Login

लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२९)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२९)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                        होम स्वीट होम

कॅरलॉन सर साराच्या हातात फ्लाईटच तिकीट देऊन बाहेर आले. सारा तिचं आवरण्यात व्यस्त होती.

'सारा! अॅट लिस्ट आय वॉन्ट यू टू बी प्रोफिशियंट इन धिस वर्क. आय थिंक यू शुड एंड माय एक्सपिरियन्स विथ इंडियन गर्ल्स टील डेट. आय नो देअर इज अ बिग डिफरन्स बीटविन यू अँड रेस्ट ऑफ द गर्ल्स. नाऊ जस्ट प्रूव्ह युअरसेल्फ बाय मास्टरिंग इट. मेबी यू कॅन बी अॅन इंस्पिरेशन टू अदर गर्ल्स अँड देअर पॅरेंट्स.' सर मनातच म्हणाले.

त्यांना सारा काहीतरी वेगळं करू शकते हे जाणवलं होतं. आजवर त्यांच्याशी एवढ्या आत्मविश्वासाने आणि स्वतःचे मुद्दे एवढ्या व्यवस्थितपणे मांडून बोलणारे कोणीही नव्हते. साराने त्यांच्याकडे शिकत असताना सुद्धा आपल्या देशाची मान खाली जाणार नाही याची काळजी घेतली तर होतीच, शिवाय ती आपला देश कसा बरोबर आहे आणि सगळ्या रुढी, परंपरांना कसा शास्त्रीय आधार आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न ती करत होती हे सरांच्याही लक्षात येत होतं. थोडावेळ ते तिथेच बाहेर थांबले आणि त्यांच्या रूममध्ये गेले. साराला तर उद्या आपण घरी जाणार आहे, सगळ्यांना हे लेटर दाखवणार, फोटो दाखवणार आणि इथे जे काही घडलं त्याचे अनुभव सांगणार या विचारांनी झोपच येत नव्हती. तिला कधी एकदा आपण घरी पोहोचू आणि सगळं काही सांगू असं झालं होतं. कशीबशी बऱ्याच उशिराने तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने सगळं आवरलं. ती तिच्या कॅमेऱ्यात ग्लिची आणि तिच्या पिल्लांचे फोटो बघत होती. घरी जायचं असलं तरीही तिचा जीव त्या पिल्लांमध्ये सुद्धा अडकला होता. थोडावेळ असाच गेल्यावर तिने घरी फोन करून ती निघत असल्याचं सांगितलं. घरच्यांच्या सूचना ऐकून तिने फोन ठेवला.

"सरऽ" सारा सरांच्या रूम बाहेर येऊन त्यांना हाक मारत होती.

"गूड मॉर्निंग. आर यू रेडी?" सरांनी विचारलं.

"गूड मॉर्निंग सर. येस सर आय एम रेडी. मै अभी निकल रही हूॅं |" सारा म्हणाली.

"ओके. हॅपी जर्नी." सर म्हणाले आणि हात पुढे केला.

साराने त्यांना हस्तांदोलन केले आणि वाकून नमस्कार केला.

"व्हॉट्स इट इज?" सरांनी एकदम गोंधळून विचारलं.

"सर आप मेरे गुरू है | ये तीन चार दिनो में आपसे बहुत कुछ सीखा है और आगे भी सिखने को मिलेगा इसलिये आपके आशीर्वाद लिये | यही भारत की संस्कृती है | बडो़ के, गुरूजनो के आशीर्वाद से हर कार्य यहाँ किया जाता है |" सारा म्हणाली.

"ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेस यू. मीट यू सून." सर म्हणाले आणि सारा "थँक्यू" म्हणून तिथून निघाली.

रांचीला आल्यावर एकदा तिने घरी फोन करून कळवलं. बघता बघता ती मुंबईला पोहोचली सुद्धा. दुपार होऊन गेली होती आणि समीर तिला घ्यायला आला होता. सबंध रस्ताभर साराची बडबड ऐकत दोघं घरी पोहोचले.

"आईऽ सारा आली बघ." समीरने आईला हाक मारून सांगितलं.

"साराऽ बाहेरच थांब. आले मी." तिची आई म्हणाली.

