लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३३)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                  झेप स्वप्नांच्या दिशेची

सगळ्यांनी कितीही मनाची तयारी केली असली, मनाला समजावलं असलं तरीही सारा आता महिना, दोन महिने तरी परदेशात जाणार आणि तेही आफ्रिकेच्या जंगलात म्हणून दिवसेंदिवस त्यांची तिच्या विषयीची काळजी वाढत चालली होती. तिच्या सरांनी तिची फ्लाईटची तिकिटं तिला पाठवून दिली होती. दोन दिवसात तिला निघायचं होतं. आता पुन्हा महिनाभर तरी तिची भेट होणार नाही म्हणून तिचे प्रचंड लाड सुरू होते. रोज तिच्या आवडीचा स्वयंपाक होत होता आणि तिच्या सोबत वेळ घालवता यावा म्हणून तिचे बाबाही लवकर घरी येत होते. जायच्या आठवडाभर तरी तू फक्त आमच्या सोबत वेळ घालवायचा अश्या घरच्यांच्या इच्छेने ती आठवड्यापासून घरातच होती. एकमेकांच्या सहवासात कधी त्यातले पाच दिवस संपले होते हेही समजलं नव्हतं. आता परवा सारा तिच्या स्वप्नांच्या दिशेने झेप घेणार होती. सगळे रात्रीच्या जेवणासाठी एकत्र बसले होते.

"सारा तू आता परवा आफ्रिकेला जाशील. संपूर्ण घर आता सूनं सुनं वाटेल." तिची आई म्हणाली.

"अगं आई महिना, दोन महिन्यांचा प्रश्न आहे फक्त. आपण कॉलवर बोलूच की! हवंतर मला जेव्हा जेव्हा शक्य होईल मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ कॉल करत जाईन. तुम्हालाही आफ्रिका बघता येईल." सारा म्हणाली.

"ते तर तू करायचं आहेच." तिची आजी म्हणाली.

"हो आजी नक्की करणार. पक्का प्रॉमिस." सारा म्हणाली.

साराने इंटरनेटवरून आफ्रिकेच्या जंगलांची आणि तिथल्या आदिवासी वस्त्यांची माहिती काढली होती. तिने त्याबद्दलही घरी सगळ्यांना कल्पना देऊन ठेवली. सगळ्यांची जेवणं झाली आणि बाकी आवराआवर झाल्यावरही आई अजून किचनमध्येच का आहे? हे बघायला सारा आत गेली.

"आई काय करतेस आत्ता एवढ्या उशिरा? चल ना थोडावेळ गप्पा मारू मग झोपू." ती म्हणाली.

"तुमच्या सगळ्यांचं चालू दे. मी तुझ्यासाठीच जरा फराळाचं करतेय. आत्ता आता आधी तिखट मिठाच्या शंकरपाळ्या करते. एवढ्या लांब जाणार आहेस तेही थोडे थोडके दिवस नाही तर चांगली महिना, दोन महिने. तुला तिथे काही आवडलं नाही खायला तर निदान घरचं काहीतरी असावं ना. जा तू बाहेर बस. आता दोन दिवसात मला पाच ते सहा पदार्थ करायचे आहेत." तिची आई म्हणाली.

"अगं आई एवढे कशाला? नको ना एवढी दगदग करून घेऊ." सारा तिच्या आईला समजावत म्हणाली.

"दगदग कसली त्यात? आधी पासूनच सुरुवात करणार होते पण म्हणलं एवढे दिवस टिकायला पाहिजे तर ताजं ताजं करू." तिची आई म्हणाली.

"आई दोन पदार्थ कर काहीतरी जास्त नको. आधीच माझं सामान भरपूर आहे. विमानात माहितेय ना ठराविक वजनच घेऊन जाता येतं." सारा म्हणाली.

"हो माहितेय. याचं एवढं काही वजन होणार नाही. तू जा बघू निमूटपणे बाहेर आधी." तिची आई म्हणाली.

"नाही. आज मी तुला मदत करते." सारा म्हणाली.

आईचं काहीही ऐकून न घेता ती तिला मदत करत तिथे थांबली.

