लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२४)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                                किंग

सर्वत्र बघूनसुद्धा साराच्या दृष्टिक्षेपात अजून तो बिबट्या आला नव्हता. ती अगदी बारकाईने सगळीकडे बघत होती तरीही अजून कसा दिसत नाहीये? म्हणून तिचं मन अस्थिर होतं.

'इथल्या वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो सर्वत्र अगदी राजा सारखा वावरत असतो. त्या दृष्टीने आता मला शोधलं पाहिजे.' सारा मनातच म्हणाली.

आता तिची नजर त्याला आरामदायी झाडावर शोधत होती. थोडावेळ असाच शोधण्यात गेला आणि शेवटी तिला तो बिबट्या दिसलाच. अगदी घनदाट नाही आणि अगदी विरळ नाही अश्या झाडावर तो मस्त आरामात बसला होता. त्याच्या बसण्याच्या पद्धतीवरून तो अगदी उश्या, लोड आणि गादीला टेकून बसला आहे असं भासत होतं. त्यात त्याचा रंग इतका फांद्यांशी मिळता जुळता होता की, सहज त्याच्याकडे लक्ष जात नव्हतं.

"सरऽ" साराने सरांनाही तो बिबट्या दाखवला.

'अगदी साजेसं नाव ठेवलं आहे याला. किंग! अगदी राजा सारखाच ऐटीत बसला आहे झाडावर. राजे महाराजे जसे विश्रांतीसाठी बसत अगदी तसंच वाटतंय.' सारा मनातच म्हणाली.

"कौन से ट्रिक से तुमने इस लेपर्ड को ढुंडा़?" सरांनी तिला विचारलं.

"सर, फॉरेस्ट ऑफिसर बोले थे की, ये लेपर्ड जबसे यहाँ आया है किंग की तरह रेहता है | बस! मैने यही बात दिमाग में रखी | लेपर्ड डे टाईम में आराम करते है, तो वही मैने देखा की आरामदायक जगह किधर है? तो मुझे यह पेड़ दिखा |" सारा अगदी सहज म्हणाली.

तिने त्याचे तसे काही फोटो काढून घेतले. एखाद्या बिबट्याला एवढं आरामात झाडाच्या फांदीवर बसलेलं प्रत्यक्ष बघताना तिला खूप आनंद होत होता. झाडावर बसून तो बिबट्या त्याच्या क्षेत्राची जणू पहाणीच करत होता. एवढ्यात थोड्या अंतरावर एक प्राणी मृत अवस्थेत पडलेला सरांना दिसला. साराची अजून एक परीक्षा घेण्याचा हा चांगला उपाय आहे म्हणून त्यांनी मनोमन काहीतरी ठरवलं.

"सारा! वो ट्री के लेफ्ट साईड में कुछ फिफ्टी मीटर के दूरी पे एक शिकार पडा़ है, वह किसका शिकार हो गया होगा? वह देख के एक्स्प्लेन करो |" सर म्हणाले.

साराने लगेच सरांनी जे लोकेशन सांगितलं तिथे बघितलं. दुर्बिणीतून व्यवस्थित निरीक्षण करता येत नव्हतं म्हणून तिने वन अधिकाऱ्यांना अजून थोडं पुढे जाण्यासाठी विनंती केली. सगळी सुरक्षा आणि बाकी बाबी बघून त्यांनी अजून थोडं पुढे जाण्याची अनुमती देताच काही फूट पुढे जीप घेण्यात आली.

'याची शिकार नक्कीच बिबट्याने केलेली नाही. कारण बिबट्या शिकार करतो तेव्हा शिकारीच्या सरळ पोटकडचा भाग फाडतो त्यामुळे त्याच्या पोटाचा लादा फुटून दुर्गंधी पसरते. तसंतर यातून दुर्गंधी येतेय पण बहुदा ते उरलं सुरलं मांस कुजायला लागलं आहे त्याची आहे. नरडीचा घोट घेऊन शिकार करायची पद्धत वाघाची पण यात असं काही दिसत नाहीये. शिवाय वाघ, बिबट्या हे प्राणी त्यांची शिकार पुरवून पुरवून खातात. हा प्राणी जवळ जवळ सगळाच फस्त झाला आहे, उभा फाडून खाल्ला आहे हे नक्की. नक्कीच हे काम जंगली कुत्र्यांचं आहे. ते घोळक्याने एखादी शिकार करतात आणि मिळेल तिकडून प्राण्याला उभा फाडून खातात. यांची शिकार करायची पद्धतच अत्यंत क्रूर आहे. बिचारा तो प्राणी पूर्णपणे मृत झालेला पण नसतो आणि यांचा अर्ध्याच्या वर खाऊन झालेला असतो. मरताना तर त्याला अत्यंत यातना सहन करूनच मरावं लागतं.' सारा ती शिकार बघून मनातच म्हणाली.

