दिलं.

"समीर काय म्हणाले डॉक्टर? सगळं ओके आहे ना?" त्याच्या आईने विचारलं.

"हो आई. आजोबा तर एकदम फिट अँड फाईन आहेत. आजीला फक्त डॉक्टरांनी डायबिटीस चेक करायला सांगितला आहे." समीर म्हणाला.

"बरं. जेवणानंतर दोन तासांनी घेऊन जा मग." विशाखा म्हणाली.

"हो आई." समीर म्हणाला.

"बरं आई, बाबा तुम्ही दोघं फ्रेश होऊन या आणि थोडावेळ आराम करा. सगळं जवळ जवळ झालंच आहे. फक्त आमटी करायची आहे ती झाली की लगेच बोलावते मग जेवून घेऊ." विशाखा म्हणाली.

"आराम कसला? आम्ही गाडीतून गेलो, गाडीतून आलो. तू तुझं सावकाश कर. काही घाई नाही." समीरचे आजोबा म्हणाले आणि ते दोघं हातपाय धुवायला गेले.

विशाखा तिचं काम करू लागली आणि समीर दोघांच्या फाईल जागेवर ठेवून फ्रेश व्हायला गेला. एव्हाना एक वाजलाच होता. सगळे जेवायला आले. समीरने आणि विशाखाने मिळून पानं घेतली.

"अगं साराला बोलाव." तिची आजी सवयीप्रमाणे म्हणाली.

"अहो आई सारा आफ्रिकेला गेली नाही का? मगाशी पण माझं असंच झालं. सवयीप्रमाणे मी तिला हाका मारत तिच्या खोलीत गेले होते." विशाखा म्हणाली.

"अरे हो." तिची आजी म्हणाली.

त्या दोघींच्या अश्या वागण्याने समीर आणि आजोबा हसू लागले.
********************************
इथे सारा अजूनही पूर्णपणे आफ्रिकेत रुळली नव्हती. आत्ता तिथे साधारण साडे नऊ, दहा वाजले होते पण साराला खूप भूक लागली होती.

'अरे यार खूप जास्त भूक लागली आहे.' सारा मनातच म्हणाली.

भुकेमुळे तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव उमटले होते आणि तिला काही करूच नये असं वाटत होतं. तरीही ती दुसरीकडे कुठेतरी मन रमवावं म्हणून फोटो काढत होती. सर तिला बोलवत होते याकडेही तिचं लक्ष नव्हतं.

"सारा व्हॉट हॅपेंड?" ते तिच्या समोर उभे राहून म्हणाले.

"नो सर. नथिंग." सारा म्हणाली.

ते तिला इतर आदिवासी बोलवत होते तिथे बोलवायला आले होते. सारा त्यांच्यासोबत तिथे गेली. ते सगळे मिळून एका झाडाची फळं तोडत होते. द्राक्षाच्या आकाराचे आणि त्यासारखेच दिसणारे ते फळ होते. साराने ते एक चाखून बघितले. थोडे गोडूस असेच ते लागले पण तिला त्याची चव विशेष अशी आवडली नाही. ते आदिवासी त्यांना दुसऱ्या एका कोपऱ्यात घेऊन गेले. तिथे उखळ आणि मुसळ होते.

'अरे वा! आफ्रिकेत पण उखळ आणि मुसळ? काय करत असतील हे लोक यात?' सारा आश्चर्याने मनातच म्हणाली.

तिने मोबाईलमध्ये बघितलं आणि "सर कॅन आय कॉल माय मॉम?" तिने सरांना विचारलं.

"येस येस. टुडे वी आर नॉट ऑन वर्क. सो इट्स फाईन." सर म्हणाले.

तिने व्यवस्थित रेंज आहे ना? हे बघून तिच्या आईच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला. भारतात तेव्हा दीड वाजून गेला होता आणि सगळ्यांची जेवणं झाली होती. साराचा व्हिडिओ कॉल आहे म्हणल्यावर सगळेच जमले.

