लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२५)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                                 बाजू

साराला या लाल, केशरी नैसर्गिक प्रकाशात किंगचे फोटो काढायचा मोह झाला होता आणि म्हणूनच तिने सरांकडून परवानगी मिळवली होती. जसा हा लाल, केशरी प्रकाश किंग बसलेल्या झाडावर पडला तसे साराने त्याचे फोटो काढले. तो दूरवर काहीतरी बघत होता. त्यात त्याच्या त्या काळया डोळ्यात तो प्रकाश पडल्याने ते मस्त चमकत होते. त्याच्या डोळ्यात तोच त्या जागेचा सर्वेसर्वा आहे अशी चमक दिसत होती. थोडावेळ तो झाडावर बसून राहिला आणि नंतर खाली उडी मारली. त्याचा उडी मारतानाचा पण एक छान फोटो साराने क्लिक केला. त्या फोटोमध्ये एवढा जिवंतपणा होता की असं वाटत होतं जणू त्या बिबट्याला उडी मारताना कोणीतरी स्टॅच्यू केलं आहे. आज साराच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान झळकत होतं.

'आई, बाबा, आजी, आजोबा आणि दादा! मी तुम्हाला नक्कीच गर्व वाटेल असंच काम करेन. आजी मी इथे येताना थोडी नाराज होती ना? आता मी घरी आले की सगळे फोटो आजीला दाखवून तिची नाराजी दूर करेन. तुम्ही कोणीही कसलीच काळजी करू नका. मला माहित आहे तुम्ही सगळे मोठे आहात आणि माझ्या भल्याचा विचार करून मला सल्ले देता, पण हे काम मला एवढं आवडतं ना की यात मी खुश असते. प्राण्यांना असं जवळून बघणं, त्यांची दिनचर्या, त्यांचं एकंदर जीवन असं न्याहाळणं खूप भारी असतं.' सारा मनातच घरच्यांशी बोलत होती.

मगाशी तिला आलेलं टेंशन मावळतीच्या सूर्याबरोबरच मावळलं होतं. त्या लाल, केशरी प्रकशात तिचे डोळेही पुढच्या आयुष्याच्या स्वप्नात, जंगल अनुभवण्याच्या समाधानाने आणि कॅरलॉन सरांना भारतीय लोकांविषयी मत बदलायला लावण्याच्या निर्धाराने चमकत होते. तिने मनोमन आहे ती परिस्थिती स्वीकारली होती. आत्ता आपण टेंशन घेऊन दादाला इथल्या ऑफिसमध्ये फोन करायला सुचेलच असं नाही हे तिने जाणलं होतं. प्राणी जसे आली वेळ निभावून नेतात, उद्याची सोडा पण पुढच्या क्षणाला काय होईल याचीही काळजी करत नाहीत आणि आपल्या वाटेला आलेलं आयुष्य अगदी मनमुराद जगतात हेच सारा हळूहळू शिकत होती. तिने मनोमन निसर्ग जे शिकवतोय ते आत्मसात करायचं आणि प्राण्यांकडून नक्कीच आयुष्याचे धडे घ्यायचे हे ठरवलं होतं.

"सारा! व्हॉट आर यू थिंकींग?" सरांनी तिला एकटक निसर्ग न्याहाळताना बघून विचारलं.

"सर यही की, इंसान जो सब कर सकता है, जिसके पास अधिक बुद्धिमत्ता है, सबसे होशियार है, लेकीन जिंदगी जिना तो उसे आता ही नहीं ना? हमेशा कल की चिंता, काम की चिंता, स्टेटस की चिंता, घर की चिंता और न जाने क्या क्या दिमाग में चालू रेहता है | बट यही अॅनिमल्स कितने शान से जिंदगी जिते है | जितना चाहिए उतनाही शिकार करते है, पेट भरने के बाद बचा कुचा बाकी पंच्छी या किडे मकोडोको छोड़ देते है | उनमे कभी भी कल क्या होगा? कल के लिये आज इंतजाम कर के रखो ऐसी सोच कभी नहीं रेहती |" सारा म्हणाली.

"राईट. लेकीन ह्युमन अँड अॅनिमल्स बोथ आर राईट इन देअर ओन प्लेस. यू एक्सपिरीयन्स ऑल धिस फर्स्ट टाईम सो ऐसे थाॅट्स आ सकते है, लेकीन थिंक विथ बोथ साईड." सर म्हणाले.

"येस सर." सारा म्हणाली.