समीरने तिची बॅग आत नेली आणि सारा तिथेच उभी होती. साराच्या आईने तिच्या पायावर पाणी घालून तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि तिला आत घेतलं.

"बाबाऽ आय मिस यू. तुम्हा सगळ्यांना मी तिथे खूप मिस केलं." सारा आत गेल्या गेल्या तिच्या बाबांना बिलगली.

"मी पण तुला खूप मिस केलं. इन्फॅक्ट आम्ही सगळे तुला मिस करत होतो. तुझी बडबड नव्हती ना घरात." तिचे बाबा म्हणाले.

"फायनली घरी आले. होम स्वीट होम. अहाहा..." सारा म्हणाली आणि सोफ्यावर आरामात बसली.

खूप दिवसांनी असं आरामात तिला बसायला मिळालं होतं. सोफ्यावर आळस टाकून ती पुन्हा उत्साहात बोलू लागली; "आईऽ, बाबा तुम्हाला माहितेय मला तिथे खूप मजा आली. तिथे ना मी खूप फोटो काढलेत. सरांना पण माझं काम...." सारा बोलत होती पण तिला मध्येच तोडत तिची आई बोलू लागली; "सारा अगं आधी जा ना फ्रेश हो. एवढ्या लांबून प्रवास करून आली आहेस आणि इथेच काय सरळ सरळ सोफ्यावर बसतेस? जा बघू आधी. आम्ही कोणीही इथून पळून चाललो नाहीये. ऐकणार आहोत तुझं. जा.." तिची आई तिला ओरडली.

"हो मी येते फ्रेश होऊन. आजी तुझ्यासाठी खास सरप्राइज आहे. थांब मी येऊन दाखवते." ती बोलता बोलताच आत गेली.

"आई सारा खूप आनंदात आहे. तिने येता येता मला बरंच काही सांगितलं. तू आणि आजी उगाच तिला अडवू नका. तिच्या आनंदावर उगाच विरजण नको पडायला." समीर म्हणाला.

"हो विशाखा. समीर बरोबर बोलतोय. आपण तिला समजून घेऊया. आईला मी समजावेन हवं तर." विराज म्हणाला.

त्यावर ती काहीही बोलली नाही. थोड्याच वेळात सारा तिचं आवरून बाहेर आली.

"सारा चल बघू आधी काहीतरी खाऊन घे मग बडबड कर." तिची आई म्हणाली.

"अगं आई आत्ता नको. संध्याकाळ होतच आली आहे तर नंतर नाश्ता करते. तसंही मी प्रवासात खाल्लं आहे आणि हो! मी राघवला आज घरी बोलावलं आहे. तुम्हाला सगळ्यांना फोटो दाखवता दाखवता त्यालाही दाखवता येतील ना म्हणून." सारा म्हणाली.

बोलता बोलता तिने तिच्या सॅकमधून सरांनी तिला दिलेलं लेटर बाहेर काढलं.

"आई, बाबा! हे घ्या. मी पास झाले आणि सरांनी मला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी दिली आहे. यात माझं जॉइनिंग लेटर आहे." सारा तिच्या आई बाबांच्या हातात ते लेटर देत म्हणाली.

तिच्या बाबांनी ते उघडलं आणि दोघांनी मिळून वाचलं.

"आय एम प्राउड ऑफ यू सारा." तिचे बाबा आनंदाने म्हणाले.

"सारा अभिनंदन." तिची आई म्हणाली.

अचानक तिच्या आईने तिचं अभिनंदन केलं म्हणून समीरनेही तिच्याकडे आश्चर्याने बघितलं.

"थँक्यू." सारा गोड स्मित करत म्हणाली.

"जा आधी हे लेटर देवासमोर ठेव आणि आजी आजोबांना नमस्कार कर." तिची आई म्हणाली.

साराने लगेच लेटर देवा समोर ठेवलं आणि आजी आजोबांना नमस्कार केला. आज तिला तिची आजी एकदम शांत शांत वाटत होती.

"आजी काय झालं? तू गप्प गप्प का आहेस? तुला अजूनही मी हे काम करतेय ते पटत नाहीये का?" साराने विचारलं.

"तू माझं ऐकणार तर नाहीच ना? मग कशाला विचारतेस?" तिची आजी म्हणाली.

