लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२२)

Story Of Girl Who Want To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                              झुंज

सारा तर तिच्या शूटमध्ये पूर्णपणे गुंतली होती. तिला काहीही करून यात यश मिळवून पुढे सरांसोबत आफ्रिकेच्या जंगलात जायचं होतं. तिला कळत्या वयापासून आफ्रिकन वाघ, सिंह, चित्ते आणि हत्तींचं निरीक्षण करून त्यांचे फोटो काढण्याची इच्छा होती.

'आज सरांना माझं काम आवडलं तर कदाचित ते उद्या घरी जाऊ देतील. जर असं झालं तर बरंच आहे. नाहीतर काय? जे व्हायचं असेल ते होईलच.' सारा मनातच विचार करत होती.

विचार करता करताच तिचं शूटसुद्धा सुरू होतंच. अतिशय बेरका स्वभाव असलेला बिबट्या, कसा आपल्या भक्ष्याला फसवून मारतो? हे साराने काल रात्रीच्या प्रसंगात बघितलं होतंच. अगदी बेसावध असलेली ती रान मेंढी कालच्या बिबट्याची शिकार झाली होती. बिबटे नेहमी आपल्या आकारापेक्षा लहान सावजाची शिकार करतो हे तिने काल अनुभवलं होतं. ती कालच्या प्रसंगाची उजळणी करत होती एवढ्यात समोरच्या दृश्यात अचानक धावपळ सुरू झाली आणि साराचं विचारचक्र थांबून ती बारकाईने समोरची दृश्य टिपू लागली.

'नक्कीच आता झुंज होणार हे फिक्स आहे.' ती मनातच म्हणाली.

तिथे अचानक जंगली कुत्री घोळक्याने जमा झाल्याने ग्लिची तिच्या पिल्लांना प्रोटेक्ट करण्यात व्यस्त होती. ती गुर्गुर करून त्यांना पाठी हटवण्याचा प्रयत्न करत होती. सगळी पिल्लं तिच्या मागेच होती. तिने थोडं पुढे होऊन रान कुत्र्यांना जरा मागे हटायला लावलं आणि बाजूलाच असलेल्या दगडांच्या जागेत सगळ्या पिल्लांना ठेवून ती तिथेच ठिय्या देऊन बसली. एरवी रान कुत्र्यांनी असं कळपाने बिबट्याला घेरलं तर तो सरसर झाडावर चढून बसतो परंतु ही पिल्लं लहान असल्याने जास्त उंचीवर पटकन चढू शकणार नाहीत आणि नक्कीच त्यांचा बळी जाईल म्हणून ग्लिचीने त्यांना असं लपवलं होतं आणि तिथेच बसून त्यांचं रक्षण करत होती.

'आई ती आईच असते. आपल्या पिल्लावरचं संकट टाळण्यासाठी आता तासन् तास इथेच बसून राहावं लागणार आहे तिला.' सारा मनातच म्हणाली.

ती रान कुत्री तिच्या जवळ येऊ लागली की ती जागेवरून उठून अचानक त्यांच्यावर हल्ला चढवायला जाई आणि मग ती कुत्री मागे हटत. असंच बराचवेळ सुरू होतं. चारही बाजूंनी ग्लिची आणि तिची पिल्लं घेरली गेली होती. जवळ जवळ सात ते आठ रान कुत्री आणि एकटी ग्लिची असं त्यांचं युद्ध सुरू होतं. एखादेवेळी ग्लिची पुढून आलेल्या कुत्र्यांना मागे हटवण्यासाठी पुढे गेली की मागची कुत्री पुढे येत. यामुळे तिची चांगलीच दमछाक होत होती, पण तिला तिच्या जिवापेक्षा तिच्या पिल्लांचा जीव महत्त्वाचा होता. अशीच त्यांची झटापट सुरू होती आणि काही वेळानंतर ग्लिची पुढे गेली असता मागची कुत्री त्या पिल्लं लपून बसली होती त्या दगडापर्यंत पोहोचलीच. त्या दगडात असलेली गॅप लहान असल्याने त्या कुत्र्यांना विशेष काही करता येत नव्हतं. आता सगळी भिस्त पिल्लांवरच होती. जर पिल्लं बाहेर आली तर त्यांचा जीव जाणार हे निश्चित होतं. ग्लिची त्या कुत्र्यांना मागे हटवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू लागली पण आता त्यांची हिंमत बळावली होती. ती काही मागे हटण्यासाठी तयारच नव्हती. त्याही परिस्थितीत ग्लिची तिचं पूर्ण बळ एकवटून लढत होती. सगळ्याच रान कुत्र्यांनी मिळून तिच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यातून कशीबशी वाचून ती एकटीच तिच्या पिल्लांसाठी झुंज देत होती. तिला जखमा झाल्या होत्या. काही वरवर होत्या तर काही खोल. तरीही तिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पिल्लांना वाचवायचं आहे हेच भाव होते. ती विविध आवाज काढत होती, पिल्लं लपली होती त्या दगडापाशी ती सारखी थांबत होती. एखादं पिल्लू बाहेर आलं तर ती त्याला आत ढकलत होती. पिल्लांनाही आईची काळजी वाटत होती. त्यात ग्लिचीला झालेल्या जखमेतून रक्तस्त्राव होताना बघून सारालाही वाईट वाटत होतं.

