लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१)

Story Of Girl Who Want To Do A Different Carrier.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                                 हट्ट

"अगं सारा दार उघड नाऽ काय नसता हट्ट चालू आहे तुझा?" साराची आई विशाखा दारावर थाप टाकत तिला हाक मारत होती.

"आईऽऽ तू प्लीज मला एकटीला राहुदे." सारा आतून म्हणाली.

"अगं ऐकून तरी घे एकदा. आम्ही तुला का नाही म्हणत आहोत? त्याची कारणं तर समजून घे." तिची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती.

"नाही म्हणजे नाही, माझं ठरलं आहे. मला हेच करायचं आहे." सारा आता पूर्ण आवेशात आली होती.

तिला तिचं स्वप्न डोळ्यासमोर दिसत होतं. बेडवर बसून बाहेर आईशी बोलताना तिची नजर संपूर्ण रूमभर फिरत होती. सगळीकडे लावलेले फोटो; जे तिने स्वतः काढले होते, कॅमेरा, कॅमेऱ्याच्या लेन्स, स्टँड आणि बरंच सामान तिच्या नजरेखालून जात होतं.

\"का आई असं सांगतेय? मला लहानपणापासून कधी अडवलं नाही आणि आत्ताच का?\" सारा मनातच विचार करत होती.

विचार करता करताच तिने बाजूच्या कॉर्नर पिसवर ठेवलेली एक फोटोफ्रेम हातात घेतली आणि ती तिच्याच विचारात गढून गेली होती. पुन्हा दारावर थाप पडली आणि ती भानावर आली.

"आईऽ मी सांगितलं ना, मी नाही येणार बाहेर." ती पुन्हा नाराजीच्या स्वरात म्हणाली.

"आई नाही मी आहे." बाहेरून आवाज आला.

त्या आवाजाने साराच्या डोळ्यात एक चमक आली. तिच्या सगळ्यात जवळचा तिचा दादा आला होता. आता नक्कीच दादा आपली बाजू समजून घेईल असं तिला वाटलं आणि तिने धावतच बेडवरून उठून दार उघडलं.

"दादाऽऽ" जवळ जवळ ओरडतच ती त्याला बिलगली.

समीर! साराचा सख्खा मोठा भाऊ. एकमेकांशिवाय त्यांचं पान हलायचं नाही. (कारण, नाहीतर मग भांडण कोणाशी करणार ना?)

"काय गं? आईला त्रास का देतेय?" त्याने विचारलं.

"अरे बघ ना ती मला फोटोग्राफीसाठी जाऊ नकोस म्हणून सांगतेय." तिने तक्रारीच्या सुरात आपल्या लाडक्या दादाला सांगितलं.

"एक काम कर, जा आधी फ्रेश हो आपण जेवता जेवता बोलू." तो म्हणाला.

"मला जेवायचं नाहीये. आई जोवर माझं ऐकत नाही मी जेवणार नाही." सारा म्हणाली.

"ठीक आहे. बस मग उपाशीच. फक्त एवढं लक्षात ठेव मीही अजून बी.पी.ची गोळी घेतली नाहीये आणि काही खाल्लं नाहीये." साराची आई नाराजीने म्हणाली.

आई आपल्याला ब्लॅकमेल करतेय हे तिला समजत होतं आणि तिला याच गोष्टीचा त्रास होत होता. ती अजुनही दारातच काहीही न बोलता उभी होती.

"सारा अगं चल जेवायला. आपण नंतर बोलू. आईची तब्येत आधी महत्वाची आहे." समीर म्हणाला.

तिची आई काहीही न बोलता तिथून निघून गेली आणि समीरने साराला बळजबरी तिच्या मागे पाठवलं.

"आईऽऽ सॉरी ना. चल तू बस मी वाढते तुला." सारा आईला मनवायचा प्रयत्न करत होती.

"बस जरा इथे." तिची आई गंभीर होऊन म्हणाली.

तिथेच असलेल्या डायनिंग टेबलवर सारा बसली. साराच्या आईने जेवायची ताटं घेतली, वाढलं आणि साराच्या बाजूला बसली.

"सारा! अगं आता तू मोठी झालीस ना? काय हा बालिशपणा तुझा? तू आज उपाशी म्हणून तुझे बाबा डबा न घेता गेलेत. आजी, आजोबांना औषध घ्यायचं असतं म्हणून मीच बळजबरी त्यांना चार घास खायला लावलेत. सगळ्यांना तुझी काळजी वाटते आणि तू असं वाग." तिची आई तिला थोड्या नाराजीने म्हणाली.

"सॉरी आई. पुन्हा मी असं नाही वागणार. मला अन्नावर राग काढून कोणालाही त्रास द्यायचा नव्हता, पण मग मला का तुम्ही सगळे शूटला जायला अडवताय? हेच तर वय आहे ना माझं करिअर करण्याचं, स्वतःला सिद्ध करण्याचं?" सारा आता वरमली होती आणि आईला स्वतःची बाजू नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती.