"आई हे बघ आफ्रिकेत पण उखळ आणि मुसळ आहे. हे लोक काहीतरी बनवणार आहेत." सारा म्हणाली आणि तिने बॅक कॅमेरा चालू केला.

सगळेच विशाखा भोवती जमले होते आणि त्यांनाही उत्सुकता होतीच. दोन, तीन आदिवासी मिळून त्यात साराने जे फळ चाखलं होतं ते टाकून त्या फळांचा रस करू लागले. ते आफ्रिकन भाषेत बोलत होते पण साराला आणि तिच्या घरच्यांनाही काही कळत नव्हतं. त्यांचं बोलणं झाल्यावर त्यांनी एक चॉकलेटी प्लॅस्टिकची बाटली बाहेर आणली, ज्यावर निळं झाकण होतं. साराला आणि सरांना सुद्धा ते लोक ते पेय देत होते. साराने ते घ्यायला हात पुढे केला.

"सारा इट्स अ बिअर. अकाॅर्डिंग टू आफ्रिकन ट्रेडिशन, दे ग्रीट एव्हरीवन विथ अ बिअर. धिस बिअर इज कॉल्ड चिकुबू." कॅरलॉन सर म्हणाले.

तिने हे ऐकलं आणि पटकन हात मागे घेऊन आधी कॅमेरा बंद केला आणि साऊंड सुद्धा म्युट केला.

'बापरे! हे आता आईने आणि आजीने ऐकलं असेल तर झालं कल्याण. त्यात माझा हात पण दिसला असेलच.' सारा मनातच म्हणाली.

तिने पटकन व्हिडिओ कॉल बंद केला आणि साधा फोन लावला.

"हॅलो आई. अगं जरा रेंजचा प्रॉब्लेम होतोय. आपण पुन्हा नंतर बोलूया व्हिडिओ कॉलवर. आत्ता मी फोन ठेवते हा." ती घाईत म्हणाली.

समोरून तिची आजी काहीतरी बोलत होती पण साराने मुद्दाम फोन कानाजवळून दूर नेत "हॅलोऽ हॅऽलो" केलं आणि फोन ठेवला.

'थोडक्यात वाचले. आजीने नक्कीच बिअरबद्दल ऐकलं आहे. आत्ता फोन चालूच ठेवला असता तर मला चांगलीच बोलणी खावी लागली असती. तुझ्या बापाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही आणि तू दारू पिणार? हे असलं करायचं असेल तर आत्ताच्या आत्ता काम सोडून परत यायचं. असंच बोलली असती आजी. आजीला मग कितीही समजावलं असतं की बिअर वेगळी आणि दारू वेगळी तरीही तिला ते पटलं नसतंच वरून ती म्हणाली असती की अशी नशा करायला बाहेर जायचं होतं का तुला?' सारा मनातच आजी तिला काय बोलली असती याचा विचार करत होती.

"सारा ये सब क्या था?" कॅरलॉन सरांनी तिचे हे पराक्रम बघून तिला विचारलं.

"सर वो मुझे पता नहीं था ये बिअर है | हमलोग में ये सब नहीं चलता |" सारा म्हणाली.

"व्हॉट? यू इंडियन्स ऑलवेज गिव्ह एक्सक्युजेस." सर म्हणाले.

"नो सर. देअर इज स्क्रीपचर बिहाईंड इट टू. गिव्हन द टेंप्रेचर अँड ह्युमिड क्लायमेट इन इंडिया, बिअर विल बी हॉट फॉर इंडियन्स. द फूड अँड ड्रिंक ऑफ इच प्लेस डीपेंडस ऑन द क्लायमेट. इन इंडिया, सम पिपल कंझ्युम बिअर अँड अल्कोहोल, बट देअर एक्सेसिव हॅबिट्स अँड अॅडिक्शन्स आर अल्सो बॅड. आय एम नॉट सेयींग दॅट एव्हरीवन इन इंडिया थिंक सो, बट व्हॉट वन लाईक्स अँड व्हॉट वन डज नॉट, इज अ पर्सनल क्वेशन फॉर एव्हरीवन. सॉरी सर बट आय डोन्ट लाईक सो आय डोन्ट टेक बिअर लाईक दॅट." सारा म्हणाली.

