© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
योग्य निर्णय
***************************
योग्य निर्णय
सगळे साराला सोडून पुन्हा घरी आले. आज घर खूप रिकामं - रिकामं वाटत होतं. घरात एरवी असलेला आवाज, हसण्या - खिदळण्याचे आवाज कुठेतरी हरवले आहेत असं वाटत होतं. त्या घरालाही साराची खूप सवय झाली होती. एरवी ताजं, टवटवीत दिसणारं घराचं अंगण आज कोमेजून गेल्यासारखं वाटत होतं.
"सारा नाहीये तर किती उदास वाटतंय. आता ती येईपर्यंत कसे दिवस जातील काही समजत नाहीये." विशाखा सोफ्यावर बसत म्हणाली.
"आई एवढं काय त्यात? ती दोन महिन्यात येणार आहे. बघ किती पटकन संपतील हे दिवस." समीर तिला पाणी देत म्हणाला.
"एरवी सारा घरात असली की नुसता दंगा असायचा. तिला सांगावं लागायचं जरा आवाज कमी कर, गप्प बस पण आता तोच सगळा गोंधळ आपण मिस करणार आहोत." विशाखा म्हणाली.
"हम्म ते आहेच. असो! चला आता पटकन फ्रेश होऊन येऊ आणि जेवून घेऊ पुन्हा बाबांना ऑफिसला जायचं आहे." समीर म्हणाला.
सगळेच त्यांचं आवरायला गेले. आज समीरने बाहेरूनच जेवण मागवलं होतं. सारा आज जाणार होती त्यामुळे घरात गडबड असणार आणि पुन्हा स्वयंपाक करायचा म्हणजे आईची धावपळ होईल म्हणून त्याने आधीच हे ठरवलं होतं. त्यांचं आवरून होईपर्यंत पार्सल आलं. सगळेच जेवायला बसले. आज मात्र त्यांच्यात एवढा उत्साह नव्हता. कसेबसे चार चार घास पोटात ढकलून साराचे बाबा ऑफिसला गेले. आजी, आजोबा आणि समीरची आई आराम करायला त्यांच्या त्यांच्या रूममध्ये गेले आणि समीर बाहेरच टीव्ही बघत बसला.
'सारा तू अगदी योग्य निर्णय घेतला. तूच तुझ्या मतावर आणि निर्णयावर ठाम राहिलीस म्हणून आज तुला आफ्रिकेला जायची संधी मिळाली आहे. खूप छान काम कर आणि एक आदर्श घालून दे सगळ्यांना.' समीर मनातच म्हणाला.
*******************************
इथे सारा अजूनही विचारातच होती. तिला बाहेर निरभ्र आकाश बघून आत्ता पर्यंत झालेल्या सगळ्या घटना डोळ्यासमोरून जात होत्या.
*******************************
इथे सारा अजूनही विचारातच होती. तिला बाहेर निरभ्र आकाश बघून आत्ता पर्यंत झालेल्या सगळ्या घटना डोळ्यासमोरून जात होत्या.
'मी किती हट्ट केला होता ना आधी? आई मला फोटोग्राफी करायला नाही म्हणत होती तरीही मी हट्टाला पेटले होते. तो दिवस तर एक वेगळाच होता. त्यात वर्ल्ड रेकॉर्डसाठी फॉर्म भरला आहे हेही मी विसरले. बरं झालं तेव्हा राघवने मदत केली म्हणून मी रेकॉर्डला जाऊ शकले. तिथेही खूप मजा आलेली. पूर्ण दिवसभर धावपळ करून दमायला झालं होतं पण दुसऱ्या दिवशी माझा रेकॉर्ड सेट झालेलं समजलं आणि सगळाच क्षीण कुठच्या कुठे पळून गेला. हळूहळू आई, बाबा, दादा आणि आजोबा पण तयार होऊ लागले. फक्त आजी अजून तयार होत नाहीये तेवढं बघावं लागेल. नंतर कॅरलॉन सरांसोबत झालेला पहिला इंटरव्ह्यू, त्यांची मतं आणि मग माझ्याही ध्येयात थोडे बदल झाले हे किती पटकन घडलं ना सगळं? अजूनही मला विश्वास बसत नाहीये मी आफ्रिकेला चालली आहे.' सारा तिच्या विचारातच गुंग होती.
