Login

लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२)

Story Of Girl Who Wants To Achieve Her Dreams. Wants To Achieve Something New.
लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
****************************
                     काहीतरी शिजतंय

समीर साराला पूर्णपणे समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण तिचं ध्येय तिला शांत राहू देत नव्हतं. काहीही करून तिला तिचं स्वप्न साकारताना बघायचं होतं. ती तोंड पाडूनच मोबाईल बघत बसली होती आणि अचानक तिला काहीतरी आठवलं.

'ओह नो! मी हे कसं विसरू शकते? मी तर लिमका बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी फॉर्म भरला होता. आता काय करू?' अचानक सारा मनातच विचार करत होती.

तिला आता तिच्या दादाला सुद्धा काही सांगण्यात अर्थ नाही हे माहीत होतं. ज्याला तिने कायम सपोर्ट केला होता; असा दादा आज तिलाच सपोर्ट करत नव्हता.

'मला या सगळ्यांची काळजी तर लक्षात येतेय, पण माझ्यासारखे अजून बरेच आहेत ना या क्षेत्रात? कसं समजावू आता मी सगळ्यांना? मला या वर्ल्ड रेकॉर्डसाठी तर जायचंय. आत्ता नाही, तर कधीच नाही. काहीतरी थाप तर मारावी लागेल.' सारा तिच्याच विचारत होती.

समीर आपला गप्प बसून टीव्ही बघत होता. साराने हळूच त्याच्याकडे बघितलं.

'बरं झालं दादा हॉटेल मॅनेजमेंटच्या इंटर्नशिपमध्ये बिझी होता आणि त्यावरच त्याचं पुढचं करिअर ठरणार होतं. त्याला माझ्यामुळे हे लिमका बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच टेंशन वाढायला नको म्हणून सांगितलं नव्हतं आणि नंतर विसरून गेले. नाहीतर अंधारात राहून त्याला सगळंच सांगून बसले असते तर एक थाप मारून जायची आशा आहे तीही मावळली असती.' सारा मनातच म्हणाली.

सारा त्याच्याकडे बघतेय ते समीरला समजलं आणि त्याने टीव्ही बंद केला.

"काय गं? असं का बघत होतीस?" समीरने विचारलं.

"काही नाही. मला वाटलं होतं निदान तू तरी मला पाठिंबा देशील. पण.... असो! मी आहे माझ्या रूममध्ये." सारा म्हणाली आणि रूममध्ये गेली.

'सारा मलाही कळतोय तुझा हेतू. सॉरी सारा, पण मला नाही वाटत मी तुला यात काही मदत करू शकेन. तुला आत्ता समजत नाहीये पण हे काम खूप कठीण आहे. त्यातही एका मुलीसाठी जास्तच. तुला कुठे माहीत आहे बाहेरचं जग कसं आहे?' समीर मनातच म्हणाला.

सारा सतत येरझाऱ्या घालत होती. आज आईने ज्या आवेशात आपल्याला नकार दिला आहे ते बघता ती या वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुद्धा नकारच देणार हे तिला माहीत होतं. थोडावेळ येरझाऱ्या घालून ती आरश्यासमोर बसली.

'लहानपणापासून मला यातच करिअर करायचं आहे. सगळ्यांच्या मनातली काळजी मला कळतेय पण रिस्क घेतली नाही तर मी पुढे कशी जाणार? नाही! मला जर माझं स्वतःचं प्रतिबिंब स्वतःच्याच नजरेत उंचावलेलं बघायचं असेल तर काहीतरी करावं लागणार. असं स्वस्थ बसून चालणार नाही.' साराने काहीतरी विचार केला.

तिने सारासार विचार करून काहीतरी ठरवलं तर होतं पण आता ते कृतीत कसं आणायचं? याची योजना आखत ती तिच्या रूममध्ये लावलेल्या फोटोवरून हात फिरवत होती. आता थांबून चालणार नाही हे तिला माहीत होतं.

'मी माझे पूर्ण प्रयत्न करणार आहे. परवा मला जराही न थांबता सतत सहा तास फोटोशूट करायचं आहे. त्यांच्या टीममधून दोन, तीन माणसं माझ्या बरोबर असणार आहेत.' सारा मनातच सगळा विचार करत होती.

आता न थांबता शूट करायचं म्हणजे पूर्ण प्लॅन करूनच जावं लागणार हे तिला माहीत होतं. साराने त्यांचा दुसरा पर्याय निवडला होता, ज्यात नवीन रेकॉर्ड आपण तयार करायचा होता. सगळे डिस्क्लेमर, नियम व अटी पूर्ण वाचून सही केलेले पेपर्स तिने सबमिट करून झाले होते.