'किती मोठी झाली सारा. परवा आता माझं हे बाळ आफ्रिकेला जाईल. सारा याआधी कधीच अशी एवढ्या लांब एकटी गेली नाहीये, तिथे तिला करमेल ना? अचानक हवामान आणि पाणी बदलाने जर आजारी पडली तर? कोण घेईल माझ्या साराची काळजी? तिथली व्यवस्था कशी असेल? एकतर ही जाणार त्या आदिवासी वस्त्यांमध्ये! तिथली लोकं कशी असतील?' साराची आई मनातच विचार करत होती आणि विचार करता करताच ती शंकरपाळ्या तेलात सोडत होती.

"आईऽ अगं बास. तेलात मावतील एवढ्या शंकरपाळ्या टाकून झाल्यात कढईत. तुझं लक्ष कुठे आहे?" साराने विचारलं.

तिच्या बोलण्याने ती भानावर आली.

"काही नाही." तिची आई म्हणली आणि शंकरपाळ्या तळू लागली.

"आई नको ना एवढी काळजी करुस. मी पहिल्यांदा चालले असले तरीही मी नेटवरून सगळी माहिती काढली आहे आणि त्याबद्दल मी सांगितलं ना तुम्हा सगळ्यांना?" सारा म्हणाली.

"हो सांगितलं पण तिथले लोक कसे असतील? कसे राहत असतील? याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नाही ना. त्यात सगळ्या वस्त्या आहेत त्या आदिवासी जमातीच्या." तिची आई म्हणाली.

"अगं आई चांगले असतात ते लोक. निसर्गाशी प्रामाणिकपणे जोडलेले असतात. त्यांना आपल्या या तांत्रिक जगात काहीही रस नसतो. त्यांचा निसर्ग आणि ते छान राहतात. अगं मी असंही ऐकलं आहे की, ते लोक आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा छान पाहुणचार करतात, त्यांना मदत करतात. त्यांची कसली भीती? तीही आपल्या सारखी माणसंच आहेत." सारा तिच्या आईला समजावत म्हणाली.

"तरीही मला काळजी वाटतेय गं तुझी. अगदी त्यांनी छान पाहुणचार केला, तुम्हाला मदत केली तरीही अचानक होणाऱ्या हवा पाण्याच्या बदलाने, अचानक बदललेल्या आहारामुळे तू आजारी पडलीस तर तिथे तुझी काळजी कोण घेणार? इथे तुझं साधं डोकं दुखलं तरीही आईने मॉलिश करून दिल्याशिवाय तुला बरं वाटत नाही. तिथे गेल्यावर काय होईल?" तिची आई काळजीने म्हणाली.

"असं काही नाही होणार आई. जेमतेम दोन महिन्यांचा प्रश्न आहे. अगदीच काही कुरबुर झाली तर निसर्ग आहे ना! आपल्या निसर्गात कितीतरी व्याधींवर औषध आहे." सारा अगदी सहज म्हणाली आणि कढईतून पहिला घाणा बाहेर काढला.

एव्हाना सारा अजून का आली नाही? म्हणून समीर तिथे आला. त्याने दोघींना काम करताना बघून बाकीच्यांना पण बोलावलं आणि सगळे मिळून काम करू लागले. घरात अगदी दिवाळीसारखं वातावरण तयार झालं होतं. फराळाचा दरवळ संपूर्ण घरात पसरला होता आणि सगळ्यांचे हसण्याचे आवाज घरात दुमदुमत होते.

'तुम्ही सगळे असेच हसत रहा, आनंदी रहा. आत्ता कुठे मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने झेप घेत आहे पण एक ना एक दिवस तुम्हा सगळ्यांना माझा अभिमान वाटेल असंच काम मी करेन. तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय हे काहीही शक्य झालं नसतं. माझ्या उद्याच्या यशात तुम्हा सगळ्यांचा खूप मोठा वाटा असेल. आपल्या देशासाठी मला माझ्या ज्ञानाचा वापर करायचा आहे. त्यासाठी जिथून आणि जेवढं शिकता येईल मी शिकेन.' सारा मनातच म्हणाली.