एवढ्यात समीर त्याचं आवरून आला. येता येता त्याने दोघींचं बोलणं ऐकलं होतं आणि आत्ता लगेचच विषयाला फाटे फोडायला नको म्हणून तो गप्प बसला होता.

"दादा, तू सांग ना रे आईला." साराने आता तिचा मोर्चा दादाकडे वळवला.

"आधी जेवू आणि मग बोलू." समीर म्हणाला.

\"दादाने ज्याअर्थी असं सांगितलं आहे म्हणजे काहीतरी जुगाड होईल. दादा आपली बाजू आईला सांगेल.\" असा विचार करून सारा गप्प बसली आणि तिघांनी निमूटपणे जेवण केलं.

जेवण झाल्या झाल्या साराने आधी आईला गोळी दिली. एरवी स्वयंपाक घरातसुद्धा न फिरकणारी सारा आज आईला मदत करत होती. तिलाही कळून चुकलं होतं; आपण जे वागलो आहोत त्यामुळे सगळ्यांनाच त्रास झाला आहे, म्हणून ती हे सगळं करत होती. लहानपणापासून एकदम लाडात वाढलेली सारा आत्ताच तिच्या मनाविरुद्ध वागतायत म्हणून उदास होती. काम करता करता तिच्या आईच्या मनःपटलावर जुने दिवस चित्रफितीसारखे फिरत होते.

\"लहानपणापासूनच सारा एकदम टॉम बॉय. शाळेत कोणी काही बोललं किंवा उगाच खोडी काढली की, इतर मुलं रडत रडत बाईंना किंवा पालकांना तक्रार करायचे, पण ही पठ्ठी तिथल्या तिथे चार बुक्के हाणून यायची. रोज तिला शाळेत सोडायला जायचं म्हणजे काहीतरी कंप्लेंट ऐकून घ्यायची तयारी ठेवूनच जायला लागायचं. वर्गातली सगळी मुलं तिला घाबरून असायची. एकदम बिनधास्त स्वभाव, परखड मते आणि अन्यायाला विरोध करण्याची धमक तिच्यात तेव्हापासूनच होती. जशी जशी ती मोठी होईल तशी जरा वरमेल असं तिच्या आईला वाटायचं, पण तिचा स्वभाव अजूनच निर्भिड झाला. मुळूमुळू रडणाऱ्यातली ती नव्हतीच. जराही नमतं घेणं तिच्या स्वभावात नव्हतं. पुढे हिचं कसं होणार?\" याच विचारात तिची आई गढली होती.

एवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि ती भानावर आली.

"साराऽ अगं काय हे? केलंस ना काम डबल. जा बघू तू आधी बाहेर बस." तिची आई तिला ओरडली.

साराच्या हातातून पाण्याचा तांब्या निसटला आणि सगळं पाणी सांडलं होतं. सकाळ पासूनच सारावर चिडलेली आई अजूनच चिडली. तोंडातल्या तोंडात; "काय ही पोरगी अशी?" असं पुटपुटत तिने साराला बाहेर पिटाळलं. समीर आणि आईने मिळून सगळं काम उरकलं आणि ते दोघं बाहेर आले.

"आईऽ सॉरी ना. पण प्लीज आता तरी तुम्ही मला परवानगी द्या. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय मी कशी हे सगळं करू शकणार आहे?" सारा पुन्हा आईला मस्का मारू लागली.

एव्हाना या सगळ्या गोंधळामुळे तिचे आजी - आजोबा पण बाहेर आले होते.

"अगं ढमे! किती वेळा सांगायचं तुला? हे काम तुला झेपणार नाही." तिची आजी म्हणाली.

"अगं आज्जी तू थांब गं जरा." सारा न कळत बोलून गेली.

"आधी आजीला सॉरी म्हण. ही बोलायची पद्धत आहे?" तिची आई तिला ओरडली.

साराने लगेच आजीची माफी मागितली आणि आता तिची आश्वासक नजर दादाकडे बघत होती.

"सारा! खरंतर आईला नाही मी तुला सांगतोय, तू पुन्हा विचार कर. तुला हे झेपणार आहे का? अगं तू म्हणतेस ते काम भलेभले करू शकत नाहीत." समीर साराला समजावत म्हणाला.

"मग काय तर. अगं पोरिंनी असं जंगलातल्या प्राण्यांचे फोटो काढत फिरणं बरं दिसतं का? आता तुझ्यासाठी आपण ते प्राणी इथे आणू शकणार आहोत का? तुला सतत कुठे ना कुठे फिरतीवर राहावं लागेल." त्याचं बोलणं ऐकून आजी अजूनच तिचा विरोध दर्शवत बोलू लागली.