'तसंतर मला फोटोशूट करताना तहान, भुकेची काहीही जाणीव नसते आणि दिवसभरासाठी मी बाटलीत ताक ठेवणार आहे. त्याने जेवण केलं नाही तरीही मला कसला त्रास होणार नाही आणि बॉडी पण हायड्रेटेड राहील.' सारा स्वतःशीच म्हणाली.

ती एक एक करून सगळे मुद्दे लक्षात घेऊन काय काय करायला हवं? याची मनात उजळणी करत होती.

'आता ताडोबाला सहा तासात मी वाघाचे दिवसभरात वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो काढणार आहे म्हणजे त्याच्या अभ्यासाला सुद्धा लागायला हवं.' सारा म्हणाली.

तिने तिच्या सेफ्टीची पण तयारी करून ठेवली होती. हत्तीची सफर करता करता थोडं काम होणार होतं आणि तिथले काही ऑफिसर्ससुद्धा तिच्या सोबत असणार होते.

साराने मनातच हे विचार करून स्वतःलाच 'बेस्ट लक' दिलं.

एवढ्यात तिला कोणीतरी आल्याची चाहूल लागली म्हणून ती काहीही झालं नाहीये असे भाव चेहऱ्यावर आणून मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली.

"आई, काय आणलंस बाजारातून?" साराने विचारलं.

"सरप्राइज आहे. संध्याकाळी समजेल." आई म्हणाली.

आईच्या बोलण्यावरून तरी ती आता नॉर्मल झाली आहे असं तिला जाणवलं.

"अगं आई! मला एक सांगायचं आहे." सारा म्हणाली आणि आईकडे तिने पाहिलं.

आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की, पुन्हा ते फोटोग्राफीबद्दल बोलणं नकोय. ते साराने बघितलं पण आपल्याला काहीही समजलं नाही असे भाव आणून ती बोलू लागली; "आमच्या सगळ्यांचा आत्ताच प्लॅन झाला आहे. म्हणजे मी आणि माझ्या काही कॉलेज फ्रेंड्स मिळून ताडोबाला जायचा प्लॅन करतोय."

"सारा! आई आहे मी तुझी. खरं सांग काय प्रकरण आहे? अचानक तेही ताडोबा का? अजिबात नाही जायचं." तिने जरा संशयाने विचारलं आणि सरळ नकार दिला.

"अगं आई खूप दिवसापासून सुरू होतं जायचं म्हणून. उद्याचा मुहूर्त लागला बघ." सारा म्हणाली.

त्यांचं बोलणं सुरु असताना समीर तिथे आला. आई नकारच देत होती.

"सारा एकदा नाही म्हणून सांगितलं आहे. फोटोच्या नादात तुझं आजूबाजूला लक्षसुद्धा राहत नाही." आई म्हणाली आणि ती तिच्या रूममधून बाहेर गेली.

समीरने साराला गप्प राहायचा इशारा केला आणि तो आईच्या मागे गेला.

"काय झालं आई? काय म्हणत होती सारा?" तो विचारत होता.

"तिला ताडोबाला फ्रेंड्स सोबत फिरायला जायचं आहे." आई म्हणाली.

"अच्छा!" समीर फक्त एवढंच म्हणाला.

"मला साराला नाही जाऊ द्यायचं. आपली सारा मोठी झाली असली तरीही तिच्यातला बालिशपणा अजून तसाच आहे. वय १९ आहे म्हणून सज्ञान आहे नाहीतर अजूनही ती पुढचा मागचा कसलाच विचार न करता वागते." आई म्हणाली.

"अगं आई याला बालिशपणा नाही म्हणत. आपली सारा खूप धीट आहे आणि वेळ आलीच तर ती खूप जबाबदारीने पण वागते. हा फक्त आपल्या घरातलं शेंडेफळ म्हणून थोडं हट्टी आहे." समीर म्हणाला आणि दोघं हसायला लागले.

"बरं चल मी जरा पडते." त्याची आई म्हणाली आणि ती तिच्या रूममध्ये गेली.

साराने बरेच प्रयत्न करूनही आई काही तयार होत नव्हती म्हणून 'संध्याकाळी बाबा घरी आल्यावर यावर बोलू' असा विचार तिने केला.

समीर साराच्या रूममध्ये गेला.

"काय झालं? तू का आलास आता?" साराने नाराजीने विचारलं.

"सारा खरं सांग, तुझ्या डोक्यात काय शिजतंय नक्की?" त्याने संशयाने विचारलं.

"खोटं वाटत असेल ना तर घे हा वैशालीचा नंबर. फोन कर तिला आणि विचार." सारा रागाने म्हणाली.

आता काही बोलण्यात उपयोग नाही आणि उगाच वाद नको वाढायला म्हणून तो बाहेर गेला.

