लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२७)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                                तणाव

समीरने कसंबसं आईला शांत केलं होतं पण त्यालाही साराची खूप काळजी वाटत होती. तो सतत तिला फोन लावण्याचा प्रयत्न करत होता पण तिचा फोन लागतच नव्हता. एव्हाना दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. आज सारा येणार म्हणून तिच्या आईने साराच्या आवडीच्या पदार्थांचा घाट घातला होता. मात्र जसजशी वेळ पुढे सरकत होती आणि साराशी काहीही संपर्क होत नव्हता तशी तिच्या काळजीत भर पडली होती आणि सगळं काम अर्धवट राहिलं होतं. घरातील मंगलमय वातावरण बदलून तणावग्रस्त वातावरण तयार झालं होतं. वातावरणातला हा तणाव कमी करण्यासाठी साराचा फक्त एक फोनसुद्धा पुरेसा होता. मात्र ती सरांच्या एका अटीमुळे कळवू शकलेली नाही हे सत्य सगळ्यांपासून अनभिज्ञ होतं. वेळ पुढे जातेय आणि घरात वयस्कर आजी, आजोबा आहेत शिवाय आईलाही बी.पी.चा त्रास आहे हे ओळखून समीरने सगळं राहिलेलं काम करून आजी, आजोबा आणि आईला जेवायला बोलावलं.

"नकोय समीर मला जेवायला. काहीही खाण्याची इच्छा होत नाहीये. सारा अजून कशी आली नाही? बरं आली नाही अजून तेही ठीक पण फोनही केला नाही त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटतंय." त्याची आई म्हणाली.

"आई अगं येईल ती किंवा निदान फोन तरी करेलच. आपली सारा एवढी बेजबाबदार नाहीये. तू खा ना काहीतरी. एकतर सकाळ पासून तू काहीही खाल्लं नाहीये त्यामुळे गोळी घ्यायची राहिली आहे. असंच करत राहिलीस तर उगाच तब्येतीवर परिमाण होईल." समीर आईला समजावत म्हणाला.

"विशाखा अगं समीर बरोबर बोलतोय. सारा घरी येईल तेव्हा तिने तुला असं आजारी बघितलं तर तिला वाईट वाटेल ना? खाऊन घे चार घास." समीरच्या आजोबांनी समजावलं.

"नकोय मला." विशाखा मात्र तिच्या मतावर ठाम होती.

"बघितलं? मी सांगितलं होतं सारामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवाला घोर लागणार. या पोरीला आहे का त्याचं काही? आपल्या आईला गोळी घ्यायची असते, घरात म्हातारे आजी, आजोबा आहेत कशाचाच विचार नाही." तिची आजी म्हणाली.

"आजी! सारा आजवर असं कधी वागली आहे का? अगं तिचं हे कामच असं आहे की ते कधीही वाढू शकतं किंवा काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात." समीर म्हणाला.

"तू तर तिची बाजू घेऊच नकोस. अरे सारामुळे तर आज..." आजी बोलत होती.

एवढ्यात साराच्या आईला चक्कर आली आणि ती सोफ्याचा आधार घेऊन तिथेच बसली. समीरने आणि बाकी सगळ्यांनी पण हे बघितलं.

"आईऽ" समीर काळजीने ओरडला आणि पटकन पाणी घेऊन आला.

"विशाखा अगं डोळे उघड. काय झालं?" साराची आजी आणि आजोबा तिला उठवत म्हणाले.

समीरने हळूच तिच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि तिला सोफ्यावरच झोपवलं. अजूनही तिने डोळे उघडले नव्हते म्हणून त्यालाही काळजी वाटत होती. त्याने पटकन त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं.

"समीर अरे विराजला पण बोलावून घे. नक्कीच विशाखाला हे टेंशन सहन झालेलं नाहीये." त्याचे आजोबा म्हणाले.

"नको आजोबा. बाबा तसंही आज हाफ डे घेऊन घरी येणार आहेत. त्यांना असं फोन करून बोलावलं तर टेंशन येईल. डॉक्टर येतायत तर बघूया ते काय म्हणतात." समीर म्हणाला.