सारा अजून बरीच लहान होती. शरीरात भरपूर काम करण्यासाठी ऊर्जा आणि उत्साह होता आणि म्हणूनच तिला उद्याच्या तजबिजीचे जास्त काही वाटत नव्हते. ती अगदी सहज प्राणी कसे आला दिवस छान जगतात हे बघत होती, पण तिला अजून त्यातल्या अडचणी कळायच्या होत्या. माणूस जसा आजारी पडतो तसेच प्राणीही पडतात हे ती या नादात विसरली होती. सरांनी तिच्या डोळ्यात अंजन घातलं तेव्हा कुठे ती दोन्ही बाजूंनी विचार करू लागली. एव्हाना आता संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. त्यांची जीप पुन्हा माघारी फिरली.
****************************
इथे घरी मात्र जसजशी संध्याकाळ होत होती तशी समीरची चलबिचल वाढली होती. त्याला सतत साराची काळजी वाटत होती आणि मनातून सारखं काहीतरी गडबड होणार आहे असं वाटत होतं. तो सतत साराला फोन लावण्याचा प्रयत्न करत होता.

'स्विच ऑफ, स्विच ऑफ! शी! सारा यार कॉल कर घरी. नाहीतर काही खरं नाही.' तो स्वतःशीच म्हणाला.

त्याला काय करावं? हेच सुचत नव्हतं. आई आणि आजी जे काही सारा हजारीबागला गेल्यापासून वागल्या आहेत त्यामुळे नक्कीच साराच्या वाटेत वादळ येणार हे निश्चित होतं. तो डोळ्यात प्राण ओतून त्याच्या बाबांची वाट बघत होता. त्याचे बाबा आल्याची त्याला चाहूल लागली आणि तो हॉलमध्ये येऊन बसला. बाबांना आल्या आल्या लगेचच काही सांगायला नको म्हणून तो काहीही बोलला नाही. त्याचे बाबा फ्रेश व्हायला त्यांच्या खोलीत गेले.

'आता बाबा आले आहेत. त्यांना या सगळ्याची कल्पना देतो. साराशी कॉन्टॅक्ट करण्याचा काहीतरी मार्ग निघाला तर बरं होईल.' त्याने मनातच विचार केला.

त्याचे बाबा त्यांचं आवरून आले. आजी - आजोबा पाय मोकळे करायला बाहेर गेले होते आणि विशाखा विराजसाठी चहा करत होती. आज तो ऑफिसमधून घरी आल्यावर विशाखा नेहमी सारखी त्याच्याशी स्वयंपाक घरातून बोलत नव्हती, त्यावरूनच त्याने काहीतरी बिनसलं आहे हे ओळखलं होतं. समीरच्या बाजूला बसत त्याने त्याला डोळ्यांनीच काय झालं? म्हणून विचारलं.

"बाबा अहो आजी त्या दिवशी देवळात जाऊन आली आणि काय प्रकार झाला तुम्हाला आईने सांगितला असेलच ना? त्याचेच पडसाद आहेत." समीर हळू आवाजात बोलत होता.

"हो तिने मला सांगितलं, पण नक्की त्याचे पडसाद म्हणजे? नीट सांग काय झालंय ते." विराज म्हणाला.

"अहो बाबा आजीने आईला हळूहळू पूर्णपणे कॅन्फ्युज करायला सुरुवात केली आहे. आधी आई साराला यासाठी पाठिंबा द्यायला तयार झाली. मग हे सगळं घडलं तर तिला आजी जे म्हणतेय ते पटायला लागलं आणि आता तिची द्विधा मनःस्थिती झाली आहे. कधी ती साराच्या बाजूने बोलते, कधी आजीच्या. अश्याने तिलाच त्रास होणार आहे ना?" समीरने विषयाला हात घातला.

एवढ्यात विशाखा चहा घेऊन आली आणि तिने फक्त "अश्याने तिलाच त्रास होणार आहे ना?" एवढंच ऐकलं.

"कोणाला कसला त्रास होणार आहे? काय झालं समीर?" तिने विचारलं.

समीर काहीही बोलला नाही. विराजने तिलाही त्यांच्यासोबत बसायला लावलं आणि स्वतःच्या कपातला अर्धा चहा तिला देत बोलू लागला; "काही नाही विशाखा. समीरला तुझी काळजी वाटतेय."

हे ऐकून तिचा चेहरा पार गोंधळून गेला.

"माझी? का? मला काय झालंय?" तिने गोंधळून विचारलं.

"अगं जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हाच आपल्याला काहीतरी झालं आहे असं नसतं ना? तू म्हणे सध्या द्विधा मनःस्थितीत आहेस. त्यामुळे तुझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे शारीरिक आरोग्यावर हेच समीर सांगत होता." विराज म्हणाला.

