लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३०)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -३०)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                            तू रडतेस?

साराचा तर सगळाच उत्साह एका झटक्यात उतरला होता. तिने तिथे असतानाच आजीला आपण हे फोटो दाखवून बिबट्यांची नावं सांगायची, आईला सांगायचं की बघ आई ही पिल्लं आहेत ती आमच्या दोघांसारखीच त्यांच्या आईला त्रास देत होती. मला सरांनी असे फोटो काढायला सांगितले, मी त्यांना आपल्या देशाच्या परंपरा कश्या शास्त्रीय आहेत? हे सांगू पाहत होते. असं सगळं ठरवलं होतं. साराच्या मनात हेच विचार आले आणि आत्ता हे भलतंच घडतंय म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं.

"सारा आम्ही काही चुकीचं बोललो का? सांग. अगं मान्य तुझ्या सरांनी परीक्षा घ्यायला तुला घरी काहीही कळवू नकोस म्हणून सांगितलं पण त्या तेवढ्या वेळात आमच्या मनात काय काय विचार येऊन गेले असतील? याचा तरी विचार कर. अगं आम्ही पोलिस स्टेशनमध्ये जाणार होतो तक्रार करायला." तिची आई म्हणाली.

"आई मी तुम्हाला इथून जातानाच सांगून गेले होते ना माझं काम असं आहे की कधी कधी संपर्क होऊ शकणार नाही. तरीही एवढी काळजी का करायची? शी! मी काय ठरवून आले होते आणि इथे झालं काय!" सारा नाराज होत तिथेच बसली.

"तुला एवढं सगळं सोपं वाटतं का? आजचं जग कसं आहे हे तुला वेगळं सांगायला नको. आजी देवळात गेली होती तेव्हाही तिला बाकीच्यांकडून खूप काही ऐकून घ्यावं लागलं सारा तुझ्यामुळे." तिची आई म्हणाली.

"काय केलं मी असं म्हणून तुम्हाला ऐकून घ्यावं लागतंय? सगळे जसं काम करतात तसंच मी करतेय. कुठे दरोडे घालायला जात नाहीये ना? अगं आई आपल्या देशात पण आहेत वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पण ते खूप कमी आहेत विशेषतः मुली! अगं कदाचित तुम्ही सगळ्यांनी माझी साथ दिली तर तो इतरांना आदर्श नसेल का? लोक काय थोडे दिवस बोलतील आणि गप्प बसतील." सारा म्हणाली.

"सारा गप्प बस. आत्ता आम्ही तुला काही म्हणालो का? फक्त आमच्या या अटी मान्य कर ना." तिची आजी मध्येच म्हणाली.

"अच्छा? या अटी मान्य केल्या ना तर मला दुसऱ्याच दिवशी घरी बसावं लागेल हे मला माहीत आहे. अगं आजी लहान असताना चालताना आपण पडलो म्हणून चालायचं सोडतो का? किंवा सायकल शिकताना कितीवेळा गुडघे फोडून घेतलेले असतात म्हणून पुन्हा सायकलला हात पण लावत नाही का? तसंच आहे हे. मी असं म्हणत नाहीये की दरवेळी तुम्हाला मी असं कळवू शकणार नाही पण तिथल्या जंगलात जर नेटवर्कच नसेल किंवा फोन बंद पडला किंवा काही नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यात वेळ गेला तर मी काय करू शकणार आहे? तुम्हीच तुमच्या मनाची तयारी करा ना." सारा तिच्या आजीला समजावत म्हणाली.

"आई अगं सारा म्हणते ते बरोबर आहे." विराज म्हणाला.

"तू मध्ये बोलू नकोस. थांब जरा." साराची आजी म्हणाली आणि तिने साराच्या आजोबांना पण बोलण्यापासून थांबवलं.

"सारा बघ तुझ्याकडे हे दोनच मार्ग आहेत एकतर तू या अटी मान्य करून काम कर किंवा आत्ताच काम सोड." तिची आजी ठामपणे म्हणाली.

या सगळ्याचा सारा सोबतच तिच्या आईला सुद्धा त्रास होत होताच. तिलाही तिच्या मुलीचं सुख हवं होतं पण त्यापेक्षा तिची काळजी मोठी झाली होती म्हणून तीही साराच्या आजीला पाठिंबा देत होती.