तिला मनोमन आपण घेतलेला निर्णय योग्य आहे हे पटत होतं. आत्ता पर्यंत जे काही घडत गेलं ती आज एकदम शांत चित्ताने पुन्हा आठवत होती. किंबहुना तिला ते आठवायला लागतच नव्हतं. आपोआप तिचं मन या घटनांकडे आकर्षित होत होतं. विचारा विचारातच तिला डुलकी लागली. मुंबईहून आफ्रिकेचा प्रवास म्हणजे साधारण चौदा ते साडे चौदा तासांचा! साधारण अर्ध्या तासातच तिला जाग आली. ती फ्रेश होऊन आली आणि कॉफी घेत होती. सोबत तिने एक मॅगझिनसुद्धा वाचायला काढलं. अर्थातच वाईल्ड लाईफ फोटोग्राफीशी संबंधितच ते होतं. सारा वाचण्यात गुंग झाली होती.
"हॅलो. मी आर्या. तुमचं नाव?" इतकावेळ तिच्या बाजूला बसलेली मुलगी म्हणाली.
साराने मॅगझिनमधून डोकं वर काढलं आणि तिच्याकडे पाहून स्मित केलं.
"हॅलो. मी सारा." ती म्हणाली.
"तुम्हाला फोटोग्राफी आवडते वाटतं?" आर्याने विचारलं.
"हो. मी याच क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आफ्रिकेला जाऊन काम करण्याची ही माझी पहिलीच संधी आहे." सारा म्हणाली.
"गूड. आपल्या भारतातून अश्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुली कमीच आहेत. ऑल द बेस्ट." आर्या म्हणाली.
"हो पण त्यालाही कित्येक कारणं आहेतच. असो! तुम्ही काय करता?" साराने विचारलं.
तिला तसंही नुसतं बसून कंटाळा आलेला होताच. आर्या आणि तिची कमी वेळातच छान मैत्री झाली आणि दोघी छान गप्पा मारत होत्या. त्यांच्यातील फॉर्मालिटी केव्हाच संपली होती आणि दोघी अगदी मैत्रिणींसारख्या बोलत होत्या. आर्या साराला तिचे याबाबतचे अनुभव आणि तिची स्वप्न याबद्दल विचारत होती. बोलताना दोघींनी आपापले नंबरही एक्सचेंज केले. साराला या अनोळखी प्रांतात, या एवढ्या लांबच्या प्रवासात थोडावेळ का होईना कुणीतरी सोबतीला मिळालं म्हणून साराही खुश होती.
'आई, आजी तुम्ही कशाचीच काळजी करू नका. आत्ता मला आर्या म्हणून एक नवीन मैत्रीण मिळाली आहे. मान्य ती फक्त आता लिव्हिंगस्टोन एअरपोर्टपर्यंत सोबतीला असेल पण पुढे अश्याच माझ्या अजून ओळखी होतील. कदाचित नशिबात असेल तर आर्या मला पुन्हा भेटेल सुद्धा! काय सांगावं?' सारा मनातच घरच्यांशी बोलत होती.
तिला हेच सगळं अनुभवायचं होतं. नवनवीन देश, तिथल्या संस्कृती, माणसं आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथला निसर्ग साराला जगायचा होता. सगळीकडून मिळणारे अनुभव आणि ज्ञान याचा वापर तिला आपल्या देशासाठी करायचा होता म्हणूनच ती नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करायची.
"बाय द वे सारा तुला भेटून खूप छान वाटलं. आपल्या देशाला तुझ्या सारख्या स्वातंत्र्य आणि ठाम विचारांच्या मुलींची गरज आहे." आर्या म्हणाली.
"हो ते आहेच. तेही होईल. खरं सांगायचं झालं ना तर माझं नशीब खूप चांगलं आहे म्हणून मला पाठिंबा देणारे आणि माझ्या निर्णयात मला साथ देणारे माझे कुटुंबीय माझ्या सोबत आहेत. आई, बाबा, दादा, आजोबा आणि आजी मला खूप समजून घेतात." सारा म्हणाली.
"हो पण यासाठी लगेचच सगळे नसतील ना तयार झाले? माझ्या अनुभवावरून सांगते आपल्या देशात अजूनही मुलींना अश्या रिस्की क्षेत्रात शक्यतो नाही जाऊ दिलं जात." आर्या म्हणाली.