"असं काही नाहीये रे विराज. ही पोरं मोठी झाली आहेत पण काळजी वाढेल असंच वागतात. एकवेळ समीरची एवढी काळजी नाही पण ही आपली सारा! जीवाला घोर लावून ठेवला आहे. आज तिचा फोनही आला नाहीये त्यामुळे सारखं मन अस्थिर होतंय." विशाखा म्हणाली.

"विशाखा तू आधी चहा घे बोलू आपण." विराज म्हणाला आणि त्याने चहा संपवला आणि विशाखाला सुद्धा घ्यायला लावला.

"विराज आधीच सांगते तू जर साराची बाजू घेऊन बोलणार असशील तर प्लीज नको बोलू. आधीच मला काहीही सुचेनासं झालंय." विशाखा म्हणाली.

"छे! तिची बाजू कोण घेतंय? मी कोणाचीही बाजू घेणार नाहीये. उलट तुझा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे." विराज म्हणाला आणि त्याने समीरला हळूच मी बोलतो निश्चिंत राहा अशी डोळ्यांनीच खूण केली.

विशाखा आता एकदम शांत झाली होती आणि विराज काय म्हणतोय? हे ऐकू लागली.

"मला सांग, साराचा काल फोन आलेला तेव्हा ती म्हणाली होती की नाही तिला आज फोन करायला वेळ मिळणार नाहीये?" विराजने विचारलं.

"हो." विशाखा म्हणाली.

"तिथे सगळी सोय व्यवस्थित आहे आणि तीही मजेत आहे हेही सांगितलं आहे ना तिने?" विराजने पुढचा प्रश्न केला.

"हो." विशाखा म्हणाली.

"ती उद्या घरी येणारच आहे ना? त्याआधी तरी एखादा फोन होईलच आपला. बरोबर?" विराज ने विचारलं.

"हो." विशाखा म्हणाली.

"मग आता कसली काळजी करायची? बघ साराने आपल्याला आधीच सगळं सांगितलं होतं त्यामुळे काळजीचं काही कारण नाहीच आहे." विराज म्हणाला.

"ते सगळं तर बरोबर आहे, पण आईंना सारामुळे नको नको ते ऐकून घ्यावं लागतंय, त्यांच्या संस्कारांवर लोक बोट दाखवतायत आणि त्यांना त्रास होतोय हे मला बघवत नाहीये." विशाखा म्हणाली.

"बघ विशाखा, या सगळ्याला जरा वेळ जाऊ दिला पाहिजे. काय आहे ना, आपल्या मुलांच्या पिढीमध्ये आणि आई, बाबांच्या पिढीमध्ये खूप अंतर आहे. शिवाय त्यांचं वय असं आहे की, त्यांना पटकन नवीन गोष्टी स्वीकारता येत नाहीत. त्यांची पिढी एका चौकटीत राहिलेली आहे त्या व्यतिरिक्त त्यांना जास्त माहिती नाहीये. मान्य आई आपल्या मुलांच्या भल्यासाठी बोलते, सूचना करत असते पण तिला हवं तेच घडेल असं नाहीये ना? ती मोठी आहे, अनुभवी आहे त्यामुळे आपण तिचं ऐकून घ्यायचं, जे काही आपल्याला उपयोगी आहे ते मनावर बिंबवून ठेवायचं पण नवीन गोष्टी तिलाही पटायला लागतील, रूचायला लागतील याचीही काळजी आपणच घ्यायची. ती दुखावली न जाता तिला हळूहळू आपण समजावून सांगू. मग बघ हीच आई त्या बाकीच्या लोकांना कशी अभिमानाने साराबद्दल सांगेल ते." विराज म्हणाला.

"हम्म." विशाखा म्हणाली.

"नुसतं हम्म? अगं आता तरी तुझा गोंधळ दूर झाला का?" विराज ने विचारलं.

"हो पण साराचा आवाज जोवर कानावर पडत नाही तोवर मला बरं नाही वाटणार. मी पुढच्या कामाला लागते. आई, बाबा येतील एवढ्यात." विशाखा म्हणाली आणि ती आत गेली.

"हे असंच सुरू आहे बाबा. आता तुम्हीच सांगा काय करायचं?" समीर म्हणाला.

क्रमशः....
******************************
सारा घरी येईल तेव्हा तिला नवीनच दिव्याला सामोरं जायचं आहे याची तिला तिळमात्र कल्पना नाहीये. काय असेल तिची प्रतिक्रिया? ती जर पास झाली तर तिला आफ्रिकेला जायची संधी मिळेल का? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all