लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३४)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                           सोनेरी क्षण

दुसरा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला होता. फक्त विशाखा आज जरा जास्त कामात होती. सारा उद्या आफ्रिकेला जायला निघणार म्हणून तिची गडबड सुरू होती. आज सगळं साराला जे आवडेल ते करायचं असा तिने चंगच बांधला होता. आजी, आजोबांनी पण साराच्या हातून देवाला अभिषेक करून घ्यायचा ठरवलं होतं आणि तसं साराला सांगून तिला तिचं आवरायला पाठवलं होतं. दुपारी तिच्या हस्ते अभिषेक आणि नैवेद्य अर्पण होणार होता. सगळी तयारी झाली होती आणि दुपार होतच आली होती. विशाखा नैवेद्याचे पान वाढत होती. सारा आणि बाकी सगळे सुद्धा त्यांचं आवरून आले.

"विशाखाऽ अगं झालं का?" साराच्या आजीने विचारलं.

"हो आई झालंच आहे फक्त पान वाढतेय." विशाखा म्हणाली.

"थांब मी येते. तू जा तुझं आवरून घे. सगळ्यांनीच जायचं आहे आणि तुझं आवरून नाही झालं तर कसं चालेल?" तिची आजी म्हणाली आणि ती स्वयंपाकघरात आली.

विशाखा तिचं आवरायला गेली. साराच्या आजीने तोवर पान वाढलं आणि सगळे देवळात जायला निघाले. घरापासून जवळच देऊळ होतं. सगळे छान रमतगमत देवळात आले. खूप दिवसांनी सगळं कुटुंबं असं देवळात आलं होतं. देवळाच्या परिसरात आल्या आल्या एकदम प्रसन्न वाटत होतं. सगळे देवळात गेले.

"या या देशमुख. मी सगळी तयारी करून ठेवली आहे." देवळाचे गुरुजी म्हणाले.

सगळे आत गेले आणि शांत बसले. तिथे गेल्यावर एकदम प्रसन्न आणि छान वाटत होतं.

'किती मस्त वाटतंय इथे. आत्ता समजलं आजी रोज का येते देवळात ते.' सारा मनातच म्हणाली.

तोवर गुरुजींनी तिला बोलावलं आणि तिच्या हस्ते अभिषेक करून घेतला.

"अभिषेक संपन्न झाला. आता जो काही नैवेद्य आणला असेल तो देवाला अर्पण करा." ते म्हणाले.

साराच्या आईने साराच्या हातात नैवेद्याचे पान दिले आणि साराने नैवेद्य अर्पण केला. नंतर देवाला आणि गुरुजींना तिने नमस्कार केला.

"आयुष्यमान भव." त्यांनी आशीर्वाद दिला.

सगळे तिथेच थोडावेळ बसले आणि नंतर प्रसाद घेऊन निघाले.

"सारा मी हे सगळं करतेय म्हणजे असं समजू नकोस की मी मनापासून या सगळ्याला तयार झाले आहे. तू सुखरूप राहावी आणि तुला सद्बुद्धी मिळावी म्हणून मी हे केलं आहे." तिची आजी म्हणाली.

"कांता! आत्ताच एवढी छान पूजा झाली ना? कशाला उगाच ते पवित्र वातावरण भंग करतेस?" तिचे आजोबा म्हणाले.

"नाही. फक्त सांगून ठेवतेय तिला. नाहीतर तिला असं नको वाटायला आपण मनमानी केली की आजी तयार होते." तिची आजी म्हणाली.

"बरं आजी. तू जे काही करतेस ते माझ्या चांगल्यासाठी हे मला माहीत आहे. बघ मी आफ्रिकेवरून आले की तूच माझं सगळ्यात जास्त कौतुक करशील." सारा तिला एका हाताने मिठीत घेत म्हणाली.

"तसं झालं तर चांगलंच आहे. मलाही तुझाच आनंद हवा आहे." तिची आजी तिचा हात बाजूला काढत म्हणाली.

बोलता बोलता सगळे घरी पोहोचले आणि सगळ्यांनी जेवणं करून घेतली.

