लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३१)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३१)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                             मनाचे खेळ

सारा तिच्या मनात जे काही सुरू होतं ते सगळं बोलत होती. राघवही तिला जे बोलायचं ते बोलू देत होता. बोलून निदान तिचं मन शांत होईल आणि ती व्यवस्थित विचार करू शकेल म्हणून तो तिचं सगळं ऐकून घेत होता. तिची अखंड बडबड सुरूच होती तरीही एकदाही त्याने तिला अडवलं नाही. बराचवेळ बोलून झाल्यावर तिचं तिलाच लक्षात आलं आपण खूप वेळ बडबड करतोय आणि राघव फक्त आणि फक्त ऐकून घेतोय.

"सॉरी. मी भावनेच्याभरात बडबडत बसले." सारा म्हणाली.

"इट्स ओके यार. मित्र असतातच कशाला? ऐकून घेण्यासाठीच ना? बरं वाटतंय का आता तुला?" त्याने तिला काळजीने विचारलं.

"हम्म. ठीक आहे. अरे तू अजूनही उभाच आहेस? बस ना. सॉरी यार. माझं लक्ष नव्हतं तू तरी बसायचं होतं ना." सारा त्याला समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवून म्हणाली.

तो तिच्या रूममध्ये आल्यापासून उभाच होता आणि याकडेही तिचं लक्ष नव्हतं. आत्ता जेव्हा तिला शांत वाटत होतं तेव्हा तिच्या हे लक्षात आलं आणि तिने त्याला बसायला लावलं.

"सारा! आता तरी बाहेर येणार आहेस का?" त्याने तिला विचारलं.

"माझं मनच होत नाहीये रे. अरे आजीला मी सांगून सांगून दमले आहे. आता पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायची ताकद माझ्यात नाहीये. हे बघ सरांनी मला जॉईनिंग लेटरसुद्धा दिलं आहे पण इथे आल्यावर हे सगळं झालं आणि सगळा उत्साहच गेला रे." सारा हताश होत म्हणाली.

"म्हणजे आता तू तुझी आजी म्हणते तसं हे काम सोडून देणार आहेस का? आणि हे लेटर काय आठवण म्हणून जपून ठेवणार? अगं सारा काय बोलतेय तू याचा तरी विचार कर. अगं तुझं काम हे जरा वेगळं आहे यात अश्या अडचणी येणं साहजिक आहे. जर तू फक्त तुझ्या आजीच्या बोलण्याने एवढा त्रास करून घेतलास ना तर पुढे तुला अजून त्रास होईल. अगं तुझं आफ्रिकेला जायचं स्वप्न तर दूर पण तू अभयारण्यात पण फोटो काढायला नाही जाऊ शकणार." राघव तिला समजावत म्हणाला.

त्याला चांगलंच माहित होतं सारा अशी हार मानणाऱ्यातली नाही. फक्त ती आहे त्या परिस्थितीचा जरा जास्तच विचार करतेय. तो तिला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता.

"हेच इतर कोणी असतं तर मी त्यांना बरोबर उत्तर दिलं असतं पण इथे माझीच आजी आणि आई आहेत. आपलीच माणसं जेव्हा आपल्यावर विश्वास दाखवत नाहीत ना तेव्हा काय वाटतं? हे तुला नाही कळणार राघव." ती म्हणाली.

हे बोलताना पुन्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते आणि नाक लाल झालं होतं. तिला तिचं काम प्रिय होतंच पण आजीला आणि आईला यामुळे त्रास होतोय, आई काल अशी अचानक चक्कर येऊन पडली या विचारांनी तिला जास्त त्रास होत होता.

"इथेच तू चुकत आहेस सारा. आजीचा आणि काकूंचा तुझ्यावर विश्वास आहे फक्त त्यांना तुझी काळजी वाटतेय म्हणून त्या अश्या बोलल्या. तू आत्ता त्यांना तुझ्या परीक्षेचे फोटो दाखवल्यावर बघ त्यांची काळजी जरा कमी होईल. ऐक माझं सारा, चल बाहेर." राघव म्हणाला.

"तरीही त्यांना नाही पटलं तर? तुला माहित आहे राघव हे काम म्हणजे माझं पॅशन आहे, माझा श्वास आहे. जर तरीही आई आणि आजी मला नाहीच म्हणाल्या तर? माझ्या तोंडून काहीतरी अपशब्द निघतील आणि उगाच नको ते होऊन बसेल." सारा म्हणाली.