"जाऊदे! मला आत्ता काही बोलायचं नाहीच आहे. मी काय ठरवून आले होते आणि काय झालं? सगळा मूड ऑफ केला माझा." सारा नाराज होत म्हणाली आणि तिथून उठून देवा समोरचं लेटर घेऊन स्वतःच्या खोलीत गेली.

"आई, आजी अगं का असं केलं? आजी ती आजच, आत्ताच आली होती ना? तिचं सगळं ऐकून तरी घ्यायचं होतं." समीर म्हणाला.

"असुदे! तिला आत्ता त्रास झाला तरीही तिच्या लक्षात येईलच आम्ही का तिला असं सांगितलं ते. थोड्यावेळात होईल ती शांत." तिची आजी म्हणाली.

"आई तू तरी साराशी जाऊन बोल ना. अगं तिला किती वाईट वाटत असेल आत्ता? आज तिच्या हातात एवढ्या मोठ्या संधीचं जॉईनिंग लेटर आहे आणि घरी तिला काय ऐकायला मिळतंय? तर हे काम सोड म्हणून? आई लहानपणापासून साराला यातच संपूर्ण आयुष्य व्यतीत करायचं आहे हे आपल्याला माहीत होतं ना? मग ती तिच्या स्वप्नांच्या एवढ्या जवळ पोहोचल्यावर का तिला पुन्हा मागे फिरायला लावायचं?" समीर म्हणाला.

"आई! विशाखा! समीर जे बोलतोय ते बरोबर आहे. साराच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतल्यासारखं आहे हे." विराज म्हणाला.

"कांता खरंतर यात सगळी चूक तुझी आहे. ती विशाखा तिच्या मनाची तयारी करत होती पण तूच तिच्या मनात नाही नाही ते विचार कालवले. अगं आजचं जग किती पुढे चाललं आहे? सारा म्हणते त्यात तथ्य आहे. ती काय कुठे दरोडे नाही घालायला जात." तिचे आजोबा म्हणाले.

"तुम्हीही मलाच बोला. काल विशाखाची काय अवस्था झाली होती हे आपण बघितलं ना? तिच्याच काळजीपोटी बोलतेय ना मी?" साराची आजी म्हणाली.

एवढ्यात दारावरची बेल वाजली. समीरने जाऊन दार उघडलं.

"अरे राघव ये ना." समीरने त्याला स्मित करून आत घेतलं.

"दादा सारा कुठे आहे? तिचा आज रिझल्ट येणार होता ना?" त्याने आत येता येता विचारलं.

घरात आल्यावर त्यालाही नक्कीच काहीतरी झालं आहे असं जाणवलं आणि म्हणून पुढे काहीही न बोलता तो गप्प बसला.

"बाबा मी साराला बोलावून आणतो." समीर म्हणाला आणि तो साराला बोलवायला तिच्या रूममध्ये गेला.

दार उघडचं होतं. तो आत गेला. सारा ते लेटर हातात घेऊन पुन्हा पुन्हा त्यावरून हात फिरवत ते वाचत होती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले पण दादाची चाहूल लागताच तिने तोंड फिरवून पटकन डोळे पुसले.

"सारा अगं राघव आला आहे चल बाहेर." तो म्हणाला.

"कशाला? इथे माझ्याच घरचे मला सपोर्ट करत नाहीयेत हे सांगायला? तू जा आत्ता. मला नाही बोलायचं कोणाशीच." ती रागाने म्हणाली.

तिचा आवाजही बऱ्यापैकी मोठा होता त्यामुळे बाहेर बसलेल्या सगळ्यांनाच ते ऐकायला जात होतं.

"सारा अगं हळू बोल. बाहेर राघव आला आहे त्याला काय वाटेल? आजीला आपण समजावू ना! तू का काळजी करतेस?" समीर तिला म्हणाला.

"दादा मला आत्ता काहीच समजत नाहीये प्लीज तू जा. मला थोडावेळ एकटीला राहू दे." सारा म्हणाली आणि बेडवर जाऊन त्याच्याकडे पाठ फिरवून बसली.

समीरचा आता नाईलाज होता. तो काहीही न बोलता तिथून निघाला. साराच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि म्हणूनच ती अशी वागत होती. तिने जे ठरवलं होतं त्यातलं काही होतच नव्हतं शिवाय तिने एवढी मोठी संधी रक्ताचं पाणी करून मिळवली होती त्याचंही कौतुक तिला मिळत नव्हतं म्हणून तिला जास्त वाईट वाटत होतं. समीर हताश होऊन हॉलमध्ये आला.

