लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३२)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                              शिकवण

सारा सगळं काही व्यवस्थित सांगत होती आणि तिने जेव्हा त्या टास्कबद्दल सांगितलं तेव्हा सगळ्यांच्याच चेहऱ्यावर गोंधळाचे भाव होते. त्यांना वाटत होतं जर सरांना हेच अपेक्षित होतं तर त्यांनी तिला मोबाईल का वापरू दिला नसेल? हे साराने ओळखलं.

"मला माहितेय तुम्ही सगळे काय विचार करताय ते. सरांनी मला मोबाईल वापरू दिला नाही आणि तरीही मी घरी कॉन्टॅक्ट करावा अशी त्यांची इच्छा होती याचाच ना?" सारा म्हणाली.

"हो." तिची आजी म्हणाली.

"आजी त्यांना बघायचं होतं मी अचानक अश्या ट्विस्टमध्ये काय करू शकते ते. जंगलात असताना काही तांत्रिक अडचणी आल्या तर आम्हाला मेन कॅम्पवर त्याची इन्फॉर्मेशन द्यावीच लागते. तर मी त्या परिस्थितीशी सामना करायला तयार आहे का? हे त्यांनी या टास्कमधून बघितलं." सारा म्हणाली.

"खरंच गं सारा तुझी तिथे एकदम कसून परीक्षा घेतली आहे सरांनी." तिचे बाबा म्हणाले.

"हो. तुम्हाला माहीत आहे? सरांना ना आधी भारतीय मुलीला शिकवायचं म्हणजे वेळ वाया घालवणे असं वाटत होतं. त्यामुळे त्यांची परीक्षा पास करणं जरा कठीणच होतं. त्यांच्या मनात याबद्दलची अढी आहे ती मला कायमस्वरूपी दूर करायची आहे. त्यांच्याकडे म्हणे फार कमी भारतीय मुली शिक्षणासाठी येतात आणि त्याही घरच्या कारणांनी मध्येच काम सोडतात त्यामुळे त्यांचा इतर विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. या परीक्षेच्यावेळी तर मला स्वतःला सिद्ध तर करायचं होतंच पण सरांच्या मनात आपल्या देशाविषयी जे मत तयार झालं आहे तेही मला बदलून दाखवायचं आहे." सारा म्हणाली.

हे बाकीचं काही तिने घरी सांगितलं नव्हतंच त्यामुळे आत्ता कुठे सगळ्यांना अंदाज आला होता की सारा कोणत्या कोणत्या दिव्यातून गेली आहे. समीर तिला घेऊन पुण्याच्या भीमाशंकर अभयारण्यात गेला होता तेव्हा त्याने हे थोडं अनुभवलं होतं पण त्याची तीव्रता आत्ता सारा सांगतेय त्यावरून लक्षात येत होती. नुसती परीक्षा देऊन तिला फक्त काम करायचं नाही तर, एका जागरूक नागरिकाप्रमाणे तिला आपल्या देशाचा जागतिक पातळीवर अभिमान वाटावा असं काम करून सरांनाही आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे आणि त्यांच्या मनात ज्या चुकीच्या समजुती आहेत त्याही दूर झाल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न करायचे आहेत.

"खूप छान विचार केलास सारा. फक्त आणि फक्त आपलं काम करून तुला बाजूला व्हायचं नाहीये तर आपल्या देशाची शान वाढवायची आहे. आपण ज्या समाजात राहतो त्याचं आपण देणं लागतो हे तू नीट लक्षात ठेवलं आहेस. आपल्या देशाचा जेव्हा जागतिक पातळीवर सन्मान होईल, कोणालाही आपल्या देशाबद्दल चुकीच्या समजुती नसतील तेव्हाच आपलीही प्रगती होईल." साराचे आजोबा म्हणाले.

"तुमच्या कडूनच शिकले आहे आजोबा. तुमची शिकवण आचरणात सुद्धा आणली पाहिजेच ना. तुम्हीच नेहमी सांगता ना, आपणच आपल्या देशावर मनापासून प्रेम केलं पाहिजे, आपल्या देशातल्या विविध चांगल्या संस्कृतींचा आदर केला पाहिजे तेव्हाच इतर लोकही त्याचा आदर करतील. हेच मी लक्षात ठेवलं आहे." सारा म्हणाली.

