लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२८)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२८)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                      जे होतं ते भल्यासाठी.

साराचा निदान व्हॉईस मेसेज तरी कानावर पडला म्हणून घरातलं तणावपूर्ण वातावरण जरा वरमलं होतं. सगळ्यांच्याच मनात जे भलते सलते विचार येऊन गेले होते त्यांना अचानक यामुळेच आळा बसला आणि सगळेच थोडे निश्चिंत झाले.

"बघ आई मी म्हणालो होतो ना? सारा बेजबाबदार वागणार नाही. अगं तिथे रेंजचा प्रॉब्लेम असेल किंवा तिच्या परीक्षेचा काहीतरी भाग असू शकतो म्हणून तिने आपल्याला फोन केला नाही. आता काळजी सोड." समीर म्हणाला.

"काळजी पूर्ण तेव्हाच मिटेल जेव्हा सारा फोनवर बोलेल." त्याची आई म्हणाली.

"विशाखा! अगं साराला पण माहीत आहे तू किती काळजी करत असतेस ते. तिने मेसेजमध्ये तुझ्यासाठी खास सांगितलं आहे काळजी करू नकोस आणि गोळी घेत जा म्हणून. ती जेव्हा घरी येईल आणि तिला कळेल की, तू अशी आजारी होतीस तर तिला किती वाईट वाटेल? आता नको जास्त विचार करुस." साराच्या आजोबांनी तिला समजावलं.

"म्हणजे? काय झालं होतं विशाखाला?" विराजने गोंधळून विचारलं.

समीरने लगेचच दुपारी जे काही घडलं ते त्याच्या बाबांना सविस्तर सांगितलं.

"काय हे विशाखा? असं नाही करायचं पुन्हा. आणि तुम्ही सगळे या गोंधळात काहीही खाल्लं नाहीये ना? थांबा मी पटकन बाहेरून काहीतरी नाश्ता ऑर्डर करतो खाऊन घ्या." विराज म्हणाला आणि त्याने हलका नाश्ता ऑर्डर केला.
******************************
इथे सारा कॅरलॉन सरांना सगळे फोटो व्यवस्थित दाखवून ते जे विचारत असतील त्याची उत्तरं देत होती. साधारण दुपारपासून सुरू असलेलं हे त्यांचं सेशन संध्याकाळपर्यंत सुरू राहिलं. साराला शूट करताना सरांनी मध्ये मध्ये ज्या टिप्स दिल्या होत्या किंवा काहीतरी खास गोष्ट सांगितली होती त्याबद्दल ते तिला विचारत होते. प्राण्यांना आपण नाव दिल्यावर हे तेच प्राणी आहेत हे कसं ओळखायचं? जंगलात ज्या खास जागा असतात त्या लक्षात कश्या ठेवायच्या आणि मुख्य म्हणजे जंगलात रात्री खूप उशीर झाला आणि अंधारात वाट शोधावी लागली तर स्वतःची सुरक्षा करून पुन्हा बेस कॅम्पजवळ कसं यायचं? याबाबतीत साराला किती ज्ञान आहे हे सर बघत होते. ते जे काही विचार होते त्याला सारा अगदी आत्मविश्वासाने आणि कुठेही सरांना टोकायला जागा मिळणार नाही अशीच उत्तरं देत होती.

"गूड! इंटरव्ह्यू अँड समरी ऑफ सेशन्स बहुत अच्छे से किया |" कॅरलॉन सर म्हणाले.

"थँक्यू सर." सारा म्हणाली.

"ये रहाॅं तुम्हारा रिझल्ट." सर तिच्या हातात एक लेटर देत म्हणाले.

ते लेटर लिफाफ्यात बंद होतं. सारा ते उघडू लागली. आपण पास झालो आहोत का? हे बघण्यासाठी तिचं मन खूप अधीर झालं होतं. तिने अगदी काळजीपूर्वक ते वाचलं. वाचताना तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, उत्सुकता आणि आनंदाचे भाव उमटले होते. अर्थातच ती पास झाली होती हे सांगायला नको. त्यात ती सरांची असिस्टंट म्हणून काम करू शकते त्यासाठीचे जॉईनिंग लेटर होते.

"थँक्यू सर." ती खुर्चीवरून उठून अगदी आनंदाने म्हणाली.