जंगली कुत्र्यांची ही पद्धत अतिशय क्रूर आणि काळजाचं पाणी पाणी करण्यासारखी असते हे साराने अभ्यासलं होतं. आपल्याला साधी भाजी चिरताना सुरी किंवा विळीने कापलं गेलं तरीही किती त्रास होतो? इथे तर प्राणी जिवंत असतानाच त्याच्या देहाचा अर्धा अधिक फडशा पडलेला असतो तर त्याला किती नरक यातना सहन कराव्या लागत असतील? हा विचारही न केलेला बरा. असे विचार मनात आणून साराच्या अंगावर काटा आला होता. मोजून दीड ते दोन मिनिटं तिने त्या शिकरीकडे बघितलं असेल पण आता तिलाच कसंतरी होत होतं. त्यात त्याची दुर्गंधी पण एवढी होती की ती आता सहन होण्याच्या पलीकडे गेली होती.

"सर प्लीज वापस पिछे चलते है |" सारा कशीबशी नाकावर रुमाल धरून म्हणाली.

कॅरलॉन सरांनी डोळ्यांनीच वन अधिकाऱ्यांना सांगितल्याने लगेचच सगळे मागे फिरले. एवढा वेळ जीपमध्ये उभी राहिलेली सारा आता बसली होती. बॅगेतून पाण्याची बाटली काढून तिने घोटभर पाणी कसंबसं पिलं आणि तो प्रसंग नजरे समोरून घालवण्याचा ती प्रयत्न करत होती.

"इन सबकी अब आदत डाल लो |" सर तिच्याकडे रोखून बघत म्हणाले.

"हम्म." सारा फक्त एवढंच म्हणाली.

तिला या सगळ्याची सवय नाही आणि अजून थोडावेळ तर लागेलच म्हणून सरही तिला तिचा वेळ देत होते. ते तिची परीक्षा घेताना कितीही कठोर वागत असले तरीही त्यांनाही माहीत होतं की, सगळा अभ्यास थियरी नुसार करणं आणि तेच प्रात्यक्षिक स्वरूपात अनुभवणे यात खूप फरक असतो. कित्येक विद्यार्थी हे काहीकाही वेळा एवढ्या हिंस्र प्राण्यांना बघून घाबरायचे, काहीकाही शिकार बघून त्यातल्या रक्ताला घाबरून चक्कर येऊन पडायचे पण साराच्या बाबतीत असं अजूनतरी काहीही झालेलं नव्हतं. ती सगळं अगदी धीराने आणि संयमाने, धाडसीपणाने घेतेय हे सरांच्या लक्षात आलं होतं. त्यांना अश्याच धीट विद्यार्थांना शिकवायला आवडायचं. त्यांचं एकच मत होतं की, जर तुम्हाला या निसर्गाच्या सान्निध्यात काम करायचं आहे तर त्यातच एकरूप व्हायला शिका आणि ज्याला हे जमलं त्याला कॅरलॉन सरांचं मार्गदर्शन लाभलं. कारण हे क्षेत्र म्हणजे संपूर्णपणे निसर्गाशी एकरूप होणे, त्यातले बारकावे अभ्यासणे आणि हे सगळं करत असताना आपलं लक्ष दुसऱ्या गोष्टींनी विचलित होऊ न देणे या सगळ्याचा कस लागतो. याच कारणांनी ते तिला वरवर रागवत असत, तिला तिच्या चुका पूर्णपणे लक्षात याव्यात म्हणून प्रसंगी जास्तच कठोर होत असत पण यामागे त्यांचा हेतू फक्त आणि फक्त तिने या सगळ्यासाठी मनाची तयारी करावी हाच होता. त्यांनी तिला आधीपासूनच जर ढील दिली असती तर कदाचित आत्ता ती जितक्या तन्मयतेने स्वतःच्या चुकांमधून शिकतेय तेवढी शिकली नसती म्हणून ते असं वागत होते.

