लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२६)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२६)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                         सारा कधी येणार?

विराजने विशाखाला कितीही समजावलं असलं तरीही तिला साराची खूप काळजी वाटतेय आणि जे साराच्या आजीने घरी येऊन सांगितलं होतं त्यामुळे त्याचाच विचार ती जास्त करतेय हे विराज आणि समीर दोघांनाही समजत होतं. आपण आता काहीही बोलून किंवा दोघींनाही अजून समजवायला जाऊन काहीही उपयोग नाही, वेळच यावर रामबाण उपाय आहे हे जाणून दोघं गप्पच बसले होते.

"बाबा मी साराला दुपार पासूनच फोन ट्राय करतोय पण तिचा फोन बंद आहे. काय करुया? साराचा काहीही कॉन्टॅक्ट नाही झाला तर आईला टेंशन येईल आणि आधीच तिला बी.पी.चा त्रास आहे तर तिच्यासाठी हे चांगलं नाही." समीर म्हणाला.

"रात्री पर्यंत बघूया. तिची आज परीक्षा होती त्यामुळे तिने आधीच सांगितलं होतं फोन करायला मिळणार नाही. रात्री तिचा फोन आला तर ठीक नाहीतर सकाळी करून बघू." त्याचे बाबा म्हणाले.

"ठीक आहे. सारा सोबत बोलणं होणं खूप महत्त्वाचं आहे कारण आजीने तशी अटच घातली आहे ना की, सारा तिची खुशाली कळवण्यात चुकली किंवा तिला या कामामुळे काही इजा झाली तर तिने हे काम सोडायचं. अर्थात साराला याबद्दल काही माहीतच नाहीये." समीर म्हणाला.

"बघूया आता उद्या सकाळीच समजेल आपल्याला. आईचं एवढं मनावर नको घेऊ. ती काळजीने बोलतेय. मी बोलतो तिच्याशी." त्याचे बाबा म्हणाले.

एवढ्यात त्याचे आजी, आजोबा बाहेरून आले आणि आजीने त्यांचं हे बोलणं ऐकलं.

"तू माझ्याशी बोलून काहीही होणार नाहीये. मी जे सांगितलं आहे तेच होणार. तुम्हाला जर कोणाला नसेलच ऐकायचं तर मला गावाला नेऊन सोडा! म्हणजे तुम्हाला या म्हातारीचा त्रास होणार नाही." आजी जरा नाराजीनेच म्हणाली.

"अगं आई आम्ही असं म्हणालो का की तुझा आम्हाला त्रास होतो? तू आधी बस." विराज म्हणाला.

"म्हणाला नाहीस रे पण अर्थ तसाच होतो." आजी म्हणाली.

"आई तुम्ही नका काळजी करू. आम्ही तुमचं इतकी वर्ष ऐकलं आणि या पुढेही ऐकू. तुम्ही जा फ्रेश होऊन या मग थोड्यावेळात पानं घेते." विशाखा म्हणाली.

आजी खोलीत जायला निघाली आणि आजोबांनी विराजला हातानेच मी बघतो म्हणून खूण केली.

'काय होणार आहे काय माहीत? सारा उद्या तरी फोन कर.' समीर मनातच म्हणाला.
****************************
इथे जंगलातून सगळे त्यांच्या बेस कॅम्प जवळ आले होते.

"सारा! टूमारो मॉर्निंग वी विल गेट अ चान्स टू मीट ग्लिची अँड हर कब्स् अगेन. आफ्टर दॅट यू विल गेट युअर रिझल्ट." सर म्हणाले.

"ओके सर." सारा म्हणाली.

"डोन्ट फॉर्गेट, यू हॅव नो परमिशन टू कॉन्टॅक्ट विथ युअर फॅमिली." सर म्हणाले.

"येस सर. आय नो." सारा म्हणाली.

नंतर सरांनी तिला हातानेच "तू जाऊ शकतेस" म्हणून खूण केली आणि ती तिच्या खोलीत गेली.

'सर तुम्ही परवानगी दिलेली नसली तरीही तुमच्याच अटीत राहून मी मेन ऑफिसमध्ये मेसेज ठेवला आहे आणि मला दादावर विश्वास आहे तो नक्कीच उद्या इथे फोन करेल.' सारा मनातच म्हणाली.