"सारा मी बाकीची कामं आवरते तोवर एकदा तुझी बॅग चेक करून घे आणि त्यातले काही कपडे काढून ठेव. आपण संध्याकाळी खरेदीला जातोय तर नवीन कपडे घेऊन जा सोबत." तिची आई म्हणाली.

"अगं आई कपडे चांगले आहेत. कशाला उगाच नवीन?" सारा म्हणाली.

"असुदे सारा. छान सुती कपडे घेऊन येऊ. आफ्रिकेला खूप उष्ण वातावरण असतं म्हणे." तिचे आजोबा म्हणाले.

सगळेच ज्याचं त्याचं आवरून सारा सोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा म्हणून तिच्याच सोबत होते. आजची दुपार कोणीही झोपलं नाही. सगळे मिळून मस्त कॅरम, पत्ते आणि असे बरेच खेळ खेळले. यातच संध्याकाळ झाली आणि सगळेच बाहेर पडले. मनसोक्त खरेदी आणि फिरून झाल्यावर बाहेरच जेऊन सगळे घरी आले.

"सारा चल मी तुला हे बॅगेत भरायला मदत करते." तिची आई म्हणाली.

"आणि हो आपण सगळे आज एकत्रच इथेच झोपायचं आहे." समीर म्हणाला.

सारा आणि तिची आई जाऊन उद्याची बॅग पॅक करून आल्या. तोवर समीर आणि त्याच्या बाबांनी मिळून सगळ्यांच्या झोपेची सोय केली होती. सारा अंथरुणावर येऊन बसली.

"आजी आज गोष्ट सांग ना." ती तिच्या आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपत म्हणाली.

आजीनेही कसलेही आढेवेढे न घेता ऐतिहासिक गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि ती ऐकता ऐकताच साराला झोप लागली.

"किती लहान मुलीसारखी झोपली आहे ना सारा?" समीर हळू आवाजात म्हणाला.

"हो ना. वेळ कशी निघून गेली समजलं नाही. किती पटापट सरली ना वर्ष?" त्याचे आजोबा म्हणाले.

"खरंच. किती सोनेरी क्षण जगलो आपण? इतकी वर्ष एकमेकांसोबत आहोत, एकमेकांना समजून घेतोय हीच आपली संपत्ती आहे. खरं सांगायचं झालं तर इतक्या वर्षात जेवढी आपण मजा केली नाही, जेवढा वेळ एकमेकांना दिला नाही तेवढा वेळ आत्ता साराने जेव्हा हे क्षेत्र निवडलं तेव्हा दिला. आत्ता आपण खूप मनमुराद सगळ्या क्षणांचा आनंद घेऊन या गोड आठवणी आपल्या आयुष्यात साठवल्या आहेत." विराज म्हणाला.

"हो ना. नाहीतर एकमेकांना वेळ देणं म्हणजे फक्त सणाला एकत्र जाऊन खरेदी करणं, रोज रात्री एकत्र जेवणं एवढंच करत होतो आपण. आज आई - बाबांसोबत देवळात गेलो आणि त्यांना घेऊनच सगळी मजा केली ते खूप छान झालं." विशाखा म्हणाली.

सगळ्यांनाच आजचा दिवस खूप आवडला होता. कितीतरी वर्षांनी असे सगळे सहकुटुंब मोलाचा वेळ एकमेकांसोबत घालवत होते. साराच्या बडबडीमुळे त्यांना निसर्गाचे नवीन नवीन पैलू बघायला मिळत होते आणि तिचा हा अनुभवाचा खजिना असाच वाढता रहावा यासाठीच सगळे प्रार्थना करत होते. आजचा त्यांचा विषय फक्त आणि फक्त त्यांची लाडकी सारा हाच होता. त्यांच्या गप्पांमुळे साराची झोप चाळवली.

"आई, दादा अरे झोपा ना. उद्या मला घरातून अकरा वाजता निघायचं आहे." ती म्हणाली.

"हो बाळा. तू ये झोप." असं म्हणून विशाखाने तिचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवलं आणि हलक्या हाताने तिच्या केसातून हात फिरवून तिला मॉलिश करून दिलं. आईच्या त्या उबदार, मायाळू स्पर्शाने तिला लगेच झोप लागली.