थोडावेळ असाच विशाखाला शुध्दीवर आणण्यात गेला आणि दारावरची बेल वाजली. डॉक्टर आले होते. लगेचच त्यांनी विशाखाला तपासलं.

"यांचं बी.पी. खूप वाढलं आहे. यांनी आज गोळी घेतली नाहीये का? आणि कसलं टेंशन आहे का?" डॉक्टरांनी विचारलं.

"आज नाही घेतली अजून तिने गोळी. सकाळपासून काहीही खाल्लं नाहीये त्यामुळे देताही आली नाही." समीर म्हणाला.

"समीर अरे तू तरी आईला काहीतरी खायला लावून गोळी द्यायला हवी होतीस. तुला माहित आहे ना त्यांना गोळी ही रोज घ्यावीच लागते. ठीक आहे! मी त्यांना एक इंजेक्शन देतो. थोड्यावेळात त्यांना जरा बरं वाटेल. त्या उठल्या की काहीतरी खायला देऊन आधी गोळी द्या. असं एवढं बी.पी. वाढणं चांगलं नाही." डॉक्टर म्हणाले.

त्यांनी लगेचच सगळी ट्रीटमेंट करून काही एक्स्ट्रा सप्लिमेंट लिहून दिल्या आणि ते गेले.

"समीर तू पुन्हा साराचा फोन लागतोय का बघ ना. तिचा आवाज ऐकून विशाखा लगेच बरी होईल." त्याची आजी काळजीने म्हणाली.

"हो आजी मी करतोय प्रयत्न. तुम्ही दोघं जेवून घ्या मी आई जवळ बसतो. पुन्हा तुम्हा दोघांना काही त्रास नको व्हायला." समीर म्हणाला.

"आमची काळजी सोड. तू आधी फोन लाव बघू." त्याची आजी म्हणाली.

समीर पुन्हा तिला फोन करू लागला पण काहीही उपयोग होत नव्हता.

"सारा, सारा कुठे आहे?" विशाखा शुध्दीवर येत होती आणि साराला हाका मारत होती.

"आई सारा येईल हा. तू आधी शांत हो. जरा उठून बसतेस का? तुझ्यासाठी पटकन गार दूध आणतो. गोळी घे आधी मग साराला आपण फोन करू." समीर तिला उठून बसायला मदत करत म्हणाला.

यावेळी त्याने तिचं काहीही ऐकून न घेता सरळ तिला बळजबरी दूध प्यायला लावलं आणि गोळी दिली. थोड्याच वेळात तिला आधीपेक्षा जरा बरं वाटू लागलं तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

'सारा नक्की काय झालंय? सगळेच तणावाखाली आहेत. आम्हाला कसं समजेल नक्की काय झालंय?' समीर फोन लावता लावताच मनात विचार करत होता.

सगळेच साराशी बोलण्यासाठी, तिचा आवाज ऐकण्यासाठी तरसले होते. कारण आज दुसरा दिवस होता आणि तिचा एकही फोन घरी आलेला नव्हता. अश्या परिस्थितीत घरच्यांना काळजी वाटणं हे साहजिक होतंच. त्यात तिने आज ती घरी येणार आहे हे सांगितलं असल्याने ती अजून कशी आली नाही? म्हणून सगळ्यांच्या मनात ना ना शंका, कुशंका येत होत्या. म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती अशीच काहीशी अवस्था आज देशमुख घरात होती. एवढ्यात साराचे बाबा ऑफिसमधून आले.

"साराऽ कुठे आहेस? कशी झाली परीक्षा?" त्यांनी घरात आल्या आल्याच साराला हाका मारायला सुरुवात केली.

"तुझी लेक अजून आलेली नाहीये. सकाळपासून एकही फोनसुद्धा केला नाहीये." साराची आजी म्हणाली.

"काय? अगं पण ती आज.." विराज बोलत होता तर त्याला मध्येच तोडत समीर बोलू लागला; "बाबा तुम्ही आधी फ्रेश होऊन या. सारा येईल. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. मी तिला कॉल करतोय."

"नाही आधी साराला फोन कर. एवढी बेजबाबदार नाही वागत ती." विराज काळजीने बोलू लागला.