साराचा आज सगळ्यांनाच अभिमान वाटत होता. सगळ्यांच्या ते डोळ्यात दिसत होतंच. सगळ्यांना फक्त असं वाटायचं की, साराला या क्षेत्रात आवड आहे आणि म्हणून तिला हे काम करायचं आहे पण या व्यतिरिक्त तिला यासोबत खूप काही काम करायचं आहे हेही त्यांना आज समजलं होतं.

"सारा खरंच खूप छान फोटो काढले आहेस. तुझा हेतूही खूप छान आहे." राघव म्हणाला.

"हो सारा! खूप छान काम केलंस." तिचे बाबा म्हणाले.

"थँक्यू." सारा म्हणाली.

"आजी, आई आता तरी तुम्ही मनापासून मला पाठिंबा द्या ना. तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर मलाही बळ मिळेल ना." सारा म्हणाली.

"मी तयार आहे सारा." तिची आई म्हणाली.

तिच्या आईचं बोलणं ऐकून ती आईला आनंदाने बिलगली.

"बघ सारा म्हणलं होतं ना तू सगळ्यांना नीट सांग, फोटो दाखव सगळे तयार होतील?" राघव म्हणाला.

"पण आजी?" सारा तिच्या आजीकडे आशेने बघत म्हणाली.

"आम्हा म्हाताऱ्यांचं काय? कोणी ऐकणार तर नाहीच ना?" तिची आजी नाराज होत म्हणाली.

"आजी अगं असं काय करतेस? तू नको ना एवढी काळजी करुस. मला काहीही होणार नाही. हवंतर आता पुढच्या महिन्यात मला आफ्रिकेला जायचं आहे तर त्याच्या आधी मी तुझ्या सगळ्या मैत्रिणींना चोख उत्तरं देऊन जाते म्हणजे तुला कोणीही काहीही बोलणार नाही." सारा म्हणाली.

"काही नकोय. तू बोलणार म्हणजे अजूनच उद्धार व्हायचा आमचा. माझं मी बघते." आजी म्हणाली.

तिच्या या बोलण्याने तिने नकळत साराला परवानगी दिली होती.

"आजी मी तुमची कोणाचीही मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही. विश्वास ठेव." सारा तिच्या आजीचा हात हातात घेत म्हणाली.

तिच्या डोळ्यात, त्या स्पर्शात एक खरेपणाची भावना होती. तिच्या मनात आलं असतं तर तिने फक्त तिच्या आई - बाबांनी परवानगी दिली आहे मग मी आजी - आजोबांना कशाला समजावत बसू? असं म्हणून तिचं तिचं काम सुरू केलं असतं पण तिला सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्यांना तिच्या या निर्णयात सहभागी करून पुढच्या आयुष्यात येणारं यश, अपयश वाटून घ्यायचं होतं.

"चला आता सगळं मिटलं आहे तर मस्त शेव पुरीचा बेत केला आहे मस्त खाऊन घ्या." समीर म्हणाला.

सारानेही आल्यापासून काहीही खाल्लं नव्हतं. साराचे तिथले किस्से आणि बाकी बडबड ऐकत सगळ्यांनी खाऊन घेतलं. आत्ता कुठे साराची कळी खुलली होती. सगळं आटोपल्यावर राघव त्याच्या घरी जायला निघाला. सारा त्याला बाहेरपर्यंत सोडायला आली होती.

"थँक्यू राघव तू नसतास तर मी डिप्रेशनमध्ये गेले असते असं वाटतंय. विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली होती." ती म्हणाली.

"बस का? मित्र असताना कोणीही डिप्रेशनमध्ये जाऊ शकत नाही. अगं मैत्रीचं नातं रक्ताचं नसलं म्हणून काय झालं? इथे सगळ्या प्रॉब्लेम्सच सोल्युशन असतं." राघव म्हणाला.

"ते तर आहेच. मागच्यावेळी वर्ल्ड रेकॉर्डसाठी पण तूच मदत केलीस आणि यावेळीही. खरंच खूप खूप थँक्यू." सारा म्हणाली.