"असं कसं होईल सारा? सगळेच तुझ्या बाजूने आहेत. एवढंच नाही तर काकू आणि आजी पण तुला हे काम करू द्यायला तयार आहेत. त्यांनी फक्त तुला त्या अटी घातल्यात तर तू एवढा टोकाचा विचार का करतेस? त्या बाबतीत आपण सगळेच मिळून समजावू दोघींना. तू उगाच तुला हे काम कधी करायलाच मिळणार नाहीये असा विचार करत आहेस म्हणून तुला एवढा त्रास होतोय. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत फक्त." राघव म्हणाला.

त्याच्या बोलण्याने सारा भानावर आली. या विचारांच्या गर्तेत कधी आपण नकारात्मक विचार करायला लागलो आणि आहे त्या परिस्थितीचा बाऊ केला हे तिच्या लक्षात आलं. माणसाचं मन एकदम छोट्या गोष्टीचा सुद्धा अती विचार करून त्याला खूप मोठं करतो आणि जी परिस्थिती नाही अशी परिस्थिती मनात उभी करून तेच खरं मानायला लागतो आणि इथेच मनाचे खेळ सुरू होतात. असंच सारा सोबत घडत होतं. वेळीच राघवने तिला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली म्हणून ती त्यातून बाहेर आली.

"ठीक आहे आपण बोलू आई आणि आजीशी." ती म्हणाली.

लगेचच तिने तिचा कॅमेरा आणि लॅपटॉप घेतला आणि दोघं बाहेर आले.

"सारा ठीक आहेस ना आता?" तिच्या बाबांनी विचारलं.

"हो. आजी! आई! मला तुम्हाला मी हजारीबागला काढलेले फोटो दाखवायचे आहेत ते बघून नक्कीच तुम्हाला पटेल मला याच क्षेत्रात का जायचं आहे? आणि तिथे माझं मन कसं रमलेलं असतं ते?" सारा म्हणाली.

सारा निदान काहीतरी बोलतेय आणि तिच्या मनात आता कोणतेही नकारात्मक विचार नाहीयेत हे बघून सगळ्यांना जरा बरं वाटत होतं. शिवाय तिचे रडलेले डोळे आणि आवाज कळत होता म्हणून कोणीही काहीच बोललं नाही. कोणीही साराला असं मुळूमुळू रडताना या आधी कधीच बघितलं नव्हतं. आज ती एवढी रडली आहे म्हणजे तिला खूप त्रास झाला असणार हे सगळ्यांच्याच लक्षात आलं. ती घरात कोणाशीही बोलली नाही ते राघवशी बोलली म्हणून सगळ्यांनाच त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटत होती. समीरने राघवला डोळ्यांनीच थँक्यू म्हणलं. त्याने साराला असं हताश आणि रडताना पहिल्यांदा पाहिलं होतं, तिच्यातला आत्मविश्वास कुठेतरी हरवला होता जो राघवने तिला पुन्हा मिळवून दिला होता आणि म्हणूनच समीरला बरं वाटत होतं. साराने स्मार्ट टीव्हीला लॅपटॉप कनेक्ट करून फोटो दाखवायला सुरुवात केली. अगदी पहिल्या दिवसापासूनचे किंगचे फोटो, ग्लिची आणि तिच्या पिल्लांचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा ती एक एक करून दाखवत होती. ते दाखवताना ती पुन्हा ते क्षण अनुभवत होती. फोटो, व्हिडिओ बघताना आपण प्रत्यक्ष हे अनुभवतोय असाच भास सगळ्यांना होत होता.

"आजी मी तुला म्हणलं होतं ना तुझ्यासाठी खास सरप्राइज आहे, ते म्हणजे तुला मी आता या सगळ्यांची नावं सांगणार आहे. तुला सारखं वाटायचं ना की प्राण्यांची नावं लक्षात कशी ठेवतात? ज्या त्या नावाचा प्राणी ओळखतात कसा? ते मी आता तुला सांगते." सारा म्हणाली.

लगेचच तिने ग्लिची आणि तिच्या पिल्लांचा फोटो ओपन केला. जसं तिथल्या वन अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं अगदी तसंच तिने आजीला सांगितलं. इतकावेळ आजी आणि आई नाराज दिसत होत्या पण फोटो, व्हिडिओ बघून त्यांची नाराजी कुठच्या कुठे पळून गेली होती.

