लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२१)

Story Of A Girl Who Wants To Achive Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२१)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                   ग्लिची, शाय, स्नोई, राणी

साराचा डोळा लागला असला तरीही तिला ती पिल्लं स्वप्नातसुद्धा दिसत होती. आधीच प्राण्यांची आवड तिला होतीच आणि आता पुढचं सगळं आयुष्य प्राण्यांच्याच सानिध्यात व्यतीत करायला मिळणार आहे या विचारानेच तिचं मन सुखावलं होतं.

"साराऽ आर यू रेडी?" सरांनी तिला तिच्या खोलीच्या बाहेरून हाक मारली.

त्यांच्या आवाजाने ती जागी झाली आणि घड्याळ बघितलं तर अंदाजे अडीच तास होऊन गेले होते.

'झोप लागली होती. पटकन आवरलं पाहिजे.' ती मनातच म्हणाली आणि व्यवस्थित उठून बसली.

तोवर सरांची बाहेरून पुन्हा हाक आली.

"येस सर आय एम रेडी. जस्ट अ मिनिट." सारा म्हणाली.

पटकन उठून तिने तोंड धुतलं आणि तिची रेडी करून ठेवलेली सॅक घेऊन ती बाहेर आली.

"ये आज जो हूवाॅं वह फर्स्ट अँड लास्ट टाईम. यू हॅव टू एबल कंट्रोल ऑन युअर स्लीप. इन धिस फिल्ड यू हॅव टू रेडी ऑल टाईम. आय नो रेस्ट अँड अवर हेल्थ इज अल्सो इंपॉर्टंट, बट यू हॅव टू एक्सटेंड युअर हेल्थ लिमिट्स." सर म्हणाले.

"येस सर." सारा म्हणाली.

लगेचच सारा, कॅरलॉन सर आणि वन अधिकारी पुन्हा जंगलाच्या दिशेने निघाले. एव्हाना सकाळचे अकरा वाजून गेले होते. उन्हाची तीव्रता वाढत होती, पण सगळे जसे जंगलाच्या दिशेने जात होते तसा गारवा जाणवत होता. साराला आता खूप उत्सुकता होती ती म्हणजे तिने सेट केलेल्या कॅमेऱ्यात काही कैद झालं आहे का? हे बघण्याची. तिथे पोहोचल्या पोहोचल्या साराने आधी कॅमेरा हातात घेतला.

वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने सगळे जीपमधून खाली उतरले होते. साराने जिथे कॅमेरा सेट केला होता तिथेच उभं राहून साराने कॅमेरा सुरू केला. कॅमेऱ्यात ती मादा बिबट्या आणि तिची पिल्लं कैद झाली होती. जसजशी सकाळ होत गेली तशी पिल्लं आईच्या कुशीत निर्धास्तपणे झोपली होती. काल जे पिल्लू झाडाच्या खोडात लपून बसलं होतं ते या बाकीच्या पिल्लांपेक्षा जरा जास्त बुजरं वाटत होतं. काही काळ असा गेला आणि पिल्लं पुन्हा उठली.

'ही पिल्लं तर आपण लहान होतो तशीच आहेत अगदी. आई मला आणि दादाला शाळेतून घेऊन आल्यावर सगळं आवरून, खाऊ पिऊ घालून आणि शाळेत काय काय घडलं? ही आमच्या दोघांची बडबड ऐकून घेऊन दुपारी जरावेळ आम्हाला झोपायची. जरा झोप झाली की आम्हा दोघांना लगेच जाग यायची. आजी, आजोबा पण दुपारी झोपायचे आणि आईची कामं सुरू असायची तरीही आम्ही दोघं तिच्या कामात लुडबुड करायचो आणि मग आजी, आजोबांना उठवून त्यांच्याशी खेळायचो. ही पिल्लंसुद्धा तशीच द्वाड आहेत. बिचारी त्यांची आई दमून झोपली आहे आणि ही पिल्लं लागली पुन्हा तिच्या अंगावर खेळायला.' सारा मनातच व्हिडिओ फुटेज बघून बोलत होती.