"आजी अगं नको ना अशी चिडू. अगं तुला माहितेय त्या लेटरमध्ये सरांनी लिहिलं आहे की मला पुढच्या महिन्यात आफ्रिकेच्या जंगलात जायचं आहे. मला तिथे काम करण्याची संधी मिळणार आहे." सारा आनंदाने म्हणाली.

"सारा अगं तू दोन दिवस आमच्या नजरेसमोर नव्हतीस तर काय अवस्था झाली होती आमची माहीत आहे का? त्यात तुझा काल काहीही संपर्क होत नव्हता तेव्हा तर विशाखा चक्.." तिची आजी बोलत होती पण समीरने तिला मध्येच अडवलं आणि तो बोलू लागला; "अगं सारा तू काढलेले फोटो दाखव ना. आजीला काहीतरी सरप्राइज पण देणार होतीस ना? तेही सांग."

"दादा एक मिनिट थांब. आजी तू बोल आईला काय? काय झालं होतं आईला?" साराने काळजीने विचारलं.

ती ज्या पद्धतीने विचारत होती त्यावरून तरी ती आता बाकी कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही हे स्पष्ट कळत होतं.

"अगं तुझ्या काळजीपोटी विशाखाला चक्कर आली होती. ती बेशुद्ध झाली होती. तुला चांगलंच माहित आहे तुझ्या आईला टेंशन घेतलं की खूप त्रास होतो तरीही तू तिला टेंशन येईल असंच वागतेस." तिची आजी म्हणाली.

तिच्या आजीच्या बोलण्यात फक्त आणि फक्त विशाखाबद्दलची काळजी होती. दोघीही सासवा सूना असल्या तरीही एकमेकींना दोघींनी माय - लेकींसारखा लळा लावला होता. आज सारामुळे विशाखाला त्रास होतोय हे एका आईला बघवत नव्हतं म्हणूनच ती असं बोलत होती.

"आई ती आत्ताच दमून आली आहे जाऊदे." विशाखा म्हणाली.

"नाही विशाखा. तू तिच्याशी बोलणार नसशील तर मला तिच्याशी बोलू दे. आपल्या अटी मला तिला सांगू दे." तिची आजी म्हणाली.

"अटी? कसल्या अटी? आणि आपल्या म्हणजे?" साराने गोंधळून विचारलं.

"आपल्या म्हणजे मी आणि विशाखाने ठरवलं आहे जर तू या कामामुळे आम्हाला काही कळवायला चुकलीस किंवा तुला यात काही दुखापत झाली तर तू हे काम सोडून सण समारंभात फोटो काढायचे." तिची आजी ठामपणे म्हणाली.

"क.. काय? आई तू पण?" साराने विचारलं.

"हो. सारा मला तुझी खूप काळजी वाटते. काल तुझा व्हॉईस मेसेज जर मिळाला नसता तर इथे आमच्या सगळ्यांचं काय झालं असतं? हे तुला सांगायला नकोय. कालच्या त्या मेसेजमुळे तू थोडक्यात वाचली आहेस. नाहीतर.." तिची आई बोलता बोलता थांबली.

"नाहीतर मला आफ्रिकेला जाऊ दिलं नसतं असंच ना?" सारा म्हणाली.

तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तिला वाटलं होतं आज आपण घरी जाऊन सगळ्यांसोबत आनंद वाटून घ्यायचा पण इथे भलतंच काहीतरी घडत होतं.

"आई, आजी तिथून निघताना मी किती स्वप्न रंगवून आले होते. इथे येऊन मला काय ऐकायला मिळालं? तर हे काम न करण्यासाठी तुमची मतं. अगं आई तू तर आधी स्व खुशीने तयार होतीस ना? अचानक काय झालं?" साराच्या आवाजात एक जडपणा आला होता आणि ती दाटून आलेल्या कंठाने बोलत होती.

क्रमशः.....
******************************
साराने घरी आल्यावर काय काय करायचं याची स्वप्न बघितली होती ती तर तुटून गेली याचा साराच्या मनावर काय परिणाम होईल? सारा तिच्या आईला आणि आजीला कसं समजावून सांगेल? यावेळी पण कॅरलॉन सरांसोबत जे घडत आलं तेच घडेल का? त्यांच्या मनातली आपल्या देशाची प्रतिमा ढासळलेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all