"यू आर अ फर्स्ट गर्ल हू प्रुव्ह युअर सेल्फ. वो घरपे कुछ न बताने का टास्क भी इसलिये ही था |" सर म्हणाले.

त्यांच्या या बोलण्याने सारा गोंधळली आणि तिने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर असे गोंधळलेले भाव बघून सर बोलू लागले; "हा! जो तुमने किया वही मुझे एक्सपेक्टेड था | अगर तुमने कुछ आयडिया न लगा के कॉन्टॅक्ट करने की कोशिश ही की नहीं होती तो शायद आज तुम्हारे हाथ में ये लेटर न होता |" सर म्हणाले.

त्यांच्या या वाक्याने साराच्या काळजात एकदम धस्स झालं.

"हा! मोस्ट ऑफ कँडीडेट्स कुछ ट्राय ही नहीं करते थे और कुछ ये कंडीशन सुनकर घरपे चले जाते थे | मुझे यही देखना था की, तुम उन सबसे अलग हो की नहीं |" सर म्हणाले.

यावर साराने फक्त स्मित केलं.

'बरं झालं आजीच्या भीतीमुळे आणि आईच्या काळजीने काहीतरी हात पाय मारले. हे सुचलं नसतं तर माझं स्वप्न स्वप्नच राहिलं असतं. आजी म्हणत असते जे होतं ते भल्यासाठी हे आज पटलं.' सारा मनातच म्हणाली.

"ओके. टुमारो यू कॅन गो होम. नाऊ एन्जॉय अँड यू कॅन कॉल युअर पॅरेंट्स." सर म्हणाले.

सारा सरांचे आभार मानून तिथून निघाली. सगळ्यात आधी ती रिसेप्शनवर आली. तिला दादाने इथे फोन करून चौकशी केली आहे का? हे तर विचारायचं होतंच शिवाय त्यांचे आभारसुद्धा मानायचे होते.

"सर, मेरे फॅमिली का कॉल आया था?" तिने तिथे येऊन विचारलं.

"हा. थोडा टाईम हो गया |" ते म्हणाले.

"थँक्यू सर. आपने यहाँ रेकॉर्डिंग रखा |" साराने त्यांचे आभार मानले आणि तिथून निघाली.

आज तिला खूप छान वाटत होतं आणि कधी एकदा घरी फोन करून सगळ्यांशी बोलतेय असं झालं होतं. सारा त्या ऑफिस बाहेरच एका बाकड्यावर बसली आणि तिचा फोन चालू करून घरी फोन केला. जसजशी रिंग जात होती तशी साराच्या मनात धाकधूक होत होती कारण तिला माहित होतं आई आपल्यावर चिडणार आहे.

"हॅलो दादा फोन स्पीकरवर टाक ना सगळ्यांशी बोलायचं आहे." ती म्हणाली.

"बोल. फोन स्पीकरवरच आहे." समीर म्हणाला.

"आईऽ मी उद्या घरी यायला निघतेय." ती म्हणाली.

आईच्या मुडचा अंदाज घेण्यासाठी ती जरा दबक्या आवाजात म्हणाली.

"आत्ता आठवण आली ना तुला घरची? काय अवस्था झाली होती आमची कळतंय का तुला?" तिची आई हुंदका दाबून म्हणाली.

"आई अगं मला काळजी वाटत होती म्हणूनच तर मेसेज ठेवला होता ना? सरांनी मला परीक्षेचा भाग म्हणून फोन बंद करायला सांगितला होता आणि तुमच्याशी कोणाशीही संपर्क करायचा नाही म्हणून सांगितलं होतं." सारा म्हणाली.

"ही असली कसली परीक्षा? ते काही नाही तू सरळ घरी ये आता." तिची आजी म्हणाली.

"अगं आजी उद्या मी निघणार आहे इथून. एवढ्या उशिरा आता मला रांचीला जायला तरी मिळेल का? संध्याकाळ होऊन गेली आहे." सारा तिला समजावत म्हणाली.

"बरं बाळा तू ये उद्या. आपण तू घरी आलीस की सविस्तर बोलूच. बाय द वे आवाजावरून तरी तू पास झाली आहेस असं वाटतंय." तिचे बाबा म्हणाले.

"हो बाबा. मी पास झाले आहे. उद्या घरी येईन तेव्हा सगळं डिटेलमध्ये सांगते. आत्ता असं फोनवर सांगून मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवता नाही येणार." सारा म्हणाली.