ती ते फुटेज बघण्यात पूर्णपणे गुंतली होती. तिला या पिल्लांच्या अश्या वागण्याने स्वतःचं बालपण आठवत होतं. त्या रेकॉर्डिंग नंतर पिल्लं त्यांच्या आई सोबत दुसरीकडे गेली आणि त्या अॅंगल पर्यंत कॅमेरा न पोहोचू शकल्याने ती पिल्लं आणि त्यांची आई कुठे गेली? हे समजू शकलं नाही.

"सारा! अभी तुम्हारा टास्क ये है की, यू हॅव टू फाईंड दॅट मदर लेपर्ड अँड हर कब्स्." कॅरलॉन सर म्हणाले.

"ओके सर. आय विल डू माय बेस्ट." सारा आत्मविश्वासाने म्हणाली.

लगेचच तिने तिची दुर्बीण काढली.

'बिबट्या दिवसा झाडावर राहतात किंवा कुठल्यातरी झाडाच्या थंडगार सावलीत पहुडलेले असतात आणि त्या बिबट्याची पिल्लं बघून वाटतंय तरी ती पिल्लं निदान कमी उंचीच्या झाडावर तरी चढू शकत असतील किंवा त्यांच्या आई बरोबर एखाद्या गार सावलीत मस्ती करत असतील. मला असंच झाड शोधलं पाहिजे ज्यावर ती आई बिबट्या आणि तिची पिल्लं असू शकतील किंवा असं झाड ज्याची सावली घनदाट असेल.' सारा मनातच म्हणाली.

मनात हे विचार करता करताच तिची नजर दुर्बिणीने सर्वत्र त्या बिबट्यांना शोधत होती. थोडावेळ शोधण्यात गेल्यावर एका मोठ्या झाडाच्या सावलीत तिला तीनही पिल्लं आणि त्यांची आई दिसली. साराने ज्याप्रमाणे विचार केला होता अगदी त्याप्रमाणेच आई सावलीत पहुडली होती आणि पिल्लं एकमेकांशी खेळत होती. साराने लगेचच त्या पिल्लांचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली. दोन पिल्लं तर अगदी बिनधास्तपणे खेळत होती फक्त ते तिसरं पिल्लू जरा बुजऱ्या स्वभावाचं आणि एकदम स्लो आहे असं वाटत होतं. इतर पिल्लांच्या तुलनेत त्या पिल्लाचं वजनही कमी होतं.

'ही त्याची दोन भावंडं या पिल्लाला नेहमी मागे पाडत असणार. शाळेत एखादा तरी असा विद्यार्थी असतोच ना ज्याची सगळे टिंगल टवाळी करतात, त्याला खूप त्रास देतात आणि तरीही तो काहीच बोलत नाही किंवा काही करत पण नाही अगदी तसंच आहे हे पिल्लू. बाय द वे या गोड फॅमिलीला काहीतरी छान नाव द्यायला हवं ना?' सारा मनात म्हणाली.

ती त्या बिबट्यांना काय नावं द्यायची? याचा विचार करत होती आणि सरांना याबद्दल त्यांचं मत विचारू आणि मग नाव ठरवू असा विचार करून तिने व्हिडिओ शूट करण्याचं थांबवलं.

"सर, ये फॅमिली को कुछ नाम रखते है ना." सारा म्हणाली.

"येस, डेफिनेटली." कॅरलॉन सर म्हणाले.

"इस फॅमिली का नाम है | वो जो मदर लेपर्ड है उसका नाम ग्लीची है, क्योंकी जब वह यहाँ लाई गयी थी तब उसके एक आँख में से बार बार पानी आता था तो ये बार बार अपनी पलके झपकाती रहती थी | बादमे ईलाज करके इसे ठीक कर दिया | बडी़ होने के बाद अब इसने कई बच्चो को जन्म दिया | इसके इन कब्स् का नाम भी रखा गया है | वह जिसका वजन सबसे कम है उसका नाम शाय है, क्योंकी वह थोडा शर्मिला है | वह जादातर समय आपनी माॅं के साथ बिताता है |" ते वन अधिकारी त्या बिबट्यांची नावं सांगत होते. थोडावेळ त्यांनी पॉज घेतला.

