लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग - ३७)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                   गूड मॉर्निंग आफ्रिका

सरांनी सांगितल्याप्रमाणे सारा एअरपोर्टवर असलेल्या गेस्ट रूममध्ये गेली. सगळं सामान तिने तिथे ठेवलं आणि बेडवर पाठ टेकली.

'खूप दमायला झालं आहे. सारा अगं आत्ता कुठे तू आलीस आणि एवढं दमून चालेल का? आपल्याला अजून खूप काम करायचं आहे.' ती मनातच म्हणाली.

तिला आत्ता घरी सगळे काय करत असतील?, तिथे साधारण किती वाजले असतील? या विचारातच डोळा लागला. थोडावेळ झाला असेल तिला झोप लागून एवढ्यात तिचा फोन वाजला. तिने झोपेतच फोन उचलला.

"हॅलो." ती झोपेतच म्हणाली.

"सारा अगं आहेस कुठे? तुझा आवाज झोपेत असल्यासारखा का येतोय?" तिच्या आईने विचारलं.

"अगं आई झोपलेलेच होते." सारा उठून बसत म्हणाली.

"वाजलेत किती बघ आधी. अगं साडे नऊ होऊन गेलेत. तू काय आफ्रिकेला झोपा काढायला गेलीस का?" तिच्या आजीने विचारलं.

"काय? साडे नऊ झाले?" सारा एकदम खाडकन जागी झाली आणि कानाचा मोबाईल खाली घेऊन तिने घड्याळ बघितलं.

"काय आजी? सहा वाजलेत फक्त." सारा म्हणाली.

"सारा काहीही बोलू नकोस. अगं आम्ही नाहीये तिथे तुला दहा वेळा उठवायला." तिची आजी ओरडली.

"आजी अगं चिल. मी इथे आफ्रिकेमध्ये आहे की नाही? इथे आत्ता पहाटेचे सहा वाजलेत." सारा म्हणाली.

"बरं सारा तुझा मेसेज मिळाला मला तू पोहोचल्याचा पण तिथे सगळं कसं आहे? नवीन देश, नवीन जागा काही अडचण नाहीये ना?" तिच्या बाबांनी विचारलं.

"नाही बाबा. अजून मी एअरपोर्टवर गेस्ट रूममध्ये आहे. सकाळी सर मला लोकेशन पाठवणार आहेत तिथे जायला निघणार. अजून मी आफ्रिका बघितलंच नाही." सारा म्हणाली.

"ए सारा थांब व्हिडिओ कॉल करतो मी. आत्ता रेंज आहे तोवर जरा व्हिडिओ कॉलवर बोलूया." समीर म्हणाला.

त्याने लगेचच व्हिडिओ कॉल लावला. सारा जाऊन फक्त काही तासच झाले होते पण ती खूप दिवस आपल्यासोबत नाही असं सगळ्यांना वाटत होतं.

"सारा तुझे डोळे खूप खोल गेल्यासारखे वाटतायत. झोप झाली नाहीये का?" तिच्या आजोबांनी विचारलं.

"झाली तशी पण वेळेच्या फरकामुळे जरा इकडे तिकडे होतंय. आता बघा ना इथे आत्ताशी सहा वाजलेत आणि मला खूप भूक लागली आहे. एरवी आपण घरात यावेळेला नाश्ता करतो ना." सारा म्हणाली.

"सारा डबा काय तुला फक्त बॅगेत ठेवायला नाही दिला. खा त्यातून काहीतरी." तिची आई म्हणाली.

"हो. आता आधी तेच करते." सारा म्हणाली.

नंतर थोडावेळ सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि फोन ठेवला. साराच्या बाबांनासुद्धा आता ऑफिसला निश्चिंत मनाने जाता येणार होतं कारण त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलता आलं होतं. साराही खुश होती कारण सकाळ सकाळी तिला तिच्या घरच्यांसोबत बोलायला मिळालं होतं. शरीराने जरी सगळे तिच्या पासून लांब असले तरीही मनाने सगळे एकत्रच होते. सारा आता उठली होतीच तर तिने तिचा फोन चार्जिंग करून घेतला आणि आईने दिलेला फराळ खाऊन फ्रेश होऊन ती आली. तोवर सात वाजून गेले होते आणि सरांनी तिला लोकेशन पाठवलं.