'आईचं प्रेम हे आईचं प्रेमच असतं, मग ती माणसाची आई असो वा प्राण्यांची. ग्लिची किती झुंज देतेय फक्त आणि फक्त पिल्लांचा विचार करून. बिचारीला थोड्याफार जखमा पण झाल्यात. काही तर एवढ्या खोल आहेत की रक्तस्त्राव होतोय. एका आईशी यांनी पंगा घेतला आहे म्हणून अजून ग्लिची टिकून आहे नाहीतर ही रान कुत्री तर प्राण्यांना उभे फाडून खाण्यात कुप्रसिद्ध आहेत. बघवत नाहीये मला तिचा हा संघर्ष. काय करू?' सारा मनातच विचार करत होती.

अचानक तिच्या डोक्यात काय आलं काय माहीत तिने तिचा कॅमेरा स्टँडला लावला आणि बॅगेतून काहीतरी चाचपडून बाहेर काढलं. त्या बिबट्या आणि यांच्या जीपमध्ये बरंच अंतर होतं पण साराने काहीतरी मनातच आकडेमोड केली, आजूबाजूचे आवाज घेतले आणि डोळे मिटून ती सज्ज झाली.

"फट्ऽऽ चर्रऽऽ" अचानकच मोठा आवाज झाला आणि जीपमध्ये असलेले वन अधिकारी आणि कॅरलॉन सर सुद्धा एकदम दचकले.

साराचं मात्र याकडे लक्ष नव्हतं ती पूर्णपणे समोरचं दृश्य बघण्यात गुंतली होती आणि तिने ज्याप्रमाणे विचार केला होता त्याप्रमाणे समोर असलेली रान कुत्री कुठच्या कुठे पळून गेली होती आणि ग्लिची आता निर्धास्त होती. तरीही तिने पुन्हा सगळीकडे बघून नक्की संकट टळलं आहे ना? याची खात्री करून घेतली आणि शांतपणे बसली. पिल्लं सुद्धा आता बाहेर आली होती आणि आईला झालेल्या जखमा बघून तिच्या भोवती बसली होती. शाय तर तिच्या जखमा चाटत होता. सगळ्यात जास्त वाईट त्याला वाटत होतं. ग्लिचीने सुद्धा पिल्लांना जवळ घेऊन चाटलं. जणू ती त्यांना सांगत होती; "बाळांनो! नका काळजी करू. संकट टळलं आहे आणि मी आहे." साराला हे बघून खूप छान वाटत होतं. तिने सगळे क्षण कॅमेऱ्यात टिपून घेतले होते.

"व्हॉट यू डीड? साराऽ आय डोन्ट लाईक धिस. ऐसे नेचर के काम में हम दखल नहीं दे सकते | यू क्रॉस युअर लिमिट्स." सर जरा रागात म्हणाले.

"सॉरी सर. मुझे ऐसा नहीं करना चाहिए था | लेकीन ग्लिची की मुझे चिंता हो रहीं थी इसलिये मैने पार्टी बॉम्ब फोडा़ | इससे बडा़ आवाज आयेगा और वो जंगली डॉग्स् भाग जायेंगे ये मुझे पता था |" सारा म्हणाली.

"लूक सारा, यू कान्ट हॅव एनी राईट टू इंटरफियर विथ नेचर. तुम्हें अपने इमोशन्स पे काबू रखना होगा | अदरवाईज लिव्ह इट अँड च्युस सम अदर करिअर ऑप्शन." सर रागाने म्हणाले.

"इट्स ओके सर. मै ग्लिचीके इलाज की व्यवस्था करता हूॅं | यहाँ ऐसी लढाई शुरूही रेहती है |" वन अधिकारी म्हणाले.

"येस सर यू डू दॅट. बट साराने जो भी किया वो सही नहीं था | उसे अपनी गलती पता होनी चाहिए |" कॅरलॉन सर म्हणाले.

"सॉरी सर. आगे से ऐसी गलती नहीं होगी |" सारा म्हणाली.