'सारा आय नो यू इंडियन्स अार व्हेरी स्मार्ट अँड अॅक्टीव इन युअर वर्क. आय अल्सो लाईक इंडिया. सॉरी फॉर व्हॉट आय स्पिक अबाऊट युअर कंट्री बट माय एक्सपिरियन्स इज सो वर्स्ट अँड दॅट इज द ओन्ली थिंग दॅट मेक्स मी अ सम बायाज विथ इंडिया. शायद तुम भी अगर काम बीच में छोड़ के गयी तो पुरे इंडियन गर्ल्स के लिये मेरा गाईडन्स बंद हो सकता है | बट इफ यू कॅन एबल टू प्रूव्ह देन...' सर मनातच म्हणाले.

त्यांच्या मनात हा विचार आला आणि लगेचच त्यांनी तो झटकून दिला. त्यांना आजवर आलेल्या अनुभवामुळे असं वाटत होतं हे त्यांनी मनोमन का होईना मान्य केलं होतं. त्यांना भारतातील राहणी, पाहुणचार आणि बाकी गोष्टी फार आवडत होत्या पण कामाच्या बाबतीत त्यांना अनुभव आलेले त्यामुळे त्यांच्या मनात याविषयी जरा मळभ होतं जे साराने मनोमन दूर करायचं ठरवलं होतं.

"सारा! टेल मी अबाऊट दॅट अॅनिमल." कॅरलॉन सर म्हणाले.

त्यांनी हा प्रश्न साराला विचारेपर्यंत मध्यंतरी जरा वेळ गेला होता आणि त्यामुळे साराही सावरली होती. लगेचच तिने तो प्राणी बघून मनोमन जे बोलली होती तेच त्यांना सांगितलं.

"राईट. ये काम जंगली डॉग्स का ही है |" सर म्हणाले.

साराने फक्त स्मित केलं. या सगळ्यात संध्याकाळ होत आली होती आणि जसा जसा दिवस अस्ताला चालला होता तशी तशी साराला घरची आठवण येत होती कारण ती घरी काहीही कळवू शकणार नव्हती.

'मी वर्ल्ड रेकॉर्डच्या वेळी फोटो शूटला गेले होते तेव्हा खोटं बोलले हे कळल्यावर किती त्रास झाला होता सगळ्यांना. यावेळी सगळ्यांना खरं माहीत आहे पण मी एवढ्या लांब आहे आणि त्यांना काहीही सांगू शकत नाहीये म्हणल्यावर घरी तर पूर्ण काळजीचं वातावरण तयार होईल. एकतर मी तर सोडा, दादा पण कधी असा एवढ्या लांब तेही चक्क दुसऱ्या राज्यात असे एकटे कधी गेलो नाहीये. आमचा फोन झाला तेव्हा मी आज माझी परीक्षा आहे म्हणून सांगितलं होतं. आता बाबांना आणि आईला परीक्षा कशी झाली? हे ऐकायचं असणार. अगदी आज रात्री फोन करायला जमलं नसेल अशी स्वतःच्या मनाची समजूत घालून ते आजची रात्र काढतील पण उद्याचं काय?' सारा मनातच विचार करत होती.

"लेट्स गो नाऊ. टुडेज वर्क विल बी ओव्हर." सर म्हणाले.

"ओके. सर, अभी थोडीही देर में सनसेट होगा | वह देख के वाईंड अप किया तो चलेगा?" साराने विचारलं.

"हम्म." सर म्हणाले.

जंगलातला असा सूर्यास्ताचा प्रकाश आणि परतीच्या प्राणी, पक्ष्यांचे फोटो काढता यावे म्हणून तिने सरांना असं विचारलं होतं आणि ते निसर्ग सौंदर्य तिला तिच्या कॅमेऱ्यात तर टिपायचं होतंच पण मनात पण साठवायचं होतं. थोड्याच वेळात आता सूर्याचा लाल केशरी गोळा अस्ताला जाणार होता आणि त्याचाच प्रकाश सर्वदूर पसरला होता. कोणत्याही फिल्टर शिवाय, कृत्रिम लाईट शिवाय आत्ताच्या उजेडातले फोटो साराला फार आवडायचे. तिला हवा तसा प्रकाश आता पडला होता आणि ती तिचा कॅमेरा घेऊन सज्ज झाली.

क्रमशः......
******************************
साराने तर छान छान फोटो काढले आहेत आणि आत्ताही ती अजून फोटो काढणार आहे, पण तिला घरी काय सुरू आहे हे माहीतच नाहीये. तिला जेव्हा हे समजेल तेव्हा काय होईल? समीरला इंटरनेटवरून तिथल्या ऑफिसमध्ये फोन करायला सुचेल का? कॅरलॉन सरांचं मत ती कसं बदलेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all