'चला सारा मॅडम आता निघालं पाहिजे.' सारा मनातच म्हणाली आणि तिचं सगळं सामान घेऊन ती एअरपोर्टमधून बाहेर पडली.

'गूड मॉर्निंग आफ्रिका.' सारा एअरपोर्ट मधून बाहेर पाऊल ठेवल्या ठेवल्या मनातच मोठ्याने म्हणाली.

नवीन देश आणि नवीन माणसं बघून बाहेर पडल्या पडल्या ती थोडी गोंधळली होती. कुठे जायचं?, कुठून जायचं? हे तिच्या लक्षात येत नव्हतं. कोणालातरी विचारुया म्हणून तिने ठरवलं आणि सर्वत्र नजर फिरवून ती संपूर्ण परिसर बघत होती. सवयीप्रमाणे ती आधी मराठी किंवा हिंदीतच बोलत होती पण लक्षात आल्यावर इंग्लिशमध्ये बोलत होती. काहींना तेही समजलं नाही तर गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून आफ्रिकन शब्द शोधत होती. तिथल्या वातावरणात रुळायला तिला जरा वेळ लागणार तर होताच. या सगळ्या प्रपंचानंतर तिला कॅब कुठे मिळतील? हे समजलं आणि सरांनी पाठवलेल्या लोकेशनवर जायला ती कॅबमध्ये बसली.

'फायनली आता लोकेशनवर पोहोचेन.' साराने मनातच विचार केला आणि समोर मॅप चालू ठेवलं.

संपूर्ण प्रवासात तिच्या मनात आत्तापर्यंत जे काही घडलं तेच येत होतं. आज ती आफ्रिकेत आहे हेही तिला खरं वाटत नव्हतं.

'मी हजारीबागवरून आल्यावर आजी आणि आईने मला जवळ जवळ शॉक दिला होता. त्यादिवशी जर राघव येऊन माझ्याशी बोलला नसता तर मी काय केलं असतं? काम तर नक्कीच सोडलं नसतं पण कदाचित आई आणि आजी विषयी माझ्या मनात कटुता निर्माण झाली असती. राघव बोलायला आला तेव्हा मी हतबल झाले होते पण मला माहित आहे माझ्या स्वभावानुसार मी घरच्यांना उलट सुलट बोलून जे हवं ते केलं असतं. उगाच मग सगळीच परिस्थिती हाताबाहेर गेली असती. आईला मनस्ताप झाला असता तो वेगळा आणि आजीला पण खूप वाईट वाटलं असतं. राघव खरंच किती समजूतदार आहे ना? बरं झालं त्या दिवशी तो होता घरी. अरे! आत्ता त्याला फोन करायचा राहिलाच की. अजून म्हणा भारतात साडे दहा, अकरा वाजले असतील. कामाच्या गडबडीत असेल. एक काम करते नंतर त्याला आठवणीने फोन करते.' सारा विचारात हरवली होती. कॅबचा हॉर्न वाजला आणि ती भानावर आली.

ती तिच्या लोकेशनवर पोहोचली होती. ती कॅबमधून उतरली. एका गावाच्या वेशीवर ती पोहोचली होती. ती थोडी पुढे चालत गेली एवढ्यात समोरून तिला सर येताना दिसले.

"गूड मॉर्निंग सारा. वेलकम टू आफ्रिका." सर तिला हस्तांदोलन करत म्हणाले.

सारानेही स्मित करून त्यांना "गूड मॉर्निंग." म्हणलं.

"अभी आज का डे हमे आगे एक व्हिलेज है उधर स्पेंड करना है |" सर म्हणाले.

"ओके सर." सारा म्हणाली.

नंतर त्यांच्यात जुजबी बोलणं झालं आणि दोघं पुढे जाऊ लागले. थोडं अंतर चालल्यावर ते एका गावात पोहोचले. ते एक आदिवासी जमाती असलेलं लहान गाव होतं. सारा सगळीकडे बघत बघत चालत होती. निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं गाव आणि मातीची घरं सारा बघत होती. कॅरलॉन सर तिथल्या लोकांशी आफ्रिकन भाषेत बोलत होते. त्यांच्या बोलण्यावरून तरी ते त्या लोकांना आधीपासून ओळखतात असं जाणवत होतं. तिथले सगळेच लोक परंपरेला धरून वागणारे आणि तसेच राहणीमान असलेले होते. तिथे तंत्रज्ञानाचा जास्त प्रसार झालेला नव्हता. आजही तिथली लोकं पारंपरिक पद्धतीने जगत होती. किंबहुना त्यांचे पोषाखही पारंपरिक होते.

