लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२३)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
            अभिमान मी भारतीय असल्याचा

साराच्या आजीने जे काही सांगितलं होतं त्यामुळे समीर जरा चिंतेत होता. त्याला सारावर पूर्ण विश्वास होता, पण कामाच्या गडबडीत किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे जर साराला काही घरी कळवता आलं नाही, तर आजीला आयती संधीच मिळणार आहे साराला अडवायला हे त्याने ओळखलं होतं. सध्या तरी आईला आणि आजीला काहीही बोलून उपयोग होणार नाही म्हणून तो विचार करतच त्याच्या रूममध्ये जाऊन बसला होता.

'सारा यार जर तू आज रात्रीपर्यंत फोन नाही केलास ना तर तुझं पुढचं करिअर धोक्यात आहे. काहीही कर पण घरी एकदा तुझी खुशाली कळव.' समीर मनातच म्हणत होता.

त्याला माहित होतं आपली आजी जे बोलते तेच खरं करते आणि जर तिच्या मनासारखं झालं नाही तर तिला त्या गोष्टीचा त्रास होतो आणि तिच्यामुळे मग सगळ्या घरात दुःखी वातावरण असतं, म्हणून समीरला जास्त काळजी वाटत होती.

'साराला जेव्हा वर्ल्ड रेकॉर्डसाठी जायचं होतं तेव्हा तर मी तिला पाठिंबा देऊ शकलो नाही पण ती चूक आता मी सुधारली पाहिजे. सारा एवढ्या लांबून दमून येणार, काहीतरी स्वप्न उराशी बाळगून येणार आणि मग घरी आल्या आल्या तिला हे समजलं तर तिच्या त्या स्वप्नांचा तर पार चुराडा होऊन जाईल. नाही! मला असं घडण्यापासून थांबवावं लागेल. आज संध्याकाळी बाबा घरी आले की त्यांच्याशी एकदा बोलतो. बघूया, त्यांचं मत काय आहे ते. हे प्रकरण शांततेत मिटेल तेवढं बरंय. उगाच घरात वाद नको व्हायला.' समीर मनातच सगळं ठरवत बोलत होता.

आता संध्याकाळी बाबांशी विचारविनिमय करून मग पुढचं पाऊल उचलू असं ठरवल्याने तो काही अंशी निर्धास्त झाला होता. त्यालाही साराची काळजी होती, पण तिच्या स्वप्नांचा बळी या काळजीपोटी जाऊ नये एवढंच त्याला वाटत होतं.
*****************************
इथे साराला आता तिच्या चुकीची जाणीव झाली होती आणि सरांनी तिला समजावून सांगितल्यावर तिने पुन्हा अशी चूक करायची नाही हे ठरवलं होतं. ती तिच्या कामात व्यस्त होती. वन अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ग्लिचीवर उपचार करण्यासाठी एक डॉक्टरांची टीम तिला तिथून घेऊन जायला आली होती आणि तिच्या सोबत पिल्लांना पण काही दुखापत झाली नाहीये ना? याची तपासणी करायला ते घेऊन गेले. भारतात आधीच बिबटे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने ग्लिचीवर उपचार करणे हे भागच होते. हेच कोणता दुसरा प्राणी जखमी झाला असता तर त्याला नैसर्गिकरीत्या बरं होण्यासाठी सोडलं असतं पण बिबट्यांच्या बाबतीत ही जोखीम घेण्यासारखी नव्हती, म्हणून तिच्यावर उपचार व्हावे याची सोय वन अधिकाऱ्यांनी केली होती.

"सारा शो मी फोटोज् अँड व्हिडिओज्." कॅरलॉन सर म्हणाले.