"चला आता सगळेच झोपा." विशाखा हळू आवाजात म्हणाली.

विशाखा आणि विराजने मिळून साराचं डोकं उशीवर ठेवलं आणि सगळेच झोपले. दुसऱ्या दिवशी विशाखाने सगळी तयारी केली. आज तिने मुद्दामच साराला लवकर उठवलं नव्हतं. 'निघायला अजून बराच वेळ आहे आणि सगळी तयारी झालेली आहे तर कशाला उगाच लवकर उठवा पोरीला?' असा विचार तिने केला होता. कारण एकदा सारा आफ्रिकेला गेली की तिला दिवसरात्र एक करून काम करायला लागणारच होतं. तिला आत्ता, आज जेवढा आराम मिळतोय तेवढा मिळू दे म्हणून कोणीही कसलाच आवाज न करता घरात वावरत होते. तरीही साराला बरोबर साडे आठ वाजता जाग आली.

"आई अगं साडे आठ झाले. मला का नाही उठवलं?" तिने उठल्या उठल्या विचारलं.

"अगं आपण अकरा वाजता घरातून निघणार आहोत. सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. तुला आराम मिळावा म्हणून नाही उठवलं. बरं आता जा उठली आहेस तर आवरून ये. चहा, नाश्ता तयार आहे." तिची आई म्हणाली.

सारा तिचं आवरून बाहेर आली. आज नाश्त्यासाठी तिच्या आवडीची थालिपीठं केली होती. साराने मस्तपैकी चहा, नाश्ता केला आणि सगळ्या बॅग्स बाहेर आणून ठेवायला आत गेली.

"किती घाई झाली आहे हिला? एरवी हाका मारल्या तरीही उठत नाही. आज बघ." विराज म्हणाला.

"आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तूच बघ तुझी लेक." विशाखा त्याला हसून म्हणाली.

तोवर सारा सगळं बाहेर घेऊन आली.

"सारा तू सगळं घेतलं आहेस ना? ओरिजनल डॉक्युमेंट्स, मोबाईल चार्जर, पॉवर बँक आणि फर्स्ट एड किट घेतलास ना?" समीरने विचारलं.

"हो दादा. मी पुन्हा ही मेन बॅग चेक केली आहे. सगळं घेतलं आहे." सारा म्हणाली.

"बरं सारा ऐक! मी तुझ्या अकाउंटवर थोडे पैसे कन्व्हर्ट करून टाकले आहेत. तिथे कशाचीही गरज पडली तरीही मला लगेच फोन करायचा." तिचे बाबा म्हणाले.

"बाबा कशाला? तिथे मला फक्त आणि फक्त निसर्ग आणि प्राणी यांचीच गरज पडणार आहे." सारा म्हणाली.

"तरीही असावेत पैसे. अकाउंटमध्ये तर आहेत ना? असुदे." तिची आई म्हणाली.

"ठीक आहे. बरं राघव पण येणार आहे एअरपोर्टवर. मगाशी मी आवरत होते तेव्हा त्याचा फोन येऊन गेला." सारा म्हणाली.

"येऊदे की. तुझा चांगला मित्र आहे तो. मी विचारणारच होते त्याचा काही फोन कसा आला नाही अजून ते." तिची आई म्हणाली.

"हम्म. अरे हो आई एक सांगायचं राहिलं." सारा म्हणाली.

आता अचानक हिला काय आठवलं? ऐनवेळी ही धावपळ करायला लावणार की काय? या विचाराने तिच्या पोटात गोळाच आला.

"आई अगं एवढं नको टेंशन घेऊ." सारा म्हणाली.

"मग सांग की पटकन. एवढा सस्पेन्स का ठेवतेस?" समीर म्हणाला.

क्रमशः...
****************************
साराला अचानक काय सांगायचं असेल? काही गंभीर तर नसेल ना? ती आता आफ्रिकेला जायला निघाली आहे. कसा असेल तिचा आफ्रिकेचा अनुभव? आफ्रिकेत तिला कोणते प्राणी बघायला मिळतील? तिच्या वाटेत आता कोणते नवीन अडथळे येणार असतील? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all