"तू सारखं असं थँक्यू म्हणणार असशील तर पुढच्या वेळ पासून मी येणारच नाही आणि यावेळी मी काहीही केलं नाहीये तुझं काम इतकं छान होतं की घरचे आपोआप तयार झालेत." राघव म्हणाला.

सारा काही बोलायला जाणार एवढ्यात तोच बोलू लागला; "तू काहीही बोलू नकोस आता. जा घरी मस्त एन्जॉय कर आणि हो पुढच्या महिन्यात आफ्रिकेला जाणार आहेस तर घरात महिनाभर झोपा काढू नकोस जरा कामाची सवय ठेव."

"गप रे! मी काय एवढी आळशी वाटते का तुला?" ती त्याच्या हातावर हळूच फटका मारत म्हणाली.

"बरं चल निघतो आता. उद्या एका वेब सीरिजसाठी मिमिक्री करायला जायचं आहे." तो म्हणाला.

साराने त्याला बाय केला आणि ती घरात आली. तो दिवस तर तिच्या फोटो आणि व्हिडिओची स्तुती करण्यात आणि त्याबद्दल बोलण्यातच संपला. दुसऱ्या दिवशी पासून समीर तिच्या व्हिसासाठी कामाला लागला आणि सारा तिची प्रॅक्टिस करू लागली. काही दिवस रोज सकाळी ती आजी बरोबर देवळात सुद्धा गेली. तिथे कोणीही तिच्या या अनोख्या करिअरबद्दल काही बोललं तर समोरच्याला न दुखवता ती त्यांना त्यांची चूक दाखवून द्यायची आणि तिची बाजू कशी बरोबर आहे? हेही सांगायची. यात तिचा एक डायलॉग फिक्स असायचा.

ती म्हणायची; "आजीची आणि तुम्हा सगळ्यांची शिकवण आहेच की! तुमचे संस्कार आणि शिकवण मी अशी विसरणार थोडीच आहे. मी परत येईन तेव्हा तुम्ही सगळे नक्कीच माझं अभिनंदन करायला याल."

तिच्या या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास असायचा. तिच्या या वाक्याने मग समोरची व्यक्ती काहीही बोलायची नाही. ती सरळ त्यांच्याच संस्कार आणि शिकवणीवर बोट ठेवायची आणि त्यांची स्तुती करायची मग कोणीही काहीच बोलायचं नाही. असेच दोन तीन दिवस ती आजी बरोबर देवळात गेली आणि थोडे दिवसांनी तिने तिचा हा दिनक्रम बदलला. आता ती रोज बागेत, पेट शॉपमध्ये आणि कधीतरी एखाद्या अभ्यारण्यात फोटो काढायला जायची. तिला या महिनाभरात भरपूर सराव तर करायचा होताच शिवाय कामाची सवय आणि घरच्यांच्या मनाची तयारीही करून घ्यायची होती म्हणून कधी कधी ती न सांगता मुद्दाम घरी उशिरा यायची. सुरुवातीचे काही दिवस सगळ्यांनाच काळजी वाटायची पण तिने सगळ्यांनाच या सगळ्याची सवय ठेवा म्हणून समजावून सांगितलं होतं. अश्यातच वीस दिवस संपले आणि हातात दहा दिवस बाकी होते. या काळात तिचा व्हिसा आलेला होता आणि तिची आफ्रिकेला जायची तयारी सुद्धा सुरू होती. आता आफ्रिकेला जाणार आहे म्हणजे महिना, दोन महिना काही तिला घरी यायला मिळणार नव्हतं. त्या हिशोबाने ती सगळी पॅकिंग करत होती. जस जसा तिचा आफ्रिकेला जायचा दिवस जवळ येत होता तिच्या आईच्या पोटात गोळा येत होता. सारा एकटी अशी पहिल्यांदा एवढ्या लांब दुसऱ्या देशात जाणार होती आणि तेही जंगलात. तिथे तिचे सर आणि बाकी टीम असली तरीही एका आईला आपल्या मुलीविषयी जी काळजी वाटली असती तिच साराच्या आईलाही वाटत होती.

क्रमशः.....
*****************************
सारा आता आफ्रिकेला जाणार आहे. तिचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. कसा असेल तिचा मार्ग? तिथे तिला काय काय अनुभव येतील? तिची आजी पुन्हा तिला अडवणार नाही ना? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all