तिला बिअर घेण्यात जराही रस नव्हता आणि तिने अगदी व्यवस्थितपणे तिचा नकार सरांना सांगितला. तिला दारू आणि बिअर मधला फरक माहीत असला तरीही तिने काम सुरू करण्याआधी तत्व ठरवली होती आणि त्यातलंच एक होतं की, कधीही बिअर, व्हिस्की असं काही घेणार नाही. नाही म्हणलं तरीही त्यात थोड्या प्रमाणात अल्कोहोल असणारच हे तिला माहीत होतं. तिने तिच्या परीने तिची बाजू म्हणूनच सरांसमोर मांडली. सर सुद्धा त्यावर काहीही बोलले नाहीत आणि त्यांनी बिअर घेतली. त्यांनतर ते सगळे आफ्रिकन लोक त्यांना त्यांचे पारंपरिक नृत्य दाखवणार होते. त्यानुसार सगळी तयारी झाली. दोन जण ढोलकीसारखे काहीतरी वाजवत मध्ये उभे होते आणि त्यांच्या बाजूने बाकीचे लोक नृत्य करत होते. साराला हे सगळं खूप आवडत होतं. तिने या सगळ्याचे व्हिडिओ काढायला सुरुवात केली. थोडावेळ नृत्य झाल्यावर तिथली मुलं कोलांट्या उड्या आणि बाकी खेळ दाखवू लागले.

'आपल्या इथे सर्कस आल्यावर हमखास त्यात असे आफ्रिकन लोक असायचे. ते जसे खेळ दाखवायचे अगदी तसंच वाटतंय हे. किती मस्त आहे. दादाला स्पेशली सर्कशीत हे खेळ असणार म्हणून खूप आवडायचं. आत्ता कळतंय सर्कशीत ते त्यांचे पारंपरिक खेळ दाखवायचे. किती छान करतात ना हे लोक. दादाला नंतर याचा व्हिडिओ नक्की पाठविन. त्याला खूप आवडेल.' सारा मनातच म्हणाली.

तिला ते खेळ बघून ती आणि तिचे कुटुंबीय जेव्हा सर्कसला जायचे ते क्षण आठवले. हत्ती क्रिकेट खेळायचा हे शेवटी असायचं आणि आफ्रिकन लोकांच्या करामती त्याच्या आधी असायच्या. बाकी सर्कस पेक्षा सगळ्यात जास्त आवडीचा टप्पा तिच्यासाठी आणि समीरसाठी हाच असायचा. त्या विचारातच ती खेळ बघण्यात दंग झाली होती. थोडावेळ असाच गेला आणि त्यांनी आता त्या दोघांना त्यांच्या गावाच्या मार्केटमध्ये फिरायला घेऊन जाण्याचं ठरवलं होतं.

"सारा नाऊ दे विल शो अस देअर मार्केट. इट्स फेमस फॉर हॅंड क्राफ्ट्स. इफ यू वॉन्ट समथिंग देन यू कॅन बाय थिंग्ज देअर." सर म्हणाले.

"ओके सर." सारा म्हणाली.

क्रमशः....
********************************
साराने पटकन फोन बंद केला असला तरीही तिच्या आजीने बिअरबद्दल ऐकलं असेल तर साराची चांगलीच शाळा होणार असेल का? तिला तिथे आजच्या दिवसात अजून काय काय बघायला मिळेल? साराला जेवणात जे मिळणार असेल ते तिला आवडेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all