तिने तिचा रिझल्ट काय लागेल? या विचारातच तिचं आवरून घेतलं, आईने दिलेला डब्बा खाल्ला आणि पाठ टेकली. दोन दिवस सतत दगदग झाल्याने तिला लगेचच झोप लागली आणि जाग आली ती अचानक दचकून.

'मला कोणी हाक मारली का? काय झालं अचानक?' ती मनातच म्हणाली.

तिने घड्याळ बघितलं तर पहाट झाली होती. उठून तिने खोलीचं दार उघडून पाहिलं तर बाहेर कोणीही नव्हतं.

'स्वतःहूनच जाग आली आहे ती चांगली गोष्ट आहे. आवरून घेते.' ती मनातच म्हणाली आणि तिचं आवरायला गेली.

आजचा दिवस सारासाठी खूप महत्त्वाचा होता. आज तिला तिचा रिझल्ट मिळणार तर होताच पण पुन्हा एकदा ग्लिची आणि तिच्या पिल्लांना बघायला मिळणार होतं. या एक दोन दिवसातच तिला ग्लिची आणि तिच्या पिल्लांचा लळा लागला होता. तिला सतत ती पिल्लं खेळताना डोळ्यासमोर दिसायची. ती पिल्लंही म्हणा खूप गुटगुटीत आणि मनमोहक होती. सारा त्याच पिल्लांच्या विचारात तिचं आवरू लागली. तिचं सगळं आवरून होईपर्यंत साधारण दीड, दोन तास गेले. एव्हाना आता सात वाजले होते. ती खोलीच्या बाहेर येऊन बसली. सकाळची प्रसन्न वेळ आणि मनमोहक निसर्ग सौंदर्य यामुळे तिला खूप छान वाटत होतं. थोड्याचवेळात तिचे सरही आले.

"गूड मॉर्निंग सारा." ते म्हणाले.

त्यांनी तिला गूड मॉर्निंग म्हणलं तेव्हा तिच्या सर आल्याचं लक्षात आलं. तिनेही त्यांना स्मित करून "गूड मॉर्निंग" म्हणलं.

वन अधिकाऱ्यांच्या बरोबर दोघंही कॅन्टीनमध्ये गेले. सकाळचा चहा, नाश्ता झाला आणि तिथूनच सगळे पुन्हा जंगलात आले. आता ग्लिची आणि तिच्या पिल्लांना परत सोडायला त्यांची एक खास गाडी येणार होती त्याचीच वाट ते बघत होते. त्या गाडीतून जेव्हा ग्लिची आणि तिची पिल्लं बाहेर पडली तेव्हा पिल्लं तर खूप खुश दिसत होती आणि ग्लिचीच्या तब्येतीत पण सुधारणा होती. तिला झालेल्या जखमांवर व्यवस्थित मलम पट्टी झाली होती आणि एकाच दिवसात सुद्धा त्या जखमा भरायला लागल्या होत्या. तिची पिल्लं आणि ती त्यांना जंगलात सोडल्या सोडल्या आनंदाने त्यांच्या नेहमीच्या जागेवर गेले.

'कितीही आणि कुठेही फिरून आलो तरी जे सुख आपल्याला आपल्या घरात मिळतं ते इतर कुठेही मिळत नाही. अगदी तसंच यांचं झालंय. आपल्या घरी आल्यावर किती आनंद झालाय ग्लिचीला आणि तिच्या सगळ्या पिल्लांना सुद्धा!' सारा मनातच म्हणाली.

"प्राणीयो को भी अपना घर, अपना इलका सब समज में आता है | अभी तो ग्लिचीके बच्चे भी उसके साथ गए थे लेकीन पिछली बार उसके दुसरे बच्चे जब थे, तभी वह बुरी तरह से जखमी हो गई थी तो खाली उसको ही ट्रीटमेंट के लिये भेजा गया था तब उसने पुरा हॉस्पिटल और उसके बच्चोने पुरा जंगल सर पे उठायाॅं था |" वन अधिकारी म्हणाले.

"येस. अॅनिमल्स को ऐसे करते देखा गया है |" कॅरलॉन सर म्हणाले.