"सारा टुडे वी विल स्टे हिअर. यू कॅन टेक रेस्ट, एन्जॉय अँड नो सम फॅक्ट्स अबाऊट आफ्रिका." सर म्हणाले.

"येस सर. सर बट बॅग्स? व्हेअर वी स्टे?" साराने विचारलं.

"यहाँ के मुखिया के घर |" सर म्हणाले.

सरांसोबत ती त्या इलाक्याच्या मुखियाच्या घराकडे गेली. मातीपासून बनवलेलं, त्यावर वरच्या बाजूला घातलेलं गवत, वरून थोडं लंबगोलाकार असं ते घर होतं. घर म्हणजे थोडक्यात झोपडी सारखंच होतं. उजेडासाठी छताच्या बाजूला खिडकी होती. सारा ते सगळं बघत होती. एवढ्यात त्या मुखियाच्या बायकोने तिला "सामान कोपऱ्यात ठेव" असं आफ्रिकन भाषेत सांगितलं पण ते तिला समजलं नाही. सरांनी सांगितल्यावर तिने तिचं सामान ठेवलं. आधीच उष्ण देश आणि त्यात घरात पंखा सुद्धा नाही म्हणाल्यावर साराला जरा टेंशन आलं होतं.

'इथे आपल्याला उन्हाळ्यात जराही पंखा बंद केला तरीही सहन होत नाही. इथे तर आजचा पूर्ण दिवस आणि रात्रही काढायची आहे. कसं होणार आहे तुझं सारा?' ती मनातच म्हणाली.

सारा विचारा विचारातच सगळं बघत होती एवढ्यात त्याच बाईने तिला पुन्हा आफ्रिकन भाषेत "काही खायला देऊ का?" म्हणून विचारलं तेव्हा ती भानावर आली. सरांनी तिला ते इंग्लिशमध्ये सांगितलं. आत्ता तरी साराचा काहीही खाण्याचा मूड नव्हता. तिने नकारार्थी मान डोलावली आणि ती बाई पुन्हा तिच्या कामाला लागली.

"सारा अब ये सब की आदत लगा लो |" सर म्हणाले.

"येस सर. आय विल ट्राय माय बेस्ट." सारा म्हणाली.

"गूड. इफ यू वॉन्ट टू टेक रेस्ट देन इट्स ओके." सर म्हणाले.

'एवढ्या उकाड्यात? आत्ता तरी अजिबात नको. नंतरच नंतर बघू.' सारा मनातच म्हणाली आणि तिने सरांना आत्ता ती फ्रेश आहे असं सांगितलं.

दोघं घरातून बाहेर आले. बाहेर आल्यावर तिला जरा बरं वाटलं. तिला तिथे आल्या आल्या काहीतरी नवीन अनुभवता येणार आहे म्हणून उत्साह होताच पण तिथल्या गरमीने तिची झोप केव्हाच उडाली होती. ती तिथल्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत होती. तिथेच बाजूला काही लहान मुलं तिला खेळताना दिसली. ती त्यांच्यात गेली आणि ते काय करतायत? हे बघू लागली. ती लहान मुलं विंचवाला पकडायला बघत होती. साराने हे बघितलं. त्या मुलांना आपण विषारी किटकाला हात लावत आहोत हे कदाचित माहीत नाहीये असं समजून तिने घाईत जाऊन सरांना याबद्दल सांगितलं.

"रिलॅक्स सारा. दे नो हाऊ टू हॅण्डल दॅट." सर म्हणाले.

क्रमशः.....
********************************
सारा आफ्रिकेत तर आली आहे पण अजूनही ती जरा गोंधळलेली आहे. अर्थातच नवीन देश म्हटल्यावर तिला तिथे रुळायला वेळ लागणारच. कसा असेल तिचा तिथला अनुभव? उद्या ती सरांसोबत कुठे जाणार असेल? तिला काय नवीन शिकायला मिळेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all