"हो. आजी तर अजूनही थोडी नाराज आहे. म्हणजे म्हणताना म्हणतेय की तू हे करतेय ते मला पटत नाहीये वैगरे वैगरे पण मनाची हळूहळू तयारी करतेय ती. आधी सगळेच माझ्या विरोधात होते पण म्हणतात ना वेळच औषध असतं. तसंच झालं!" सारा म्हणाली आणि तिने आर्याला तिच्या या वाटचालीबद्दल सगळं सविस्तर सांगितलं.
"खरंच तू योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतलेस म्हणून हे शक्य झालं. माणसाला आपल्या मतावर ठाम राहता आलं की अर्ध काम होतं पण आपल्या इथे कोणी काही बोललं की लगेचच आपलं मन डोलायला लागतं." आर्या म्हणाली.
"हम्म. आजी म्हणते तसं शेवटी जे व्हायचं असतं तेच होतं." सारा म्हणाली.
"अगं असं नसतं. आपण जे मनाशी ठाम राहून करायचा निर्णय घेतो ते तडीस जातंच. फक्त आपण त्या निर्णयावर ठाम राहणं गरजेचं असतं मग पूर्ण जग म्हणतं, निर्णय योग्य होता." आर्या म्हणाली.
"किती छान बोलतेस तू. खरंच ऐकत रहावसं वाटतं. इतके दिवस मी सगळ्यांना समजावते आहे, सगळ्यांचं ऐकून घेतेय त्यामुळे हे असे शब्द खरंच संजीवनी आहेत माझ्यासाठी." सारा म्हणाली.
"एवढं काही नाही त्यात. बरं आता बराच उशीर झालाय आपण गप्पा मारतोय. झोपूया आता." आर्या म्हणाली.
"एवढ्यात?" सारा म्हणाली.
"अगं तू पहिल्यांदा एवढा लांब प्रवास करतेस ना? तुला नंतर जेट लॅगचा त्रास होईल. ऐक माझं झोप." आर्या म्हणाली.
दोघीही शांतपणे झोपल्या. साराला आर्याला भेटून खूप छान वाटलं होतं. दोघींची काही वेळासाठी झालेली भेट सुद्धा तिला खूप काही शिकवून गेली होती. अश्यातच कधी त्यांचा चौदा ते पंधरा तासाचा प्रवास संपला हे समजलं देखील नाही. दोघीही एअरपोर्ट मधून बाहेर आल्या आणि एकमेकींना बाय करून विरूद्ध दिशेने निघून गेल्या. आफ्रिकेत सध्या मध्यरात्र उलटून चालली होती. चौदा ते पंधरा तासांचा प्रवास साराचा झाला होता म्हणजे ती ज्या दिवशी फ्लाईटमध्ये बसली होती त्याचा दुसरा दिवस आज होता. साराने वर्ल्ड क्लॉक ओपन करून भारतात किती वाजले असतील? हे बघितलं. आपलं भारतीय घड्याळ साधारण साडेतीन तास पुढे होतं.
'आत्ताच घरी नको फोन करायला. जस्ट पहाट झाली आहे. मेसेज फक्त करून ठेवते आणि नंतर निवांत फोन करते.' सारा मनातच म्हणाली.
एवढ्यात तिचा फोन वाजला. कॅरलॉन सरांचा फोन आलेला.
"हॅलो सर." सारा म्हणाली.
"कॅन यू रीच लिव्हिंगस्टोन एअरपोर्ट?" सरांनी विचारलं.
"येस सर. जस्ट." सारा म्हणाली.
"ओके गूड. एअरपोर्ट में गेस्ट हाऊस में आज की रात रहो | टूमारो आय विल सेंड यू लोकेशन, यू बुक कॅब अँड कम देअर." सर म्हणाले.
"ओके सर." सारा म्हणाली आणि तिने फोन ठेवला.
क्रमशः....
*********************************
सारा आता आफ्रिकेला पोहोचली आहे. तिचा तिथला अनुभव कसा असेल? सारा घरी जेव्हा जेव्हा तिचे अनुभव सांगेल तेव्हा तरी तिची आजी तयार होऊ लागेल का? साराला भेटलेली आर्या तिला खूप काही शिकवून गेली. भविष्यात तिची आणि साराची पुन्हा भेट होईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.
*********************************
सारा आता आफ्रिकेला पोहोचली आहे. तिचा तिथला अनुभव कसा असेल? सारा घरी जेव्हा जेव्हा तिचे अनुभव सांगेल तेव्हा तरी तिची आजी तयार होऊ लागेल का? साराला भेटलेली आर्या तिला खूप काही शिकवून गेली. भविष्यात तिची आणि साराची पुन्हा भेट होईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.