त्यांच्या बोलण्याने साराला आपण नक्कीच खूप चुकीचं वागलो आहोत याची जाणीव होत होती. आपल्याला कितीही वाईट वाटलं तरीही निसर्गाच्या कामात आपण हस्तक्षेप करू शकत नाही हा नियम तिने भावनेच्याभरात मोडला आणि आता त्याचा तिला खूप पश्चाताप होत होता. प्रत्येकाने आपलं जीवन स्वतःच जगायचं असतं आणि त्यात येणाऱ्या अडचणींवर मात सुद्धा स्वतःच करायची असते आणि यातूनच जीवन उजळून जातं हेच ती विसरली.

"सारा लिसन! व्हेन आय वॉज स्टुडंट लाईक यू देन आय अलसो फील द सेम. बट नेचर के भी कुछ रुल्स होते हैं | वी ओन्ली च्युस द फील्ड ऑफ फोटो अँड व्हिडिओग्राफी. वी डोन्ट हॅव एनी राईट टू इंटरफियर विथ इट. हमें लगता है की, कुछ अच्छा काम हो गया, किसिकी लाईफ बच गई लेकीन ऐसे नहीं होता | इट्स अलसो इफेक्ट अवर स्टडीज." सर म्हणाले.

आधीपेक्षा आत्ता त्यांचा स्वर जरा शांत वाटत होता. साराने जे केलं ते चुकीचं होतं याची तिला जाणीव झालेली बघून सर तिला समजावत होते.
****************************
इथे साराच्या घरी मात्र वेगळंच वातावरण होतं. साराला यायला अजून उशीर होणार आहे आणि तिला निदान एक दिवस तरी जास्त राहावं लागणार आहे या बातमी पासून अनभिज्ञ तिची आई सारा उद्या येणार म्हणून आनंदी होती. तिला मनोमन साराच्या मनासारखं व्हावं असं वाटत असलं तरीही तिच्या आजीमुळे साराच्या आईचं मन सुद्धा दोलायमान होत होतं. तिलाही मुलीचं सुख हवं होतं पण साराच्या आजीचं बोलणंही पटत होतं. त्यात साराच्या आईने आणि आजीने सारा यात पास झाली नाही तर तिला पुन्हा हे काम करूच द्यायचं नाही असं ठरवलं होतं.

"आई उद्या सारा येईल. ती पास झाली असेल तर तिचा आनंद नको हिरावून घ्यायला. आपण तिला समजावून बघू." विशाखा म्हणाली.

"हो गं! मलाही तिची काळजी आहेच. आपण समजावल्यावर ती नक्की समजून घेईल बघ. तसंही आता तिथे कामाची ओढाताण झाली असेल तर तिचं तिलाच जाणवलं असेल हे काम आपल्याला झेपणार नाहीये." तिची आजी म्हणाली.

"अगं आई, आजी असं काय म्हणताय? आपली सारा काहीतरी करु पाहतेय तर तुम्ही हे असे विचार का करताय?" समीर म्हणाला.

"समीर आम्ही जर तरच्या गोष्टी करतोय. साराला जर हेच काम करायचं असेल तर काही आम्ही तिला हाताला धरून अडवायला नाही जाणार आहोत. तिचं सुख तेच आमचं सुख आहे." त्याची आई म्हणाली.

"असं काहीही नाहीये. वेळ पडलीच तर आपण तिला हाताला धरून सुद्धा अडवायला जायचं. आत्ता करू दे काय करायचं असेल ते पण तिच्या हातून फक्त एक चूक होऊदे मग बघ." त्याची आजी म्हणाली.

"अगं आजी तिची चूक झाली तर तिचे सर तिच्याकडून घेतील ती सुधारून. ती चुकांमधून तर शिकेल." समीर म्हणाला.

"मला काय म्हणायचं आहे हे तुला समजलं नाही. तिची चूक म्हणजे आपल्याला काही कळवण्यात हलगर्जीपणा झाला किंवा तिला तिच्या या कामात काही दुखापत झाली किंवा ती या परीक्षेत नापास झाली तर.. असं म्हणायचं आहे मला." त्याची आजी म्हणाली.

'मग तर आजी तू साराला या क्षेत्रातून कधीच दूर करू शकत नाहीस. बघच आपली सारा आता या सगळ्याला कशी झुंज देऊन उंच आकाशी उडते ते.' समीर मनातच म्हणाला.

क्रमशः.....
*****************************
सारा जे वागली आहे त्यामुळे तिचे मार्क्स कापले जातील का? तिची आजी जे म्हणाली आहे ते ती खरं करेलच. तिच्या आजीला तर एक आयतीच संधी मिळणार आहे, साराला एक दिवस तरी यायला उशीर होणार आहे आणि हेच कारण पकडून तिची आजी तिला विरोध करेल का? काय होईल पुढे? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all