लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३५)

Story Of A Girl Who Wants To Achive Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                            गवसणी

सारा मुद्दाम गप्प राहून अजूनच सस्पेन्स निर्माण करत होती. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आता ऐनवेळी काही राहिलं असेल तर काय करा? अशी चिंतेची लकेर दिसत होती.

"सारा बोल ना पटकन. काही राहिलं असेल तर हातात वेळ आहे तेवढ्यात काहीतरी करता येईल." तिची आई म्हणाली.

"अगं आई किती टेंशन घेतेस? काल पासून सगळी तयारी झाली की नाही हे जवळ जवळ तूच चार ते पाच वेळा तपासून बघितलं आहेस." सारा म्हणाली.

"मग? आता काय सांगायचं आहे तुला?" समीरने विचारलं.

"दादा एक आनंदाची बातमी आहे." सारा म्हणाली.

"तू आफ्रिकेला जात नाहीये ना?" तिची आजी म्हणाली.

"आजी! ही आनंदाची बातमी कशी असेल? ते सोड. अगं आई, दादा मला मगाशी सरांचा फोन आलेला. त्यांनी सगळी तयारी झाली का? विचारायला फोन केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की, मला तिथे गेल्यावर एक खूप मोठी संधी मिळणार आहे. आपण तो वाईल्ड फील्ड शो बघतो बघ त्यात जे प्राण्यांचं शूट केलेलं असतं ते करण्याची मला संधी मिळणार आहे. कारण सरांना तो प्रोजेक्ट मिळाला आहे आणि आता मी त्यांची असिस्टंट असणार आहे." सारा आनंदात म्हणाली.

"अरे वा! मस्तच. अभिनंदन सारा." तिचे आजोबा म्हणाले.

"ए बाई म्हणजे त्यात तो जो कोणी माणूस आहे तो प्राणी, साप हातात घेतो, पार त्यांच्या जवळ जातो तोच शो ना हा?" तिच्या आजीने काळजीने विचारलं.

"हो आजी." सारा म्हणाली.

"सारा नाही. तू तिथे शिकायला जा पण यात काम नको करू. अगं ते काही पाळीव प्राणी नाहीयेत. अजिबात तिथे प्राण्यांच्या जवळ जायचं नाही." तिची आई काळजीने म्हणाली.

तिच्या आईच्या या बोलण्याने सारा जोरात हसायला लागली.

"मला इथे तुझी काळजी वाटतेय आणि तू काय फिदीफिदी हसतेस?" तिची आई तिला एक धपाटा देत म्हणाली.

"अगं आई हसू नाहीतर काय करू? माझं काम फक्त शूट करणं एवढंच आहे. तेही मी अजून शिकतेय तर सर जे सांगतील तेवढंच. सगळं मेन काम सर करणार आणि आम्हा फोटोग्राफर्सना प्राण्यांना हात लावायची परवानगीच नसते. तू नको काळजी करुस. तिथे पूर्ण टीम असणार आहे. आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळी सोय केलेली असेल." सारा म्हणाली.

आत्ता कुठे तिच्या आईला जरा बरं वाटलं होतं. साराला पुन्हा आईचा मगाशी टेंशनमुळे झालेला चेहरा आठवला आणि ती पुन्हा हसू लागली.

"सारा तुला जाता जाता आता मार खायचा आहे का? जा ना जाऊन आवर. निघायचं आहे आता." तिची आई स्वतःचं हसू आवरत म्हणाली.

साराने समीरला टाळी दिली आणि हसतच तिथून पळाली. त्यांच्या या बोलण्यात निघायची वेळ झालीच होती.

"थोडे दिवस आता हे हसणं, मुद्दाम चिडवणं आणि ओरडत बसणं हे आवाज घरातून गायब होतील." तिचे बाबा थोडे भावूक होत म्हणाले.

"तुझी लेक फक्त दोन महिने चालली आहे. ती सासरी चालल्यासारखा काय वागतोस?" साराची आजी म्हणाली.

एवढ्यात साराची हाक ऐकू आली म्हणून सगळे बाहेर गेले. तर या मॅडम दारात सगळं सामान घेऊन उभ्या होत्या.

"सारा आधी आत ये. अगं एवढ्या लांब चालली आहेस सगळ्यांना नमस्कार कर. दरवेळी तुला सांगावं लागतं का?" तिची आई म्हणाली.