"बाबा तुम्ही शांत व्हा. मी ट्राय करतोय." समीरने त्यांना शांत केलं आणि पाणी आणून दिलं.

आज दिवसभर त्याची सगळी ऊर्जा घरच्यांना सावरण्यात जात होती. तो साराला फोन करत होताच पण त्याला अजूनतरी नेटवरून नंबर शोधून तिथल्या ऑफिसमध्ये फोन करायचं सुचलं नव्हतं. थोडावेळ असाच तणावात विचार करण्यात गेला. साराच्या आजीने तर आता आपण पोलिसात तक्रार करू म्हणून देखील सुचवलं होतं.

"समीर! मला वाटतंय आई म्हणते तसं आपण जाऊया का पोलीस स्टेशनला?" विराज म्हणाला.

"नको बाबा. तिथे जाऊन काहीही उपयोग होणार नाहीये. ती राज्याबाहेर गेली आहे. खरंतर माझंच चुकलं मी साराला सोडायला गेलो होतो तेव्हा तिच्या सरांचा नंबर घेऊन यायला हवा होता." समीर म्हणाला.

"अरे ते एवढे फेमस आहेत तुम्ही ते नेटवरून सगळं शोधता तसं शोध काहीतरी." त्याचे आजोबा एकदम उत्साहाने म्हणाले.

"राईट! हे लक्षातच नाही आलं. मी एक काम करतो हजारीबागच्या ऑफिसमध्ये कॉल करतो." समीर म्हणाला आणि त्याने बोलता बोलताच नेटवरून तिथला नंबर शोधून काढला.

सगळे आता त्याच्या भोवती जमा झाले होते. एक आशेचा किरण सगळ्यांच्याच डोळ्यात दिसत होता.

"रिंग जातेय." समीरने लगेचच सांगितलं.

निदान आता तिथून तरी काहीतरी माहिती हाती लागेल म्हणून सगळे खुश होते. समीरने फोन स्पीकरवर टाकला. चार ते पाच रिंग झाल्यावर समोरून फोन उचलला गेला.

"हॅलो, मै समीर देशमुख बोल रहा हूॅं फ्रॉम मुंबई. सारा देशमुख वहाॅं कॅरलॉन सर के साथ आई है वह आज मुंबई रिटर्न अाने वाली थी, वह वहाॅं से निकली है क्या? कौनसे फ्लाईट से आ रही है?" समीरने विचारलं.

"सारा देशमुखने आप के लिये यहाँ व्हॉईस मेसेज छोडा़ है | मै आपको सूनाता हूॅं |" तिथले ऑफीसर म्हणाले.

निदान साराचा मेसेज तरी मिळेल म्हणून सगळ्यांनी एक सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांनी व्हॉईस मेसेजची क्लिप सुरू केली.

"आई, बाबा, दादा, आजी, आजोबा मी ठीक आहे. तुम्ही काळजी करत असाल म्हणूनच हे रेकॉर्डिंग मी इथे दिलं आहे. काही कारणाने मला तुम्हाला फोन करता येणार नाहीये. कोणीही काळजी करू नका. अचानक काम वाढलं आहे आणि मला यायला काही दिवस उशीर होणार आहे. मी घरी आल्यावर सविस्तर बोलूच. जेव्हाही मला तुम्हाला फोन करण्याची संधी मिळेल मी लगेचच फोन करेन. आई तू आधी गोळी घे आणि काळजी करू नकोस."

व्हॉईस क्लिप ऐकवून झाल्यावर पुन्हा ते ऑफीसर बोलू लागले; "उन्होंने आप चिंता करोगे इसलिये ये मेसेज यहाँ रखा था | डोन्ट वरी मॅडम ठीक है |"

"थँक्यू सो मच सर." समीर म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

साराचा आवाज ऐकून सगळ्यांनाच बरं वाटत होतं. समीरने एक सुस्कारा सोडला आणि सोफ्यावर बसला.

क्रमशः....
******************************
सगळ्यांना सारा सुखरूप आहे हे समजलं असलं तरीही तिच्या मार्गात आता नवीन अडथळे येतील का? साराला जेव्हा समजेल आपल्यामुळे आपल्या आईची तब्येत एवढी ढासळली होती तेव्हा तिला काय वाटेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all