साराने लगेच तिचा कॅमेरा त्यांच्याकडे दिला. त्यात ग्लिची आणि तिच्या पिल्लांचे छान छान फोटो आले होते. शिवाय साराने त्यांचे खेळतानाचे व्हिडिओसुद्धा काढले होते. साराची फोटो काढण्याची पद्धत एकदम खास होती त्यामुळे आपण फोटो बघत नसून प्रत्यक्ष समोर ते प्राणी बघत आहोत असंच वाटायचं. परफेक्ट टाईमिंग, फोटोची क्लियारिटी आणि फोकस सगळं एकदम व्यवस्थित असायचं. सरांनाही ते फोटो फार आवडले. त्यांनी तिला जरी सांगितलं असलं की, "तू फोटो काढ मी त्यात जिवंतपणा कसा आणायचा हे दाखवतो" तरीही त्याची जास्त गरज नव्हती. साराने ते आपोआप आत्मसात केलं होतं.

"व्हेरि गूड सारा. नाईस क्लिक्स्." सर म्हणाले.

"थँक्यू सर. आपके आर्टिकल रीड करके ही सिखा है |" सारा म्हणाली.

कामाच्या गडबडीत आणि अचानक झालेल्या झुंजीमुळे कधी दुपार होऊन गेली होती हे कोणाला समजलंच नव्हतं.

"ओके. लेट्स गो नाऊ. एक सेफ जगह देखके फर्स्ट वी विल टेक लंच अँड देन वी फाइंड दॅट येस्टरडेज् लेपर्ड." कॅरलॉन सर म्हणाले.

"ओके सर." सारा म्हणाली.

तिला सध्यातरी मनातून बरं वाटत होतं कारण तिने अनाहूतपणे का होईना निसर्गाच्या कामात ढवळाढवळ केली होती आणि सर प्रचंड चिडले होते पण आता ते नॉर्मल वागत होते म्हणून तिला आत्ता कुठे रिलॅक्स वाटत होतं. वन अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी एक व्यवस्थित जागा बघितली आणि तिथे सगळे उतरले. जंगलात येताना त्यांनी काही रेडी टू कुक पॅकेट्स आणले होते त्यात फक्त पाणी गरम करून घालायचं होतं म्हणून सरांनी त्याची व्यवस्था केली आणि पाणी गरम करत ठेवलं.

"सर! आय ब्रिंग टिफीन. वी कॅन शेअर इट." सारा म्हणाली.

"ओके. बट ये आदत अब छोड़ दो | तुम्हें ऑल टाईम घरका खानाही मिलेगा ये पॉसिबल नहीं है |" कॅरलॉन सर म्हणाले.

"येस सर. ये बार मॉमने सब बनाके दिया था |" सारा म्हणाली.

बोलता बोलता तिने तिथल्या झाडांच्या मोठ्या पानात सगळ्यांना वाढलं आणि पानं दिली. तिच्या आईने तिला दोन ते तीन दिवस पुरतील एवढे पराठे, लोणचं, चिवडा, लाडू आणि तिखट मिठाच्या पुऱ्या दिल्या होत्या.

"आय लाईक इंडियन फूड. इंडिया की ये बात मुझे बहुत पसंद है, यहाँ खाने की बहुत वऱ्हाईटी होती है |" कॅरलॉन सर पराठ्याचा घास खाता खाता म्हणाले.

"येस सर. हमारे हर स्टेट की एक खास बात होती है और हर फूड आयटम अपने बॉडी के लिये अच्छा काम करता है | इंडिया के सभी ट्रेडिशन्स को एक सायंटिफिक रिझन होता ही है |" सारा म्हणाली.

"सारा! होनेस्टली मै एक बात बोलू? अगर इंडियन लोक कुछ थान ले ना तो कुछ भी कर सकते है | मगर हमेशा सोसायटी के बारे में सोचते सोचते हमेशा पिछे रहते है |" कॅरलॉन सर म्हणाले.

'सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असतो. आपल्याला नक्की खरी कारणं काय आहेत? हेही कित्येकदा माहीत नसतं. जर सगळ्यांनाच मनात आलं ते करायला मिळालं असतं, तर जगण्यातला आनंद कुठेतरी निघून गेला असता ना? अहो सर जे यश आपल्याला घाम गाळून मिळतं त्याचं मोल आणि आयतं काहीतरी मिळालं तर त्याचं मोल यात फरक असतोच ना? जे आपण संघर्ष करून हळूहळू मिळवतो ते चिरकाल टिकतं. सर, कदाचित आत्ता तुम्हाला नाही कळणार मी हे सगळं सांगून सुद्धा म्हणूनच वेळ आल्यावर एक एक गोष्टी तुम्हाला भारतीयांच्या दृष्टीने दाखवून देईन. निसर्गाच्या या नियमाला कोणीही अपवाद नसतं, अगदी प्राणीही नाही. त्याचंच उदाहरण घेऊन एक ना एक दिवस तुम्हाला सगळ्या भारतीयांचा गर्व वाटेल असं तुम्हाला सांगेन. तुम्ही तर अगदी सहज म्हणालात की, भारतीय नेहमी समाजाचा विचार करतात, कुटुंबात अडकून पडतात त्याचं अगदी नीट उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन. मी असं म्हणत नाहीये की, तुमचं सगळंच चुकतंय. मान्य आम्ही भारतीयांनी पण आता काही नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात आणि आम्ही प्रयत्न करतोय. एकाच रात्रीत जादूची कांडी फिरवावी असं काहीही बदललं जाणार नाही, पण बघाच सर हाच भारत उद्या महासत्ता म्हणून नावारूपाला येणार. आम्हा सर्वांनाच आम्ही भारतीय असल्याचा अभिमान आहे. तो कोणीही येऊन असा पुसून टाकू शकत नाही. तुम्हालाही भारतातील बऱ्याच गोष्टी आवडतात ना? आता संपूर्ण भारतच तुम्हाला आवडायला लागेल असं काहीतरी मी नक्कीच करून दाखवेन.' सारा मनातच विचार करत होती.

तिला माहित होतं आत्ता आपण सरांना काहीही सांगितलं तरीही त्यांना ते पटणार नाहीये म्हणूनच तिने मनोमन त्यांना ज्या भाषेत कळेल म्हणजेच प्राण्यांच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी माणसांच्या आयुष्याशी सांगड घालून त्यांना सांगायचं ठरवलं होतं.

"व्हॉट आर यू थिंकिंग?" सरांनी तिला असं विचारत गढलेलं पाहून विचारलं.

"नथिंग सर." सारा म्हणाली.

तिला आत्ता पासूनच सरांना काहीही कल्पना द्यायची नव्हती नाहीतर त्यांनी स्वतःच्या मनाला ती काय बोलतेय हे पटत असून सुद्धा आपणच बरोबर आहेत याची समजूत घातली असती. म्हणूनच सारा काहीही बोलली नाही आणि जेवण करू लागली. थोड्याचवेळात सगळ्यांची जेवणं झाली. पुन्हा सगळे जीपमध्ये आले आणि वन अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार अजून थोडं पुढे गेले. त्यांना काल रात्री जो बिबट्या शिकार करताना दिसला होता त्याचे फोटो काढायचे होते आणि तो यावेळी कुठे असतो याचा अंदाज वन अधिकाऱ्यांना होताच.

"अभी जो लेपर्ड हम देखने जा रहे है उसका नाम किंग है | क्योंकी जबसे वह यहाँ आया है तबसे बाकी के लेपर्ड उससे दूर ही रहते है | वह एक राजा की तरह पुरे जंगल में घुमते रेहता है |" वन अधिकारी म्हणाले.

"कल उसके शिकार का तरिका भी देखा था | एकदम शातिर तरिकेसे उसने शिकार किया |" सारा म्हणाली.

बोलता बोलता ते सगळे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले. वन अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार तो बिबट्या दिवसा तिथल्याच एखाद्या झाडावर असतो म्हणून सारा दुर्बिणीने त्याला शोधत होती.

क्रमशः....
***************************
सारा तिच्या सरांचं भारतीय लोकांविषयी असलेलं मत कसं बदलेल? साराला तर अजून तिच्या घरी आजी आणि आईने काय ठरवलं आहे हे माहीतच नाहीये, जेव्हा तिला हे समजेल तेव्हा काय होईल? सारा आफ्रिकेच्या जंगलात जाऊ शकेल? ती या परीक्षेत पास होईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all