सारा आत गेली. तिच्या आईने तिचं औक्षण करून तिच्या हातावर दही साखर दिलं आणि साराने सगळ्यांना नमस्कार केला. सगळे साराला सोडायला निघाले. साराच्या बाबांनी आणि समीरने मिळून तिच्या बॅग्स गाडीत ठेवल्या. सगळेच तिला सोडायला जाणार असल्याने आज त्यांनी मोठी गाडी काढली होती. साराचे बाबा ड्राईव्ह करणार होते. त्यांच्या बाजूला सारा बसली. मागच्या सीटवर समीर आणि त्याची आई आणि त्याच्या मागच्या सीटवर आजी, आजोबा बसले.

"गणपती बाप्पा मोरया." सगळ्यांनी एका सुरात म्हणलं आणि गाडी सुरू झाली.

"सारा मला पोहोचल्या पोहोचल्या तुझा फोन आला पाहिजे. वेळोवेळी कळवत राहायचं." तिची आई म्हणाली.

"हो आई. तू मला हे जवळ जवळ दहा ते पंधरा वेळा सांगून झालंय." सारा म्हणाली.

"हो मग. तू विसरु नये म्हणून सांगतेय." तिची आई म्हणाली.

"मी नाही विसरणार. तूही गोळी वेळेत घ्यायची आहे. अजिबात आजारी पडायचं नाही. दादा आईला वेळेत गोळी देण्याची जबाबदारी तुझी." सारा म्हणाली.

"हो का मॅडम? बऽरं." समीर म्हणाला.

बोलता बोलता सगळे एअरपोर्टवर पोहोचले. राघवसुद्धा तिथे आलेला होता. साराच्या फ्लाईटला अजून थोडावेळ होता.

"सारा तिथे नीट राहायचं हा. व्यवस्थित स्वतःची काळजी घ्यायची. वेळ मिळेल तसा फोन करायचा." तिची आई म्हणाली.

"हो आई. आपल्या वेळेत आणि आफ्रिकेच्या वेळेत जरा फरक असेल त्यामुळे जरा इकडे तिकडे होऊ शकतं पण निदान मेसेज करण्याचा तरी प्रयत्न करीन. शिवाय तिथे चांगली जागा असेल जिथे रेंज मिळत असेल तिथून शक्य झालं तर मी व्हिडिओ कॉल पण करेन. आता लगेच तिथे गेल्या गेल्या तरी काही काम नसेल. वेळ झालाच आणि शक्य असेल तर व्हिडिओ कॉल करते." सारा म्हणाली.

"ओके. सारा आणि तिथे तुला जेवण आवडलं नाही तर आईने डब्बा दिला आहे त्यातून खा पण स्वतःची अबाळ नको करुस. तुला दिवसभर काम करण्यासाठी ताकद लागेल." तिचे बाबा म्हणाले.

"हो बाबा." सारा म्हणाली.

"सारा असं ऐकलं आहे तिथे खूप उष्णता असते तर सारखं पाणी पीत रहा. तुझ्या त्या छोट्या पाउचमध्ये मी एनार्जी ड्रिंकचे पॅकेट्स ठेवले आहेत ते पाण्यात मिसळून पी. तुझं शरीर हायड्रेटेड राहायला हवं." समीर म्हणाला.

"हो दादा मी घेईन ते. तुम्ही कोणीही काळजी करू नका." सारा म्हणाली.

"सारा ऑल द व्हेरी बेस्ट. छान काम कर आणि मलाही कळव तुझी खुशाली. खरंतर मला कालचा दिवस तुझ्यासोबत घालवायचा होता पण नेमकं गेल्या आठवड्यापासून कामाला सुरुवात झाली आणि वेळच नाही मिळाला." राघव तिला हात मिळवत म्हणाला.

"थँक्यू राघव. जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी तुलाही कॉन्टॅक्ट करेनच ही काय सांगायची गोष्ट आहे का? आणि मला माहित आहे तुझं काम सुरू झालं आहे ते. तू तुझ्या कामावर फोकस कर. मी पुन्हा भारतात आले की भेटूच." सारा स्मित करून म्हणाली.

"सारा पुन्हा आईला टेंशन येईल असं वागायचं नाहीये. माझ्या लेकीला काही त्रास झाला तर बघ." साराची आजी म्हणाली.

"अगं आजी आईला नाही काही होणार. आता मी आधीच सगळ्यांना कल्पना दिली आहे ना? आपल्या भारतातली वेळ आणि आफ्रिकेची वेळ यात फरक आहे त्यामुळे जरा इकडे तिकडे होऊ शकतं." सारा आजीला समजावत म्हणाली.

एवढ्यात सारा ज्या फ्लाईटने जाणार होती त्या फ्लाईट संदर्भात अनाउन्समेंट झाली. त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी चेकिंगसाठी जावे म्हणून ती सूचना होती.