"सर, यही में कल कह रही थी | प्राणियो को भी इमोशन होते है, तो हम तो इंसान है ना सर?" सारा म्हणाली.

तिला काय म्हणायचं आहे हे सरांच्या लक्षात आलं पण ते काहीही बोलले नाहीत. तिने हळूहळू तिचं म्हणणं पटवून द्यायला सुरुवात केली होती. थोडावेळ असाच ग्लिची आणि तिच्या पिल्लांसोबत घालवल्यावर सगळे माघारी वळले. ग्लिची पूर्णपणे आता बरी आहे आणि ती स्वतःची आणि पिल्लांची काळजी घेऊ शकते याची खात्री झाल्यावरच ते तिथून निघाले होते. साराने आजही ग्लिची आणि तिच्या पिल्लांचे फोटो काढून घेतले होते. आज तिचा तिथला शेवटचा दिवस होता आणि तिला घरी जाताना ग्लिची आणि तिच्या पिल्लांच्या आठवणी सोबत न्यायच्या होत्याच शिवाय तिला हे सगळं आजीला दाखवण्यासाठी विशेष उत्साह होता म्हणून आजही ती स्वतःला त्यांचे फोटो काढण्यापासून थांबवू शकली नाही. या सगळ्यात दुपार झाली होतीच. ते सगळे त्यांच्या बेस कॅम्प जवळ आले आणि कॅरलॉन सरांनी वन अधिकाऱ्यांना काहीतरी सांगितलं. त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि ते साराकडे वळले.

"सारा नाऊ यू विल गेट युअर रिझल्ट. ऑफिस में चलके बात करते है |" कॅरलॉन सर म्हणाले.

वन अधिकारी आणि हे दोघं त्यांच्या सोबत ऑफिसमध्ये गेले. साराला त्यांनी थोडावेळ बाहेरच थांबायला सांगितलं आणि कॅरलॉन सर वन अधिकाऱ्यांसोबत आत गेले.
***************************
इथे घरी मात्र साराचा काही सकाळ पासून फोन आलेला नाही शिवाय फोनही बंद येतोय म्हणून घरचे सगळेच काळजीत पडले होते.

"मी सांगितलं होतं साराला नका एवढ्या लांब पाठवू." साराच्या आजीने पुन्हा तिचं तेच तेच बोलणं सुरू केलं होतं.

"आजी अगं थांब जरा. तिच्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. आपल्याला काय माहित नक्की काय झालंय?" समीर तिला म्हणाला.

"अरे समीर बघ ना पुन्हा लावून. माझा जीव खूप घाबराघुबरा होतोय. आज सारा येणार होती तर तिचा काहीतरी फोन यायला हवा होता ना?" त्याची आई म्हणाली.

"आई तू नको काळजी करुस. सारा येईल. मी ट्राय करतोय तिचा फोन." समीर म्हणाला आणि तो पुन्हा फोन ट्राय करू लागला.

"लागला का?" आजीने विचारलं.

"नाही." समीर म्हणाला.

"समीर अरे सारा आता कधी येणार? काहीही संपर्क होत नाहीये आपला तिच्याशी. काही प्रॉब्लेम तर नसेल ना?" त्याच्या आईने काळजीने विचारलं आणि ती मटकन सोफ्यावर बसली.

"आई अगं एवढं टेंशन नको घेऊ. सारा कळवेल आपल्याला." समीर तिला पाणी देत समजावत म्हणाला.

त्याने आईला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला असला तरीही त्याला मनातून काळजी वाटत होतीच. दुपार झालेली असताना निदान एकदा तरी साराचा फोन येणं सगळ्यांना अपेक्षित होतं.

'सारा यार तू कधी येणार आहेस? जर तू अचानक येऊन सरप्राइज द्यायचा किंवा काही प्रँक करायचा प्लॅन करत असशील तर हे खूप महागात पडेल. वेळीच कॉल कर.' समीर मनातच म्हणाला.

क्रमशः....
****************************
जे व्हायला नको होतं तेच घडलं. साराची काळजी आता सगळ्यांनाच वाटायला लागली आहे. समीरला तिथल्या ऑफिसमध्ये फोन करायचं सुचेल का? साराला तिचा रिझल्ट समाधानकारक मिळेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all