'साराला आपण उगाच नको म्हणतोय का? पोरीने किती छान छान फोटो, व्हिडिओ काढले आहेत. किती मन लावून काम करते सारा. शिवाय हे असे जंगली प्राण्यांचे फोटो काढायचे म्हणजे धाडस पण किती लागतं. आपल्या पोरीत ते आहे. तिच्या या गुणांना आपणच वाव द्यायला हवा ना? प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यांच्यातले कलागुण, आवड निवड आपण पालकांनी ओळखून मुलांना हवं ते काम योग्य दिशेने करायला आपणच मदत करायला हवी ना? इथेच तर साराला आपली खरी गरज आहे.' साराची आई मनातच विचार करत होती.

ती विचारात गढून गेली होती. समोर ग्लिची आणि तिच्या पिल्लांचा व्हिडिओ सुरू होता आणि सारा लहानपणीच्या आठवणी त्या व्हिडिओ सोबत सांगड घालून सांगत होती आणि आईचं याकडे लक्ष नाहीये हे तिने बघितलं.

"आईऽ अगं काय झालं? मी काय बोलतेय आणि तुझं लक्ष कुठे आहे?" सारा म्हणाली.

तिच्या डोळ्यात आईला हे सगळं आवडत नाहीये का? म्हणून भीती होतीच.

"काही नाही. तू दाखव ना व्हिडिओ. पुन्हा सुरुवाती पासून लाव." तिची आई म्हणाली.

साराने तो व्हिडिओ पुन्हा सुरुवाती पासून आईला दाखवला आणि सगळी बडबड पुन्हा केली. फोटो, व्हिडिओ दाखवताना आत्ता थोड्यावेळापूर्वी एकदम उदास असणारी सारा खुलली होती.

"आता मी तुम्हाला जंगलातला सगळ्यात रोमांचक थरार दाखवते." सारा म्हणाली आणि तिने झुंजीचा व्हिडिओ सुरू केला.

हा तोच व्हिडिओ होता ज्यात ग्लिची आणि तिच्या पिल्लांवर रान कुत्र्यांनी हल्ला केला होता. व्हिडिओ बघताना सगळ्यांच्याच अंगावर काटा आला.

"सारा हे काय आहे? अगं किती जवळ आहेस तू त्या प्राण्यांच्या? तुला काही झालं असतं तर?" तिची आजी काळजीने म्हणाली.

"नाही आजी. मी काही एवढी जवळ नव्हते. ती सगळी कॅमेऱ्याची कमाल आहे. आम्ही सगळे सुरक्षित अंतरावर होतो. जंगलात अश्या लढाई होत असतात. एवढं घाबरायचं नसतं." सारा म्हणाली.

"तरीही. तुला काही दुखापत झाली असती म्हणजे? म्हणूनच माझा विरोध आहे तुला." तिची आजी ठामपणे म्हणाली.

"अगं आजी तिथे सुरक्षेसाठी वन अधिकारी होते ना. शिवाय आम्ही काय चालत गेलो नव्हतो, जीपमध्ये होतो. त्यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी हत्यारं पण होती. सहसा नाही होत काहीच दुखापत. आम्ही सुरक्षित अंतर ठेवून असतो." सारा तिला समजावत म्हणाली.

त्यावर तिची आजी काहीही बोलली नाही. तो व्हिडिओ पूर्ण झाला.

"यात काय झालं होतं माहितेय? मला त्या पिल्लांची खूप काळजी वाटत होती कारण ती पिल्लं आपल्या आईला लागलं आहे म्हणून गांगरून गेली होती म्हणून मी पार्टी बॉम्ब फोडला. त्या आवाजाने ती सगळी रान कुत्री पळून गेली पण आपण निसर्गाच्या नियमात अशी ढवळाढवळ करू शकत नाही म्हणून मला सर ओरडले. माझ्याही चूक लक्षात आली आणि मी पुन्हा असं करणार नाही असं सांगितलं सरांना. त्यांनतर मग त्यांनी मला समजावलं आणि मग आम्ही पुढची कामं केली. कदाचित यामुळे माझे मार्क्स कापले गेले असते पण सरांना माझे फोटो, व्हिडिओ आवडले आणि तो घरी न कळवण्याचा टास्क होता त्यात मी त्यांच्या अपेक्षे प्रमाणे तुम्हाला मेसेज ठेवला म्हणून माझं सिलेक्शन झालं." सारा म्हणाली.

क्रमशः.....
********************************
साराची आई तर मनातून साराला पाठिंबा द्यायला हवा असा विचार करतेय पण तिची आजी काय निर्णय घेईल? साराला आफ्रिकेला जायला मिळेल? कसा असेल तिचा पुढचा प्रवास? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all