सारा आता कधी एकदा संध्याकाळ होतेय? याची वाट बघत बसली होती. संध्याकाळ झाली तसा स्वयंपाक घरातून मस्त सुवास संपूर्ण घरभर दरवळत होता पण एरवी लगेचच आई नक्की काय करतेय? हे बघायला जाणारी सारा आज तिच्याच विचारात हॉलमध्ये येऊन बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती.

"काय गं सारा? तुला बरं आहे ना?" तिच्या आजोबांनी विचारलं आणि ती भानावर आली.

"हो. मला काय झालंय?" तिने उत्तर दिलं.

"नाही म्हणलं आज आई काहीतरी स्पेशल करतेय आणि तू तिथे न घुटमळता इथेच बसली आहेस म्हणून विचारलं." आजोबा म्हणाले.

"काही नाही असंच." सारा म्हणाली.

तेवढ्यात तिचे बाबा आले आणि तिची कळी खुलली.

"बाबाऽ द्या तुमची बॅग ठेवते." ती धावतच दाराजवळ गेली आणि त्यांच्या हातातून बॅग घेतली.

"काय गं? आज इतकं प्रेम का उतू जातंय?" तिच्या बाबांनी शूज काढता काढता विचारलं.

"काही नाही. असंच." सारा म्हणाली आणि ती आत पळाली.

"काय ओ बाबा नक्की काय झालंय हिला?" साराच्या बाबांनी (विराजने) विचारलं.

"काय माहित? नक्कीच काहीतरी डोक्यात शिजतंय एवढं खरं." तिचे आजोबा म्हणाले.

एवढ्यात किचनमधून समीर आणि त्याची आई बाहेर आले.

"विराज आलास तू? पटकन फ्रेश होऊन ये आत्ता नाश्त्याला मी आणि समीरने मिळून मस्त बेत केला आहे." विशाखा (साराची आई) म्हणाली.

सगळे डायनिंग टेबलवर येऊन बसले. आज बऱ्याच दिवसांनी घरात दही काचोरीचा बेत केला होता. सारा आणि विराजचा विक पॉइंट म्हणजे दही कचोरी. विराज तर ते बघून खुश झाला पण आज सारा मात्र शांत आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं.

"काय झालं आज माझ्या साराला? गप्प का आहे आमचं लाडकं शेंडेफळ?" विराजने विचारलं.

तिच्या आईने दिवसभर साराने जे प्रताप केलेले ते सांगितले. ते ऐकून तिचे बाबा हसायला लागले.

"तू सगळं हसण्यावारी नेतोस म्हणूनच तुझी लेक बिघडत चालली आहे." साराची आजी म्हणाली.

"अगं आई काहीही काय? सारा लहान आहे अजून." विराज म्हणाला.

"लहान? अरे हिच्या वयाची असताना माझं लग्न होऊन मला तू झाला होतास." तिची आजी म्हणाली.

"अगं आई तो काळ वेगळा, हा काळ वेगळा. ते जाऊदे. सारा, असं तोंड पाडून नको ना बसू. तुला नेहमी हसताना बघायची सवय आहे." तिचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाले.

"मी हसेन पण एका अटीवर." सारा म्हणाली.

"तुझ्या एका स्माईलसाठी सगळं मंजूर." ते म्हणाले.

"विराज आधी तिचं ऐकून घे, काहीही प्रॉमिस करू नकोस." तिची आई म्हणाली.

विराजने फक्त हातानेच तिला खूण केली आणि तो साराचं काय म्हणणं आहे? हे ऐकू लागला.

"बाबा मी आणि माझे फ्रेंड्स उद्या ताडोबाला जायचं म्हणतोय. आई जायला नाही म्हणतेय." साराने सांगितलं.

"अगं अचानक काय ठरलं तुमचं?" विराजने विचारलं.

"खूप आधी पासून ठरवत होतो आम्ही पण उद्याचा मुहूर्त लागला. उद्या जाऊ, तिथे एका मैत्रिणीच्या रॉ हाऊसवर राहू, परवा फिरू आणि त्याच रात्रीपर्यंत घरी." साराने सांगितलं.

"अच्छा! आधी खा मग बोलू." विराज म्हणाला.

क्रमशः.....
*****************************
साराने वर्ल्ड रेकॉर्डसाठी थाप तर मारली आहे पण ते घरी समजलं तर? तिला तिथे जाण्याची परवानगी मिळेल? सारा तिचा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड तयार करू शकेल? तिच्या करिअरसाठी हे महत्त्वाचं पाऊल असेल तर यात तिला कितपत यश येईल? ती जर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून करिअर करू इच्छिते तर तिच्या मार्गात जे अडथळे येतील ते ती कसे दूर करेल? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all