"काय झालं समीर? सारा का ओरडत होती?" तिच्या बाबांनी काळजीने विचारलं.

"काय कारण असणार बाबा? तिला खूप वाईट वाटतंय. अहो आपली सारा एवढी टॉम बॉय आहे, तिला कधी हताश झालेलं पाहिलं नाही पण आज ती पूर्ण तुटली आहे." समीर म्हणाला.

"काका तुमची परवानगी असेल तर मी एकदा बोलू का तिच्याशी?" राघवने विचारलं.

"हो राघव त्यात परवानगी कसली? ती उलट तुझ्याशी नीट बोलेल. जा तू तिच्या खोलीत." तिचे बाबा म्हणाले.

राघव लगेच आत गेला. निदान तिच्या मित्राशी बोलून तरी तिला बरं वाटेल म्हणून तिच्या बाबांनी त्याला आत पाठवलं.

"आजी एरवी मी तुला कधीच काहीच बोलत नाही पण आज तू असं बोलायला नको होतं. सारा खूपच दुखावली गेली आहे. अगं ती आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काय तेज होतं, तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती पण आत्ता? आत्ता ती बघ रूममध्ये जाऊन कशी निस्तेज बसली आहे." समीर म्हणाला.

यावर त्याची आई काहीही बोलली नाही. आता सगळी भिस्त राघववर होती.

"साराऽ आत येऊ?" राघवने दारातूनच विचारलं.

तेव्हाही सारा रडतच होती तिने पटकन डोळे पुसले आणि नुसतं; "हम्म." केलं.

"सारा तू रडतेस?" राघवने आश्चर्याने विचारलं.

"नाही." ती कसाबसा हुंदका दाबून म्हणाली.

आता पुन्हा उगाच तिला अजूनच वाईट वाटायला नको म्हणून राघवने विषय बदलायचं ठरवलं.

"सारा अगं तुझा रिझल्ट काय आला? आणि सगळ्यांना फोटो दाखवणार होतीस ना? दाखव ना." तो तिचा मूड ठीक करण्यासाठी म्हणाला.

"कोणाला रस आहे का त्यात? उगाच कशाला? जाऊदे. मला ना कोणाशी बोलायचं नाहीये." सारा म्हणाली.

"सारा अगं एवढी चिडू नकोस ना. सगळ्यांना तू काढलेले फोटो बघायचे आहेत." राघव म्हणाला.

"असं असतं ना तर आजीने मला एवढं ऐकवून नसतं दाखवलं." सारा नाराजीने म्हणाली.

"सारा अगं मित्र म्हणून एक सांगू? बघ मलाही आधी मिमिक्री करायला माझ्या बाबांचा विरोध होता, कारण कामाची शाश्वती नाही. आपले आजी, आजोबा, आई, बाबा हे सगळे वेगळ्या पिढीतले आहेत त्यांना मोजक्या करीअरबद्दल माहीत आहे आणि त्यातच एक सिक्युरिटी आहे असं त्यांना वाटतं. आपण त्यांना समजावून सांगायचं असतं. आपणच जर असे नाराज होऊन बसलो, त्यांच्यावर चिडलो तर मग त्यांना आपली बाजू कशी कळेल?" राघव म्हणाला.

"तुला काय वाटतंय मी यातलं काहीच केलं नाही? अरे उलट बाबा, दादा आणि आता आजोबा पण मला सपोर्ट करतायत पण आजी आणि आई अडून बसल्यात. त्यांनी मला काय अटी घातल्या आहेत माहितेय? एक म्हणजे मी त्यांना वेळोवेळी संपर्क करून मी कुठे आहे?, कशी आहे?, किती दिवस तिथे राहावं लागेल? याची बातमी द्यायची आणि दुसरी म्हणजे जर या कामामुळे माझ्या तब्येतीवर परिमाण झाला तर मी हे काम सोडून इव्हेंट मॅनेजमेंट करायचं. म्हणजे इथे माझ्या स्वप्नांचा विचारच कोणी करणार नाहीये का? अरे आपण चालताना धडपडलो तर चालणं सोडतो का?" सारा म्हणाली.

याच सगळ्या विचारांनी तिचं डोकं आता फुटायची वेळ आली होती.

क्रमशः....
****************************
कधी नव्हे ते साराच्या डोळ्यात आज पाणी आलं आहे. तिला तिच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागेल का? राघव तिचा मूड ठीक करू शकेल? काय होईल पुढे? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all