"बरं चला आता मी निघते." सारा म्हणाली.

तिच्या आईच्या डोळ्यात पाणी होतं.

"आई अगं नको ना रडू. तू मला असं रडून बाय केलंस तर माझा पाय निघेल का इथून?" सारा तिच्या आईचे डोळे पुसत तिला मिठी मारत म्हणाली.

तिच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि साश्रू नयनांनीच तिच्या कपाळाची पापी घेतली. साराने सगळ्यांना मिठी मारली आणि बाय करून तिथून जाऊ लागली. सगळे तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. साराही सगळे जोवर दिसत होते तोवर मागे वळून वळून सगळ्यांना बाय करत होती. सगळं स्टेप बाय स्टेप सुरू होतं आणि आता ती तिच्या फ्लाईटमध्ये आली होती.

'आई, बाबा थँक्यू तुम्ही माझं सगळं ऐकून घेतलं आणि माझ्यावर विश्वास दाखवून मला पाठिंबा दिला. तुम्हा सगळ्यांमुळे आज माझ्या पंखात बळ आहे आणि मी आता आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे.' सारा मनातच म्हणाली.

एवढ्यात फ्लाईट आता टेक ऑफ होणार असल्याने त्याची सूचना आली आणि त्या आवाजाने सारा भानावर आली. तिची फ्लाईट टेक ऑफ झाली आणि आपण आता खरंच उंच आकाशाला गवसणी घालण्यासाठी निघालो आहोत असंच साराला वाटून गेलं. ती खिडकीतून खाली बघत होती.

'आज मी खऱ्या अर्थाने माझ्या स्वप्नांच्या दिशेने झेप घेतली आहे. इतकी वर्ष ज्याचा मी ध्यास घेतला आहे ती गोष्ट आता माझ्या आयुष्यात सत्यात उतरणार आहे. मला आफ्रिकेला जायची संधी मिळाली आहे आणि या ज्ञानाचा उपयोग मला आपल्या देशासाठी करायचा आहे. मला कॅरलॉन सरांचं मार्गदर्शन हवं होतं तेही लाभलं. आता फक्त काम करता करता मला त्यांच्याही मनात भारताविषयी अभिमान निर्माण करायचा आहे.' सारा बाहेर बघतच विचार करत होती.

तिच्या पोटात गुदगुल्या होत होत्या. अगदी आपल्या पोटात फुलपाखरं उडतायत असं तिला वाटत होतं. तिचं खूप मोठं स्वप्न सत्यात उतरत होतं म्हणूनच तिची अशी अवस्था झाली होती.
******************************
इथे सगळे पुन्हा घरी जायला निघाले होते.

"राघव चल आमच्या सोबत. आम्ही पण घरीच चाललो आहोत." साराचे बाबा म्हणाले.

"नको काका. माझं इथे जवळच काम सुरू आहे तर मला पुन्हा तिथेच जायचं आहे. एका वेब सिरिजसाठी मिमिक्री करतोय." राघव म्हणाला.

"बरं. ऑल द बेस्ट. सीरिज रिलीज झाली की सांग." साराचे बाबा म्हणाले.

"हो काका नक्की." राघव म्हणाला आणि तो तिथून गेला.

"चला आता आपण पण निघू. आज हाफ डे तरी ऑफिसला गेलं पाहिजे." साराचे बाबा म्हणाले.

सगळे तिथून निघाले. आत्ता घरी जाताना समीर गाडी चालवत होता.

"विराज अरे सारा नीट राहिल ना तिथे? ती अशी आपल्याला सोडून एवढ्या लांब कधीच गेली नाहीये." साराच्या आजीने विचारलं.

"अगं आई ती लहान नाहीये आता. तिला आणि आपल्यालाही आता या सगळ्याची लवकरात लवकर सवय करून घ्यावीच लागणार आहे." विराज म्हणाला.

"तेही ठीक पण त्या टीव्हीत बघितलं आहे तिथे खूप हिंस्र प्राणी असतात. साराला काही होणार नाही ना?" ती पुन्हा काळजीने म्हणाली.

"अगं आजी कशाला काय होईल? तू असं बोलून आईचं टेंशन नको वाढवू. तिचा चेहरा बघ." समीर आरश्यातून बघत म्हणाला.

क्रमशः....
******************************
सारा निघाली आफ्रिकेला! आता कसा असेल तिचा तिथला अनुभव? साराची आजी मनापासून कधी तयार होईल या सगळ्याला? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all