"हो आजी! मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची आहे. आजकाल आता करिअरचे खूप पर्याय आहेत. त्यातलाच हा एक आहे. मला यात रस आहे तर मी हे काम एन्जॉयसुद्धा करेन." सारा तिची बाजू मांडत म्हणाली.

आजी काहीतरी बोलायला जाणार तोच आजोबांनी तिला हातानेच दोन मिनिटं शांत रहा म्हणून सांगितलं. थोडावेळ शांततेत गेला.

"आणि आई तूच म्हणतेस ना, तू आता मोठी झाली आहेस, स्वतःच्या जबाबदाऱ्या घ्यायला शिक, मग करू दे ना मला माझ्या मनासारखं." सारा म्हणाली.

"तू आता मोठी झाली आहेस याचीच जास्त काळजी आहे. अगं तू जे काम करायचं म्हणतेस त्यात आम्ही सतत तुझ्या भोवती नसू. आत्ता बाहेरच्या जगाच्या झळा तुझ्यापर्यंत आम्ही कधी पोहोचू दिल्या नाहीयेत. बाहेरचं जग जितकं रंगीबेरंगी दिसतंय ना, तितकंच ते एखाद्या मृगजळासारखं आहे." तिची आई तिला समजावत म्हणाली.

"आई माहीत आहे मला. आपण रोज बघतो बातम्या. पण तूच म्हणतेस ना, आपण कोणाचं वाईट केलं नाही की आपलंही वाईट होत नाही. मग?" सारा म्हणाली.

"ते सगळं छोट्या छोट्या गोष्टींसाठी. कलियुग आहे बाळा हे. इथे नाती - गोती माणसं विसरून जातात." मध्येच तिची आजी म्हणाली.

साराला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. तिला तिच्या दादा कडून एक अपेक्षा होती तीही आता मावळली होती, पण आता प्रश्न होता तिच्या जिद्दीचा, तिच्या निष्ठेचा! तिने काहीतरी विचार केला आणि बोलू लागली; "आई, माझ्याकडे एक पर्याय आहे. बघा तुम्ही सगळे मला फक्त सहा महिन्यांचा अवधी द्या. यात मी स्वतःला सिद्ध करू शकले तर ठीक नाहीतर तुम्ही म्हणाल ते मी करेन."

"हा आई. हे बरं वाटतंय. तसंही सहा महिन्यात सारा एवढं काहीही करू शकणार नाही. तिला आपलंच ऐकावं लागणार." समीर म्हणाला.

साराला त्याच्या या बोलण्याने खूप दुःख झालं. तिला आज स्वतःचाच दादा वैरी वाटत होता.

"नाही. कसलाही अवधी मिळणार नाहीये. तुझ्याकडे आता फक्त दोनच पर्याय आहेत, एकतर तुला ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची असेल तर माझं तोंड आयुष्यात कधी बघायचं नाही. दुसरा तुला फोटोग्राफी करायचीच आहे तर इव्हेंट मॅनेजमेंट कर." साराची आई म्हणाली आणि ती सरळ पिशवी घेऊन बाहेर गेली.

साराचे आजी - आजोबा पण आत निघून गेले आणि सारा सोफ्यावर तोंड पाडून बसली.

"सारा! मला वाटतंय तू आईचा दुसरा पर्याय निवड ना. तुला फोटोग्राफी करण्याचं समाधान मिळेल आणि तू आमच्या डोळ्यासमोर राहशील." समीर तिला समजावत म्हणाला.

ती काहीही बोलली नाही. समीर जेव्हा तिला जास्तच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होणं किती जोखमेचं काम आहे हे समजावू लागला तेव्हा ती बोलू लागली; "तुम्हा सगळ्यांना चांगलं माहीत आहे मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरीही स्वतःची नीट काळजी घेऊ शकते तरीही आई असं म्हणतेय. निदान तुझा तरी पाठिंबा मिळेल म्हणून एक अपेक्षा होती पण तोही नाही." ती तक्रार करत म्हणाली.

"आपली आई आहे ना ती. तिला आपली काळजी वाटणं साहजिक आहे. तू कितीही टॉम बॉय असलीस तरीही आमच्या सगळ्यांसाठी आमची छोटुशी साराच आहेस. तुला अजून जगातले छक्के पंजे कळत नाहीत, म्हणून आम्ही सगळे असं म्हणतोय ना?" समीर म्हणाला.

क्रमशः....
****************************
साराला तिचं स्वप्न पूर्ण करता येईल का? एक आई म्हणून साराच्या आईला वाटणारी काळजी योग्यच आहे पण ती काळजी तिच्या करिअरच्या आड येणार नाही ना? एक जगावेगळं स्वप्न उराशी बाळगून त्याच्या मागे धावताना साराची वाट कशी असेल? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all