त्यांनतर त्यांनी बऱ्याच गप्पा मारल्या. आज दोन दिवसानंतर सारा घरच्यांशी बोलत होती त्यामुळे तिला फोन ठेवावा असं वाटतच नव्हतं. आता तिच्या आईच्या आवाजावरून तरी तिची काळजी जरा कमी झाली आहे वाटत होतं. बऱ्याच गप्पा झाल्यावर ती फोन ठेवायला जाणार तर समीर बोलू लागला; "सारा अगं ऐक! राघवचा फोन आलेला. तुझा फोन लागत नव्हता, म्हणून तू आलीस का घरी? असं विचारायला. त्याला एकदा फोन करून घे."

"ओके. मी करते त्याला फोन." सारा म्हणाली आणि तिने आईला जास्त काळजी करू नकोस म्हणून सांगून फोन ठेवला.

'मी राघवला सांगून ठेवलं होतं म्हणून कदाचित त्याने काळजीने फोन केला घरी. आधी आता त्याच्याशी बोलून घेते.' तिने मनातच विचार केला आणि राघवला फोन लावला.

"हॅलो राघव बोल." सारा म्हणाली.

"बोल काय बोल? अगं आहेस कुठे? कालच घरी येणार होतीस ना?" तो काळजीने म्हणाला.

"ओय तू घरी फोन करून दादाशी बोलला आहेस ना? मग?" सारा म्हणाली.

"हो गं तरीही तू कालच येणार होतीस तर मी वाट बघत होतो ना तुझी. तुझा रिझल्ट ऐकायचाय मला. दिला का सरांनी रिझल्ट?" त्याने विचारलं.

"अरे नाही ना अजून. उद्याच मिळेल. उद्या मी येणार आहे महाराष्ट्रात तर तेव्हाच सांगते. तू घरीच ये. मी सगळ्यांना इथे काढलेले फोटो दाखवणार आहे तर तुलाही बघता येतील." सारा म्हणाली.

तिला राघवला आत्तापासून रिझल्ट सांगायचा नव्हता. तिला माहित होतं जर तिने रिझल्ट सांगितला तर तिने त्याला कितीही फोटो बघायला घरी ये म्हणून सांगितलं असतं तरीही तो आला नसता म्हणूनच तिने त्याच्यापासून हे लपवलं. तिला राघवने एवढी मदत केली होती त्यामुळे तिला त्याच्यासोबत हा आनंद वाटून घ्यायचा होता.

"ओके. येतो मग संध्याकाळी." राघव म्हणाला.

नंतर दोघांनी छान गप्पा मारल्या आणि सारा सगळा निसर्ग बघत स्वतःचे सेल्फी काढत पुन्हा तिच्या रूमवर आली. सगळं सामान आवरून ती फ्लाईटच तिकीट बुक करायला जाणार एवढ्यात सरांनी तिच्या रूमच्या दारावर टकटक केली. सरांना बघून तिला जरा भीतीच वाटली.

'आता पुन्हा सर इथेच थांबायला नाही ना सांगणार? काय झालं असेल?' हे विचार तिच्या मनात आले.

तिच्या चेहऱ्यावर गोंधळ युक्त भीती स्पष्ट दिसत होती. तिचा असा कावराबावरा झालेला चेहरा बघून सर हसू लागले.

"डोन्ट वरी. तुम्हे यहाँ रूकना नहीं है | ये तूम्हारी फ्लाईट की तिकीट |" सर तिच्या हातात एक पाकीट देत म्हणाले.

ती त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होती.

"तुम्हारा कल का तिकीट मेरे वजह से वेस्ट गया इसलिये और अब तुम मेरी इंटर्न हो तो तुम्हारा ट्रायव्हलिंग का खर्चा मेरी जिम्मेदारी |" सर म्हणाले.

तिने ते तिकीट घेतलं आणि त्यांचे आभार मानले.

क्रमशः.....
******************************
सारा तर आता खूप आनंदी आहे. तिने घरी फोन केल्यामुळे त्यांची काळजीही मिटली आहे पण तिच्या आईने आणि आजीने तिला आफ्रिकेला जाऊ दिलं नाही तर? तिच्या स्वप्नांचं काय होईल? कॅरलॉन सर आत्ता कुठे सारावर तिच्या कामाच्या बाबतीत विश्वास ठेवायला लागले आहेत त्यांच्या विश्वासाला तडा जाईल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all