साराला यात खूप मजा येत होती. ती लहानपणापासून घरी टीव्हीवर असे कार्यक्रम बघायची तेव्हा त्या शो मधल्या प्रेझेंटर्सनी प्राण्यांची नावं सांगून त्यांचं निरीक्षण सुरू केलं की हिला फार गंमत वाटायची. आपणही मोठं होऊन असंच जंगलात जायचं, प्राण्यांचं निरीक्षण करायचं आणि त्यावरून त्यांना नावं द्यायची आणि पुढचा अभ्यास करायचा असं तिने केव्हाच ठरवलं होतं. आज तेच ती प्रत्यक्ष अनुभवत होती. आपली स्वप्न पूर्ण होत आहेत ही भावनाच काही मस्त असते ना? हेच साराला वाटत होतं आणि ती हे सगळं खूप आनंदाने जगत होती. ती तिथल्या पूर्ण वातावरणात मनापासून सामील झाली होती. न कळत ती त्या बिबट्यांच्या पिल्लांची आणि तिच्या बालपणीच्या आठवणींची सांगडसुद्धा घालत होती आणि आपण आज आपलं स्वप्न पूर्ण करायला आलो आहोत या भावनेतून मन भरून ते क्षण जगत होती. वन अधिकारी काय काय सांगतायत ते ती अगदी नीट ऐकत होती.

वन अधिकारी पुन्हा बोलू लागले; "वह बच्चा जो अभी शाय के साईड में खडा़ है, उसका नाम स्नोई है | क्योंकी उसके एक पंजे के पास सफेद दाग है और जो तिसरा बच्चा है उसका नाम रानी है | वह एक फिमेल लेपर्ड है |" ते म्हणाले.

"इन सबके नाम बहुत प्यारे है |" सारा म्हणाली.

आता तिला त्या बिबट्यांचा अभ्यास करायला खूप सोपं जाणार होतं कारण तिच्याकडे आता सगळ्यांना नावं होती. त्यांच्या नावाप्रमाणे ती त्यांचा त्यांचा अभ्यास करून फोटो काढणार होती आणि घरी हे सगळे फोटो दाखवताना सुद्धा तिला त्यांची नावं सांगता येणार होती.

'घरी गेल्यावर या सगळ्यांची नावं सांगून फोटो दाखवले तर किती मजा येईल? आजीला तर टीव्हीवर प्राण्यांना नावाने बोलवायचे तेव्हाही किती कौतुक वाटायचं? ती नेहमी म्हणायची की, यांना नक्की कळतं कसं काय माहित आपण कोणाला काय नाव दिलं आहे ते, की काहीपण बोलतात त्यांचं त्यांना माहीत. आता मी आजीला नावं सांगून ती का ठेवली आहेत? याचं कारण पण सांगेन.' सारा मनातच घरी फोटो दाखवताना काय काय गंमत येईल याचे इमले बांधत होती.

"सारा, नाऊ टेक सम फोटोज् अँड व्हिडिओज्. देन आय विल शो यू हाऊ टू फिल दॅट फोटो अलाईव्ह." सर म्हणाले.

"येस सर." सारा म्हणाली.

लगेचच ती शूटसाठी तयार झाली. यावेळी शूट करताना मात्र ती मनात ज्याचा फोटो किंवा व्हिडीओ काढत असेल त्याचं नाव घेऊनच ती शूट करत होती त्यामुळे तिलाही प्राण्यांना नावाने ओळखण्याचा आणि बारीक बारीक फरक ओळखण्याचाही सराव होणार होता.

क्रमशः......
*****************************
साराने मेन ऑफिसमध्ये तिचा व्हॉईस मेसेज ठेवला आहे म्हणून ती निर्धास्त असली तरीही समीरला तिथे फोन करायचं सुचेल का? साराला माहितही नाहीये की तिच्या घरी तिच्याच आजीमुळे तिच्या आईचं मन बदलतंय. तिला आफ्रिकेला जाणं सहज शक्य होईल? ती कॅरलॉन सरांच्या परीक्षेत पास होईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all