सगळी कामं आटोपल्यावर सगळेच आपापल्या खोलीत झोपायला गेले.

"विराज सारा तिथे नीट राहिल ना?" विशाखाने अचानक त्याला विचारलं.

"असं अचानक विचारायला काय झालं? अगं आपली सारा आता लहान नाहीये एकोणीस वर्षांची झाली आहे. नीट न राहायला काय झालं?" विराज अगदी सहज बोलून गेला.

"हो माहितेय ना ती एकोणीस वर्षांची झाली आहे पण अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत विराज. ती आफ्रिकेला कोणत्याही हॉटेलमध्ये राहायला नाही चालली किंवा ती फक्त पर्यटन म्हणून फिरायलाही चाललेली नाहीये. मला काळजी वाटतेय रे." विशाखा म्हणाली.

"मान्य विशाखा. अगदी सगळं सगळं मान्य. आपल्या साराने हे क्षेत्र निवडलं आहे तर हे असंच होणं साहजिक आहे. आपल्याला अजून सवय नाहीये म्हणून तुला तिची जास्त काळजी वाटतेय. आत्ता ती हजारीबागला जाऊन आलीच ना? तशीच आफ्रिकेला जाऊन येईल. अगं कित्येक मुलं जात नाहीत का परदेशात शिकायला?" विराज म्हणाला.

"हो पण त्या मुलांना तिथे सुरक्षित वातावरण असतं. त्यांना तिथे सगळ्या सोई सुविधा उपलब्ध असतात." विशाखा म्हणाली.

"आपल्या सारालाही असणार आहेत ना! जंगल, तिचे कॅमेरे, तिचे सर, निसर्ग आणि तिचे सगळ्यात आवडते प्राणी." विराज म्हणाला आणि हसू लागला.

"तू फक्त मस्करीच कर. जाऊदे! मी पण तुझ्याशी काय बोलत बसले. उद्या लवकर उठून मला सगळं आवरायचं आहे. साराला परवा जायचं आहे तर सगळी तयारी केली पाहिजे. उद्या संध्याकाळी तिच्यासाठी खरेदी पण करायचा विचार करतेय." विशाखा म्हणाली.

"उद्या मीही सुट्टी टाकली आहे. संध्याकाळी मग एकत्रच जाऊ सगळे. दिवसभर पण छान वेळ घालवू. पुन्हा आपली सारा महिना, दोन महिने आपल्या डोळ्यासमोर नसेल." विराज म्हणाला.

त्याच्या डोळ्यात थोडे अश्रू तरळले होते. विशाखाला त्याने कितीही समजावलं असलं तरीही सारा त्याचीही लाडकी होती आणि तो दाखवत नसला तरीही त्यालाही तिची खूप काळजी वाटत होतीच. विशाखाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो भानावर आला.

"साराची काळजी वाटतेय ना? नको उगाच भावना दाबून ठेवूस तुलाच त्रास होईल." विशाखा म्हणाली.

"काळजी अशी नाही गं पण आत्ता सारा फक्त कामासाठी म्हणून आपल्या पासून दूर जातेय तर एवढा त्रास होतोय, उद्या तिचं लग्न ठरलं तर काय अवस्था होईल आपली?" विराज म्हणाली.

"खूप वेळ आहे अजून त्याला. नको विचार करुस. झोप आता शांतपणे." विशाखा म्हणाली आणि दोघं झोपले.

'सारा तू बिनधास्त तुझ्या स्वप्नांच्या दिशेने झेप घे. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे आहोत. तुझ्या या वाटेत जे अडथळे येतील ते तुलाच दूर करावे लागतील, आलेल्या परिस्थितीला तुलाच तोंड द्यावं लागेल आम्ही फक्त तुला बळ देऊ. ऑल द बेस्ट सारा.' विराज मनातच म्हणाला आणि झोपला.

क्रमशः.....
****************************
सारा तिच्या स्वप्नांच्या दिशेने झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. कसा असेल तिचा आफ्रिकेचा अनुभव? यामुळे तिच्या करिअरमध्ये काय नवीन गोष्टी घडतील? ती कॅरलॉन सरांचं भारतीयांविषयी मत बदलू शकेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all